🎆दिवाळी खरीखुरी🎆

 


दिवाळी' शब्द ऐकायला मिळाला की प्रत्येक जणच खुश होतो. प्रत्येक आर्थिक गटातला माणूस आपापल्या ऐपतीप्रमाणे हा सण साजरा करतो. अगदी आजराजाला दिवाळी माहित नसते' या उक्तीप्रमाणे वर्षभर खरेदी होत असली आणि वर्षभर विविध पदार्थांची चंगळ होत असली तरी 'दिवाळी' वेगळीच असते. साधं भारतातल्या कोणत्याही बाजारात दिवाळीच्या दिवसात एखादी चक्कर मारली तर त्या गर्दीत, दिव्यांच्या लखलखाटात हरवून जायला होतं. मन आनंदानं नाचायला लागतं. प्रत्येक जण दुःखाची काळी रात्र विसरत या सणाचं स्वागत करतो. या दिवसांचं पौराणिक महत्व प्रत्येकाला माहित आहे पण मी एक वेगळाच मुद्दा मांडायचा प्रयत्न करणार आहे.


दिवाळी नावातच दिवा आहे
. आजकाल विविध प्रकारचे लाईटच्या माळा बाजारात मिळतात. तरीही महत्व असतं ते इवल्याशा पणतीचं! धनत्रयोदशीला धनापाशी लावली जाते, वसुबारसेला गायी गोऱ्ह्याच्या गोठ्यात, नरक चतुर्दशीला शौचालयात आणि भाऊबीजेला दक्षिण दिशेला यमव्दितीयेची आठवण म्हणून ही पणती लावली जाते. लक्ष्मी पूजनाला तर अनेक पणत्यांची आवली लावली जाते तीच दीपावली....

का लावायची ही पणती? तिचा जीव एवढासा असतो पण देवालयाचा गाभारा प्रकाशमान करते. हीच पणती वीज नसेल तिथे सभोवताल उजळून टाकते. हीच पणती नदीपात्राची पण पूजा करते. खूप महत्व आहे या पणतीला. दिवाळीत सगळीकडे आनंदीआनंद का असतो बरं! त्याला कारण असं आहे की कोणीही निराश राहत नाही. सगळे आनंदी राहायचा प्रयत्न तर नक्की करतात. प्रवास, खाणंपिणं, मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी, नातलगांकडे येणं-जाणं यात मन रमून जातं. रोजच्या कटकटी,ऑफिसचे ताण, काही आजारपण,हे सगळं मागे टाकलं जातं, जरासं का होईना विसरण्याचा प्रयत्न केला जातो. हे सगळं घडतं या छोट्या पणतीमुळे...मनातला निराशेचे ढग घालवून तिथे आशेची, आनंदाची ज्योत ही पणती पेटवते. म्हणून सगळीकडे आनंदीआनंद नांदत असतो. निराशा घालवून द्यायची आणि आशेचा दीप लावायचा हे या पणतीचे काम ती चोख पार पाडते.


हे तत्त्वज्ञान माहीतही आहे
, पुष्कळ वेळा मांडलं जातं, पण मग आपलं काय, आपण काय शिकलो या पणतीकडून! पणती दुसऱ्याला उजेड द्यायला स्वतः जळते आहे, मग मी काय करायला हवंय... जिथे दुःख कायमच वस्तीला आहे तिथे आनंद द्यायचा प्रयत्न करूया.

ज्या घरात अकाली मृत्यू झालेला असतो, ज्या घरात कोणी कायमच दुर्धर रोगाने आजारी असतं अशा लोकांना ह्या सकारात्मकतेची, आधाराची, खूपच गरज असते. भर सणाच्या दिवसांत रुग्णालयात काही छोट्या मोठ्या कारणांमुळे भरती झालेल्यांनाही   दिवाळी निराशेची ठरू शकते. ज्यांच्याकडे कायमची दिव्यांग व्यक्ती आहे, ते धीराने राहत असतात. त्यांना दिवाळीच काय, कायमस्वरुपीच प्रफुल्लित करायची गरज असते. अनाथालय, वृद्धाश्रम, वा स्वतःच्याच घरी एकेकटी राहणारी माणसे, यांच्या जीवनातही छोटीशी आनंदाची झुळूक आपण आणू शकलो तर हा सण साजरा केला असे म्हणता येईल.


सगळ्यात महत्वाची आपली भारतीय सेना
. हे आपले जवान, अधिकारी - कोणताही दिवस असू देत आपल्या सेवेसाठी सदैव सज्ज असतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असो ते त्यांच्या कामात कसूर करत नाहीत, त्यांना दिवाळी नसते का? त्याना घर नसतं का? सगळं असतं पण ते न तक्रार करता जाणीवपूर्वक आपलं कर्तव्य पालन करत असतात, करत राहतात. अशा अनेक प्रसंगातून माणसं जात असतात. हे काहीच प्रसंग मी लिहिले आहेत. यातील माणसांचा विचार कोणी करायचा का नाही?

प्रत्येकाने स्वतःला विचारावं...का आपल्या घरापुरताच उजेड निर्माण करून आपलाच आनंद अनुभवायचा? विचार नक्की व्हायला हवाय. वर दिलेल्या एका समाजमित्राच्या चेहऱ्यावर जरी आपण आनंद फुलवू शकलो, एकाला जरी आधार देऊ शकलो तरी आपली खरी दिवाळी आपण साजरी करू असं मला वाटतं. आनंद वाटत जाणं यासारखं समाधान नाही.... हे फक्त बुद्धीचं दान मिळालेला माणूसच करू शकतो...

नरकासुराचा वध करून भगवंतांनी पीडित सृष्टीला जीवदान दिलं, वामन अवताराने बळीराजाचं पारिपत्य केलं असंच काहीसं आपल्याला जमेल एवढंच समाजऋण फेडायचा प्रयत्न करू या. परोपकाराची इवलीशी पणती प्रत्येक घरी तेवत ठेवू या. असं कार्य केल्याने जो आनंद मला मिळेल तो प्रत्येकालाच मिळू देत अशी प्रार्थनाही करू या!!

सगळ्या कट्टावासियांना शुभ दीपावली.....!

उर्मी निवर्गी




4 comments:

  1. Very well written. Pl keep it going. Good luck for beautiful writing.

    ReplyDelete
  2. खूपच छान लेख..... पणतीविषयी एगदम मार्मिक विचार....
    कायमच तुमच्या लेखातून उर्जा मिळणारे विचार असतात. अभिनंदन...
    दिपावलीच्या शुभेच्छा...!

    ReplyDelete
  3. कल्पना धर्माधिकारी, पुणे

    ReplyDelete
  4. उर्मी, दिवाळीसंदर्भातल्या गोष्टींबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणारा लेख ...

    ReplyDelete