डोळस भटकंती भाग-९- स्वर्गीय सौंदर्य-व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

 




कथा पांडवांची. पांडुकेश्वर या आपल्या जन्मस्थानी पांडव आले. तेव्हा अलकनंदा आणि लक्ष्मणगंगेच्या संगमावर, लक्ष्मणप्रयागला द्रौपदी स्नानासाठी आली असता तिने प्रवाहात वाहणारे एक सुवर्णरंगी फूल पाहिले. ते सुरंगी ब्रह्मकमळाचे फूल कुठून आले असेल याचा शोध घ्यावा असे तिने भीमाला सांगितले. भीम त्या फुलाच्या शोधात निघाला. आजूबाजूचे डोंगर, ओढे-नाले ओलांडत तो पुष्पगंगेच्या किनाऱ्याने एका लांबच लांब पण अरुंद अशा दरीमध्ये शिरला. हा सगळाच प्रदेश रंगीबेरंगी फुलांनी भरलेला होता. देवलोकीच्या त्या पुष्पसमुद्रातच त्याला ब्रह्मकमळांचा ताटवा मिळाला. तो तिथले फूल तोडणार तेवढ्यात ते देवांचे उद्यान राखणाऱ्या गंधर्वराज चित्ररथाने त्याला अडवले. भीमाने आपली ओळख त्याला सांगितली. द्रौपदीची या फुलांनी देवपूजा करण्याची इच्छा त्या गंधर्वाला सांगितली. चित्ररथाने मोठ्या आनंदाने भीमाला ब्रह्मकमळे नेण्याची अनुमती दिली. भीमानेसुद्धा आवश्यक तेवढीच फुले घेतली आणि त्या गंधर्वराजाचे आभार मानून निरोप घेतला. महाभारतात उल्लेख असलेली ही कथा, आणि ती जिथे घडली तो परिसर म्हणजेच हिमालयात बद्रीनाथजवळ असलेला व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा परिसर.


एप्रिल पासून बर्फ वितळू लागतं. जूनपासून उबदार वातावरण आणि हलकासा पाऊस होतो. मग गढवालमधली ही दरी हिरवी शाल पांघरून बसते आणि त्या शालीवर नाना रंगांची फुलं फुलून एक देखणं कशिदा तयार होतो. सप्टेंबरपर्यंत हा परिसर अशा असंख्य फुलांनी फुललेला असतो. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स किंवा पुष्पदरीला जाण्यासाठी दिल्ली-ऋषिकेश-जोशीमठमार्गे गोविंदघाटला (५९९५ फूट) यावे लागते. अलकनंदा आणि लक्ष्मणगंगा यांच्या संगमावर असलेल्या या ठिकाणाचे नाव लक्ष्मणप्रयाग होते. शिखांचे दहावे गुरु श्री गोविंदसिंह यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले त्यामुळे या जागेला गोविंदघाट म्हणू लागले. इथे गुरु गोविंदसिंहांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक गुरुद्वारा बांधलेला आहे. गोविंदघाटपासून पुढचा प्रवास पायी आहे. वाटेत ३ कि.मी. वर पुलना आणि त्यापुढे सात कि.मी. वर भ्युंदर (७३४३ फूट) ही छोटीशी गावे आहेत. भ्युंदरला काकभृशुंडीगंगा आणि लक्ष्मणगंगेचा संगम आहे. भ्युंदरच्या पुढे ५ कि.मी. वर घांगरिया (९९९७ फूट) येते. गोविंदघाट हे महाहिमाल रांगेत आहेत तर घांगरिया येते झांस्कर रांगेत. घांगरियाला मुक्कामाच्या सोयी आहेत. घांघरिया इथेसुद्धा गुरुद्वारा आहे. इथून दोन रस्ते जातात. एक रस्ता व्हॅली ऑफ फ्लॉवर्सकडे तर दुसरा रस्ता हेमकुंडकडे जातो.


पुष्पदरीतून येणाऱ्या पुष्पगंगेच्या काठाकाठाने आपण चालू लागलो की समोर १० कि.मी. लांब आणि ३ कि.मी. रुंद पसरलेल्या दरीत जागोजागी असंख्य फुले फुललेली दिसतात. हा सगळा भाग व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून ओळखला जातो. या सगळ्या प्रदेशाला रातबन, हाथी पर्वत, निलगिरी पर्वत, गौरी पर्वत, खिलीया घाटी अशा पर्वतांचा गराडा पडलेला आहे. १९८८ साली याप्रदेशाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. हिरव्या पार्श्वभूमीवर निळे जांभळे लाल केशरी पांढरे पिवळे गुलाबी अशा रंगांचे नैसर्गिक वाफे तयार होतात. या फुलांभोवती मधमाशांचा गुंजारव सुरु होतो, वाईल्ड मेरीगोल्ड मोठ्या डौलाने डोलत असतात. गुलाबी रंगांचे आणि एकेरी पाकळ्यांचे गुलाब इथे असतात. मध्येच तेरड्याने आपले डोके वर काढलेले दिसते. फुलांच्या रंगांची उधळण करायला इथे येतात बेगोनियाज, जरबेराज, डॅफोडिल्स, कॉर्नफ्लॉवर्स, ग्लॅडीओलस आणि असे असंख्य. थुम्मा, हाथजारी, रुद्रवंतीजारी, दीपजारी अशा औषधी वनस्पतीसुद्धा इथे दिसतात. दीपजारीचा उल्लेख कालिदासाने कुमारसंभवात केला आहे. खरंतर इथे आठ दिवस तरी राहायला हवं, पण ते शक्य नसतं म्हणून दोन दिवस तरी पुष्पदरीसाठी ठेवायला हवेत.


सन १९३१ साली २५४४७ फूट उंचीच्या कामेट शिखरावर जाण्यासाठी ब्रिटीश तुकडी प्रयत्नशील होती. परतीच्या प्रवासात त्यांचा मार्ग चुकला, आणि पाऊस व धुक्यामुळे ते एका दरीत शिरले. उघडीप मिळाल्यावर जो काही अफाट फुलांचा नजारा त्यांच्यासमोर होता त्यामुळे ते थक्क झाले. फ्रँक स्माईद याने याबद्दल विपुल लिखाण केले आहे. खरेतर या पुष्पदरीची माहिती स्थानिक तोल्छा भुतिया जमातीच्या लोकांना याची माहिती होतीच. पुढे १९३८ जोन मार्गारेट लेग्गी ही फ्रँक स्माईदचे पुस्तक वाचून इथे आली. नंदासिंग चौहान या वाटाड्याला घेऊन ती इथे फिरली. इथली पुष्पश्रीमंती पाहू ती वेडी झाली. तहानभूक विसरून ती ४ दिवस अभ्यास करत होती. पाचव्या दिवशी ती एका निसरड्या चढावरून पाय घसरून पडली आणि तिचा याच पुष्पदरीत अंत झाला. १९४१ साली तिचा स्मारकचौथरा तिच्या बहिणीच्या हस्ते बसवला गेला.




हिमालयात चालायची सवय असेल तर घांगरीयावरून ६ कि.मी वर असलेल्या लक्ष्मणकुंड किंवा हेमकुंडसाहिबला (१४१९९ फूट) जावे. शिखांचे हे पवित्र ठिकाण. याबद्दल पण निरनिराळ्या कथा प्रचलित आहेत. लोकपाल सरोवराजवळ लक्ष्मण मंदिर आहे. बाजूलाच गुरुद्वारा आहे. वाटेत ब्रह्मकमळाची अनेक फुले दिसतात. त्यांचा वास उग्र असून त्यामुळे डोके दुखू शकते. हेमकुंडसाहिबला गरमागरम चहा आणि अप्रतिम मुगाच्या डाळीची खिचडी मिळते.



हा सगळाच परिसर भटक्यांचे नंदनवन आहे. औली, बद्रीनाथ, माना, वसुधारा धबधबा या सगळ्या गोष्टी एकाच भेटीत बघता येतात. हल्ली होणाऱ्या भूस्खलानामुळे किमान दोन दिवस जास्तीचे ठेऊन या प्रदेशात यावे. मनसोक्त भटकावे आणि इथल्या फुलांच्या रंगांची रंगपंचमी मनसोक्त अनुभवावी. 


आशुतोष बापट 

 

1 comment:

  1. खरंच नंदनवन !
    खूप छान लेख आणि माहिती आशुतोष :)

    ReplyDelete