डोळस भटकंती – भाग २ - पर्यटन दीपगृहाचे


दीपगृह

एकविसावे शतक हे पर्यटनाचे शतक मानले जाते. जगभरच्या पर्यटनाला वेगवेगळे आयाम मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. भारतसुद्धा त्याला अपवाद नाही. अनेकविध क्षेत्रे पर्यटनाद्वारे विकसित होत आहेत. नुसत्या महाराष्ट्राचा विचार केला तरीसुद्धा धार्मिक पर्यटन, किल्ले पर्यटन, वारसा पर्यटन, साहसी पर्यटन असे पर्यटनाचे विविध पैलू विकसित होताना आपल्याला दिसतात. महाराष्ट्राला लाभलेला ७५० कि.मी. चा समुद्रकिनारा या पर्यटन क्षेत्रात मोलाची भर टाकतो आहे. सागरी पर्यटन हे नव्याने विकसित होऊ लागलेले क्षेत्र पर्यटकांना भुरळ पाडते आहे. महाराष्ट्रात सागर म्हटले की ओघानेच कोकण हा प्रांत डोळ्यासमोर येतोच. सागरी महामार्ग, कोकण रेल्वे, कोकणातल्या सड्यावर दिसणारी कातळ खोद-चित्रे, सुंदर समुद्रकिनारे आणि तिथे होणारे साहसी खेळ यामुळे कोकणात पर्यटनाच्या विविध संधी आणि सुविधा निर्माण झालेल्या आहेत. 

दीपगृहा च्या दिव्या च्या  आतील  भाग 

कोकणच्या पर्यटनाचा अजून एक आयाम विकसित होऊ शकतो तो म्हणजे कोकणात असलेल्या दीपगृहांचे पर्यटन. समुद्रामुळे अगदी प्राचीन काळापासून कोकणात विविध लहान मोठी बंदरे निर्माण झाली. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. बंदरे निर्माण झाली तशीच दीपगृहांची निर्मिती सुद्धा अनिवार्य होती. समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी ही दीपगृहे बांधली गेली. ही दीपगृहे कायमच पर्यटकांच्या दृष्टीने लांब राहिली. कदाचित पूर्वी काटेकोर नियमांमुळे यांचे दर्शन फक्त लांबूनच होत असेल. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. ही दीपगृहे सर्वसामान्य लोकांना ठराविक वेळेत बघता येतात. अगदी आतमध्ये वरपर्यंत जाऊन पाहता येतात. त्यांचे कामकाज असे चालते हे तिथे आपल्याला सांगितले जाते. रत्नागिरी हे कोकणातील देखणे गाव आता पर्यटनाच्या नकाशावर हल्ली अगदी ठसठशीतपणे उठून दिसते. रत्नदुर्ग
, आजूबाजूचे देखणे समुद्रकिनारे, हापूस आंबा, स्कूबा डायव्हिंग सारखे साहसी खेळ यासाठी रत्नागिरी प्रसिद्ध होते आहे. 

दीपगृहा च्या आतील दिवे 
याच रत्नागिरी पर्यटनामध्ये इथे असलेले दीपगृह अवश्य पाहिले पाहिजे. इ.स. १८६७ साली इंग्रजांनी या दीपगृहाची निर्मिती केली. याची उंची ९० फूट असून त्यावर १२ फुटाचा दिव्याचा प्रकाश पाडणारा मनोरा आहे. संध्याकाळी ४ ते ५ या वेळातच हे दीपगृह सर्वसामान्यांना पाहता येते. प्रवेश फी १० रुपये आणि कॅमेऱ्यासाठी २० रुपये आकारले जातात. काळ्या आणि पांढऱ्या आडव्या पट्ट्यांनी रंगवलेला हा मनोरा. याच्यावर जी दिव्याची बत्ती असते तिच्या डोक्यावर केशरी रंगाचीच टोपी असली पाहिजे असे संकेत आहेत. मनोऱ्याची रंगसंगतीसुद्धा ठरलेली असते. काळा, पांढरा आणि केशरी हे रंगच प्रामुख्याने दीपगृहासाठी वापरले जातात. याच रंगांची संगती साधून दीपगृह बांधले जाते. क्वचितप्रसंगी सबंध पांढऱ्या रंगाचे दीपगृह पाहायला मिळते. या रंगांच्या रंगसंगतीवरून त्यांचे ठिकाण दूर समुद्रातून सुद्धा ओळखले जाते. रात्रीच्या वेळी या दीपगृहातून लांबवर पडणारा प्रकाशाचा झोत फारच आकर्षक दिसतो. त्यासाठी फक्त १५० वॅटचे २ दिवे काम करतात. परंतु त्यांच्या चारही बाजूंनी लावलेल्या काचपट्टी लोलकामुळे (ग्लास प्रीझम्स) प्रकाशाचा झोत तयार होतो आणि तो २५ ते ३० कि.मी. इतका लांबवर पडतो. रत्नागिरीच्या दीपगृहातून प्रत्येक १० सेकंदात २ वेळा याचे आवर्तन होते. ही आवर्तने जागतिक नियमांनुसार ठरलेली असतात. अशा प्रत्येक दीपगृहातून पडणाऱ्या प्रकाशझोताची आवर्तने ठरलेली असतात. समुद्रातून जाणाऱ्या जहाजावरील लोकांकडे या आवर्तनांचा तक्ता असतो. त्यावरून आपण सध्या कुठल्या बंदराच्या जवळून प्रवास करतो आहोत याचे ज्ञान दर्यावर्दी मंडळींना होते. 


वेंगुर्ला दीपगृह

रात्री किती वाजता ही दीपगृहे कार्यरत होणार आणि सकाळी किती वाजता बंद होणार  याचे प्रत्येक महिन्याचे वेळापत्रक ठरलेले असते. एकही दिवस सुट्टी न घेता वर्षानुवर्षे ही दीपगृहे कार्यरत असतात. वीजपुरवठा बंद झाला तर डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि शिवाय सौरउर्जेवर चालणाऱ्या बॅटऱ्या अशी सर्व चोख व्यवस्था इथे केलेली असते. या दीपगृहांची सर्व माहिती देण्यासाठी कोणा व्यक्तीची इथे नेमणूक केलेली असते. गावापासून दूर एका टोकाला असलेल्या आणि सर्वसामान्य माणसांपासून अगदी लांब असलेल्या या दीपगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथासुद्धा आपल्याला इथे ऐकायला मिळतात. ऊन-वारा-पाऊस कितीही असला तरी दीपगृहाच्या कामकाजात कधीही खंड पडत नाही. रत्नागिरी सोबतच जयगड इथे असलेले दीपगृह असेच देखणे आहे. त्याचा रंग पांढरा आणि लाल अशा पट्ट्यांचा आहे. त्यावर असलेली टोपी मात्र केशरी रंगाचीच असते. तसेच वेंगुर्ला इथे दोन दीपगृहे आहेत. एक किनाऱ्यावर आहे तर दुसरे समुद्रात असलेल्या वेंगुर्ला रॉक्स या छोट्या बेटावर उभारलेले आहे. याला बर्टं रॉक्स असेही नाव आहे. इ.स. १८०० मध्ये ब्रिटिशांनी बांधलेले हे पहिले दीपगृह. इथे बाकी काही सामुग्री उपलब्ध न झाल्यामुळे लाकडाचा मोठा ओंडका जाळून उजेड केला जाई. आजही पावसाळ्याचे ३ महिने इथे वेंगुर्ल्याहून जाणे-येणे बंद असते. तीन महिने इथले कर्मचारी या बेटावरच राहतात. काही ठिकाणी दीपगृहे ही लोखंडी सांगाड्यावर उभी आहेत. अशी काही दीपगृहे तामिळनाडूमध्ये बघायला मिळतात. कै. गोपाळ बोधे यांनीपोर्ट्रेटस ऑफ इंडियाज लाईट हाऊसेस – ए व्ह्यू फ्रॉम हेवन्सअसे १३६ पानांचे रंगीत हवाई फोटोंनी सजलेले सुंदर पुस्तक २००६ साली प्रसिद्ध केले.  त्यामध्ये भारतातील महत्त्वाच्या दीपगृहांची विमानातून काढलेली प्रकाशचित्रे छापली आहेत. नुसत्या अंदमान-निकोबार बेटांवर तब्बल २८ दीपगृहे आहेत हे सुद्धा त्या पुस्तकामुळेच समजते. 

जीपीएस सारख्या अत्याधुनिक संपर्कयंत्रणा जरी आता अस्तित्वात आल्या असल्या तरीसुद्धा आपले पाय जमिनीवर रोवून वर्षानुवर्षे दर्यावर्दी लोकांना दिशा दाखवण्याचे काम आजही ही दीपगृहे करत आहेत. किनारी भागातल्या आपल्या पर्यटनात अशा दीपगृहांना अवश्य भेट द्यायला हवी. दीपगृहाचे पर्यटन हा एक नवीन आयाम पर्यटन क्षेत्राला लाभलेला आहे.  


आशुतोष बापट





      

 


1 comment: