मनुष्याला इतिहासात डोकवायला नेहमीच आवडते. आपले पूर्वज कोण होते, कसे होते, त्यांनी काय कामगिरी करून ठेवलेली आहे, आपल्यापर्यंत कुठला वारसा येऊन पोचला आहे याचे कुतूहल मानवाला नेहमीच वाटत आलेले आहे. आपल्या पूर्वजांचा इतिहास, त्यांची विचारसरणी, त्यांचे राहणीमान याचा अभ्यास याच कुतूहलापोटी आजही जगभर केला जातो. पुरातत्व, प्राच्चविद्या, वारसा संवर्धन अशी वेगवेगळी नावे त्या अभ्यासाला दिलेली दिसतात. नावे कितीही वेगळी असली तरीसुद्धा पूर्वजांबद्दलचे कुतूहल हीच या सगळ्या अभ्यासामागची प्रेरणा दिसते.
याच कुतुहलापोटी आणि त्यातून होत असलेल्या अभ्यासापोटी अनेक आश्चर्यकारक गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत, आणि आजही येत आहेत. प्राचीन काळातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे, त्याच्या कलांचे पुरावे जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. आणि आपण अगदी सहजगत्या त्या काळाशी जोडले जातो.
वर्तमानाचा विसर पडतो आणि आपण हजारो वर्षे मागे जातो. भीमबेटका, तिथली आदिमानवाने काढलेली गुहाचित्रे आणि त्या चित्रांचा शास्त्रोक्तपणे केलेला अभ्यास, या सगळ्याच गोष्टी काहीशा अगम्य, अतर्क्य आणि म्हणूनच आश्चर्यकारक म्हणायला हव्यात. शिलाश्राय म्हणजेच गुहांमधील वास्तव्य. मनुष्य जेव्हा भटका होता, घरे बांधून राहण्याचे कसब अजून आत्मसात व्हायचे होते, त्याकाळात त्याचा मुक्काम हा डोंगरातील नैसर्गिक गुहांमध्येच होत असे. त्याच गुहांमध्ये त्या मानवाने काढलेली चित्रे हे त्याच्यातील कलाकाराचे दर्शन घडवतात. असा आदिमानवाचा एक सुंदर अविष्कार आपल्याला मध्यप्रदेशातील भीमबेटका इथे पाहायला मिळतो.
मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या दक्षिणेला ४५ कि.मी. वर आहे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेले भीमबेटका! भारतात आदिमानवाच्या वस्तीचे आणि त्यांच्या कलेचे पुरावे इथे चित्ररुपात पाहायला मिळतात. इथे असलेल्या शैलगृहात आदिमानवाने चितारलेली रंगीत चित्रे मोठ्या संख्येने रंगवलेली आहेत. हे खरे तर एक आश्चर्यच म्हणावे लागेल. या गुहांचा शोध लावण्याचे श्रेय मराठी माणसाकडे जाते. डॉ. विष्णू श्रीधर उर्फ हरीभाऊ वाकणकर या पुरातत्वज्ञाने ह्या गुहा शोधून काढल्या. एकदा हरिभाऊ वाकणकर या परिसरात रेल्वेतून प्रवास करताना डोंगरात काहीतरी गुहासदृश खोदलेले दिसले. स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत आणि आत जनावरे असतात असे कळले. तिथे जायचे तर जवळ स्टेशन कुठले अशी चौकशी हरीभाउंनी केली, पण याठिकाणी रेल्वे थांबत नाही असेही त्यांना समजले. पण जवळच असलेल्या रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडीचा वेग कमी झाला असता वाकणकरांनी बाहेर उडी मारली आणि त्या गुहांच्या शोधार्थ ते निघाले. त्यानंतरच्या काळात हरिभाऊ सतत तिथे जात राहिले आणि त्यांनी या चित्रांचा सखोल अभ्यास केला. सतत जाऊन अभ्यास करणे हे देखील काही सोपे नव्हते.
समोर फक्त गुहा आणि त्यात काढलेली चित्रे याव्यतिरिक्त कुठलाही दुसरा संदर्भ तिथे नव्हता. ना त्याबद्दल सांगायला तिथे कोणी होते. मुख्य रस्त्यापासून गुहेपर्यंत जायचे ते केवळ चालतच.
हरीभाऊ वाकणकर |
हरीभाऊ वाकणकरांनी ज्या काळात ह्या गुहाचित्रांचा अभ्यास केला त्यावेळी तर कुठलीच सुविधा तिथे उपलब्ध नव्हती. जेवायचे म्हणजे सुद्धा सोबत बटाटे घेऊन जायचे आणि तिथे वाळूत ते पुरायचे. दुपारी ते बटाटे उकडलेले असत, तेच जेवण म्हणून जेवायचे असा व्रतस्थपणे त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन सन १९७५ मधे त्यांना भारत सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरवले. हरिभाऊ वाकणकरांच्या नावाने एक संशोधन संस्था उज्जैन इथे उभारलेली आहे. मध्यप्रदेशाच्या रायसेन जिल्ह्यातली भीमबेटका हे ठिकाण जवळजवळ ७ डोंगरांवर विखुरलेले आहे. या परिसरात ७५० पेक्षा जास्त शैलगृहे (रॉक शेल्टर्स) विखुरलेली आहेत. पुरातत्वज्ञांच्या मते ही शैलगृहे अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. या गुहांमध्ये विविध प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीची दृश्ये अशी आदिमानवाने त्याच्या आयुष्यात पाहिलेल्या प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली दिसतात.
वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांमध्ये ही चित्रे रंगवलेली आहेत. पांढरा आणि लाल रंगांचेच प्राबल्य मोठ्या प्रमाणावर दिसते. हत्ती, बारशिंगा, गवा, हरीण हे प्राणी चितारलेले पाहायला मिळतात. शिकारीच्या दृश्यात भाला, काठी यासारखी हत्यारे वापरलेली दिसतात. या चित्रांचा कालावधी ३०,००० वर्षे जुना सांगितला जातो. इथे असलेल्या विविध गुहांपैकी एक गुहा वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिला ऑडिटोरियम गुहा असे म्हटले जाते. क्वार्टझाईट जातीच्या खडकांचे स्तंभ चारही बाजूनी उंचावलेले असून त्याच्या आतमध्ये एखाद्या मोठ्या सभागृहासारखी तयार झालेली ही गुहा हे इथले खास वैशिष्ट्य.
रेखा आणि चित्रे याचा मानवाशी असलेला संबंध हा अतिशय प्राचीन आहे. मानवाचा मेंदू विकसित होत असताना त्यात कलेची जाणीव सुद्धा प्रगल्भ होत होती. त्यातूनच रेषा आणि चित्रे यांची निर्मिती होत गेली. मानवाच्या मनातील भावना तो शब्दातून व्यक्त करण्याअगोदर त्याने रेषांतून व्यक्त केल्याचे आपल्याला भीमबेटका इथे पाहायला मिळते. मानवाच्या सृजनशीलतेचे ते एक प्रतीक आहे. त्याची व्यक्त झालेली भावना आपल्याला चित्रातून पाहायला आणि अनुभवायला मिळते. मराठी माणसाच्या चौकस बुद्धीमुळे तर हा सगळा खजिना आपल्यासमोर आज उघडा झालेला दिसतो. रेल्वे प्रवासात डोंगरात दिसलेल्या गुहा. सहज कुतूहलापोटी सहप्रवाशांकडे केलेली त्याची चौकशी. आणि त्याचा शोध लावायचाच या झपाटलेपणातून, या सगळ्या कलेचा अभ्यास करण्याच्या ध्यासातून केले गेलेले सखोल संशोधन ह्या सगळ्याच गोष्टी अफलातून आहेत.
भीमबेटका इथे गेल्यावर जसे आदिमानवाच्या कलेचे कौतुक वाटते तितकेच कौतुक ते शोधून काढणाऱ्या डॉ. हरिभाऊ वाकणकरांचे वाटते. त्यांच्या अथक परिश्रमातून हा रेषा आणि चित्रांचा आपला वारसा आज आपल्यासमोर मोठ्या दिमाखात उभा आहे.
आशुतोष बापट
प्रत्येकाने आवर्जून पहाव्या अशा या गुफा आहेत भिंमबेटका पासून जवळच आणखीन काही गुहा आहेत त्या पण अप्रतिम आहेत
ReplyDelete