दुःखकालिंदी




ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असणार. पैकी बरेच जण प्रथमच नमतं घेऊन एखादी प्रसिद्ध सार्थ व सटीप ज्ञानेश्वरी हाती घेतात. त्यातले काही जण, ही आवृत्ती चाळून झाल्यावर आधीची नम्र भूमिका विसरतात आणि याचं मुख्य कारण म्हणजे आधी जे नमतं घेतलेलं असतं ते जाणीवपूर्वक नसतं. मग हळूहळू समजुतीला अधिकाराची धार येत जाते. आणिसमजेतून स्वतःच्या अनुभवाकडेयाऐवजीसमजेतून इतरांना शिकवण्याकडेअसा हा प्रवास सुरू होतो.
काही जण फक्त सार्थ आवृत्ती शोधतात. इथे अडचणी सुरू होतात.

ज्ञानेश्वरी वाचतानाची पहिली व सर्वांत सोपी अडचण म्हणजे शब्दार्थ. अर्थात हा संदर्भ सहज उपलब्ध. सार्थ आवृत्तीत तर तिथल्या तिथेच उपलब्ध.

पुढची अडचण म्हणजे तत्कालीन भाषेचे संदर्भ व तत्कालीन व्याकरण. इथे फार चिकाटीने नेट लावावा लागतो. सार्थ आवृत्ती इथेही कामी येते; पण.... पण जर ती आवृत्ती अनन्यभावे शरण जाऊन वाचली तर जास्त चिकाटीची आवश्यकता नाही. अर्थात ज्ञानेश्वरांना अनन्यभावे शरण जाणं वेगळं व एखाद्या आवृत्तीप्रती अनन्यभाव बाळगणं वेगळं. तिथे अन्य आवृत्त्या व पाठभेद आहेत याचं भान ठेवलं, की तुमच्या चिकाटीची परीक्षा सुरू होते. राजवाडेंचं ज्ञानेश्वरीतील मराठीच्या व्याकरणाचं विस्तृत विवेचन वाचलं, अर्थाच्या अनर्थाची उदाहरणं वाचली, की मनातला संशयसूर्य कासराभर उंच उगवून तळपू लागतो. मग तुमचा बराच वेळ पाठाची शुद्धता व अर्थामागचा तर्क तपासण्यात जाऊ लागतो व हिरीरी कमी होते. मग कोणी ॐ नमोजी आद्या ही गणपतीची प्रार्थना म्हणून गाऊ लागलं, तरी त्याकडे सहज दुर्लक्ष होऊ लागतं. याहीपुढे नेट धरायला अपार मनोबल हवं. ते एक तर निखळ श्रद्धा पुरवतं किंवा अपार कुतूहल... ज्ञानपिपासा म्हणा हवं तर, कुतूहल हा सामान्य शब्द वाटला तर.

पण अर्थात परिणाम तोच - अर्थ, संदर्भ व विवेचनांचे कंदील हातात घेऊन ज्ञानेश्वरीच्या निबिड जंगलात आपली वाट शोधायची. आपली वाट! आपली वाट दुसऱ्या कोणाबरोबर जुळली म्हणून फार आनंद नको आणि स्वतंत्र राहिली म्हणून निराश व्हायला नको. या वाटेवर किती पुढे जाऊ काय माहीत; पण एवढं तर निश्चित की हे जंगल असामान्य आहे आणि कुठल्याही लहानमोठ्या वाटेवर जे काही थोडं-फार हाती लागेल ते असामान्यच असेल!

आता एक छोटंसं उदाहरण.

मोक्ष, तत्त्वज्ञान वगैरे थोडक्यांचीच मिरासदारी; पण मराठी भाषा? ही तर आपण सारेच वापरतो. या भाषेचं सौंदर्यही नवनव्या स्वरूपात इथे भेटत राहतं.

अकरावा अध्याय विश्वरूपदर्शनाचा. प्रत्येक मूळ संस्कृत श्लोकापुढे त्याचा विस्तार. नुसता नाही. भारतीय संगीताची उपमा द्यायची तर - संस्कृत श्लोक ही रागाची पकड असेल तर ज्ञानेश्वरांच्या ओव्या ही उपज - नियमाधारित प्रतिभाविलास - आहे. विश्वरूपदर्शनाच्या अनंत बाहू, कराल दाढा व आत भरडून निघणाऱ्या माणसांच्या वर्णनाची उपज करून झाल्यावर शेवटी ज्ञानेश्वर त्या असामान्य उपजेला दैवी प्रतिभेचा स्पर्श बहाल करतात -

हे बापडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी ।
आणि दुःखकालिंदीचिये तटी । झाड होऊन ठेली ॥ ३४७/११

नुसत्या दृष्टिक्षेपानेच ही बापडी लोकसृष्टी दुःखकालिंदीचिये तटी झाड होऊन ठेली!


दुःखकालिंदी! त्या भारतीय युद्धापासून ते अगदी आता-आतापर्यंत, किती युद्धं, किती संहार या यमुना नदीने पाहिला त्याला सुमार नाही. पुराणकथांमध्ये डोकावलं, तर तिने कालियाही साहला. बलरामाचा रागही सहन केला. कृष्णाचं सावळेपण अंतरी साठवून सारं सोसलं. ती दुःखकालिंदी!

आणि इथे, श्रीकृष्णाच्या रौद्रभीषण विश्वरूपाने भयभीत होऊन अर्जुन म्हणतोय, की

नेणों कैसे आले भयाचे भरतें, आता दुःखकल्लोळी झळंबते तिन्ही भुवनें.

असं हे दुःख-भयाचं भरतं आहे, की त्रिलोकात कुठेही या दुःखकल्लोळाचा दाह व्हावा. हे पृथ्वीपासून आकाशापर्यंत दशदिशांना व्यापणारे आणि अनेक तोंडे, डोळे, हात, पाय व उदरे असलेले कराल दाढांचे विक्राळ स्वरूप पाहून ही बापडी लोकसृष्टीही दीनवाणी होऊन झाडाप्रमाणे निश्चल झाली आहे. चित्रासारखी निर्जीव निश्चल नाही.

नदीचं वाहतेपण वापरून बनवलेले शब्द आपल्याला अगदीच अपरिचित नाहीत. आपण ज्ञानगंगा हा शब्द ऐकलेला असतो. भारतीय मनात वसणारा गंगेविषयीचा पूज्य भाव या शब्दाला ती उंची, पावित्र्य बहाल करत असतो. जीवन सरिता हाही शब्द काही नवीन नाही. जीवनाचं वाहतेपण दाखवणारा.

हा इथला जोडशब्द याहून खोल संदर्भ घेऊन अवतरतो. श्रीकृष्णाच्या या भीषण विश्वरूपात दिसणाऱ्या सतत विदारक संहारातून सतत अवतरणारं दुःख हे वाहतंय. आणि कृष्णाच्या साहचर्याने गोकुळ, वृंदावन, मथुरा जितकं सहज आठवावं तशीच आठवते यमुना किंवा कालिंदी. तीही अशीच संहाराचं दुःख घेऊन वाहणारी. तीच दुःखकालिंदी.

आणि तिच्या तीरावर बापुडवाण्या लोकसृष्टीचं हे निश्चल झाड! कालियाचं वास्तव्य असताना यमुनेकाठची झाडं त्या विषाने मृतप्राय होऊन काठाशी गलितगात्र उभी असल्याची प्रतिमाही क्षणभर मनात उमटल्यावाचून राहत नाही.

या प्रतिमेला सर्वांगाने मनात उभं करणं हे प्रयासाचं काम आहे; पण ओवी अनुभवायची असेल आणि आपली वाट शोधायची असेल तर ते आवश्यक आहे.


कौस्तुभ आजगांवकर


3 comments:

  1. You have explained it in a simple way. Dukhha kalindi kiti gudh shabd. Ek katarwel ch

    ReplyDelete
  2. खूप छान लेख. ज्ञानेश्वरी वाचणं वर वर सोपं वाटलं, तरी एखाद्या ओवीमध्ये सुध्दा अर्थाच्या किती छटा असू शकतात हे हा लेख वाचून अगदी पटलं. चतुरस्र वाचन आणि विचार मंथन केलेलं असेल तर त्याची अशा वाचनाला किती मोठ्या प्रमाणावर मदत होईल हेसुध्दा जाणवलं. माझ्या मते हा लेख म्हणजे दुःखकालिंदीचं रसग्रहण म्हणता येईल.

    तुमचं आणखी लिखाण वाचायची उत्सुकता नक्कीच वाढली आहे!

    ReplyDelete