एक अनमोल आठवण

 




१७ एप्रिल २००४ रोजी "राजमान्य राजश्री" बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळा, जुहू, मुंबई येथे संपन्न झाला. बाबासाहेब यांच्या स्नुषा सौ. चित्रलेखा पुरंदरे यांनी लिहलेल्या पुस्तकास प्रकाशक श्री वाळिंबे सर हे लाभले होते. पुस्तक (ग्रंथ) चांगला दर्जेदार व्हावा, या संकल्पनेतून रचना व छपाईची जबाबदारी आमच्यावर सोपवली. बाबासाहेबांच्या या उपक्रमात आमचा हातभार लागणार हे आमचे भाग्यच होतं.

 


आम्ही सर्वांनी अगदी मनापासून काम केले आणि हा पुस्तक रुपी ग्रंथ तयार झाला. प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण अर्थातच आम्हाला आले होते. प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे ते नाव वाचून आम्हाला प्रचंड आनंद झाला. संगीतसम्राज्ञी लता मंगेशकर ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

 

आम्ही शहा कुटुंबीय त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. आम्हाला दुसऱ्या रांगेत बसायला सांगितले होते. आमच्या पुढच्या रांगेत लता दीदी बरोबर संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय स्थानापन्न झाले होते. कार्यक्रमाच्या दरम्यान लता दीदींनी काही भक्ती गीतं गायली. त्यांचा जादुई आवाज असा समक्ष ऐकायला मिळणे ही एक स्वर्गीय अनुभूती होती. मुद्रक या नात्याने आम्हाला व्यासपीठावर बोलावण्यात आले. भारतरत्न, गान कोकिळा लता दीदी यांच्या हस्ते आम्हाला गौरवण्यात आले. त्यांच्या बरोबर व्यासपीठावर नुसते उभे राहणे हाच आमच्यासाठी मोठा सन्मान होता. 



लता दीदींना पुस्तकाची बांधणी आणि छपाई आवडली आणि त्यांनी तसा  आवर्जून उल्लेख केला. आम्ही त्यांना साताऱ्याचे प्रसिद्ध कंदी पेढे दिले. त्यांना सातारा आवडते आणि बऱ्याच वेळेला कोल्हापूरला जाताना त्या साताऱ्याला येतात हे ऐकून आम्हाला खूप छान वाटले. जवळपास २:३० - ३ तास आम्हाला लता दीदी व मंगेशकर कुटुंबीयांचा सहवास लाभला. असे भाग्य आमच्या नशिबी आले यातच आमच्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणेन.

 

तो दिवस आणि ते २:३० - ३ तास आमच्यासाठी खूप अनमोल क्षण आहेत आणि आमच्या आठवणीत कायम राहतील.

 

जतीन शहा

सातारा




1 comment:

  1. Good memories Jatin.
    You and Prashant are very lucky to meet her in person
    cheers

    ReplyDelete