एक होता फेंगाड्या


अरुण गद्रे

"एक होता फेंगाड्या" ही अरुण गद्रे लिखित कादंबरी देशमुख आणि पब्लिशर्स ह्यांनी १९९४ मध्ये छापली. 


माणसाच्या संस्कृतीच्या प्रगतीचा अंदाज सहसा उत्खननात सापडलेल्या भांड्यांवरून - शस्त्रांवरून लावतात. माणसांच्या सांगाड्यांवरून, सांगाड्यांच्या अवशेषांवरून ती माणसं जिवंत असताना कशी जगली असतील ह्याचा अंदाज बांधता येतो. अशा उत्खननात सापडलेल्या हाडावरून सुचलेली "एक होता फेंगाडाची गोष्ट डॉ.अरुण गद्रे ह्यांनी सांगितली आहे. मानववंशशास्त्रज्ञ डॉ.मार्गारेट मीड ह्यांच्या एका वाक्यावर कादंबरीचा डोलारा उभा आहे. डॉ.मीड म्हणतात, 'मोडून पुन्हा जुळलेलं मांडीचं हाड' ही मानवी संस्कृतीची पहिली खूण आहे.

आधी रानावनात शिकार करून जगणारी एकटीदुकटी माणसं कळपात राहायला लागली. थंडी-वारा-पावसापासून बचाव करायला, नैसर्गिक गुहांमधून राहाणारी माणसं झोपड्या बांधून राहायला लागली. आपोआप उगवलेली फळं-धान्यं खाता खाता रांधू लागली, शेती करायला शिकली. आधी आपापल्यापुरतं जगणारी, स्वत:चा जीव जगवणारी माणसं हळूहळू एकमेकांसोबत जगायला लागली. कळपाच्या वस्त्या झाल्या. गावे वसली. माणसाच्या विश्वात झालेले हे मोठे स्थित्यंतर कसं झालं असेल, आदिमानवाचा माणूस कसा झाला असेल ह्याची सुरस कहाणी हे पुस्तक आपल्याला सांगते.

माणूस होण्याच्या आधी आदिमानव एकमेकांच्या संगतीत-संपर्कात कमी येत असत, म्हणून की काय ह्यातल्या व्यक्तिरेखांना ठेवलेली नावं नाहीत.त्यांच्या शारीरिक ठेवणींवरून आपोआप पडलेली नावं आहेत. फेंगाड्या तर आहेच, पण लुकड्या, लांबटांगी, पायड्या, पांगळ्या, कोमल, झिंजी, उंचाडी, पाषाण्या, झिपऱ्या, लाल्या अशी ही नावे. त्यांच्या वस्त्यांची नावं माणूसबळी टोळी, वाघोबा वस्ती, धानवस्ती अशी. देव कोण? तर ओंडक्या देव. त्याचं ठिकाण म्हणजे एक झाड. त्यांची बचावाची साधनं कोणती? तर दगड, काठ्या, हाडं, ठो-ठो करून जोरात बोंबलणं(ओरडणं). मात्र ह्या सगळ्यामुळे वाचताना आपण सहज त्या काळात जातो. सोबत एक साधा नकाशाही जोडला आहे. गोष्टीतली माणसं जिथं वावरतात ती नदी, डोंगर, धानवस्ती, वाघोबावस्ती हा परिसर त्यात दाखवला आहे. भाषाही साजेशी. अमावास्येला म्हटलं आहे, 'चंद्र नाही दिवस'.

माणसाच्या इतिहासात प्रथमच कोणीतरी एका हाडमोडक्या माणसाला जंगलात एकटं मरायला टाकलं नाही. आजच्या आधुनिक काळात मांडीचं हाड जुळून यायला प्लास्टर-प्लेटिंग-नेलिंग-ऑपरेशन सगळं करूनही कमीत कमी दीड-दोन महिने लागतात, तिथे कोणीतरी ह्या हाडमोडक्याला ४-६महिने सांभाळला आहे. त्याच्यासाठी घासातला घास देऊन जगवलाय. ही माणुसकी सुरू झाली तिथपासूनची गोष्ट. वाचायला म्हणूनच आगळी-वेगळी वाटली आणि आवडली.

पण ही फक्त माणुसकीचीच गोष्ट नाही. जोडीला सत्तेमधील सामर्थ्य जाणवलेली बाई नि बापजी ह्यांचीही ही गोष्ट आहे. ते सामर्थ्य जाणवल्यावर एकाची महत्त्वाकांक्षा वाढत जाते. त्यातून झालेला त्याचा नैतिक अध:पात तर दुसऱ्याला सत्तासामर्थ्यातून आलेल्या जबाबदाऱ्या, कर्तव्यांची जाण, त्यातून त्याला सत्ता शहाणपणाने वापरायची आलेली अक्कल. ह्या तिन्ही व्यक्तिरेखा "फेंगाड्या"ला आजच्या जगाशी जोडतात. तो जुना, रुक्ष इतिहास राहात नाही, तर मानवी भाव-भावनांची सर्वकाल चालणारी सळसळ बनते!


एकीकडे जिवंत राहाण्याच्या मोहापायी सत्ता हातात घेऊ पाहाणारा, त्यासाठी दोन टोळ्यांना आपसात लढवू पाहाणारा बापजी. कोणतेही कष्ट न करता दुसऱ्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन त्यांना भिववून स्वत:च्या भुका भागवणारा हल्लीच्या बुवा-स्वामींइतकाच ढोंगी भगत पांगळ्या; दुसरीकडे दुसऱ्यांच्या दु:खाने दु:खी होणारा, दुबळ्याला खाऊ-पिऊ घालणारा, त्यासाठी समाजा चे नियम मोडणारा सहृदय फेंगाड्या; बदलत्या परिस्थितीप्रमाणे नवे नियम सुरू करणारी बाई ह्या दुष्ट-सुष्ट स्वभावाच्या व्यक्तिरेखा फेंगाड्याच्या गोष्टीची रंगत वाढवतात. 




अनुराधा चौगुले


1 comment:

  1. आता मूळ कादंबरी शोधावी लागणार - इतकं सुरेख परीक्षण आहे :-)

    ReplyDelete