१७ जुलै रोजी "world emoji day' साजरा करतात. Emoji हा स्मार्ट फोन वापरणाऱ्या अनेकांच्या परिचयाचा आहेच. पण त्याचा अतिरेक तर होत नाहीये ना? Emoji वापरताना आपण आपली संभाषण कला तर विसरून जात नाही आहोत ना?
सध्या सगळेच गतिमान जीवनाच्या मागे आहेत. WhatsApp वर सगळ्यांचे खूप ग्रुप आहेत.आवडलेल्या पोस्टला छानसा इमोजी पोस्ट करुन
पुढे सरकता येते. हा झाला शॉर्टकट. ज्यांना खरोखरीच वेळ कमी आहे, नोकरी आहे त्यांच्यासाठी ठीक आहे पण निवृत्त असलेल्यांनी छान, मस्तच, खूप आवडले असे लिहिले तर वाचकांच्या भावना
पोस्ट टाकणाऱ्यांपर्यंत अधिक चांगल्या रितीने पोचतात.
काही लहान मुले त्यांच्या वयाच्या मानाने अभिनय, गाणे, नाट्यछटा खूप छान सादर करतात.
अशावेळी इमोजी टाकण्यापेक्षा 'शाब्बास अनुराग. गाणे छान आणि
धिटाईने सादर केले आहेस. तुला शुभेच्छा' अशी आलेली पोस्ट मला
आणि अनुरागला समाधान देते.
'शब्दांवाचून कळले सारे' हे वादनामधे
अगदी उचित आहे. पण असे आपण प्रत्येक वेळी शॉर्टकटमधे बोललो तर मला वाटते भाषासंकोच
होईल. 'स्पर्श' लिपीवरचे मराठी टाईप
करणे सोपे आहे. काही लोक मराठी टाईप करण्याऐवजी वेळ वाचवण्यासाठी इंग्रजीमधून टाईप
करतात. जेवढे मराठीत टाईप केलेले भिडते तेवढे इंग्रजाळलेले टाईपिंग मनाला भिडत
नाही. कधी कधी पटकन समजतही नाही.
काही वयस्कर लोकांना हाताच्या समस्येमुळे टाईप करणे जमत नाही.
त्यांच्यासाठी ईमोजी वरदान आहे. तसेच बक्षिस मिळाल्यावर कोणी अभिनंदन केले, तर तुमचा नम्रपणा दाखवण्यासाठी धन्यवादाबरोबर नमस्काराची
इमोजी टाकली तर तुमच्याही भावना संयुक्तिकपणे पोचतील.
इमोजींचा अतिरेक फेसबुकवर होतो. नाचणारी, मोठ्याने
हसणारी बाळे भावनांचा अतिरेक दाखवतात.
कधीकधी अनोळखी माणसे अचानक WhatsApp वर येतात. ती व्यक्ती ज्येष्ठ तसेच कर्तबगार असू शकते किंवा नसतेही.
अशावेळी प्रश्नचिन्ह किंवा आश्चर्य व्यक्त करणारी इमोजी टाकण्यापेक्षा Your
name please असे लिहिणे शिष्टाचाराला धरुन आहे. नाव कळल्याशिवाय,
ओळख झाल्याशिवाय कोणालाही प्रतिक्रिया देणे घातकच असते.
कधीकधी मैत्रिणी छान छान विनोद टाकतात किंवा चॅटिंगमधेही विनोदी विधाने करतात. आपली हसून मुरकुंडी वळते. अशावेळी तोंडावर हात ठेवलेली हास्यप्रतिमा झटकन् आपले मनोगत शब्दाशिवाय सांगून जाते.
वरील विवेचनावरुन हे लक्षात येईल की कधीकधी इमोजी संयुक्तिक आहेत, पण नेहमीच नाहीत. आपल्या परिचयातल्या व्यक्तीच्या निधनाची
वार्ता कळली तर फक्त रडकी बाहुली व नमस्कार टाकणे तुटकपणाचे आहे. शांतिविषयक
प्रार्थना किंवा मनातल्या भावना, जवळची असेल तर भेट नुकतीच
झाली अथवा नाही, गुणविशेष असे लिहीणे सयुक्तिक असते.
ग्रुपमधले कोणी परदेशातून आले तर नुसते welcome किंवा इमोजी
पुरेशी नसते. फोन किंवा भेटीची भरभरुन इच्छा शब्दच व्यक्त करु शकतात.
साकल्याने असे म्हणता येईल की जसा प्रसंग तशीच प्रतिक्रिया पाहिजे. क्वचित
आपण घाईत असलो, प्रवासात असलो, किरकोळ बरे नसेल तेव्हा इमोजींनी उत्तराचे काम केले तरी चालते. पण
नातेसंबंध, मैत्रबंध रेशीमगाठीसारखे घट्ट हवे असतील तर तुम्ही
शब्दांच्या माध्यमातून आपुलकीने जवळ येणे अत्यावश्यक आहे. शब्द हे इतके सशक्त
माध्यम आहे की लांबवरची, परदेशातली माणसेही जोडली जातात.
त्यामुळे क्वचित इमोजीचा वापर केला तरी नेहमी पुलासारख्या जोडणाऱ्या शब्दांचा वापर
करणेच योग्य आहे.
सौ. मनीषा आवेकर
अगदी योग्य विचार
ReplyDelete