फायटर!

 

जुलै २००५ ला मुंबईत आलेल्या प्रलयरुपी पावसात लोकांनी बरंच काही गमावलं... तर काहींनी कमावलं.. माझ्या आयुष्यातही तो एक ठळक दिवस ठरला. माझा पहिला इंटरव्ह्यू होता, अंधेरीला. सकाळी पावसाची चिन्हं दिसत होतीच पण फक्त रिपरिप होती. पावसाच्या उपकारामुळे वेळेत इंटरव्युला तर पोचलो. पण मुंबईत नोकरीच्या एका जागेसाठी किती उमेदवार येऊ शकतात हे ही त्या दिवशी मला कळलं. सकाळी नऊची वेळ देऊन शेवटी दुपारी तीनला माझी टर्न आली आणि साधारण तीन-चार मिनिटांत इंटरव्ह्यू झाला देखील!!.. यावरुन इंटरव्ह्यू कसा गेला ह्याची कल्पना तुम्हाला आली असेलच. असो.

 

आपल्या नशीबाला दोष देत बिल्डींगबाहेर आलो आणि पाहतो तर काय? समोरच्या रस्त्यात गुडघ्यावर येईल एवढं पाणी? क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना. आत एसी बिल्डिंगमधे असल्याने म्हणा किंवा इंटरव्ह्यूच्या टेंशनमुळे म्हणा, पण बाहेर काय चाललंय हे इतका वेळ कळलंच नाही. सहा-सात तासांत इथे नेमकं काय झालं असावं ह्याचा अंदाजच लागेना.



"इधर भीड मत करो. ट्रेन अभी चल रही है, स्टेशनतक चले जाओ. और थोडी देर बारीश हुई तो ट्रेन ठप्प हो जाएगी." - तिथला सिक्युरीटी गार्ड म्हणाला. स्टेशनच्या दिशेने जाणारी एक माणसांची साखळी त्याने दाखवली. मी डोक्यावर सर्टिफिकेटचा फोल्डर ठेवून त्या दिशेने चालत सुटलो. पाण्याला थोडा जोर होता. स्टेशनला जाणारी पाच मिनिटांची वाट आज त्या साडेतीन फूट पाण्यात मैलभर लांब वाटत होती. तेवढयात मला उजवीकडे पाण्यात फडफडणारी हालचाल दिसली. एक कुत्र्याचं पिल्लू पाण्यात कसंबसं तरंगत पोहण्याचा प्रयत्न करत होतं, आणि केविलवाण्या सूरात रडत होतं. मी न राहवून साखळी सोडून त्या पिल्लाला उचलायला उजवीकडे वळलो आणि त्याला उचलून छातीशी धरलं. ते थरथरत होतं आणि माझ्या हाताला घट्ट धरून बसलं होतं. त्याच्या साईझ वरून ते साधारण एक-दीड महिन्याचं वाटत होतं.



तेवढ्यात आजूबाजूला काहींचं "पागल है, मरेगा" ऐकू आलं. साधारण पंधरा मिनिटांनी आम्ही स्टेशनला पोचलो. ते पिल्लू माझ्या हातावरच झोपून गेलं होतं. पण तरी त्याची थरथर जाणवत होती. आता त्याला स्टेशनला टपरीकडे सोडून द्यायचं असं मी ठरवलेलं होतं. तेवढ्यात मागून एक हाक आली. "एक्सक्युझ मी". मी वळून पाहिलं,  "हाय, मी मृण्मयी. मी तुमच्या मागेच चालत होते, मी पाहिलं तुम्ही या पिल्लाचा जीव कसा वाचवला ते.....  सो नाईस ऑफ यू."

"मला नाही वाटत मी ह्याला वाचवलंय. बघा ना, हा थरथरतोय नुसता. आणि बेशुद्धही झालाय."

"डोंट वरी. मी वेटर्नरी डॉक्टर आहे . मालाडला माझं क्लिनिक आहे.. आय मीन मी सध्या तिथे इंटर्नशीप करतेय. आपण ह्याला एखाद्या कोरड्या जाड कापडात गुंडाळू. म्हणजे त्याला जरा उब मिळेल." शेजारी शहाळं विकणाऱ्याकडून तिने लगेच एक कोरडं पोतंघेतलं.

"त्या वेळेपर्यंत तरी त्याने तग धरायला हवा...." मी थोड्या शंकेने म्हणालो.

"he will ... he is fighter..." ती आत्मविश्वासाने म्हणाली. त्याचं नाव आम्ही तिथेच 'फायटर' ठेवलं......

 

...कित्येक वर्षांपूर्वीची ही घटना कशी कालचीच वाटत होती. पण मधल्या काळात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या होत्या. फायटर त्या सगळ्याचा साक्षीदार होता. मृण्मयी आणि मी वेगळे होऊन आता तीन वर्षं झाली होती...

 

...आणि आज इतक्या वर्षांनी फायटर आयुष्याची शेवटची फाईट मृण्मयीच्या स्वतःच्या क्लिनिकमधे झुंजत होता. मी त्याच्या बेडशेजारीच बसून होतो. मृण्मयी चेकअपसाठी आत आली. फायटरला धाप लागली होती. ऑक्सीजन चालूच होता. माझा केविलवाणा चेहरा पाहून मृण्मयीने न राहवून मला घट्ट मिठी मारली... आणि माझ्या तोंडून आपोआपच "आय ऍम  सॉरी" निघून गेलं. ती सुद्धा "आय ऍम सॉरी टू" म्हणाली. आम्ही दोघांनी फायटरच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याने डोळे थोडेसे उघडून आमच्याकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे मिटले.

 

फायटर जणू काही आज आम्हाला पुन्हा एकत्र पाहण्यासाठीच शेवटचे काही क्षण फाईट करत होता. पण वय आणि वेळेविरुद्ध चालण्याऱ्या त्याच्या फाईटमधे आम्ही त्याला जिंकायला मदत करु शकलो नाही. जाताजाताही तो आम्हाला मात्र बरंच काही देऊन गेला!!

 

मानस


1 comment:

  1. मस्त मस्त मानस

    ReplyDelete