फोडणीची
पोळी’ या पदार्थाला भारताचे ‘राष्ट्रीय
खाद्य’ म्हणून राजमान्यता मिळायला हवी, असे माझे आग्रही मत आहे. त्याची अनेक कारणे आहेत. ‘चव’
हे तर मुख्य कारण आहेच; पण त्याहीपेक्षा ‘जुगाड’
या आपल्या महान परंपरेचे इतके चविष्ट प्रतिनिधित्व करणारा हा पदार्थ
जगात कुठेही (चवीलाही) सापडणार नाही याची मला खात्री आहे. म्हणूनच इतक्या ‘युनिक’ पदार्थाला या देशाच्या
राष्ट्रीय खाद्याचा दर्जा मिळायला हवा. भारताने जगाला ‘शून्य’ ही संकल्पना दिली.
त्याच्या खालोखाल खरं तर फोडणीच्या पोळीचा नंबर लागायला हवा होता. परंतु हा आविष्कार
आपणच कधी सिरीयसली घेतला नाही. टेलिफोन, इंजिन, एक्स-रे, पेनिसिलीन,
दिवा असे शोध लावून दमलेल्या-भुकेल्या पाश्चात्त्य
शास्त्रज्ञांना आपल्या पूर्वजांनी फोडणीची पोळी खायला घातली असती तर
एडिसन वगैरे मंडळींनी खूष होऊन आपल्या वतीने फोडणीच्या पोळीचे पेटंट हसत हसत फाईल केले असते!
Documentation च्या बाबतीत कमालीचा आळस असणाऱ्या या देशाच्या संस्कृतीने फोडणीच्या
पोळीची मूळ जननी आपल्याला कळू दिली नाही. पण त्या कुणा अज्ञात चतुर गृहिणीबद्दल या
देशाने नेहमीच कृतज्ञ राहायला हवे. सकाळी सकाळी अनाहूत आलेल्या पाहुण्यांना पटकन
काय बनवून द्यायचे या विवंचनेतून फोडणीच्या पोळीचा जन्म झाला असावा. हेच जर परदेशात घडले असते तर आज त्या जागी ‘फोडणीच्या
पोळी’चे एक अप्रतिम स्मारक उभे असते आणि तमाम पर्यटकांची तिथे गर्दी लोटली असती. या देशातील महिला शिकत
नव्हत्या व त्यांना यथायोग्य मान नव्हता अशा काळात हा आविष्कार
झाल्याची एक शक्यता नाकारता येत नाही. हा लेख वाचून एखाद्या अभ्यासकाने मला खोटे पाडले तर माझ्यासारखा आनंदी जगात नसेल. तसे झाले तर त्या अविष्कारकर्त्याचा व अभ्यासकाचा असे दोन फोटो मी घरात
लावायला तयार आहे.
जगात
असे दोन पदार्थ आहेत, जिथे
माझी नियत हलते. त्या दोन पदार्थांसाठी माझ्या आतल्या आवाजाला, सदसदविवेकबुद्धीला गप्प करायची ताकद
माझ्यात येते. हे दोन पदार्थ मी तिन्ही त्रिकाळ,
तीनशे पासष्ट दिवस खाऊ शकतो. हे दोन्ही पदार्थ खाण्यासाठी मी
कुठल्याही थराला जाऊ शकतो. लाज, शरम, सभ्यता
गुंडाळून ठेवू शकतो. ते दोन पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी आणि फोडणीची पोळी.
यातल्या पहिल्या पदार्थाला राजमान्यता आहे. पण दुसरा पदार्थ उपेक्षित आहे.
‘उरलेल्या पोळीचा जुगाड करायला काय मोठं पाकशास्त्र लागतं?’
असं समजून या पदार्थाला अंडरएस्टिमेट करणाऱ्या अनेक सुगरणी तोंडावर
पडलेल्या मी पाहिल्या आहेत. कारण जातीची सुगरण फोडणीची पोळीसुद्धा मोदक करण्याच्या
तन्मयतेने करते. पोळीचे तुकडे तुम्ही हातांनी करता की मिक्सरमध्ये, यावर देखील ‘फो.पो.’ची चव
ठरते. हा पदार्थ घाईघाईने करायचा नाहीच मुळी.
पोळीचे
तुकडे किंवा भुगा त्यातील कांद्यासाहित लुसलुशीत होण्यासाठी तो सगळा ऐवज धीम्या
आचेवर थोडा वेळ असायला लागतो. त्या कढईमध्ये निर्माण होणारी वाफ फोपो लुसलुशीत
व्हायला मदत करते. मला स्वयंपाकाची फारशी आवड नसूनही फोपो बनवायचा मी एक दोनदा
स्वतः प्रयत्न करून पाहिला होता. फोपो तयार झाल्यावर माझ्या लक्षात आले की मी फक्त पोळीचे तुकडेच उत्तम करू शकतो. तेव्हा हेही लक्षात आले की जो पदार्थ आपल्याला आवडतो, तो आपण एकदा तरी स्वतः करून पाहिला पाहिजे आणि तो फसायला पाहिजे. तेव्हा
कुठे आपल्याला त्या पदार्थामागचे कष्ट कळतात. आणि मग आवडीचे रूपांतर
आदरात होते. ‘कधीतरी हा पदार्थ आपल्याला
करता आला पाहिजे!’ हे aspiration मनात
निर्माण होते. ‘यात काय ! कोणीही
करू शकेल हे !’ हे मनात आले की खेळ संपलाच म्हणून समजा. गंमत म्हणजे, नेमक्या याच कारणाने मी साबुदाण्याची खिचडी बनवायला
जात नाही. ‘आपण ज्ञानेश्वर बनायचा प्रयत्न करावा’ इतकी मला खिचडी अप्राप्य वाटते. त्यामुळेच असेल, माझ्या
मनात खिचडीचे स्थान खूप उंचावर आहे.
फोपो मला माझ्या ‘पोहोच’मध्ये वाटते.
अनेक
लोक ‘फोपो’ला बी ग्रेडचे खाद्य
मानतात. माझ्या स्वतःच्या लग्नात सकाळच्या नाश्त्याला फोपो असावी अशी मी विनंती
करताच दोन्ही बाजूचे लोक माझ्यावर तुटून पडले होते. ‘शुभप्रसंगी
कसलं खातोयस शिळं-पाकं!’ शिळं-पाकं? आमच्या लग्नातला हा ‘ऑफ द
रेकॉर्ड’ अपमान मी आज पहिल्यांदाच शेअर करतोय. आमच्या
लव्हमॅरेजमध्ये ‘आग्रही राहणे’ माझ्या
युद्धनीतीला अनुसरून नव्हते. त्यामुळे मी गप्प बसून फक्त अपमान सहन केला. आजही मी
जेव्हा जेव्हा सासुरवाडीला जातो, तेव्हा सासूबाईंच्या हातची
फोडणीची पोळी खाऊन मी त्या अपमानाचा बदला घेतो. सूडाने पेटलेला
चिरंजीव अश्वथामा लोकांकडे तेल मागतो, म्हणतात. त्याप्रमाणे अपमानित झालेला मी, फोपो वरील माझे प्रेम जिथे जाईन तिथे जगजाहीर करतो.
‘आनंदवन- हेमलकसा’च्या आमच्या सहलीत मी जेव्हा
लोकांना घेऊन ‘सोमनाथ’ प्रकल्पावर जातो
तेव्हा तिथल्या मेसच्या प्रमुख असलेल्या शोभाताई खास माझ्यासाठी आदल्या रात्री
तीनचार पोळ्या जास्त करतात. त्या शिळ्या होऊ देतात. आणि मग दुसऱ्या दिवशी खास
माझ्यासाठी फोडणीची पोळी करतात. विदर्भात त्याला ‘कुटका’
म्हणतात. कारण पोळ्या उरल्या तर फोपो, आणि
फोपो बनवण्यासाठी आदल्या रात्री मुद्दाम जास्त पोळ्या करून उरवणे या दोन्ही
अप्रोचमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे.
आलतू-फालतू
पदार्थ आपण कायच्या काय रुपये मोजून विकत घेत असताना हा जागतिक दर्जाचा पदार्थ
कुठेही सहजी मिळू नये, याचे मला मनस्वी दुःख होते.
मागे एकदा ‘पोटोबा’ नावाच्या हॉटेलमध्ये नव्वद रुपये मोजून फोडणीची पोळी खाताना मला कोण आनंद
झाला होता!
नाहक
उपेक्षित राहिलेला हा पदार्थ रानातल्या एकाकी वाटेवर उमलणाऱ्या रानफुलांसारखा आहे.
या पदार्थात मला गायक येशुदास दिसतो. संगीतकार जयदेव दिसतात. संजीवकुमार दिसतो.
शन्ना नवरे, रवींद्र पिंगे
दिसतात. गणितज्ञ रामानुजन दिसतात. उषा उत्तूप दिसते. कवी द. भा.
धामणस्कर दिसतात. प्रणव मुखर्जी दिसतात. राहुल द्रविड दिसतो. शाळेत सर्वात मागच्या
बाकावर बसणारा, कमी मार्क मिळवणारा
एखादा ‘प्रज्ञावंत चित्रकार’ दिसतो…
मानाच्या
पानात कुणी बसायचे यासाठी सर्व पदार्थांची
स्पर्धा सुरू असते. फोडणीची पोळी मात्र
या स्पर्धेपासून अलिप्त राहते. पोळी किंवा चपाती या मूळ पदार्थावर आपले अस्तित्व
अवलंबून आहे याची तिला जाणीव आहे. साबुदाण्याची खिचडी, कांदा पोहे, इडली-वडा सांबार,
मसाला डोसा, मिसळपाव, बटाटावडा
यांना असलेले ग्लॅमर तिला कधीही मिळणार नाही याची तिला पूर्ण कल्पना आहे. आपले रूप,
आपली चव याबद्दलची सर्व लिमिटेशन्स तिने मनोमन मान्य केली आहेत.
आपले अस्तित्व या लेखाच्या लेखकासारख्या लाखो चाह्त्यांमुळे अबाधित राहणार आहे,
हा आत्मविश्वास तिच्याकडे आहे.
पोळ्या
उरल्या तर आपण दुसऱ्या दिवशी फोडणीची पोळी करतोच. पण यापुढे वर्षातून किमान एकदा
तरी मी सांगतो तसे करून
पहा. आदल्या रात्री पाच-सहा
पोळ्या जास्त करा आणि मगच दुसऱ्या दिवशी फोडणीची पोळी करा. घाईघाईने नको, तब्येतीत करा. ती खायला माझ्यासहित आसपासच्या खूप लोकांना बोलवा.
त्याच्या जोडीला दुसरे काही करू नका. फार फार तर आंब्याचे लोणचे.
पोटभर फोडणीची पोळी खाऊन पाहुणे तृप्त होऊ देत. एकशे सोळा अन्नदानांचे पुण्य
तुम्हाला त्या एका ‘फोपो’
दानातून मिळेल. आणि डोक्यावर पाप घ्यायचे नसेल तर कृपया फोपो ला कधी
‘शिळं-पाकं’ म्हणू नका!
माझा
नंबर तुमच्याकडे आहेच. ‘मग कधी
येताय फोपो खायला?’ असे पुणेरी आमंत्रण नको. तारीख व स्थळ
सांगा. लाज आणि सभ्यतेला फोडणी देऊन मी तुमच्या घरी हजर झालोच म्हणून समजा!
नविन काळे
अरे बाप रे ....इतकी आवडते फोडणीची पोळी... त्याला आमच्या सासरचे लोक कुस्करा म्हणतात and i just hate that word for such a wonderful फोडणीची पोळी...
ReplyDeleteवा ! खमंग झाली आहे फो पो!
ReplyDelete