जी. एं चे मायावी इंद्रजाल. . . .

 

 



तो २००४ सालचा जून महिना होता. पुस्तक भिशी सुरू होऊन फार दिवस झाले नव्हते. नुकत्याच संपलेल्या शतकातील सर्वोकृष्ट १० ललित साहित्य कृती निवडल्या गेलेल्या होत्या. त्यांची यादी वर्तमानपत्रात मी वाचली होती. तिच्यात दुर्गा भागवतांचे "ऋतुचक्र", पुलंचे "व्यक्ती आणि वल्ली", रणजित देसाईंचे "श्रीमान योगी", विजया राजाध्यक्षांचे "मर्ढेकरांची कविता" (पी.एच.डी.चा शोधनिबंध) या पुस्तकांबरोबरच जी. . कुलकर्णींच्या काजळमाया या पुस्तकाचे नाव होते. तेंव्हापासून ते माझ्या संग्रहात आहे.

हे पुस्तक म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे. थरारक आहे. मानवी आशा आकांक्षांचे, स्वप्नांचे, वेदनांचे, असोशींचे एक भव्योत्कट झुंबरच या गोष्टींमधून आपले विविध रंग उधळत, मोह घालत डोळ्यांसमोर चमकत राहते. एखाद्या कसलेल्या जादूगाराने मातीचे सोने करावे व परत सोन्याची माती करावी, रत्नांचे वैभव झळकवावे, दृष्टी भुलावी आणि परत गारगोट्या दिसाव्यात तसा काहिसा हा अनुभव आहे. तो अंतर्बाह्य ढवळून ही काढतो. इथे घडणाऱ्या घटनांमधून विकसित होणारे कथानक, ही फक्त गोष्ट नसते. अटळ अशा नियतीच्या फासात अडकलेल्या जीवांना इथे कुणीतरी (कदाचित देव) अत्यंत वाकबगारपणे खेळवत असतो. हा खेळ ही खूपच उत्कंठावर्धक असतो. अंत मात्र खोलवर वेदना देणारा दुःखाचा आर्त पुकार करणारा असतो. आणि मग कळते की जरी घटनांची साखळी विविध घटना गुंफत, निसर्गाचे, अनुभूतींचे प्रत्ययकारी चित्रण करत, उत्कंठा वाढवत गुंफलेली असली, तरी प्रत्यक्षात हे एक कथानक निश्चित आकार घेऊन, घाट घेऊन एकाच अटळ दुःखाच्या दिशेने जाते. तसेच एका विलक्षण तटस्थतेने हे सर्व पाहणारा, वर्णन करणारा साक्षी सर्व फोल, माया असल्याचा साक्षात्कार घडवितो आणि सर्व नाहीसे होते.


कथा सुरु होते ती पुष्कळ वेळा निसर्गाच्या, आसमंताच्या वर्णनाच्या साथीने, जसे पहिल्याच कथेतील वर्णन पाहा. "घराच्या पूर्वेकडील बाजूने लावलेल्या, उंच लवचिक निलगिरी झाडांच्या पानांमधून सूर्य प्रकाश गाळून येत पुढच्या सोप्यावर पसरला होता"पुष्कळ वेळा या वर्णनात गूढ, शुभ-अशुभ सावल्यांचा खेळ दिसतो. हा निसर्ग बालकवींचा नाही हे लगेच जाणवते. जवळ जवळ सर्वच कथांमध्ये, कथा एखाद्या मुख्य पात्राचीच असल्याचे जाणवते. हे पात्र हे त्या आसमंताचा जणू एक भागच असते. "गुलामया कथेची विलक्षण सुरूवात अशी....... "एखाद्या मृत जनावराच्या सडत चाललेल्या आतड्यात पुढे सरकत जावे, त्याप्रमाणे त्या कुंद, अरूंद गल्ल्यांतून भटकत असता मुशाफिराचे पाय पिंजून गेले." पात्राच्या मानसिक भावभावनांचा खेळ आणि त्याचे आसमंत, अगदी आसपासच्या माणसांच्या वागणुकीसहित एक चकवा निर्माण करत गेलेले दिसते. पात्राची एखादी आसुसलेली टोकाची इच्छा, कल्पना, भावना यांचे एक जाळे निर्माण होते. एखाद्या निष्णात शल्य वैद्याने आपल्या चाकूने एक एक थर बाजूला करत खोलवर वेदनेच्या मुळापर्यंत जावे आणि दुःखाचे अनपेक्षित रूप जाणून बधिरलेल्या जाणिवेने कायमचे मूक व्हावे असे घडते. शिवाय हे सर्व खूपच मोह ही घालते. दुःख, यातनेला बाजूला न सारता तिच्यात एकरूप होऊन विरघळून जावे, दुःखाला साद घालतच बसावे, हसणेच खोटे वाटावे, अशी ओढच जणू निर्माण होते. पण हा सर्वच चकवा असतो. इंद्रजाल असते. खोटे असते. निर्मिणारा जादूगार त्या निर्मितीकडे आनंदानेच पाहातो.

कधी प्रत्येक माणसाच्या मनातील भावना ओळखून, जसे "अपराध बोध किंवा गिल्टघेऊन (आणि प्रत्येक माणूस काही ना काही तरी अपराध केल्याचा धनी असतोच, प्रत्येकातच एक राक्षस दडलेला असतो या सत्याला वापरून) गारूड रचले जाते." जसे पहिल्या "प्रदक्षिणाकथेत शांताक्काना वाटते, "माणसाला असा तडकाफडकी मृत्यू कधी येऊ नये. आयुष्याची चढती कमान संपली की पुन्हा त्याच मार्गाने परत पूर्वस्थळी येऊन संपून जाण्याची देणगी देवाने द्यायला हवी होती. कधीच चुका न करण्याचे भाग्य देवाने माणसाला दिलेले नाही. निदान परत येताना थोडी भरपाई करण्याची संधी तरी त्याने का देऊ नये"? इथे हे पात्र त्याचे गुन्हेच जणू आठवून कबूल करते. पण पतीने केलेली विलक्षण वंचना, फसवणूक आणि संपूर्ण फसलेला आयुष्याचा डाव हे वास्तव नंतर हळूहळू संथपणे उलगडते आणि आपल्याला धक्का बसतो. सुन्नपणा (पात्राप्रमाणेच) येतो.

सुरूवातीप्रमाणेच या कथांचा शेवटही आसमंताशी अटळपणे जोडलेला असतो. अर्धपुतळ्यासमोर पूर्ण पुतळ्याप्रमाणे निश्चल झालेल्या शांताक्का; (प्रदक्षिणा); निश्चल झालेला सदानंद आणि वादळ शांत झाल्यावर उरलेले आभाळाचे अभिषेक पात्र; त्यातून कालगतीचे थेंब ठिपकणे. (त्या प्रत्येक ठिपक्या बरोबर नियतीचा सहस्त्ररत्न मोरपिसारा चांदण्या चमकावत लहानमोठा होत सारे निर्विकारपणे पाहात असतो.) (स्वप्न). चेहऱ्यामागील कवटी पूर्णपणे स्पष्ट होत गेलेला दूताचा चेहरा (दूत); भाकरी तोंडात धरून समाधानाने कावकाव करणारा कावळा (रत्न) ही त्याचीच उदाहरणे. आसमंतातून उगवलेला; वेडी स्वप्ने उराशी बाळगून वेड्याप्रमाणे धावणारा; त्यासाठी आतल्या सैतानाला शरण जात अपराध करण्याचेच भागधेय असलेला; आणि अखेर पराभूत होणारा माणूस त्याच आसमंताच्या साक्षीने आपली आभासात्मक, मायिक कहाणी संपवितो. साक्षी फक्त आसमंत उरतो.


गुरुनाथ आबाजी कुलकर्णी (जी. ए. कुलकर्णी) 


जीएंच्या या काजळमायातील गोष्टींचे गोत्र जुळते ते "बा.सी. मर्ढेकरांच्याकवितांशी. "पिपात मेले ओल्या उंदीर" लिहिणारे मर्ढेकर जेंव्हा "जगण्याची पण सक्ती आहे मरण्याची पण सक्ती आहे" लिहितात तेंव्हा ते जीएंच्या पात्राना तंतोतंत लागू पडते. पण जी. एंच्या या गोष्टींच्या आकृतीबंधाचा विचार केला तर अगदी अपरिहार्यपणे आपल्याला इंग्लीश साहित्याकडे जावे लागते. जीएंच्या या (काजळमायातील) गोष्टी Dramatic monologue) या प्रकारासारख्या आहेत. यात एकाच व्यक्तीच्या दृष्टीकोनातून केलेली मांडणी, दिसलेले जग, त्याचाच आसमंत, एकूण त्याने भोगलेले सुख दुःख इ. वर्णित असते. अशा उद्ध्वस्त लेखनाची एक परंपराच मागील शतकात इंग्लीश वाङ्मयात निर्माण झालेली दिसते. पण तिची सुरूवात मात्र १९ व्या शतकातच झालेली आहे. १८५२ साली "Robert Browning" या कवीने लिहीलेली कविता "Childe Roland to the dark tower came" ही अशा उद्ध्वस्त लेखनाची नांदीच किंवा मानवाच्या सर्व शोधाचे अटळ शोकांतिक असे अशुभ वर्णनच या पुढे साहित्यातून दिसण्याची सूचनाच देते.

ही कविता निश्चितच एक पूर्वसूचना आहे. साहित्य संसारात अटळपणे येऊ घातलेल्या एका विलक्षण नाशसूक्ताच्या काळाची. ३४ कडव्यांची ही कहाणी, होही कहाणीच आहे, जी कवीला स्वप्नात दिसली, एका कल्पित वीराची आहे. जो जन्मभर "डार्क टॅावर्स"चा शोध घेतो. शेवटी तिथे पोचतो. त्याच्या सारखेच वेडे तिथे जाऊन त्यांनी आपले प्राण गमावलेले असतात. कवी त्यांच्या मधला एक होतो. मरताना त्याला उमगते की हेच त्याचे भागधेय होते. हा एक सापळाच होता. सुटका नव्हती.

हा वीर; सरदार होऊ घातला आहे. अजून सरदार झाला नाही. तसे हे नाव ही काल्पनिकच. किंग लियर नाटकातील एक पात्र खोटे सोंग घेऊन बरळण्याचे नाटक करताना हे नाव घेते. हा वीर मोठ्या कष्टाने डार्क टॅावर्सच्या रस्त्याजवळ पोचतो. इधे एक लंगडा; काठी घेतलेला म्हातारा ओठ मुडपून कुत्सित हसत; ("आला अजून एक वेडा" हा भाव दाखवत); त्याला रस्ता सांगतो. "खोटारडा कुठला" असे म्हणतही वीर त्याच रस्त्याने जायचा निर्णय करतो. या पुढे ही कविता एका विलक्षण प्रवासाचे वर्णन करते. मागचा मार्ग बंद होतो. पुढे अत्यंत अशुभ, मृत्यूची छाया पडलेल्या भयंकर उदास अशा निसर्गाच्या दुःखी सान्निध्यात वीर मार्ग क्रमण करतो. एक मान निघालेला यातना सोसून मेलेला घोडा, एक बंद पडलेले एंजिन, निखळलेले चाक, सापासारखी वळवळणारी विचित्र फेसाने भरलेली नदी; .तून जाताना तो जुन्या मित्रांची आठवण करू पाहातो. परंतु हे मित्र ही दुःखी अशा भाग्याचे धनी असतात. एकाला एका रात्री अपमानित होऊन निघून जावे लागलेले असते तर दुसऱ्याला हेर ठरवून फाशी दिलेले असते.

अखेर आता आपण काही पोचत नाही असे वाटत असतानांच समोर डार्क टॅावर्स दिसतात. सर्व बाजूनी आता टेकड्यांचा पहारा दिसतो. दुसरे काहीही दिसू शकत नाही. अनेक लोक त्याच्याकडे पाहत असतात. तो ही त्यांना ओळखत असतो. अखेर तो खिशातून शिंग काढून फुंकतो. आणि मृत्यू स्वीकारतो. ही कविता कवीने एका दिवसात लिहिली. जीएंच्या गोष्टीतल्या नायकांचे या गोष्टीतल्या नायकाशी विलक्षण साम्य दिसते.

जीएंना विनोदाचे अंग फारसे नव्हते. विनोद हा आपला ब्लाइंड स्पॉट असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलेय. पुलंचा सात्विक हास्य प्रपंच त्यांना फारसा मान्य नव्हता. टागोरही त्याना फारसे भावत नव्हते. उजाडलेल्या दुनियेतील दृश्ये पाहतानाउरात जखम बाळगून धावताना, अशुभाच्या पाऊल खुणा ओळखताना, आणि हे सर्व अटळ आहे हे जाणून सुन्न होताना विनोद, प्रेम हे खोटेच वाटते.

मृत्यूचे गूढ आकर्षण जीएंना होते असे वाटते. प्रत्येक जीवाला मृत्यूचे आकर्षण (जीवनाप्रमाणेच) असतेच असते. जीएंच्या या पुस्तकात बहुतेक सर्व कथांमधे मृत्यू दिसतो. पहिल्या कथा मृत्यूभोवती फिरतात. फक्त "कसाबही कथा सोडली (जिच्यात बकरीच्या मृत्यूचे भय आहे), तर सर्व कथात मृत्यू या ना त्या तऱ्हेने आहेच आहे. मृत्यूच्या छायेचा, त्या खाली वावरणाऱ्या, जीवनाचा वेध यात घेतलेला आढळतो.

जीएंना काही दृश्ये ही दिसत, असे त्यांनी काही पत्रांत लिहिलेलेही आहे. त्यांच्या कथांमध्ये वैयक्तिक असा आक्रोश प्रत्येक पात्राच्या जीवनात आढळतो, आणि ही पात्रे कुठेतरी जीएंच्या वैयक्तिक आक्रोशाचेही प्रतिनिधित्व करतात असे वाटते. तरीही सर्व मिळून माणसाला दुःखांची, मृत्यूची ओढ असते. ही ओढच बहुतेक त्याला चूक करायला लावते व अटळ अशा नाशाकडे नेते. शेवटी सर्व खोटेच, माया असल्याची साक्षी अवस्था या गोष्टीना नक्कीच एक तात्विक बैठकठोस भूमी देते.


शशीकला दीक्षित









3 comments:

  1. जी एंच्या शैलीची उकलण करून दाखवणारा एक सुंदर लेख!! छानच

    ReplyDelete
  2. छान उतरला आहे

    ReplyDelete
  3. अभय दीक्षित

    ReplyDelete