ग गझलेचा.. निवडक गझलांचा रसास्वाद

 झुंज

सुरेश भटांपासून अखंड चालत आलेला गझलेचा वारसा सध्याच्या घडीलासुद्धा अनेक ताकदवान गझलकार उत्कृष्टरित्या सांभाळत आहेत. गझलांकडे वळणाऱ्या मराठी कवींची दिवसागणिक वाढत जाणारी संख्या नक्कीच आशादायी चित्र उभे करते. आधुनिक गझलकारांमधील असेच एक दर्जेदार नाव म्हणजे गझलकार श्री. प्रविण पुजारी.  

 

कोल्हापूरसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहरात वास्तव्यास असणाऱ्या ह्या गझलकाराच्या अनेक आशयसंपन्न गझलांपैकी एका गझलेचे रसग्रहण आज आपण करणार आहोत.

 


आयुष्याच्या खेळामध्ये खेळत आहे

दुःखासंगे युद्धामध्ये झुंजत आहे 

आयुष्य म्हणजे विधात्याने मांडून दिलेला खेळ, हे साधे पण अर्थपूर्ण विधान उल्या मिसऱ्यात व्यक्त करून पुढच्याच ओळीत गझलकार त्याची झुंजार वृत्ती दाखवून देतो. यशापयश, सुखदुःख आणि मानापमानांचे अनेक क्षण आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला येतात. नियतीचे हे खेळ कोणालाच चुकले नाहीत. सुखाच्या सागरात डुंबत असताना कधी अचानक दुःखाची लाट उसळून अंगावर येईल हे सांगताही येत नाही. आयुष्यातल्या संकटांचा सामना करणाऱ्या प्रत्येकाची अगतिकता जणू काही ह्या मतल्यात व्यक्त होते. 

जिकडे तिकडे धडपड आहे जगण्यासाठी

रोज स्वतःला मरण्यामध्ये जगवत आहे

 

जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक जिवाची एकच धडपड सुरू असते, ती म्हणजे जगण्याची! श्वास सुरू ठेवण्याची धडपड! अथांग अवकाशात आपले इवलेसे अस्तित्व निर्माण करण्याची आणि ते कायम ठेवण्याची धडपड! कोणत्याही सजीवाला ही धडपड चुकलेली नाही. मग माणूस तर तिला अपवाद कसा असेल? जागतिक महामारी असो, किंवा अगदी दैनंदिन आयुष्य, रोज अस्तित्व संपण्याचे लाखो क्षण समोर येत असताना जगण्याची एक उमेद माणसाला 'मरणामध्ये'सुद्धा जगवत असते, ही अभिव्यक्ती इथे उत्तमरित्या व्यक्त केली गेली आहे. 

विरोधात मी कधी कुणाच्या गेलो नाही

स्वतः स्वतःच्या हरण्यामध्ये जिंकत आहे



 विरोध, टीका अशा स्वाभाविक मानवी भावभावनांचा आयुष्यात प्रत्येकाला सामना करावा लागतो. स्वतःला, स्वतःच्या मतांना होणारा विरोध झेलणे जेव्हढे अवघड, तेव्हढेच समोरच्याला विरोध करणे सोप्पे. अशा वेळी कुणाच्या विरोधात न जाता आपल्या आयुष्याचे ईप्सित साध्य करण्याचा स्थायी भाव ठेवत असल्याचे गझलकार स्पष्ट करून जातो.

 

हंस होउनी जीवनातले दूध सुखाचे

दुःखाच्या या पाण्यामध्ये शोधत आहे



 

जीवनात सुखदुःखाचे प्याले रिचवत असताना नीरक्षीरविवेकबुद्धी जागृत असणे फार महत्त्वाचे असते. जगण्यातली आव्हाने पेलत असताना चारदोन आनंदाचे क्षण वेचणे, हाच काय तो विरंगुळा. कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्यातूनही काहीतरी चांगले घेता यायला हवे. हा अर्थ मांडण्यासाठी इथे हंसाच्या नीरक्षीरविवेकबुद्धीचे फार सुंदर उदाहरण गझलकाराने वापरले आहे.

 

केली नाही कधीच स्पर्धा मी दुसऱ्याशी

माझ्या "मी" ला स्पर्धांमध्ये हरवत आहे

 

धावपळीच्या युगात स्पर्धा ही अटळ आहे. जो तो भोवतालच्या लोकांसोबत स्पर्धा करत आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग शोधत असतो. पण इतरांशी स्पर्धा करून खरेच काही साध्य होते का? दुसऱ्यांसोबत स्पर्धा न करता, माझी स्पर्धा ही फक्त माझ्यासोबत आहे. आणि ही स्पर्धा करत असताना, मी माझ्यातल्याच 'मी'ला, माझ्या अहंपणाला, माझ्या गर्वाला हरवतो आहे, असा एक सुंदर व्यापक विचार ह्या शेवटच्या शेरामध्ये व्यक्त झाला आहे.

 

जीवनातल्या विविध प्रसंगांवर, टप्प्यांवर भाष्य करणारी, आणि शेवटी एक व्यापक, अनुकरणीय असा विचार देऊन जाणारी ही गझल वाचकांच्या मनाचा ताबा घेत निश्चितच अंतर्मुख व्हायला भाग पाडते.

 

कल्याणी आडत




2 comments:

  1. खूप सुंदर रसग्रहण केले आहे. प्रत्येक शेर छान उलगडला आहे...

    ReplyDelete