‘अंदाज’
अनेक नवनवीन व उदयोन्मुख गझलकारांच्या सोबतीने
मराठी गझल बहरत असताना,
आजच्या काळातील स्त्री गझलकारांचे मराठी गझल क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान
नक्कीच महत्वाचे ठरत आहे. स्त्री गझलकारांच्या लेखणीतून व्यक्त
होणारा दृष्टिकोन मराठी गझलेला समृद्ध आणि व्यापक बनवत आहे.आजच्या
घडीला मराठी कविता आणि गझल विश्वातील एक सुप्रसिद्ध आणि प्रस्थापित नाव आहे ते म्हणजे
माधुरी चव्हाण-जोशी यांचे. 'मधुघट'
ह्या त्यांच्या गझलसंग्रहातील एका सुरेख, आशयसंपन्न
गझलेतील निवडक चार शेरांचे रसग्रहण आज आपण करणार आहोत.
तुझे अंदाज चुकल्याचा तुला अंदाज आला ना?
तुझे कोणीच नसल्याचा तुला अंदाज आला ना?
शेरातील दीर्घ रदीफ (अंत्य यमक) वाचताना किंवा ऐकताना जेव्हढी मजा देतो, तितकेच कठीण
असते तो रदिफ पूर्ण गझलेत तितक्याच ताकदीने आणि आशयसंपन्नतेने सांभाळणे. ह्या गझलेत असाच दीर्घ रदिफ पाळण्यात आला आहे, पण प्रत्येक
शेरात तो वेगळ्या पद्धतीने समोर येतो आणि हरेक शेर आशय-विविधतेत
नटतो.आयुष्यात पावलोपावली विविध अंदाज बांधले जातात. किंबहुना ही दुनिया अंदाजावर आणि अंदाज सफल होण्याच्या आशेवर चालते असे म्हणले
तरी वावगे ठरणार नाही. सगळे आपलेच असल्याचा अंदाज बांधून जगत
असताना अशी काही घटना घडते की आपले अंदाज चुकल्याचा अंदाज आपल्याला येतो आणि तेव्हा
ह्या जगात कोणीच कोणाचे नाही ह्या मतावर तुम्ही येऊन पोहोचता, असे मतल्यामध्ये गझलकारा सांगू इच्छितात.
तिची ना सावली दिसली,तिचे ना
वाजले पैंजण,
तिने रस्ता बदलल्याचा तुला अंदाज आला ना?
आपल्या जवळच्या खास व्यक्तीच्या छोट्या-छोट्या सवयींशी,
गोष्टींशीसुद्धा आपण एकरूप होत जातो. अशी व्यक्ती
जेव्हा काही कारणाने आपल्यापासून दूर जाऊ लागते, तिचा सहवास अस्पष्ट
होऊ लागतो तेव्हा तिचे अस्तित्व नसल्याच्या असंख्य खुणा जागोजागी दिसू लागतात.
सावली आणि पैंजण ह्या दोन रूपक उदाहरणावरून त्या व्यक्तीची उणीव किती
साध्या गोष्टींमधून सुद्धा जाणवून येते, हे ह्या शेरात दिसून
येते.
जरासुद्धा भिती नव्हती तुझ्या डोळ्यात मरताना,
सुरी नकळत फिरवल्याचा तुला अंदाज आला ना?
जीवनात काही गोष्टींवर, काही व्यक्तींवर आपण जीवापाड
प्रेम करतो. त्यांच्यावर तितकाच विश्वास ठेवतो. पण एखाद्या अनाहूत क्षणी ह्या विश्वासाला तडा जातो आणि आपल्याच व्यक्तीकडून
विश्वासघात होतो. हा विश्वासघात होत असतानाच्या बेसावध क्षणात
माणसाच्या मनामध्ये कोणतीच भीती नसते, समोर येणाऱ्या वादळाची
चाहूल नसते, इतक्या नकळतपणे हा घात होतो. विश्वासाचा शेवटचा क्षण उत्कटतेने ह्या शेरात व्यक्त झाला आहे.
तिच्या गाण्यामधे साधा तुझा उल्लेखही नव्हता,
तुझे संदर्भ पुसल्याचा
तुला अंदाज आला ना?
ज्या व्यक्तींसाठी आयुष्यभर आपण बरेच काही
करतो, कदाचित अशा व्यक्तीच्या
आयुष्याच्या अत्यंत लहान कोपऱ्यात आपले अस्तित्व असते. ज्यांच्या
पडत्या काळात आपण त्यांना साथ दिलेली असते, ती जाणीव लक्षात ठेवणारे
अगदीच तुरळक असतात. किंबहुना, त्यांच्या
भरभराटीच्या, आनंदाच्या काळात आपल्याला विसरणारे लोकच जास्त असतात,
आणि त्या सुखाच्या काळात आपले संदर्भासुद्धा त्यांच्या आयुष्यातून पुसून
टाकलेले असतात असा काहीसा भाव ह्या शेरात प्रकट होतो.
कल्याणी आडत
अप्रतिम शेर व तितकंच छान रसग्रहण. धन्यवाद.
ReplyDelete