ग गझलेचा …(निवडक गझलांचा रसास्वाद)

 


एखादा कवी, कविता किंवा गझल लिहीत असताना, त्याला भावलेले क्षण आणि त्या भावनांच्या आंदोलनातून निर्माण झालेल्या कविमनाच्या असंख्य जाणिवांना शब्दांच्या रुपात जणू मूर्त रूप देत असतो! त्या शब्दांचा ठेवा हा मला एका इंद्रधनूसारखाच वाटतो, कारण भावना आणि शब्दांच्या संगमातून निर्माण झालेल्या या इंद्रधनुषी काव्याचे सप्तरंगांसारखे विविध भाव तो वाचकाला देऊन जातो. मग त्यामधून कोणता रंग निवडायचा, हे सर्वस्वी वाचकावर अवलंबून असतं.प्रत्येकाची अंतरंगे वेगळी, तसाच प्रत्येकाला कवितेतून भावणारा अर्थही वेगळा! आदरणीय गझलकार वैभव देशमुख यांची माफी मागून त्यांच्या एका सुंदर गझलेने माझ्या मनाच्या पटलावर काय भाव रेखाटले, ते मांडण्याचा प्रयत्न या रसग्रहणातून!
     
ही गझल जेव्हा वाचली, तेव्हा प्रत्येक शेर मनाला स्पर्शून गेला. या गझलेतला कोणताही शब्द वाचताना रसभंग करत नाही, की ऐकताना कानांना कठोर वाटत नाही. अगदी 'रडायला', 'मरायला' हे काफियेसुद्धा असा काही आशय घेऊन समोर येतात की या शब्दांमधली नकारात्मकता जाणवता 'अरे! हे तर मीसुद्धा अनुभवलं आहे' असे उद्गार नकळत उमटत जातात. या गझलेतल्या निवडक पाच शेरांचं रसग्रहण मी येथे करत आहे.

                           
फार साधे  म्हणायला  आपण
                           जन्म 
 जातो  कळायला  आपण


      
मतल्यामध्येच वाचकाला कसं जिंकून घ्यायचं याचं हे मूर्तिमंत उदाहरण! प्रत्येकाला वाटत असतं, आपल्यासारखे साधे, सरळ आपणच. पण खरं पाहायला गेलं तर, इतके साधे असतो का आपण? स्वतःलाही माहीत नसणारा एखादा आपलाच पैलू किंवा गुण कधीतरी नकळत समोर येतो, आणि आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपली स्वतःशीच नव्याने ओळख होत जाते. आणि म्हणूनच, स्वतःला पूर्णपणे ओळखायला, समजून घ्यायला, स्वतःची स्वतःलाच पारख व्हायला उभा जन्मदेखील अपुरा आहे, असा गहिरा अर्थ वाचकासमोर ठेवणारा हा शेर बराच वेळ मनात रेंगाळत राहतो.


                          
काय  दिसते  मनामध्ये  नक्की
                          
का भितो  मन बघायला  आपण




       
मतल्यामधला भावार्थ किंचितसा पुढे नेणारा हा दुसरा शेर वाचताक्षणी विचार करायला भाग पाडतो. असंख्य भावभावना, इच्छा, आकांक्षा, दृष्टिकोन, अनुभव ह्या सर्व गोष्टी सामावून घेणाऱ्या मानवी मनाची गुंतागुंत समजणं हे खरंच फार कठीण काम. दुसऱ्याला एका क्षणात पारखून मोकळे होणारे आपण, कधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून बघतो का? कधी मनातला पसारा आवरण्याचा प्रयत्न करतो का? जगासमोर हजारो मुखवटे लावून फिरणारा माणूस स्वतःला मात्र कधी फसवू शकत नाही. मग अशावेळी स्वतःच्याच मनात आपल्याला असं काय बरं दिसतं की आपणच आपल्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करायला बघतो?

                         
एक  उबदार  स्पर्श  झाला  अन
                         
लागलो ओघळायला  आपण



       
आयुष्याला असंख्य पदर असतात. कधी सुखाचा किनारा गवसतो, तर कधी निराशेच्या लाटा अंगावर येतात. कळत नकळत प्रत्येक संकटातून तावून सुलाखून निघत आपण किंचितसे कठोर होत जातो. प्रत्येक संघर्ष हा पुढच्या संघर्षासाठी बळ देऊन जात असतो खरा, पण माणूस अगदी वज्रासारखा कठोर जरी झाला, तरी मुळात त्याच्या मनाचं जे हळवेपण आहे ते मात्र कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात जिवंत असतंच.दुनियेसमोर प्रचंड कठोर असणाऱ्या व्यक्तीलाही ज्याच्यासमोर तो हळवेपणाची पोतडी बिनसंकोच रिती करू शकतो, अशा एखाद्या जिव्हाळ्याच्या माणसाची गरज असतेच.वास्तवाचा बोचरा गारठा सोसताना कोणीतरी मायेची उबदार दुलई पांघरून जातं आणि मग जेव्हा अशा व्यक्तीच्या आपुलकीची ऊब तनामनाला भारून टाकते, तेव्हा दगड बनलेल्या हृदयालाही पाझर फुटतो. मनात साठवलेलं सारं काही पाघळत जातं आणि अश्रूंसारखे आपण त्या प्रेमाच्या ओलाव्यात ओघळून जातो, अशी सुंदर अभिव्यक्ती या शेरात व्यक्त झाली आहे.

                          
ध्यान  अपुल्याकडे  न  कोणाचे
                          
पाहिजे  का  निघायला  आपण

      
या परिस्थितीचा सामना खरं तर प्रत्येकजण कधी ना कधी करतोच. आयुष्यभर प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागण्याचा आपण खूप प्रयत्न करतो, पण कधीतरी व्यवहार आणि नाती यांचे गणित फसते आणि कोणाचातरी रोष सहन करावा लागतो. एखाद्याच्या प्रेमाचा स्वीकार आपण करू शकतो, तर एखाद्याच्या द्वेषाचा स्वीकार करणंसुद्धा क्रमप्राप्त आहे. अशा वेळी आत्मसन्मान आणि नात्यामधली ओढ यांचा समतोल सांभाळणं अवघड होतं. जर नात्यामध्ये एकमेकांप्रती आदर नसेल, तर अशा नात्यात फार काळ राहणं हे ठीक नव्हेच. खूप प्रयत्न करूनही एखाद्या चौकटीत बसता आलं नाही, तर समजून जावं की ती चौकट आपल्यासाठी नव्हे! अशा चौकटीतून बाहेर पडत असताना मनाची जी काही चलबिचल होते, ती या शेरात जशास तशी दिसून येते.

                           
हात  चिखलात  बरबटुन  गेले
                           
कमळ गेलो  खुडायला  आपण

      
कोणतंही वाईट कृत्य करत असताना निर्ढावलेला मनुष्य परिणामांची चिंता सहसा करत नाही. पण सद्सद्विवेकाचा खून करत असताना पापाचे, असमाधानाचे आणि अस्वस्थतेचे रक्त नाही म्हणले तरी हातांना लागत असतेच. उगाच हव्यासापोटी एखादी गोष्ट वाट्टेल त्या पद्धतीने आपली झालीच पाहिजे, अशा वृत्तीने मिळवलेलं काहीही कधीच पचनी पडत नाही. चांगल्या व्यक्तीला उगाचच त्रास देताना त्याचे परिणाम हे भोगावेच लागतात. सौंदर्य न्याहाळणं हे रसिकतेचं लक्षण आहे, पण त्या सौंदर्यावर स्वार्थी हेतूने अधिकार गाजवण्याच्या प्रयत्नात आपलं नुकसानच होणार, हे या शेरात 'कमळा'च्या रूपक उदाहरणावरून आपल्याला समजतं. साध्या आणि मोजक्या शब्दांत मांडलेला खूप गहिरा अर्थ, हे मला वैभव देशमुख यांच्या या गझलेचं ठळक वैशिष्ट्य वाटतं. मुळात 'आपण' हाच रदीफ असल्यामुळे प्रत्येकाला ही गझल आपली वाटत जाते. छोट्याशा शेरांमधून जगण्यातले विविध पदर हळुवारपणे उलगडत जातात. रसग्रहण करत असताना नकळत बऱ्याच गोष्टींवर चिंतन आणि मनन होत गेलं. आशय सौंदर्याने नटलेली ही गझल वाचत असताना दरवेळी एक नवा दृष्टिकोन देऊन जाते.

तळटीप:- गझलेचा पहिला शेर म्हणजे मतला.हा महत्वाचा शेर असतो.

गज़लमध्ये दोन प्रकारची यमकें असतात. अंत्ययमकम्हणजे खरें तर एक शब्द किंवा शब्द-समूह असतो. त्याला रदीफम्हणतात.

अंत्ययमकाच्या आधी आणखी एक यमक येते त्याला काफिया म्हणतात.

कल्याणी आडत





5 comments:

  1. अप्रतिम रसग्रहण

    ReplyDelete
  2. Rakesh Shantilal SheteOctober 4, 2021 at 1:10 AM

    क्या बात है, व्वा !

    ReplyDelete
  3. अप्रतिम गझल, आणि तितकेच सुंदर रसग्रहण, शुभेच्छा 🌹

    ReplyDelete