गझल हा काव्यप्रकार आशयसंपन्नतेच्या दृष्टीने
इतका व्यापक आहे की गझलेमध्ये जीवनातल्या कोणत्याही घटकांवर, सामाजिक किंवा राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाऊ शकते,
तसेच अगदी प्रेमासारख्या, समर्पणासारख्या तरल नाजूक
भावनांनादेखील गझलेत स्थान मिळते. अशाच आशयसंपन्नतेने नटलेल्या
अनेक उत्तम व दर्जेदार गझला लिहिणारे प्रसिद्ध गझलकार गोपाल मापारी यांची एक गझल आज
आपण पाहणार आहोत. आणि सोबतच त्या गझलेतल्या निवडक चार शेरांचे
रसग्रहण करणार आहोत.
'केसांत माळते तू जे फूल केवड्याचे,
मज एक एक पडते ते फूल केवढ्याचे' अशा जबरदस्त शेरांमधून श्लेष अलंकार लिलया सांभाळणारे
‘गोपाल मापारी’ मराठी गझलक्षेत्रातील एक दर्जेदार
गझलकार आहेत.
उभ्या घराच्या आभाळाला
छप्पर देऊ शकलो नाही
वावर देणाऱ्या बापाला
मी घर देऊ शकलो नाही
वडिलांनी आयुष्यभर केलेला त्याग, मुलाच्या रक्तात त्या त्यागाची
सळसळणारी जाणीव, आणि जाणीव असूनसुद्धा परिस्थितीपुढे त्याची झालेली
हतबलता ह्या गझलेचा मतल्यामध्ये प्रकट होते आणि गझलकाराच्या संवेदनशीलतेचा साक्षात्कार
होतो. वडिलांसारख्या आभाळपण देणाऱ्या कणखर व्यक्तीलासुद्धा छताची,
सावलीची गरज असते आणि आयुष्यभर मला सर्वकाही देणाऱ्या बापाला मी एवढी
साधी गोष्ट सुद्धा देऊ शकलो नाही ह्याचे शल्य ह्या शेरात गझलकार व्यक्त करतो.
गुणपत्रक अन त्यावरचे
गुण, माफी मागत होते परवा
कौतुक पुष्कळ दिले म्हणे पण भाकर देऊ शकलो नाही
भूक ज्याप्रमाणे योग्य, अयोग्य काहीही बघत नाही त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता,
पात्रतादेखील बघत नाही. शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत
असलेला व्यक्ती उदरनिर्वाह करूच शकेल असे नाही. बुद्धिजीवी व्यक्तीलासुद्धा
नियतीचे फासे चुकलेले नाहीत. फक्त कौतुकाने पोटाची भूक भागत नाही,
हा अर्थ गझलकाराने मोजक्या पण प्रभावी शब्दांत व्यक्त केला आहे.
स्वप्नांनी तर पाय कितीदा
अंथरुणाबाहेर ओढले
पण दोघांना पुरेल इतकी
चादर देऊ शकलो नाही
इच्छा-आकांक्षांचा
पतंग उंच उडत असताना 'अंथरूण पाहून पाय पसरावेत' ह्या विचाराने त्याची दोरी तुटते. स्वप्ने बिनधास्त असतात,
स्वैर असतात, स्वच्छंदी असतात. स्वप्नांना लायकी ठाऊक नसते. अशी स्वप्ने कित्येकदा आवाक्यापलीकडचा
विचार करायला भाग पाडतात, पण तो विचार, ती स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी गरजेची असणारी परिस्थिती मात्र मी कधीच बदलू
शकत नाही, हा खिन्न भाव ह्या शेरात व्यक्त होतो.
पाठीवरचे दप्तर टाकुन मी जगण्याचा भार वाहिला
पुन्हा कधी त्या पाठीवरती
दप्तर देऊ शकलो नाही
लहान वयात इवल्याशा खांद्यांवर पडलेली जबाबदारी
मोठे व्हायला भाग पाडते. ज्या वयात पाठीवर दप्तराचा
भार वाहायला हवा, अभ्यास करायला हवा, खेळायला-बागडायला हवे, त्या वयात मी 'जगण्याचा'
भार वाहिला. ज्या वयात मी हसतखेळत राहायला हवे
होते, त्या वयात माझ्यावर आयुष्य सांभाळण्याची जबाबदारी आली.
आणि ती जबाबदारी इतकी मानगुटीवर बसली, की पुन्हा
कधी त्या खांद्यांवर मी दप्तर देऊ शकलो नाही. ते खांदे फक्त जबाबदारीचेच
ओझे पेलत राहिले.....
मनाच्या संवेदनशीलतेचा ठाव घेणारी ही गझल
समाजातील विषम परिस्थितीचे वर्णन अगदी छोट्या छोट्या उदाहरणातून करते आणि अंतर्मुख
व्हायला भाग पाडते.
कल्याणी आडत
धन्यवाद कल्याणीजी....अगदी अपेक्षित भावना मांडल्यात आपण
ReplyDelete