मराठी आणि उर्दू गझलविश्वातील एक सुप्रसिद्ध
नाव म्हणजे इलाही जमादार. इलाही जमादार यांची 'माझ्यानंतर...' ही गझल त्यांच्या 'अंदाज आरशाचा' इतकी प्रसिध्द नसली तरी सुद्धा
तितकीच आशयपूर्ण आहे. 'माझ्यानंतर' ही गझल हृदयभंग झालेल्या प्रियकराच्या भावना प्रत्येक शेरातून
मांडते.
अनाथ होईल जगी वेदना माझ्यानंतर
छळेल तुजला तुझी वंचना माझ्यानंतर
वेदनेने माझे आयुष्य इतके भरून
व्यापले आहे की जर मी कदाचित उद्या ह्या जगात नसलो तर ही वेदनाच अनाथ होईल. माझ्यानंतर
ह्या वेदनेला कोणीच वाली उरणार नाही. जणू काही वेदना हीच माझे सर्वस्व होती आणि माझ्यानंतर
ती चक्क अनाथ होईल, असा गहिरा अर्थ मांडत मतला आपल्यासमोर येतो.
सारे काही असून जवळी भणंग होशील
कळेल तुजला प्रीत-भावना माझ्यानंतर
मी सोडून, तुझ्याकडे सर्व काही असेल. पण
सर्व काही असूनसुद्धा तुझ्याकडे काहीच नसेल. भौतिक गोष्टींच्या मागे लागून कधीकधी आपण
प्रेम, माया, आपुलकी ह्या भावनांना बगल देतो.
पण जेव्हा ह्या भावनांना आपल्या झोळीत भरभरून टाकणारी व्यक्तीच आपल्या आयुष्यातून निघून
जाते तेव्हा मात्र सर्व सुखे पायाशी लोळण घेत असतानासुद्धा भणंग असल्याचा भास होतो.
जिवापाड मी केली प्रीती अन तू
छळले
असेल कोणी असा सांग ना! माझ्यानंतर
मी तुझ्यावर इतका जीव लावूनसुद्धा
तू मात्र मला नेहमी छळलेस. आणि एवढे सहन करणारा माझ्यानंतर कोणी तुला भेटेल का? असा प्रश्न प्रियकर इथे करतो
आहे.
फुल ‘इलाहीच्या’ कबरीवर ये चढवाया
करावीस इतुकीच साधना माझ्यानंतर
भले ह्या जन्मात तू साथ दिली
नाहीस, भले माझी झाली नाहीस, माझ्यावर प्रेम केले नाहीस, पण ह्याबद्दल आता माझी तक्रार
नाही. आता केवळ एवढेच मागणे आहे की, माझ्या कबरीवर फूल चढवायला तू यावे. जाताजाता माझी एवढीच अपेक्षा
आहे की तू फूल चढवण्याइतपत तरी माझी साधना करावीस.सहज उलगडत जाणारा प्रत्येक शेर आणि
वेगवेगळ्या अर्थाने समोर येणारा 'माझ्यानंतर' हा काफिया ह्या गझलेचा सुंदर बनवतो.
कल्याणी आडत
सुंदर परीक्षण !
ReplyDelete