ग गझलेचा, निवडक गझलांचा रसास्वाद रसग्रहण क्र. 2

 


कोणत्याही गझलरसिकाला हमखास येणारा अनुभव म्हणजे, काही ठराविक आणि प्रभावशाली शेर मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी घट्ट रुतून बसतात आणि कितीतरी दिवस त्या शेराचा गूढ अर्थ पुन्हा पुन्हा मानसपटलावर घुटमळत राहतो. एखाद्या गाण्यातल्या दोन ओळी जशा ओठांवर रुळतात आणि आपल्याही नकळत त्या आपल्या तोंडून गुणगुणल्या जातात, अगदी तसंच एखाद्या गझलेमधला एखादा शेर कित्येक दिवस मनात घर करून राहतो. वैभव जोशींच्या अशाच अनेक शेरांमुळे रसिकांची हीच अवस्था होते.

 

वैभव जोशी हे आधुनिक कवितेमधलं अतिशय ताकदीचं आणि सध्या गाजत असलेलं नाव आहे यात शंका नाही. एक उत्कृष्ट कवी, गीतकार आणि गझलकार असणाऱ्या वैभव जोशी यांची सादरीकरणे त्यांच्याच आवाजात ऐकणे हादेखील एक नितांतसुंदर अनुभव असतो. शब्दांचं 'वैभव' पुरेपूर गाठीशी असणाऱ्या ह्या गझलकाराच्या अशाच एका सुंदर गझलेतल्या निवडक पाच शेरांचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न करत आहे, अर्थातच त्यांची माफी मागून.

 

जसा व्याकूळ होतो ओंडका वाहून जाताना

तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना

 

आपल्या जिवलगासोबत होणारी अवघ्या काही क्षणांची भेट जितकी सुंदर असते, तितकंच कठीण असतं ते त्या व्यक्तीचा निरोप घेणं. पाण्यात वाहून जाणारा ओंडका आपणही कित्येकदा बघितला असेल, ते दृश्य किती निरस आणि उदास दिसतं, तेही आपल्याला जाणवलं असेल; पण निरोपाच्या वेळेला होणारी घालमेल नेमक्या शब्दांत टिपत असताना त्या परिस्थितीला वाहून जाणाऱ्या ओंडक्याची उपमा देणे, हे केवळ वैभव जोशीच जाणे! झाडापासून विलग होत झाडपणाचा त्याग करत, वाहत जाणाऱ्या व्याकूळ ओंडक्याची जी भावना आहे अगदी तीच भावना आपल्या प्रिय व्यक्तीचा निरोप घेताना दाटून येते...ओंडका किती सुंदर रूपक आहे इथं!

  

पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही

मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना

 

आपल्या भेटीमध्ये मीपणाचे पाश तोडून टाकत तुझ्यामध्येच माझं स्वत्व विलीन होत आहे, आणि आता त्यानंतर माझी स्वतःची अशी काही ओळखच उरत नाही इतके आपण एकमेकांमध्ये भिनलो आहोत! समर्पणाच्या परमोच्च बिंदूवर मनाची अशीच काही अवस्था असेल, नाही? एखाद्या शेराचे भिन्न भिन्न अर्थ निघू शकतात. प्रियकर-प्रेयसीमधील भावना वर्ज्य करून ह्या शेराकडं बघायचं झाल्यास, आणखी एका नात्याचा अर्थ इथे संभावतो ते म्हणजे परमेश्वर आणि भक्तामधील नातं! परमेश्वराच्या चरणी भक्त लीन झाल्यानंतर इतके दोघे एकमेकांमध्ये मिसळून जातात, की त्यानंतर भक्ताचं वेगळं काही स्वत्व उरत असावं, असं वाटत नाही.

  

रित्या परडीसही येतो फुलांचा गंध नेमाने

तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना



फुलांनी गच्च भरलेली परडी रिकामी झाल्यानंतरसुद्धा त्या फुलांचा सुगंध परडीत रेंगाळत असतोच. काही व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जरी गेलेल्या असल्या तरी त्यांच्या सहवासात घालवलेल्या सुंदर क्षणांची सुगंधी आठवण आपल्यासोबत जन्मभर असते. आपली भेट संपली आहे, पण तुझ्या अस्तित्वाला इतका प्रभावशाली सुगंध लाभलेला आहे की आपल्या भेटीनंतरही माझ्या अस्तित्वात तो सुवास व्यापून उरला आहे. काय सुगंधी कल्पना आहे ही!

 

तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी

तुला वाचून जाताना, तुझ्यावाचून जाताना

 

'होतो' ह्या शब्दात श्लेष आहे हे कळल्यावर ह्या शेराची गंमत नव्याने उलगडते. त्या व्यक्तीला 'कादंबरी'ची उपमा देऊन किती रसिक बनवलं आहे या शेरालाच! तुझ्या आयुष्याच्या कादंबरीमधलं मी केवळ एक पान होतो, पण खूण केलेलं पान हे नमूद करायला गझलकार विसरत नाही. तुला मी वाचलं तर आहे, पण आता परत जाताना तुझ्या'वाचून' म्हणजेच तुझ्याशिवाय मला जावं लागतं आहे आणि हे सगळं होत असताना मी तुझ्या आयुष्यात केवळ एक 'खुणेचं पान' झालेलो आहे.

  

जसे की दूरचे गाणे मनाचे स्वास्थही नेते

तशी पडतेस तू कानी जगाआडून जाताना

 

कधीतरी सकाळी-सकाळी अचानक एखादं गाणं कानी पडतं आणि मग सबंध दिवसभर ते गाणं आपल्या ओठी रेंगाळतं. बरं, नुसतंच रेंगाळत नाही तर कधी काळी झंकारलेली आपल्या आतली एक तार त्या गाण्याने छेडलेली असते. ह्या अस्वस्थतेसारखीच तू कानी पडतेस, पुन्हा पुन्हा आठवतेस, तुझ्या आठवणी त्या गाण्यासारख्याच मनात रेंगाळत राहतात...

 

काहीशी निरोपाच्या वेळेची छटा ह्या गझलेत दिसून येते, पण प्रत्येक शेरात छटा निराळी ही मात्र कमाल आहे. साध्या आणि सोप्या शब्दांतून एक गूढ अर्थ वाचकासमोर ठेवून देण्याचा हा जो गझलकाराच्या लिखाणाचा स्वभाव आहे, तो एका गझलरसिकासाठी विलक्षण आकर्षक आहे.

 

कल्याणी आडत

kalyaniadat@gmail.com



1 comment: