जी ए कुलकर्णी मराठी साहित्यातील Pied Piper.

 


लहानपणी इंग्रजी साहित्यातील Pied piper ची गोष्ट वाचनात आली होती, ऐकली होती. तो एक धून वाजवतो आणि सगळे उंदीर मोहिनी घातल्यासारखे त्याच्या मागे जातात. तो त्यांना नदीत बुडवून टाकतो. जेव्हा त्याला पारितोषिक दिले जात नाही तेव्हा दुसरी धून वाजवून तो मुलांना mesmerise करून घेऊन जातो. नुसता Pied Piper वाजवून उंदरांवर अथवा मुलांवर मोहिनी घालून त्यांना सगळं विसरायला लावून -- फरफटत म्हणा हवं तर पण -- घेऊन जातो  हे सगळेच गंमतीशीर वाटत होतं. दहा - पंधरा वर्षांचा झाल्यानंतर ही केवळ एक गोष्ट होती आणि ती लहान मुलांच्या मनोरंजनासाठी लिहिली गेली होती असं वाटलं होतं. मात्र जेव्हा पंचविशीत जी ए कुलकर्णी यांची पुस्तके  हातात आली आणि त्यातल्या गोष्टी वाचायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की ही नुसतीच कवी कल्पना नसावी.

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी (जी. ए. कुलकर्णी) 


त्यांच्या लिखाणाची अनेक भल्याभल्यांना भुरळ पडली यात आश्चर्य नाही. अमोल पालेकर, विजया राजाध्यक्ष आणि अशा अनेकांचा त्यात समावेश होतो. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा म्हणून विजया राजाध्यक्ष यांनी पुष्कळ प्रयत्न केले होते. त्यांच्या गोष्टींचे इंग्रजीत भाषांतर करून ज्ञानपीठला दिले होते. ज्या दोन मराठी साहित्यिकांना तो पुरस्कार मिळायला हवा होता त्यातील एक जी ए आणि दुसरे विजय तेंडुलकर असो.

त्यांच्या कथा वाचायला लागल्यानंतर त्यांचे नवीन पुस्तक वाचणे ही एक जीवनावश्यक बाब होऊन गेली. त्याची कथा एकदा वाचून संपत नाही ती परत परत वाचावी लागते तेव्हाच त्या कथेचे सगळे पैलू लक्षात येतात. ही गोष्ट  जास्त करून जाणवते ती त्यांच्या ऑर्फिअस, विदूषक या प्रकारच्या कथा वाचताना. ऑर्फिअस मध्ये ते मृत्यू आणि त्याचा मनुष्य मनावर होणारा परिणाम याची चर्चा करतात. किंवा विदूषक या कथेत एका स्पर्धेमध्ये सल्लागार म्हणून काम करणारा विदूषक त्यांनी रंगवला आहे. या कथेत मनुष्य कुठल्याही घटनेचा, प्रतिकाचा अनेक प्रकारे कसा विचार करू शकतो आणि तरीही योग्य ते उत्तर शोधू शकत नाही अशी मांडणी केली आहे.



त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी इतिहासातील अथवा मिथक कथा घेऊन त्या वेगळ्या प्रकारे सादर केल्या आहेत. ग्रीक साहित्यातील ऑर्फिअस किंवा महाभारतातील एकलव्य अशा सर्वपरिचित व्यक्तिमत्वांचा वापर करून वेगळ्याच दृष्टिकोनातून ती कथा आपल्या पुढे ठेवतात आणि मूळ कथेपासून नुसतेच लांब नेत नाहीत तर त्या कथांना एक वेगळेच परिमाण देतात.

आपल्या वाचनाच्या प्रवासात जीए आपल्याला आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर भेटतात हा योगायोगाचा प्रश्न असतो. मित्रांशी बोलताना जाणवले की काहींना त्यांचे लिखाण क्लिष्ट वाटले. जीए वाचायला, कळायला कठीण आहेत वगैरे वाक्य सहजपणे कानावर येते. या सर्वाना एकच विनंती की तसे खूप वर्षापूर्वी झाले असेल तर परत एकदा वाचायला घ्या. आपण इतर कथा-कादंबऱ्या जशा वाचतो तशा जीएंच्या कथा वाचता येत नाहीत. त्यावेळी अंधारी गुहा वाटली ती आता कदाचित हिऱ्या- माणकांनी प्रकाशमान झालेली असेल....


अभय दीक्षित


1 comment:

  1. चला, अजून एक जीए भक्त भेटला! तुझं-माझं दोघांचं, जीएंच्या गोष्टी वाचत ... त्यांच्या नीयतीपुढे हतबल होत जाणाऱ्या विचारधारेचा भाग होतं - भलं होवो!!

    ReplyDelete