जीए नावाचं गारुड

 

इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेलची गोष्ट आहे. कुण्या एकाच्या खोलीवर केवळ हॉस्टेलवरच चालू शकतात अशा टवाळक्या करत असताना टेबलवर पडलेलं पुस्तक दिसलं. सवयीने चाळलं आणि लक्षात आलं की हे वाचायला हवं आहे. पुस्तकाचं नाव होतं. सांजशकु. लेखक जीए कुलकर्णी. एका बैठकीत वाचून काढण्यासारखी जी पुस्तकं असतात त्यापैकी ते एक निघालं.



जीए यांच्या लिखाणाचं गारुड तेव्हापासून आहे. ललित, सत्यकथा किंवा मौजेचा दिवाळी अंक यातून त्यांनी लिहिलेल्या गोष्टी मग आवर्जून वाचत राहिलो. त्यांच्याविषयी लिहिलेलं जास्तच कुतूहलाने वाचत गेलो. जीए हे एक गूढ व्यक्ती आहेत असं वाटत राहिलं. आणि बऱ्याच अंशी ते खरंही होतं. अत्यंत एकलकोंडे, एकांतप्रिय असे हे जीए, यांनी सभा समारंभातून उपस्थिती कटाक्षाने टाळली. The Lord of The Flies या नोबेल पारितोषिक विजेत्या पुस्तकाचं मराठी भाषांतर जीए यांनी केलं. त्याच्या प्रकाशनाला लेखक William Golding उपस्थित होते. पण जीए मात्र नव्हते. हा त्यांचा आपल्याभोवती काही गूढ वलय तयार करण्याचा प्रकार असावा अशी टीकाही त्यांच्यावर झाली. पण नंतर तो त्यांचा स्वभाव आहे, हे उमगत गेलं. घरातलं एखादं मूल इतकं बुजरं असतं की अगदी जवळचे पाहुणे असल्याशिवाय त्याने तोंडसुद्धा दाखवू नये तसाच काहीसा प्रकार.



या एकांतप्रिय माणसाची कल्पनाशक्ती मात्र अचाट भराऱ्या घेत असे. मी वरती म्हटलेलं सांजशकुपुस्तक वाचायला घेतलं आणि त्यातल्या भाषेमुळे आणि प्रत्येक गोष्टीतल्या सघन कथावस्तूमुळे मी त्या लिखाणाच्या प्रेमात पडलो. मराठी भाषेत एकाहून एक दिग्गज भाषाप्रभू होऊन गेले आहेत. या मंडळींच्या पहिल्या रांगेतल्या एका जागेवर हक्क सांगू शकेल अशा  भरजरी आणि आशयघन भाषेत जीए लिहीत असत.

जी एंनी दोन प्रकारच्या कथा लिहिल्या. एक अतिवास्तववादी तर दुसऱ्या अद्भुत, गूढ, वास्तवापासून अतिदूर अशा. मला स्वतःला त्यांच्या या अद्भुत कथांनी त्यांच्याकडे ओढून घेतले. या कथांतून जीएंच्या भाषाप्रभुत्वाचे, शब्दसंग्रहाचे, आणि शब्दांतून भरजरी चित्रे रंगवण्याचे त्यांचे कसब आपल्यापुढे येते. या गोष्टी वाचतांना आपण एखादा ७० मिमिचा पिक्चर रिकाम्या चित्रगृहात एकट्याने पण पहिल्या रांगेत बसून बघतो आहोत असं वाटत राहतं! त्या चित्रपटातले ते भरजरी सप्तरंग, घनगंभीर आवाज केवळ आपल्याचसाठी आहेत आणि आपण खुर्चीच्या कडेवर बसून आता पुढे काय या उत्कंठेने खिळून राहतो.

जीएंनी ज्या काळात लेखन केलं त्या काळचा प्रभाव असेल, पण जीएंच्या फार थोड्या कथा स्त्रीपात्र-प्रधान आहेत. त्यांच्या कथेतील नायक (किंवा protagonist ला मराठीत जे काही म्हणतात ते!) समाजातील सर्व आर्थिक, सामाजिक स्तरातून येतात. अद्भुत कथांमध्ये जसे राजपुत्र आहेत तसेच सेवक, विदूषक, सर्वसामान्य नागरिक. सगळ्यांना मुख्य पात्र बनवून त्यांच्या कथा-व्यथांमधून जीएंनी आपले म्हणणे मांडले आहे.

शेक्सपिअरने लिहिलेल्या कलाकृतींमध्ये शोकांतिका जास्त प्रसिद्ध झाल्या. रसिकांनी शोकांतिकांना डोक्यावर घेतले. असे नाटक वाचून म्हणा, बघून म्हणा झाले, की मनात दीर्घकाळ टिकून राहणारी चुटपुट, अस्वस्थता, तगमग रसिकांच्या पसंतीस उतरली. आपल्या दैनंदिन अनुभवांच्या जवळून स्पर्श करणारी वाटली. जीएंनी काही सुखांतिका लिहिलीच असेल तर मी तरी वाचलेली नाही!

मी वरती लिहिलंय की जीएंच्या कथा पुरुष-पात्र प्रधान असतात पण त्यांच्या सगळ्याच कथांची नायिका एकच आहे. नियती! जीएंच्या बऱ्याच प्रमुख पात्रांचा उल्लेख 'तो' या सर्वनामात होतो. बऱ्याच गोष्टी या प्रथमपुरुषी लिहिलेल्या आहेत. मानवी जीवन हे किती असहाय आहे असा काहीसा सूर या कथांमधून दिसत राहतो. मानवाची आपल्या आयुष्यावर, आपल्या भविष्यावर सत्ता गाजवायचा प्रयत्न करावा, आणि नियतीने तो सहजी उधळून द्यावा हे या कथांमधून वारंवार दिसते. वेगवेगळ्या पद्धतींनी, वेगवेगळ्या कथारूपांमधून जीए ते आपल्याला दाखवून देतात. याच कारणामुळे असेल कदाचित, पण मला जीएंनी लिहिलेली सुखांतिका सापडलेली नाही.



गुरुनाथ आबाजी कुलकर्णी
 
(जी. ए. कुलकर्णी) 

जीएंच्या काही कथा दीर्घकथा आहेत. छोट्या कादंबऱ्याच म्हणा ना. प्रवासी किंवा इस्किलार या कथा शेवटी चुटपुट लावत उदास करून टाकतात तर स्वामी सारखी कथा जीवाचा थरकाप उडवून जाते. 'आपण त्याच्या जागी असतो तर .." या विचाराने झोप उडू शकते. तसाच विचार केला तर स्वामी ही काही भयकथा नव्हे. पण edge of the seat या प्रकारातली ती नक्कीच आहे. ऑर्फिअस मध्ये जीवनाबद्दल गहन चिंतन आहे. एका देवाचा मृत्यू या कथेत प्रत्यक्ष देव सुद्धा नियतीपुढे कसे हतबल आहेत ते दिसून येते. एका अर्थाने जीए इथे वास्तवाचाच आधार घेतात.

अगदी छोट्यासुद्धा कथा आहेत. गीत पाखरू, चांदीची तीस नाणी, भेट, अस्तिस्तोत्र, पत्रिका, बळी. जेमतेम दोन तीन पानांच्या या कथा एकेक सुरेख विचार वीज चमकून जावी तसा आपल्यापुढे मांडत संपून जातात. चांदीची तीस नाणी. जीजस क्राईस्ट आणि जुडास यात  दोघेही लहान मुलं असताना एकमेकांसमोर येतात अशी कल्पना करून लिहिलेली आहे. तर भेट या गोष्टीत राजपुत्र गौतम आणि अश्वत्थामा असेच एकमेकांना न ओळखता एकमेकांबरोबर येतात आणि माणसाच्या मर्त्य असल्याबद्दल एक अतिशय सुंदर विचार समोर ठेवून जातात!

जीएंचं लिखाण सर्वानाच झेपेल असं अजिबातच नाही. त्यातला विचार, भाषेचं विविध, भरजरीपण, तर कधी उदास करणारे  अतिवास्तव चित्रण. यामुळे त्यापासून 'आपण यापासून जरा दूरच ठीक' असं म्हणणारे बरेच! पण त्याच बरोबर कारल्याचा कडुपणातला स्वाद जसा काही जणांना भावतो, त्याचप्रमाणे जीएंवर (खरंतर त्यांच्या लिखाणावर) भरभरून प्रेम करणारे काही कमी चाहते नाहीत. त्यातलाच मीही एक.

ज्ञानेश्वरीबद्दल एकनाथ महाराज म्हणतात. 'एक तरी ओवी अनुभवावी'. त्या धर्तीवर म्हणेन 'जीएंची एक तरी कथा वाचावी आणि त्यावर चिंतन करावे'. आपल्या आयुष्याकडे बघण्याचा एक समृद्ध, सशक्त दृष्टिकोन सापडल्याशिवाय राहणार नाही!

 

अभिजित टोणगांवकर



1 comment:

  1. मस्त वाट .जीए आवडणारे लोक भेटले की छान वाटत.

    ReplyDelete