गझल

 



जीवनापेक्षा मरण का आज झाले स्वस्त आहे

उंबऱ्याबाहेर राहुन घालतो यम गस्त आहे

 

चार दिवसांची मजा हो वाटले बाहेर खाणे

आणि चटणी भाकरी घरची कळाली मस्त आहे

 

संकटाची वेळ आली घेतला आधार त्याचा

पांढऱ्या वस्त्रातला   तो वाटला विश्वस्त आहे

 

दुःख वा आनंद होवो साठते डोळ्यात पाणी

हौद हा भरण्यात सांगा कोण इतका व्यस्त आहे

 

माणसांचे मी खुजेपण पाहते प्रत्येकवेळी

जाणले मग तो हिमालय एकटा संन्यस्त आहे



माधुरी खांडेकर





1 comment:

  1. संपादक मंडळी, मनःपूर्वक आभार 🙏🏻

    ReplyDelete