GBS- एक अनुभव प्रकरण ११ वे: घरच्याघरी फिजीओथेरपी

मागील भाग : GBS प्रकरण १० : घर वापसी

घरच्याघरी फिजीओथेरपी, आयुर्वेदिक तेल मसाज आणि विद्युतचेता उद्दीपन (Electrical Nervous Stimulation)

मला सतत जाणवणारा पण कमी तीव्रतेचा बधीरपणा असल्यामुळे डॉक्टरांनी Neurobion च्या गोळ्या चालूच ठेवल्या होत्या. त्याशिवाय इतर कुठलीही खास औषधयोजना नव्हती. व्हिटॅमिनच्या पुरवणीसाठी डॉक्टरांनी D-Rise B-Complex चालू ठेवले होते तेवढेच. त्यांनी आधीच स्पष्ट केले होते की आता मुख्य उपाययोजना म्हणजे - फिजिओथेरपी, फिजिओथेरपी आणि फिजिओथेरपीच! २६ जानेवारीपासून फोर्टीसच्या जॉन यांनी घरी येऊन दररोज एका तासाची फिजियोथेरपी सुरू केली. माझी एकंदरीत अवस्था पाहून त्यांनी सल्ला दिला की मी चाकाची खुर्ची (wheel chair) वापरणे सोडून द्यावे. मी ती आज्ञा समजून लगोलग वॉकर वापरून घरभर फिरू लागलो.  

माझ्या हालचाली एखाद्या यंत्रमानवासारख्या व्हायच्या - हळू आणि यांत्रिकपणे. अरुण नावाचा एक मसाजतज्ज्ञ आहे. तो स्नेहधारामध्ये Cerebral Palsy झालेल्या मुलांना मसाज करतो. तो रोज संध्याकाळी तासभर माझ्यावर मेहेनत घेऊ लागला. जॉनच्या व्यायामामध्ये बराचसा एकसुरीपणा होता. अरुणने मात्र मला नवीन नवीन प्रकार शोधण्यास उद्युक्त केले- जसे उठाबशा, पाठीला बाक देणे, चेहेऱ्याच्या हालचाली इत्यादी.  एका आठवड्यात मी वॉकर वापरणे सोडून दिले आणि सुटा चालू लागलो.  पण विचार व हालचाली यात म्हणावी तेवढी सुसूत्रता नव्हती, त्यामुळे आत्मविश्वास वाढत नव्हता. मन ठरवायचे की आपण दोन फुटावर पुढचे पाऊल टाकायचे, पण पाऊल प्रत्यक्षात एकाच फुटावर जायचे; ते सुद्धा भलत्याच दिशेकडे, ठरलेल्या दिशेने नाही. सुमारे पंधरा दिवसांच्या एकसुरी व्यायामांनंतर जॉनने थोडेसे बदल करायला सुरुवात केली. तोपर्यंत अरुण मला अपार्टमेंटच्या मैदानावर नेऊन फुटबॉलला किक मारायला, टेनिस बॉलचा कॅच-कॅच वगैरे प्रकार करायला लावत होता. 

सुमारे चार आठवड्यांनंतर हातापायात बऱ्यापैकी बळ आले. फुटबॉलला किक जोरदार बसत होती. जॉनने सुचवले की चेहेऱ्याच्या स्नायूंचा अशक्तपणा घालवण्यासाठी मीविद्युत चेता उद्दीपन” (Electrical Nervous Stimulation) ही उपचार पद्धती वापरावी. माझ्या सर्व शारिरीक हालचाली सामान्यपणे होत आल्या तसे जॉनने येण्याचे बंद केले. फोर्टिस हॉस्पिटल जॉनचे एका तासाचे रु.५००/- लावत होते. अरुण मात्र त्याची सेवा स्नेहधारातर्फे देत होता. मी स्नेहधाराच्या कुटुंबापैकीच असल्याने, ते एक प्रकारे प्रेमाचे प्रतीक होते- विनामूल्य!! आणि अजून स्पष्ट हवे तर - फुकट!!  आजवर मी आमच्या अपार्टमेंटच्या व्यायामशाळेत (Gym) पाऊलही ठेवले नव्हते. अरुण मला तिथे घेऊन गेला, वेगवेगळी पैलवानी उपकरणे वापरायला लावली. मग त्याने मला सायकलवर बसवले, माझे नियंत्रण आणि तोल सांभाळणे याची परीक्षा घेतली. मी त्यात बऱ्यापैकी उत्तीर्ण झालो. सुमारे पाच आठवड्यांनंतर अरुणने सांगितले की माझ्यात बऱ्यापैकी ताक आली आहे आणि मी स्वतःला सांभाळू शकतो.

एकदा neurophysician कडे पुनर्तपासणीला गेलो असताना आम्ही विचारले की - आयुर्वेदिक तैलमर्दन (oil massage) केलं तर चालेल का? डॉक्टर  म्हणाले -जरूर करा, त्याने फायदाच होईल.मग माहितीतल्या लोकांकडे थोडी चौकशी केली आणि १६ फेब्रुवारीला नरसिम्हा नावाच्या माझ्या मित्राने एक आयुर्वेदिक वैद्य, Dr. गॉडवीन, सुचवला. मी लगेच त्यांच्या खाजगी दवाखान्यात जाऊन सल्लामसलत केली. मग मला अजिबात न आवडणारा प्रकार -तेल लावणेहा सुरू झाला -  ते सुद्धा सर्वांगाला आणि स्वतःच स्वतःला नाही, तर दुसऱ्या कुणाकडून! मी त्या औषधी तेलाने सर्वांगाला मालिश करून घेतले. चेहेऱ्यासाठी एक खास - क्षीरबला तेल - वापरण्यात आले. मग त्या मालिशवाल्याने दोन्ही नाकपुड्यात काही औषधी द्रव सोडले, वरून काही वनस्पतीची कोरडी पाने जाळून त्यांचा धुर हुंगायला लावला.  

हा सर्व प्रकार रिकाम्यापोटी करायचा होता.  तेलाचे मालिश एकवेळ परवडले, पणनस्यप्रकार माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता. तुपात बनवलेल्या औषधाचे ८-१० थेंब नाकात सोडले, ते तोंडात झिरपून आले. मग मळमळून उलटी होईल असेच वाटले. पण पोट रिकामे असल्याने उलटी कशाची होणार? डोळ्यांतून पाणी आले.  तोंडात झिरपलेले औषध मी थुंकून टाकत होतो.  मला वाटले की दुसऱ्या दिवशी पण हाच प्रकार घडेल.  पण आश्चर्यकारक रित्या शरीराने त्या तुपातल्या औषधाशी जुळवून घेतले. हर्षदा आणि मी या मताचे होतो की वेगवेगळे खूप उपचार एकाच वेळी घेऊ नयेत.  रोज मी जी सूर्यक्रिया करत होतो ते जणू माझ्या शारीरीक बळाचे मापक होते. दिवसागणिक माझी शक्ती वाढत होती. 

या आजारपणाच्या दरम्यान ज्या ज्या लोकांशी संबंध आला त्यांच्याशी माझी तार जुळून गेली. युक्ती आयुर्वेदिक सेंटरमधला माझा मालीशवाला (masseur) याआधी चार वर्षे हरिद्वारला बाबा रामदेव यांच्या आश्रमात हेच काम करीत होता. तो काही महिन्यांपूर्वीच बंगलोरला आला होता. त्याच्या दोन्ही मुली केरळमध्ये राहत होत्या, त्यांची नावे अफबीया (Afbia) आणि अफबी (Afb) अशी होती. फोर्टिस मध्ये Agl स्पेलिंगच्या नावाचा परिचारक होता, त्याच्या नावाचा उच्चार अजील असा करीत असत. AFB असेल तर नावाचा उच्चार अफबी असा होतो. माझ्या ४४ वर्षांच्या आयुष्यात मी असलीस्वर रहितअक्षरांची नावे प्रथमच ऐकत होतो. ही म्हणजे व्हिएतनामच्या Nguyen (उच्चारी - न्यूएन) किंवा आफ्रिकन  Mbngwa (उच्चारी म्बंगवा) या नावांची भारतीय भावंडे वाटली.

आठवडाभराच्या मालीश-स्पेशल कार्यक्रमानंतर मी शेजारीच असणाऱ्या विक्रम अस्थी रुग्णालयात (orthopaedic क्लिनिक) गेलो. चेहेऱ्याच्या उजव्या बाजूला विद्युतचेता उद्दीपन (Electrical Nervous Stimulation) सुरु केले. असे समजले की चेहेऱ्यामध्ये सुमारे डझनभर स्नायू असतात जे चेतासंस्थेशी यांत्रिक हालचालीसाठी जोडलेले असतात - बहुदा हावभाव व्यक्त करण्यासाठी वगैरे. तिथले अस्थिरोगतज्ञ डॉ. विक्रम म्हणाले, “चेहेऱ्याच्या उजव्या बाजूच्या स्नायूंची नैसर्गिक क्षमताच कमकुवत झाली आहे. आम्ही विद्युत प्रवाह सोडून त्यांचे आकुंचन कृत्रिमपणे थांबवतो व स्नायूंवरचे myelin sheath - आवरण पुनर्स्थापित व्हायला मदत होते.’’ बहुदा माझ्या बाबतीत ही प्रक्रिया अंमळ संथपणेच होत असावी.  

मी दररोज ४५ मिनिटे हा उपचार घेत होतो, एक वेळचा खर्च रु.२०० होता. तेथील फिजियोथेरपिस्टने चेहेऱ्याचे अनेक विविध व्यायाम सांगितले व स्वतःच आरशात बघून करायला सांगितले. (हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट मुजीबाने हेच करायला सांगितले होते). मी ते व्यायाम बऱ्याच अंशी केले पण आरशाविना. ते व्यायामप्रकार साधारण अशा स्वरूपाने होते - कपाळावर आठ्या पाडणे, डोळे गच्च मिटणे व नंतर उघडणे, एकच गाल फुगवणे, नाकपुड्या फुलवणे, हसून गाल वर उंच करणे इत्यादी विशेष प्रकार होते. चेहेऱ्याचा अशक्त भाग सुरुवातीला ३-४ मिली अँपीयरचा विद्युत प्रवाह (current) घेत होता. जशी जशी सुधारणा होईल तसा तसा विद्युत प्रवाह कमी प्रमाणात लागेल असा माझा अंदाज होता. पण तो सपशेल खोटा ठरला.  फिजिओथेरपिस्टचा मापदंड त्याच्या बरोबर उलट होता. जशी जशी चेहेऱ्याच्या चेतातंतूंची व स्नायूंची शक्ती वाढेल तसा तसा विद्युत प्रवाहसुद्धा वाढवावा लागतो. सुमारे ३ आठवड्यात मी ७-८ मिली अँपीयरचा प्रवाह घेऊ लागलो. 

एका शनिवारी, या फिजिओथेरपिस्टच्या तासाला संध्याकाळऐवजी सकाळी गेलो. जाण्याच्या अगोदर सकाळीच शक्तिचलन क्रिया आणि न्याहारी केली होती. आदल्या दिवशी संध्याकाळी मी ६-८ मिलीअँपियरचा प्रवाह घेऊ शकत होतो, पण आता सकाळीक्रिये नंतरमी चक्क ८-११ मिलीअँपियर वर पोहोचलो. महिनाभरात मी ८-१३ मिलीअँपियर ला स्थिरावलो. चेहेऱ्याच्या सुरकुत्या, नाकपुड्या आणि गालांचे स्नायू पूर्णपणे बरे झाले होते. पण तरीही उजव्या डोळ्याच्या पापणीशी, तसेच ओठांच्या उजवीकडच्या बाजूला थोडा कमकुवतपणा जाणवत होता. तोंडात हवा भरून ठेवणे जड जाते, तसेच उजव्या डोळ्यात वारंवार पाणी येते. ओलावा कायम ठेवण्यासाठी आजकाल मी उजव्या डोळ्यात कृत्रिम अश्रूंचे औषध घालतो. कदाचित असे असावे की मी माझा डोळ्याचे आणि ओठांचे योग्य तऱ्हेने, योग्य प्रमाणात आभार मानले नसावे, म्हणून ते थोडे जास्त रुसून बसलेत. नक्की ठाऊक नाही. 

या आजारपणादरम्यान मी निरनिराळ्या वेळी वेगवेगळ्यापॅथींवरहोतो. हॉस्पिटलमध्ये असताना मुख्यत्वेकरून ऑलोपथी, घरी असताना फिजियोथेरपी, आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमध्ये मसाज, आयुर्वेदिक कडवट काढे, धुरी  आणि चेहेऱ्यासाठी Electrical Nervous Stimulation. एवढ्यावर थांबले हे नशीबच!  माझा मावसभाऊ (आजकालच्या भाषेत bro) असतो मुंबईला, व्यवसायाने इंजिनीयर, पण ज्या काही विषयात हात घालेल त्यात पट्टीचा संशोधक. माझ्या चेहऱ्याच्या त्रासाविषयी समजताच त्याने मला एक होमिओपॅथिक औषध सुचवले. त्याच्या sms नुसार -कॉस्टीकम 10 मिलीग्रॅम,  10 थेंबांची मात्रा अर्धाकप पाण्यात एकदा घेणे.मी अद्यापपावेतो ते घेतलेले नाही, हा भाग निराळा. आमच्या आयुर्वेदिक वैद्यराजांनी काही प्रोटीनयुक्त व पौष्टीक उत्पादने सांगीतली - ती होती Amway या नेटवर्क मार्केटिंग पद्धतीने विक्री करणाऱ्या कंपनीची. ती मी अजून वापरतो आहे. भयंकर महाग. जर एखादी गोळी चुकून खाली पडली तर मी गमतीने हर्षदाला म्हणतो - “30 रुपयांची नोट खाली पडलीये.आणि पटकन उचलून पाण्याबरोबर गटकन गिळून टाकतो.  

To Kill a Mockingbirdहे दर्जेदार पुस्तक वाचून झाल्यावर मला उर्मी आली की अजुन एक पुस्तक वाचावे. माझा थोरला मुलगा- चिरंतन याच्या पुस्तकांच्या कप्प्यात मार्क ट्वेन यांनी लिहिलेली चार पुस्तके होती. जवळजवळ दीड एक वर्ष ती पुस्तके न वाचता नुसती पडून होती. या पूर्वी जेव्हा केव्हा मी मार्क ट्वेन वाचायला घेतला तेव्हा एका पानाच्या पुढे गेलो नव्हतो. पण Mockingbird वाचल्यानंतर मला अमेरिकेतील आफ्रिकन लोक कशा पद्धतीने इंग्रजी बोलतात याचा परिचय झाला. त्यामुळे त्याच्या पुढच्या पायरीचे मार्क ट्वेनचे - Adventures of Huckleberry Finn- हे पुस्तक वाचायचे धाडस करून त्याचा आस्वादही घेऊ शकलो. 

मूळ इंग्रजी लेखक : आशिर्वाद आचरेकर

भाषांतर : सुनीत राजहंस
ट्रान्स्क्रिपशन मदत : अजय चौधरी





No comments:

Post a Comment