GBS प्रकरण १० : घर वापसी


मागील भाग:     https://mitramandal-katta.blogspot.com/p/gbs-part9.html


मी चाकांच्या खुर्चीवरून (wheel chair) घरी आलो.  गीतू व तिचा नवरा सारंगन CFL चा स्पोर्टस् डे आटोपून थकूनभागून त्यांच्या कारमधून आमच्या मागोमाग आले. भूषण त्यांच्या कारमधून आमच्या सोबतीला आला. हर्षदा, दीदी आणि मी आमच्या कारमधून आलो.  रवीने - अजून एक CFL पालक - एक वॉकर अगोदरच घरी देऊन ठेवला होता. तो चिरंतनने पार्किंगपर्यंत आणून दिला.  १५ दिवसांपूर्वी ज्या जागी मी कोलमडलो होतो बरोबर त्याच जागेवर - लिफ्टच्या समोर - मी आज वॉकरच्या सहाय्याने पहिले पाऊल ठेवले. एका दोघांनी मला wheelchair वर बसायला मदत केली व नंतर लिफ्टमध्ये सरकवले.  घरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम मी देवघरापाशी गेलो व प्रार्थना म्हटली -  

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
ॐ सर्वेशां स्वस्तिर्भवतु ।
सर्वेशां शान्तिर्भवतु ।
सर्वेशां पुर्णंभवतु ।
सर्वेशां मङ्गलंभवतु ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

प्रार्थना जरा मोठ्यानेच म्हटली - हेतू हा की आवाजाची स्पंदने माझ्या अधिभौतिक व आधिदैविक अस्तित्वापर्यंत पोहोचावी. मी गहिवरून गेलो. गीतूलासुद्धा प्रार्थनेच्या तेजाची अनुभूती होऊन तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हर्षदाने आणि तिने आनंदाने एमेकीला मिठी मारली. मग आम्ही सगळे गोल रिंगण करून बसलो. गीतूने आम्हाला वेगवेगळे ध्यानप्रकार सांगितले. संत कबीर यांच्यामोको कहा ढूंडे रे बंदे, मै तो तेरे पास मे’, या तत्वज्ञानाप्रमाणे - सत्त्वाचा शोध घेणारे गाणे आम्ही एकत्र ऐकले. माझ्या ICU मधल्या पहिल्याच दिवशी मी हेच गाणे ऐकले होते.मॊकोचा शोध चालूच होता.

तोपर्यंत माझा शेजारी सदानंद हावेलकम बॅक’ (Welcome back!) असा संदेश लिहीलेला ब्लु-बेरीचा केक आणि मोठा पुष्पगुच्छ घेऊन आला. मला घरी भेटायला आलेल्या प्रत्येकाने प्रेमभराने मिठी मारली. आतापर्यंत आई, काही प्रमाणात बहिणी व पत्नी यांना सोडून कुण्या दुसऱ्या स्त्रीला मिठी मारायचा प्रसंग आला नव्हता. पण आता या ठिकाणी कुठलाही भेदभाव नव्हता. मला ठाऊक होते की ही मिठी माझ्या शरीरात संचारीत जीवन उर्जेला होती. हर्षदा आणि दीदीने निरांजन लावून मला ओवाळले. त्यानंतर मी ब्लु-बेरी केक कापला व आम्ही सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. मग हर्षदा व दीदीने स्वयंपाक घराचा ताबा घेतला. भूषण व चिरंतन माझ्यासाठी फळे आणण्यासाठी सारक्की मार्केटला गेले.

मी घरी आल्यापासून मला भेटायला येणाऱ्यांची जणू रीघ लागली होती.  ते सर्व जण आमच्या घरची फळांची टोपली सदैव तुडुंब भरून ठेवत होते. सगळ्यांनी जणू ठरवूनच टाकले होते की माझ्यासाठी सफरचंद उत्तम!  एका दिवशी आमच्या घरी एवढी सफरचंद जमा झाली होती की आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये सफरचंदाचे दुकान लावू शकलो असतो. दिदीला एक झकास युक्ती सुचली. तीने सर्व सफरचंदे सोलली, त्यांचे तुकडे करून साखरेत घोळवले व जाम करून बाटल्यांमध्ये भरून ठेवले. तो सफरचंदाचा जाम अजूनपर्यंत पुरतोय.

मला दवाखान्यातून घरी सोडले त्याच दिवशी CFL चा स्पोर्टस् डे होता. मला मनापासून त्याला हजर राहायचे होते. अनेक पालकांनी मला सांगितले की हा स्पोर्ट्स डे अत्यंत विशेष होता.  दुर्दैवाने मी त्याला हजर राहू शकलो नाही. हॉस्पिटलच्या वॉर्डात असताना मी कमला नावाच्या एका CFL शिक्षिकेला फोनवरून सांगितले होते की मी स्पोर्टस् डे ला शाळेत उपस्थित राहणार आहे. माझा आवाज ऐकून तिला खूप आनंद झाला होता. आज जरी मी त्याप्रमाणे शाळेला भेट देऊ शकलो नाही तरी घरी परतण्याचा आनंद नक्कीच होता.

ज्या दिवशी मी घरी पोहोचलो तेव्हा मी मांडी घालून बसू शकत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मीशांभवी महामुद्रा क्रियाकरायला सुरुवात केली. तीन दिवसातच मला वज्रासनात बसता येऊ लागले.  हे मात्र थोडे कष्टदायक आणि कसरतीचे होते. वज्रासन स्थितीमध्ये दोन्ही पाय दुमडून एकमेकांना समांतर ठेवून टाचांवर बूड टेकवून बसायचे व पायाचे चवडे जमिनीवर टेकवायचे. वज्रासन येऊ लागल्यावर मग मीशक्तिचलन क्रियाकरण्यास सुरुवात केली. सकाळी शक्तिचलन व संध्याकाळी शांभवी असा क्रम चालू केला. मीसूर्य क्रिया’ (अत्यंत धीम्या गतीचे सूर्यनमस्कार) करण्याचाही प्रयत्न केला, पण माझे हात आणि पाय थरथरत होते. सूर्यनमस्कार मात्र जमत होते. दहाएक दिवसात हातापायांना स्थिरता आली. सूर्यक्रिया ही माझ्या हातापायांच्या शक्तीचे मापक बनली. माझ्या हालचाली सुरुवातीचा  एक आठवडाभर खूपच मंद होत्या, त्याही वॉकरच्या सहाय्याने. जेव्हा जेव्हा भेटायला कोणी पाहुणा येई तेव्हा त्यांना माझ्या खोलीत बोलावण्यापेक्षा मी मुद्दामहून स्वतः चालत बाहेर हॉलमध्ये येई. पायांना तेवढाच व्यायाम.दोन्ही हात वॉकरवर, हळूहळू चालतो आणि कोणीतरी बाहेर वाट पाहतोयहा सर्व प्रकार मला सिनेमामधला मुरलेला खलनायक हिरोला भेटायला जातोय त्याप्रमाणे वाटे आणि मनातच ढँ टँ ढँ असे पार्श्वसंगीत उमटे.

वॉर्डमधले शेवटचे काही दिवस मला सारखी तहान लागे. घरी आल्यावर पण तशीच तीव्रतेने तहान लागत राहिली. फोनवर चारदोन वाक्ये बोललो किंवा काही पावले चाललो तरी लगेच तहान लागायची. फोर्टीसच्या डॉक्टरांनी मला ब्लड-शुगर तपासायला सांगितले. सुदैवाने ती नॉर्मल निघाली. माझ्या आयुर्वेदिक वैद्यांनी मला खूप गोड खाण्याचा सल्ला दिला. त्याचा उपयोगही झाला. दिदी व हर्षदाने आळीपाळीने घरच्याघरी गोड पदार्थ बनवण्याचा सपाटा लावला. २-३ आठवड्यांनी तहान ताळ्यावर आली. मी जेवणाबरोबर पुरवठ्याला कच्चे, भिजवून मोड आलेले हिरवे मूग आणि शेंगदाणे भरपूर प्रमाणात खात असे.  

दवाखान्यात दाखल झाल्यादिवशी ६९ किलोग्रॅम असलेले माझे वजन अवघ्या १५ दिवसांनी डिस्चार्जच्या दिवशी ६१ किलो पर्यंत उतरले होते. अनेक जणांनी नकळत या परस्पर वेट लॉस प्रोग्रॅमचे कौतुक केले. बहुधा ते त्यांचे वजन घटवण्याच्या  प्रयत्नात असावेत. घरी पोहोचलो तेव्हा माझ्या अंगावरची त्वचा सैल व सुरकुतली होती. काही दिवसात आहार सुधारला आणि वजन वाढू लागले. ७ फेब्रुवारी २०१५ ला माझे वजन ६३ किलो होते आणि महिनाभरात  ६७  किलोवर स्थिरावले.

थोडा अवसर मिळाल्याबरोबर, मी ऑफिसच्या नेटवर्कवर लॉग-इन झालो आणि रजेबाबतची नियमावली काळजीपूर्वक वाचून काढली. या माझ्या अपवादात्मकपणे दीर्घकाळ ऑफिसला न जाण्यामुळे माझ्या नावावर खूप जास्ती LWP - Leave Without Pay- म्हणजे शुद्ध मराठीतबिनपगारी रजाजमा झाली होती. फेसबुकवर असताना शर्मिलाशी (मुंबईची मैत्रीण) चॅट करत होतो. तिने माझ्या तब्येतीची चौकशी केली. माझी प्रकृती सुधारणेतील प्रगती पाहून तिला आनंद झाला - ती उद्गारली -तुला माहितीये ?” (कोणीही असे  विचारले की खात्रीने समजावे की आता काही मोठी बातमी किंवा रहस्य प्रकट होणार आहे.सुमतीताई टिकेकर GBS नेच मृत्यू पावल्या. वयस्कर असूनही त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या. पण GBS ने त्यांना ग्रासले, अगदी मृत्यूपर्यंत.  GBS कुणाच्या मृत्यूला कारणीभूत होऊ शकेल हा माझ्यासाठी मोठा धक्काच होता. सुमतीताई या हिंदुस्तानी संगीतक्षेत्रातील सुप्रसिद्ध गायिका, नावाजलेले मराठी अभिनेता उदय टिकेकर यांच्या मातोश्री होत्या. माझी मैत्रीण शर्मिला त्यांची नातेवाईक आहे. आतापर्यंत मी GBS च्या गंभीर स्वरूपाविषयी ऐकून होतो, पण कोणी GBS मुळे मृत्युमुखी पडल्याचे मात्र ऐकले नव्हते. आता प्रथमच ऐकत होतो.

डिस्चार्ज मिळाल्यावर काही दिवसांनी - २६ जानेवारीला माझ्या एका शेजाऱ्याने मला वाचण्यासाठी एक पुस्तक आणून दिले. ते काहीसे रस्त्याच्या कडेला दुय्यम दर्जाच्या छपाईचे पुनर्मुद्रित असे पुस्तक होते.  मी ते पुस्तक त्यावेळी लगेच वाचायला घेऊ शकलो नाही, डोळे साथ देत नव्हते. खरेतर एरव्हीसुद्धा गेले काही वर्षे मी एकही पुस्तक वाचून पूर्ण केले नव्हते. माझे काही हर्षदासारखे नाही की - काहीही द्या मी वाचून काढेन. कोणी जर खरोखरच खूप शिफारस केली तरच मी एखादे पुस्तक वाचतो.  ते पुस्तक बरेच दिवस हॉलमध्ये पडून होते. मग कोणीतरी ते उचलून माझ्या बेडरूममध्ये ठेवले.  आजारपणानंतर मी वाचायला सुरुवात केली ती वर्तमानपत्रातील मोठ्या टाईपवाल्या अक्षरांतील मथळ्या
पासून.  माझे डोळे दिवसागणिक सुधारत होते. अजून  ४-५ दिवसांनी, १ फेब्रुवारीला माझ्या लक्षात आले की मी चक्क ते पुस्तक वाचू शकत होतो. एका दुपारी मी ते पुस्तक उचलून वाचायला सुरुवात केली. पहिल्या काही पानातच मला जाणवले की त्यात माझ्या लक्षात राहण्यापलीकडच्या संख्येने वेगवेगळी पात्रे होती. मी सरळ ते पुस्तक मिटले व ताणून दिली. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा ती पहिली काही पाने वाचली आणि मला दुसरा साक्षात्कार झाला की त्यात बरेचसे असे शब्द होते जे मला फक्त डिक्शनरी पाहूनच समजतील. मग अत्यंत धीम्या गतीने वाचू, डिक्शनरीच्या साहाय्याने मी ती पहिली काही पाने रेटून नेली आणि अचानक ते पुस्तक मला खुणावू लागले. जसा एखादा अबोल माणूस आपल्याला आधी शिष्ट वाटतो पण नंतर मात्र धागे जुळतात व स्नेह जुळतो. ते पुस्तक होते हार्पर ली यांचे -To kill a mockingbird”. ते अर्धेअधिक वाचून झाले असताना, वर्तमानपत्रात ठळक मथळ्याची बातमी झळकली की - हार्पर ली यांचे ८० व्या वर्षी एक नवीन पुस्तक येऊ घातले आहे. तोपर्यंत त्यांनी फक्त एकच पुस्तक लिहिले होते, त्याबद्दल त्यांना वयाच्या साठीत पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. हॉलिवूडवाल्यांनी त्यावर एक चित्रपटसुद्धा काढला होता. त्यात Atticus Finch चे पात्र दस्तुरखुद्द ग्रेगरी पेक या नावाजलेल्या अभिनेत्याने साकारले होते. त्याबद्दल त्याला अतिशय सन्मानाचा ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला होता.

क्रमश:--
भाषांतर : सुनीत राजहंस
ट्रान्स्क्रिपशन मदत : अजय चौधरी


मूळ इंग्रजी लेखक : आशिर्वाद आचरेकर


No comments:

Post a Comment