GBS -एक अनुभव -प्रकरण १२: विमा, ड्रम-सर्कल आणि नेहेमीच्या दिनक्रमाकडे

मागील भाग : GBS प्रकरण ११: घरच्याघरी फिजीओथेरपी



जेव्हा मी हॉस्पिटल मध्ये भरती झालो तेव्हा मला आमच्या कंपनीची विमा विषयीची नियमावली तेवढी स्पष्टपणे ठाऊक नव्हती. हर्षदाने माहिती काढली की मला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण होते - स्टार हेल्थ इंशुरन्स कंपनी कडून. काही कागदपत्र व व्यावसायिक आवश्यकतांची पूर्तता केल्यावर विमा कंपनीने ते पैसे हॉस्पिटलला परस्पर भरले - कॅशलेस. विनायकने,माझ्या साडूने,१ लाख रुपये रोख आणले होते,ते त्याने हॉस्पिटलला भरले. त्याच आठवड्यात नंतर त्यानी १.५ लाख रुपये आणखी भरले. मी अजूनही हे त्याचे २.५ लाख रुपये देणे लागतो. फोर्टिस हॉस्पिटलचे एकूण बिल रुपये ७ लाख ७० हजार फक्त झाले. २ लाख रुपये माझ्या SBI च्या होमलोन खात्यातून ICICI च्या खात्यात वर्ग केले होते. भरती झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ते तिथेच जमा पडून होते. त्यामुळे राहीलेले ३ लाख ३० हजार रुपये मी ICICI मधून व SBI च्या होमलोन खात्यातून भरून टाकले.  याशिवाय माझा १.५ लाख रुपयांचा कुटुंब विमा आहे,ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा. ऑक्टोबर २०१४ मध्ये चिरंतनचा ओठ त्याच्या शाळेत झाडाच्या फांदीचा शेंडा चाटून फाटला होता. १.५ लाख रुपयांपैकी ४० हजार रुपये आधीच त्याच्या ओठाच्या प्लास्टिक सर्जरी करिता वापरले गेले.

या GBS प्रकरणानंतर मला दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण किती तोकडे आहे याची जाणीव झाली. हर्षदाने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या आणि त्यांच्या तृतीयपक्षी म्हणजे Third Party व्यवस्थापकांकडे वारंवार विचारपूस केली. दिदी आणि हर्षदा  स्टार हेल्थच्या कार्यालयात जाऊन ओरिएंटल ला हवी असलेली कागदपत्रे घेऊन आल्या. त्यानुसार नंतर ओरिएंटलकडे राहिलेल्या रुपये १लाख १०हजार ची मागणी (claim) केली.

ही रक्कम माझ्या SBI च्या खात्यावर जमा होताच त्याचा पत्ता माझ्या विमा एजन्टला लागला आणि त्याने सरळ मला फोन केला.  तो साधारण साठीच्या आसपासचा वयस्कर माणूस,आरोग्य विमा पॉलिसीचा गेल्या सात वर्षापासून माझा हप्ता भरणे वगैरे साधारण एजन्टची कामे करतो आहे. तो फक्त कन्नड बोलत असल्यामुळे बहुतकरून हर्षदाच त्याच्याशी बोलत असे. कधी क्वचित मी इंग्लिश मध्ये बोललो तरी त्याचे उत्तर तो कन्नड भाषेतूनच देत असे. विमा रक्कम मला मिळाल्यावर जेव्हा त्याने मला फोन केला तेव्हा मला कळले की तो सफाईदारपणे हिंदी बोलू शकत होता. तो म्हणाला -सर आपको पैसा मिल गया. इसी ख़ुशी में मुझे कुछ दे दो. मैने मेरे स्कुटर मे पेट्रोल डाल के खर्च किया है.  आपके काम के लिये जो कुछ सेवा दि है उसके लिये कूछ रुपये दे दो.मी त्याला सांगितले की बाबा रे मी तब्बल ८लाख रुपये आत्तापर्यंत खर्च केले आहेत आणि पुढील उपचारांसाठी अजुन पुष्कळ खर्च आहे. त्यावर तो निर्लज्जपणे म्हणाला -तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला काही चहा पाण्याला पैसे द्या.मग मात्र मी उखडलो.  त्याला सांगितले -माझ्याकडून तुला एक छदामही मिळणार नाही.लगेच दुसऱ्यादिवशी मी ओरिएंटल च्या कार्यकारी अधिक्षकांना तक्रार केली व त्यांचेही लगोलग उत्तर आले.  त्या एजन्टला चांगलेच धारेवर धरण्यात आले. मग त्याचा मला परत फोन आला आणि अत्यंत साखरपेरणी करत तो दिलगिरी व्यक्त करू लागला. एके दिवशी त्याच्या मुलाचाही  फोन आला आणि त्यानेही क्षमायाचना केली.

मग मी पुन्हा ओरिएंटलच्या AO ना e-मेल पाठवून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई न करता त्याला तंबी देऊन प्रकरण मिटवण्यास सांगितले. मला इच्छा होत होती की १-२ लिटरच्या शीतपेयाच्या बाटलीत पेट्रोल भरून त्याला द्यावे. पण हा विचार फक्त विचारच ठेवला, प्रत्यक्ष कृतीत आणला नाही. 

जो योगायोग व्हायचा तो कधीच चुकत नाही. याचे प्रत्यंतर मला एक दोन उदाहरणातून आले. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात,मी जेव्हा ICU मध्ये होतो,तेव्हा चिरंतनची शाळेची अभ्यास सहल केरळातील वायनाडला जायची होती. तो सुद्धा तेव्हा GBS ला -Gurukula Botanical Sanctuaryला गेला होता. हे एक अत्यंत प्रसिद्ध मानवनिर्मीत अरण्य आहे जिथे जगभरातून वनस्पतीतज्ञ भेट देतात. चिरंतन तिथे १५ दिवसांसाठी जायचा होता. एकीकडे माझ्या वाट्याला हा GBS तर दुसरीकडे माझा मुलगा एका निराळ्याच GBS कडे निघालेला.  हा झाला पहिला योगायोग. 

घरी आल्यावर काही दिवसांनी माईने दुसरा योगायोग सांगितला. माझ्या दूरच्या नातेवाईकांपैकी एक - मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटल मध्ये याच आजारासाठी - म्हणजे GBS साठी, ICU मध्ये भरती झाली होती.  माझ्यानंतर चार दिवसांनी तिला अ‍ॅडमिट केले होते. दुर्दैवाने तिच्या फुफ्फुसांनाही GBS ची लागण झाली होती आणि म्हणून तिला बरे होण्यास बराच कालावधी लागला.

४ फेब्रुवारीला ज्योतीमाई मला भेटण्यासाठी मुंबईहून विमानाने आली होती. तिने मला यांत्रिकपणे हालचाली करताना पाहीले.  ती येताना अत्यंत चविष्ट असे मुगाचे लाडू भरपूर प्रमाणात घेऊन आली होती.  ह्या लाडूंना मुगाच्या सालीच्या रंगाची एक हिरवट झाक होती, लाडूंमध्ये खायचा डिंक आणि सुकामेवा घातला होता.  ते एवढे भरपूर होते की  आम्ही सगळे अनेक आठवडे त्यांचा आस्वाद घेत होतो. 

एका महीन्यापूर्वी मी गीतूला म्हणालो होतो की ७ फेब्रुवारीला मी स्नेहधारामध्ये ड्रमजॅमिंग (ढोल/तालवाद्य यांचे समूहवादन) चा तास घेऊ शकेन. आता तो दिवस आला होता.  दिदी आणि माई यांना मी हा उद्योग करू नये असे वाटत होते कारण मला फार थकवा आला असता.  हर्षदा द्विधा मनस्थितीत होती. मला मात्र मनापासून ड्रमजॅमिंग करावेसे वाटत होते. मी त्यावेळी संमोहन शास्त्रातीलपेसींगहा विषय घेऊन त्याभोवती समूहवादनाच्या थीमची आखणी केली. माझ्या बहीणींना व हर्षदाला खात्री दिली की मी स्वतःवर ताण येऊ देणार नाही.  सहजपणे झेपेल तेवढेच करीन.  दिदी आणि माई दोघींनी माझ्याबरोबर यायचे ठरवले.  तोपर्यंत त्यांनी माझ्या समूहवादनाच्या तासाबद्दल फक्त ऐकले होते. आज त्या माझ्याबरोबर प्रत्यक्ष येणार होत्या,एवढेच नाही तर भाग घेणार होत्या.  ७ फेब्रुवारीला सकाळी आम्ही तिघं भावंडं स्नेहधारात ऑटॊरिक्षाने पोहोचलो.  स्नेहधारा माझ्या घरापासून जवळच आहे. तिथे माझ्यासाठी वेगळाच सुखद असा प्रसंग उभा होता.

मोठ्या अक्षरात रांगोळीने “WELCOME ASHIRWAD” असे मुख्य प्रवेशद्वाराजवळ लिहिले होते. मला तिथेच थांबवण्यात आले.  माझी समूहवादनातील (ड्रम-जॅमिंग) आवडती सहकारी - उत्तरा,आरतीचे तबक घेऊन बाहेर आली. त्यात खोबऱ्याच्या वाटीमध्ये कापूर पेटवलेला होता,आरती आणि कुंकवाचे लालभडक पाणी होते. थोडक्यात म्हणजे - इडापीडा टळून माझ्या आरोग्यासाठी माझी नजर काढण्यात आली.  या जिव्हाळ्याच्या स्वागताने माझे डोळे भरून आले.

दिदी आणि माई दोघीही जणू माझ्या अंगरक्षकांप्रमाणेच वाटत होत्या.  या अशा स्वागतामुळे त्यांचा सर्व विरोध गळून पडला,माई तर अतिशय भावूक झाली होती आणि अश्रू टिपत होती.  वादनाचा कार्यक्रम माझ्यासाठी हलका फुलकाच झाला,फार ताण आला नाही. सहभागी झालेल्या वादकांच्या श्वास आणि उच्छवास यांच्या गतीशी एकरूप असा ताल पकडून त्या गतीनेपेसींगकरून ते सेशन संपवलं.

यानंतर स्नेहधारातर्फे समूहवादनाचे मी पुट्टनहळ्ळी तलावाच्या काठावर होणाऱ्याकेरेहब्बा” (लेक फेस्टिवल) या उत्सवामध्ये नेतृत्व केले.  हे लेक फेस्टिवल बंगलोर च्या तलावांचे पुनर्वसन करून त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने करण्यात येतात.  माझ्या हातातील माइक वरून बोलत असताना तसेचबम चिकी चिकी बमवगैरे ताल म्हणताना माइकने माझ्या ओठ आणि तोंडाच्या स्नायूंची कमजोरी बरोबर टिपली.  प्रत्यक्ष बोलतांना ती ऐकणाऱ्यांना जाणवत नसे.

एका CFL च्या पालक-शिक्षक संवादावेळी (Parent-Teacher Dialogue) चेहेऱ्याच्या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे मी अर्धहास्य चेहेऱ्यावर ठेवून गेलो होतो.  जर मी हसलो तर चेहेऱ्याचे फक्त डाव्या बाजूचे स्नायू हलायचे व माझे अर्धहास्य इतरांना दिसायचे. मात्र त्याचवेळी उजव्याबाजूचा चेहरा स्नायू न हलल्यामुळे स्थितप्रज्ञ राहायचा! मी एका पालकाला म्हणालो सुद्धा -मायकल माझा डाव भागच हसतो पण उजवा नाही!तर त्यावर तो उत्तरला की -मला मात्र तुझे पूर्ण हास्य दिसते आहे.”  हे त्याचे वाक्य माझ्या हृदयाला स्पर्शून गेले.  त्याची दृष्टी फक्त डोळ्यापुरती मर्यादित नव्हती तर त्या पलीकडचेही पाहू शकत होती.  विद्युत चेता उद्दीपन (Electrical Nervous Stimulation) आणि नस्य म्हणजे नाकात औषधी तेल टाकणे या दोन उपचारांमुळे चेहऱ्याच्या स्नायूंचे बऱ्यापैकी नियंत्रण परत आले. तरी दोन उणीव स्पष्टपणे जाणवत होत्या.  एक म्हणजे माझा उजवा डोळा पूर्ण मिटत नव्हता त्यामुळे तो कोरडा पडून त्यातून सारखे अश्रू यायचे. दुसरे म्हणजे ओठांची उजवी बाजू कमजोर होती त्यामुळे खाली झुकायची. पाणी किंवा अन्न  तोंडातून उजव्याबाजूने थोडेसे गळून बाहेर येई. या संबंधी न्यूरोफिजीशियन आणि डोळ्यांच्या डॉक्टरला भेटलो असता त्यांनी सांगितले की -ज्या प्रकारच्या आजारातून तू उठला आहेस ते पाहता दोन उणीव काहीच नाहीत. तुझी प्रगती खरोखरच कौतुकास्पद आहे. थोडा वेळ जाऊदे. या दोन गोष्टी आपोआप बऱ्या होतील. 

मार्चमध्ये म्हणजे तब्बल दोन महिन्यांच्या रजेनंतर मी कामावर परत रुजू झालो. कंपनीच्या वाहन व्यवस्थापकांनी अत्यंत सहानुभूतीने मला कंपनीची बस वापरण्याची परवानगी दिली,त्यांचा नियमित नोकरदार नसताना सुद्धा ही सवलत त्यांनी मला अपवाद करून वापरू दिली.


अनेकांनी ह्या घटनाक्रमाबद्दल सांगितले की -योग्य वेळी योग्य गोष्टी घडत गेल्या.डॉक्टर म्हणाली की तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही ईश्वराचे आभारच मानायला हवे.” खरोखरच,ज्या दिवशी GBS मुळे सर्वप्रथम माझा उजवा पाय गळपटला,हर्षदाला नेमकी त्याच वेळी डॉ. विजयांना फोन करायची प्रेरणा झाली.  डॉक्टर विजयांनी नुसत्या फोनवरील वर्णनाने GBS चे अचूक निदान करून त्याचा गंभीरपण आमच्या लक्षात आणून दिला. डॉक्टर नलिनींना आम्ही SHRC मध्ये योग्यवेळी भेटून सल्ला घेतला आणि फोर्टिस हॉस्पिटलला आम्ही योग्यवेळी धडकलो.  GBS झाल्याची खात्री करण्यासाठीची न्यूरोकंडक्शन चाचणी योग्यवेळी झाली आणि IVIG चे उपचारही योग्यवेळी सुरु झाले.  संपूर्ण अवकाश व काळ (space and time),CFL चे वर्तुळ,मित्रपरिवार,नातेवाईकांचे वर्तुळ तसेच कार्यालयातील सहकाऱ्यांचे वर्तुळ ह्या साऱ्यांचा माझ्या भोवती एक सुंदर तालमेल गुंफला गेला होता. 

माझ्या आजाराच्या सगळ्यात गंभीर व वाईट परिस्थितीत मला पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना तो एक अत्यंत हादरवून टाकणारा अनुभव होता. पण मला विचाराल तरजे झालं,ते झालं!याचा अर्थ अजून कुणाला GBS व्हावा असा नाही. पणमलाच का झाला?” असे दुःख मला वाटत नाही.  तशीही माझी वार्षिक आरोग्य चाचणी अजून बाकीच होती. ती यावर्षी फोर्टिस मध्ये झाली. हां,थोडी महागात पडली हे खरे - आतापर्यंत आठ लक्ष रुपये आणि अजून थोडा खर्च.  बाकी आता चेहेरा सुद्धा बराच पूर्ववत झाला आहे. फक्त मीउजवा डोळा मारू शकत नाहीआणिशिटी वाजवू शकत नाही. एवढ्यावर निभावले! गुलियन बारी सिंड्रोम की - जय हो !

हे सदर मी ४ वर्षांपूर्वी,म्हणजे २०१५ मध्ये लिहीले. आजारपणाच्या माहितीच्या दृष्टीने वाचकांनी खालील मुद्द्यांची नोंद घ्यावी अशी इच्छा आहे.


१) आत्यंतिक थकवा आला असता,हृदयाकडून मेंदूला होणारे रक्ताभिसरण हवे तितके होत नाही आणि मला चक्कर येते. फोर्टिसला Dr शीलांना ही गोष्ट कळवल्यावर त्यांनी HUTT (Head Up Tilt Test) करण्यास सांगितले व ती टेस्ट पॉजिटीव्ह आलीये.  काही मूलभूत गुंतागुंत अजुनही पूर्वपदावर आलेली नाही. पण हे फार क्वचित वेळा होते. डॉक्टरांनी सुचवले आहे की भोवळ आल्यासारखे वाटल्यास आहे तिथे काही वेळ आडवे पडून राहायचे म्हणजे चक्कर येऊन पडण्यामुळे होणारे धोके टाळता येतील.
२) सक्रिय/सजीव प्रतिजैविक (live virus) असलेली कोणतीही लस टोचून घेण्यास मला सक्त मनाई आहे. उदा. मी केनियाला गेलो त्याआधी पिवळ्या तापाची लस मला घेता आली नाही. डॉक्टरांचे प्रमाणपत्र बाळगून आणि परतीच्या वेळी मुंबई विमानतळावर मला quarantine (अलग ठेवतील) करतील ही पूर्वसूचना पत्करून मी हा प्रवास केला.
३) जर मी अती थंड,अती गरम,अती तिखट किंवा अती गोड खाल्ले तर डोळ्यात अजूनही पाणी येते. 
आता मी पूर्वीइतकाच,किंबहुना अधिक बरा आहे. वर दिलेल्या कोणत्याही लक्षणांमुळे किंवा खबरदारीमुळे आयुष्याचा संपूर्ण आनंद घेण्यावर मला कुठेही मर्यादा आलेली नाही आहे. 
                                  


मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहं,न च श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे । न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।1।।
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः,न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः । न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु, चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।2।।
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ,मदो नैव मे नैव मात्सर्यभावः । न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।3।।
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं,न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ । अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।4।।
न मे मृत्युशंका न मे जातिभेदः,पिता नैव मे नैव माता न जन्मः । न बन्धुर्न मित्रं गुरूर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।5।।
अहं निर्विकल्पो निराकार रूपो,विभुत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् । न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः, चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।6।।

                                            ।। निर्वाण षटकम्‌ ।।


                                मूळ इंग्रजी लेखक : आशिर्वाद आचरेकर
                                भाषांतर : सुनीत राजहंस

                                ट्रान्स्क्रिपशन मदत : अजय चौधरी

                                 
                                          

No comments:

Post a Comment