मागील भाग : GBS
एक अनुभव : प्रकरण ३रे : लोकांचे
सहाय्य
एखादा कॉम्प्युटर reboot करताना जसा टप्प्या टप्प्याने बंद होतो तसा माझा एक-एक अवयव
बंद पडत होता. अशाच प्रकारे स्वतःच्या नश्वरतेची जाणीव मला १९९९ मध्ये मी कैलास
मानसरोवर तीर्थयात्रेला गेलो तेव्हा झाली होती. त्या पवित्र पदयात्रे दरम्यान
प्रत्येक वळणावर एकेक प्रचंड पर्वतशिखर सामोरे येई. जसे कॉम्प्युटरवर क्लिक करताच
नवे नवे देखावे त्याच्या स्क्रीनवर येतात तसे. हिमालयाच्या भव्यतेसमोर नतमस्तक
होण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय राहत नाही. आपल्यामध्ये एक प्रकारची उर्मी,
एक प्रकारचा शरण भाव निर्माण होतो.
आता यावेळी GBS मुळे उद्भवलेली ही कॉम्प्युटर reboot
सारखी परिस्थिती, मला पुन्हा एकदा स्वतःच्या नश्वरतेची जाणीव करून देत होती.
आशा करत होतो, की शटडाऊन नको. माझे शरीर एक अक्षरशः ‘हाडांची पिशवी’ बनले होते,
पण अंतर्मनातून कोणीतरी साद देत होते,
“हाच तो क्षण,
हीच ती जागा. हाच तो वर्तमानबिंदू,
हेच ते ‘असणे’. यात चूक किंवा बरोबर असे काही नाही. हे
सत्य-असत्याच्या पलीकडचे आहे. ते स्वयंपूर्ण व संपूर्ण आहे. तुम्ही या भौतिक
चक्षुंनी त्याचे पूर्णत्व पाहू शकणार नाही.” माझे मन या प्रत्येक क्षणी सहजभाव
साधून होते. या सगळ्याची तोंडओळख मला J Krishnamurti यांचे लिखाण वाचून आली आणि याबाबतची भाषा मी शिकलो
’लँडमार्क फोरम’ मध्ये. ही संस्था तुम्हाला आत्मसाक्षात्कार होण्यास मदत करते.
अशीच एक ‘Initiatives of Change‘ ही संस्था आहे, जी तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडवते. लोकांना,
अगदी शत्रुराष्ट्रांनाही एकमेकांशी चर्चा करण्यास उद्युक्त
करते. जे सर्व चालले होते, जणू काही मला सांगत होते, आहे त्या स्वरूपात स्वतःला स्वीकार,
व्हावेसे वाटते त्या स्वरूपात नाही. माझे मन सांगत होते,
की मी त्या करुणाप्रकाशात न्हाऊन निघत आहे. माझ्या हृदयात
खोलवर जाणीव होती की मी त्या करुणामयी शक्तीच्या मांडीवर सुरक्षित आहे. या
शून्यत्वाच्या अस्तित्वात मला पूर्णतेची छटा दिसत होती. या शून्यत्वात देखील
पूर्णत्व भरून राहिले होते. हे जणू मला शिकवत होते एक कला. जेंव्हा जेंव्हा कोणी
सर्वस्व गमावतो, तेंव्हा शून्यातून भरारी घेऊन सर्व काही पुन्हा एकदा नव्याने पुन्हा सुरु
करण्याची !
बऱ्याच वेळा आपले मन लहान लहान घटनांचा कार्यकारणभाव
शोधायचा प्रयत्न करते. GBS हा असा आजार आहे ज्या विषयी अनुभवी डॉक्टर सुद्धा मान्य
करतात,
की GBS का होतो हे त्यांना ठाऊक नाही. अनेकांनी GBS
च्या कारणांचा ठोकताळा मांडला,
पण शेवटी GBS ने त्या सगळयांना हरवले, खोटे ठरवले.
पाचव्या दिवशी माझा बधीरपणा २००% पर्यंत वाढला. कमी
होण्याची काहीही चिन्हे दिसेनात. बधिरपणा सर्वांगात पसरला होता. अगदी जिभेतच नव्हे
तर हिरड्यांमध्ये सुद्धा! हाताचे तळवे आणि पायांमध्ये त्याचे प्रमाण अजून जास्त
म्हणजे ३००% पर्यंत होते. कशाला ही स्पर्श केला तर ती वस्तू आणि माझा हात यामध्ये
जाड रबर असल्यासारखे वाटे. बधिरपणाशिवाय अजून काहीतरी एक प्रकारची उष्णता त्यात
होती. मला अक्षरशः २,०००°C च्या भट्टीत फेकून दिल्यासारखे वाटायचे. त्यामुळे मी भाजून
विटेसारखा टणक होणार की पावसारखा मऊ हा भाग वेगळा. कधी कधी असे जाणवायचे की जणू मी
मुंग्यांच्या वारुळावर आहे आणि लक्षावधी मुंग्या माझ्या अंगांगावर पाय आपटत कवायत
करत आहेत. आज मी माझ्या आजाराच्या कळस बिंदूवर होतो. त्या दिवशी जेव्हा डॉ.शीला
आल्या तेंव्हा मीच त्यांना म्हणालो, ”आजची फुटबॉल मॅच रद्द, मी जरा आजारी आहे, पुढच्या आठवड्यात ठेवूया.” त्यांनी ते मान्य केले. आम्ही
हसलो.
जसे दिवस जात होते, तसतसा मी अचल अवस्थेत जात होतो. हालचाल जवळजवळ पूर्णपणे
थांबली होती. या अवस्थेत शरीरात रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून डॉक्टर शिकस्त करत
होते. रक्त पातळ होण्यासाठी नर्स मला रोज हिपॅरिन (Heparin) चे इंजेक्शन देत असे. जेव्हा जळवा पायाला चिकटून रक्त
शोषतात तेव्हा त्या हेच द्रव्य सोडतात. काही तासांपूर्वी करता येणाऱ्या शारीरीक
हालचाली आता मी पुन्हा करू शकत नव्हतो. सर्वसाधारण क्रिया जसे बसणे, वाकणे, धरणे,चेहेऱ्याच्या हालचाली, या सगळ्या जवळ जवळ बंद झाल्या होत्या. इतके वर्ष ज्या
गोष्टी मी सहजपणे गृहीत धरल्या होत्या, त्या सर्व हळू हळू मंदावत चालल्या होत्या. “स्वतःच्या
पायावर उभे राहणे” हिंदीत “अपने पैरोंपे खडे होना” याचा वेगळाच अर्थ मला समजत
होता. एक दिवशी सकाळी, डॉक्टरांचे पथक तपासायला आले व त्यांनी मला सध्या
बिछान्यावरून हवेच्या बिछान्यावर (Airbed) हलवायचे ठरवले. या हवेच्या बिछान्याविषयी मी मागेच २०१०
मध्ये ऐकले होते. मुंबईच्या MET च्या बिझनेस स्कूलमध्ये अध्यापन (mentoring
) आणि कोचिंग करत असताना माझे
मार्गदर्शक प्रोफेसर विजय पागे यांच्या पत्नी काही आजाराने बिछान्याला खिळल्या
होत्या,
तेव्हा त्यांना हवेच्या बिछान्यावर ठेवले होते. हा हवेचा
बिछाना यांत्रिकपणे विशिष्ठ पद्धतीने हलवतात ज्या योगे त्याचा पृष्ठभाग सूक्ष्म
लाटांसारखा वरखाली होतो. त्यामुळे त्यावर झोपलेल्या रुग्णाची त्वचा आणि बिछान्याचा
पृष्ठभाग यांच्यात सततचा संपर्क टळतो आणि बेडसोर्स सतत बिछान्याला खिळल्यामुळे
त्वचेला होणाऱ्या जखमा टाळावयास मदत होते.
एकीकडे या Airbed च्या पृष्ठभागावरच्या सूक्ष्म लहरी मला मदत करत होत्या तर
दुसरीकडे त्या विभाजित (split) बिछान्याच्या वळ्या थेट माझ्या मणक्यापर्यंत टोचत होत्या.
मग नर्सनी त्या वळ्यांवर चादरीच्या जाड घड्या घालून त्या टोचणाऱ्या सुरकुत्यांचा
त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा जास्त उपयोग झाला नाही. सतत २-३
दिवस चादरींच्या घड्यांनी सुरकुत्या झाकून, बेड एक विशिष्ट कोनात स्थिर करून शेवटी एकदाची मी airbed
वरची कमीतकमी त्रासाची स्थिती शोधून काढली. एक दोन वेळा
पाठीला होणाऱ्या असहाय्य त्रासाने मी अक्षरशः रडलो.
सकाळी लवकर एक नर्स मला गरम पाण्याने स्पंज बाथ (sponge
bath) देण्यास येत. त्याचवेळी
बिछान्यावरच्या चादरी सुद्धा ते बदलत. त्याची पद्धत अशी मला डाव्या कुशीवर वळवून
माझी पाठ पुसत. त्याच वेळी जुनी चादर माझ्या अंगापर्यंत गुंडाळून नवीन चादर अर्धी
पसरत. तेव्हा मी पलंगाच्या रेलिंगचा आधार घेई. मग मला नवीन चादरीवर,
उजव्या कुशीवर वळवून घेत. माझ्या डाव्या बाजूची पाठ पुनः
पुसून घेत. मग जुनी चादर काढून घेत व नवीन चादर उरलेल्या पूर्ण बेडवर पसरत. हे आता
रोजचेच झाले होते. हा हवेचा बेड नेहमीच्या गाद्यांपेक्षा बराच जाड होता,
त्यामुळे जवळ जवळ तो पलंगाच्या रेलिंगच्या उंचीचा होता.
तो हॉस्पिटल मधला ६वा दिवस, १४ जानेवारी २०१५ होता. सकाळचे ५.३० वाजले होते. नेहमी
प्रमाणे मला स्पंज बाथ द्यायला पुरुष नर्स आला. माझ्या पाठीचा कणा इतका दुखत होता
की आदल्या दिवशी मला कोणीतरी जमिनीवर सपाट झोपवावे अशी तीव्र इच्छा झाली होती.
नेहमीप्रमाणे मला डाव्या कुशीवर वळवून नर्सने स्पंजिंग सुरु केले. मी रोज प्रमाणे
रेलिंग चा आधार घेतला होता आणि अचानक रेलिंगने दगा दिला! रेलिंग निसटून खाली गेले
आणि धप्प असा मोठ्यांने आवाज करत मी जमिनीवर उताणा पडलो,
अगदी आदल्या दिवशी माझी इच्छा होती त्याच प्रमाणे! माझ्या
उजव्या बाजूच्या खालच्या बरगड्यांवर खरचटले होते. बहुतेक सर्व भार त्या भागावर
पडला असावा. धप्प आवाजासरशी सर्व नर्स माझ्या भोवती जमा झाल्या. एक नर्स तिच्या
आवाजाचा वरच्या पट्टीत मला विचारु लागली, “सर तुम्हाला चक्कर किंवा भोवळ आल्यासारखे वाटतेय का ?”
तिने मला हा प्रश्न ५-६ वेळा विचारला असेल. डोक्याला इजा
झाली आहे का हे तिला माहित करून घ्यायचे असावे. मी पूर्णपणे शुद्धीवर होतो. मला
खात्रीशीर जाणीव होती की मानेच्या डावीकडे आखडले होते पण त्या पलीकडे काही जास्त
दुखापत झाली नव्हती. त्या ५-६ जणांनी मला उचलून परत वरती airbed
वर ठेवले. स्पंजिंग करणाऱ्या नर्सने थोडे चोळून दिल्यावर
मान पूर्ववत झाली. एक जुनिअर ऑर्थोपेडिक डॉक्टर मला तपासायला आला. त्याने मला माझे
पाय वळवायला सांगितले. दोन दिवसांनंतर एक सिनिअर ऑर्थोपेडिक डॉक्टर आले. त्यांनी
माझे हात पाय ओढून ताणून वाकवून मला “कुठे
दुखतंय का ?” विचारले. मी दुखत नाही म्हटल्यावर "ऑल इज वेल" अशी पावती दिली.
पडल्यापासून काही क्षणातच मी लहानपणी शाळेत शिकलेली humpty
dumpty ची कविता
गुणगुणत होतो.
Humpty
dumpty sat on a wall,
humpty
dumpty had a great fall.
All
the kings horses and all the kings men,
could
not put humpty dumpty together again.
Humpty
dumpty चे जरी या
कवितेत पडल्यामुळे तुकडे तुकडे झालेले असले तरी मी मात्र नशिबाने एकसंध शाबूत
होतो. मग काही मोठे डॉक्टर्स आणि काही पडलेल्या चेहेऱ्याचे अधिकारी मला पाहायला
आणि क्षमा मागायला आले. त्यांच्यातला एक फॉल स्पेशालिस्ट (पडण्यातला तज्ज्ञ) होता.
ही पदवी मला मोठी चमत्कारिक वाटली.
आतापर्यंत माझ्या लक्षात नव्हते की माझ्या पलंगाच्या डोक्याच्या बाजूच्या
भिंतीवर “फॉल फ्री “ असा ठळक अक्षरात लिहिलेला हिरवा बोर्ड होता. मग पलंग
पुरवणाऱ्या कंपनीचे आणि मेंटेनन्स विभागाचे प्रतिनिधी पलंगाचा कठडा तपासायला आले.
तेव्हा मात्र तो कठडा व्यवस्थित वर अडकून तसाच पक्का राहिला.
काही दिवसांनी मी लहानपणी शिकलेली अजून एक कविता गुणगुणत
होतो.
Jack
and Jill, went up the hill,
to
fetch a pail of water.
Jack
fell down and broke his crown
and
Jill came tumbling after.
मला आश्चर्य वाटले की लहान मुलांसाठीच्या इंग्लिश
कवितांमध्ये अशी पडा पडी का टाकत असावेत? मग लक्षात आले की त्या वयाची लहान मुले नुकतीच उभी राहायला
आणि चालायला लागली असतात, त्यामुळे पडा पडी ही आलीच. खरं म्हणजे त्यावेळेला मी सुद्धा
एक लहान मुलंच होतो. थोडे वजनदार लहान मूल म्हणा हवे तर! ज्याची अगदी लहान सहान
काळजी सुद्धा दुसऱ्यांना घ्यावी लागत होती. हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि माझ्या
नातेवाईकांमध्ये संवादात दरी होती. हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने माझ्या
नातेवाईकांना माझ्या पडण्याविषयी फारच त्रोटक माहिती दिली. मग मात्र मित्रांनी
तसेच नातेवाईकांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय कार्यालयात बंगलोरच्या एका
आघाडीच्या वृत्तपत्राचा फोन आला. त्यांनी विचारले
“ICU
मध्ये पेशंट पलंगावरून पडण्याची बातमी वृत्तपत्रात येऊ देत
का ?”
वास्तविक मी खरोखरच ICU चा पेशंट असल्यामुळे माझी विशेष काळजी आधीपासूनच घेतली जात
होती. पण माझ्या पडण्याच्या प्रकरणानंतर माझी काळजी घेणारी नातेवाईक आणि मित्रांची
टीम तिथे खूप महत्वाची मानली जाऊ लागली. मी पडलो तेव्हा मला स्पंज बाथ देणाऱ्या
पुरुष नर्सशी मी अतिशय गंभीर आणि सखोल चर्चा केली. माझ्या पडण्याचे ओझे त्याच्या
खांद्यावर त्याला असहाय्य होत होते. तो म्हणाला, “असे व्हायला नको होते. असे पुन्हा तर अजिबात होता काम नये.
मला क्षमा करा.” मी त्याला म्हणालो, “जे झाले ते झाले. ते काही आता परत फिरवता येणार नाही आणि
त्याचे परिणामही नाहीसे करता येणार नाहीत. पण मित्रा तू या ओझ्यापासून स्वतःच अगदी
या क्षणापासून मुक्त होऊ शकतोस. हे अगदी अनावश्यक ओझे आहे. तुझ्या डोक्यातून
त्याचे विचारसुद्धा काढून टाक आणि ये मला कडकडून भेट बघू.” आम्ही खरोखरच एकमेकांना
स्नेहाने आलिंगन दिले आणि एकमेकांचे जिवाभावाचे मित्र बनलो. हॉस्पिटलच्या
व्यवस्थापनाला आणि डॉक्टरांना घडल्या प्रकाराबद्दल उत्तरे देता देता त्याच्यावर
काय गुजरली असेल, मला ठाऊक नाही. नंतर मात्र तो इतर पेशंटचे काम करत असताना
किंवा आजूबाजूला वावरताना आम्ही एकमेकांकडे नुसते बघायचो किंवा हात हलवायचो!
भाषांतर : सुनीत राजहंस
ट्रान्स्क्रिपशन मदत : अजय चौधरी
आशिर्वाद आचरेकर
स्वतःच्या अंतर्मनाशी झालेला अप्रतिम संवाद ! Truly, a beautiful mind !
ReplyDelete
ReplyDeleteअत्यंत सुंदर भाषांतराबद्दल सुनीत राजहंस यांचेही मनःपूर्वक अभिनंदन !
खूप छान आशीर्वाद....
ReplyDelete