माझी अशी कल्पना होती की IVIG - GBS शी लढण्यासाठीचे इंजेक्शन -
म्हणजे एक मोठी बिसलेरीच्या पाण्याच्या बाटलीसारखी बाटली असावी, जी एक-दोन तासात माझ्यामध्ये रिकामी करतील. पण तसे
प्रत्यक्षात नव्हते. ते जवळजवळ ६ बाटल्याभरून पारदर्शक द्रव्य माझ्या शरीरात चढवत
आणि संध्याकाळी ५वा सुरु झालेला हा कार्यक्रम ५-६ तास चाले. त्या सलाईनच्या नळीतून
हवेचा बुडबुडा माझ्या शरीरात जाऊ नये याच्या काळजीत मी सतत असायचो. याला अनावश्यक
ज्ञान म्हणायचे की अवास्तव फिकीर हा भाग निराळा. सध्याच्या काळात, मनुष्यबळाचा खर्च व चुका कमी
करण्यासाठी, सलाईनमध्ये जिथेतिथे प्रवाह नियमन (फ्लो कंट्रोल), वेळचे वेळी क्रिया सुरु-बंद
करण्यासाठी टायमर व या सगळ्याचे रेकॉर्ड ठेवणाऱ्या यंत्रणा जोडल्या असतात. सलाईनची
बाटली संपायला आली की अलार्म वाजतो. पण बऱ्याच वेळी ही सगळी यंत्रणा काम सोपे करण्याऐवजी कटकटी
वाढवून ठेवते. IVIG ची नवीन
बाटली चढवताना ही यंत्रणा ती बाटली अशा पद्धतीने फिरवायची, की नळ्यांमध्ये व बाटलीमध्ये हवेचे बरेच बुडबुडे
तयार होत. हे बुडबुडे जर शरीराच्या रक्तवाहिन्यांत शिरले तर गुंतागुंत निर्माण होऊ
शकते. २-३ दिवस गेल्यावर नर्सनी ही सगळी यंत्रणा बाजुला सारून, परंपरागत पद्धतीने सलाईन लावायला सुरुवात केली व भरपूर वेळ वाचायला लागला.
मी नर्सला विचारले ज्या
खोक्यातून ही IVIG ची औषधे
आली, तो पाहायला मिळेल का ? त्या
खोक्यावर ‘रिलायन्स’ हे नाव पाहून मला
आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. खरेतर माझ्या मनात ‘रिलायन्स
म्हणजे काही खरे नाही’ अशी काहीशी प्रतिमा होती. पण आता
त्यांनी मला चितपट केले होते. ती औषधे रिलायन्स लाइफ सायन्सेस’ कडून आली होती. प्रत्येक बाटलीची किंमत १६हजार रुपयांपेक्षी थोडी अधिक
होती. म्हणजे एका दिवसात लागणाऱ्या ६ बाटल्यांचे झाले लाखभर रुपये! त्या सर्व
बाटल्या शीतपेटीत ठेवत व एक एक लागेल तशी आणत. रिकाम्या बाटल्या का कोण जाणे राखून
ठेवत होते. पण एक दिवशी IVIG चे सगळे डोस संपल्यावर, त्यांनी मला त्या रिकाम्या बाटल्या मोजून दाखवल्या. त्या ३० भरल्या.
त्यांनी त्यांचे काम पूर्ण केल्याचा पुरावा म्हणून बाटल्या ठेवल्या होत्या. नर्स
म्हणाली सुद्धा की - ही महागाची इंजेक्शन्स आहेत, त्यामुळे
त्यांचा हिशोब तुमच्या लक्षात यावा यासाठी रिकाम्या बाटल्या ठेवल्या होत्या.
या सर्व घटनांमध्ये हर्षदाने
मात्र कमाल केली. आहे ती परिस्थिती, आहे तशी स्वीकारून हर्षदाने आणि मी हा प्रवास नृत्याच्या सहजतेने चालायचे
ठरवले. हर्षदा म्हणजे बाहेरच्या जगाशी मला जोडणारी आणि ICUतले माझे विश्व बाहेरच्या जगाशी
जोडणारा एकमेव दुवा होती. मी ICUत असताना ती दररोज कित्येक
डझन फोन कॉल्स आणि शेकडो SMS हाताळत होती. मी जेव्हा ICUतुन साधारण-वॉर्डात आलो, तेव्हा हर्षदाने कबुल केले की - मी तुमच्यासाठी चेहेऱ्यावर कणखरपणा दाखवत
असले तरी आतून खूप काळजीत होते. एके दिवशी CFLच्या एका शिक्षिकेच्या गळ्यात पडून मी अक्षरशः रडले व
आत कोंडलेले दुःख हलके केले. त्यामुळे दुःखभार वाहून गेला व मला हलके वाटले.” हर्षदाच्या सभोवती त्या काळात सदैव
३-४ ‘काहीही काम करायला तयार’ असे लोक
असत. कोणी कारचे पंक्चर परस्पर ठीक केले, कोणी क्रेडिट
कार्डचे महिन्याचे बिल परस्पर online भरून टाकले, कोणी खाऊचा डबा तर कोणी जेवणाचा डबा आणून देई. माझी काळजी तर ICUत व्यवस्थित घेतच होते, पण हर्षदाची काळजी एवढे सगळे
लोक निरपेक्षपणे सुंदररित्या घेत होते. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत जरी मी
त्यांना धन्यवाद देत राहिलो तरी ते कमीच पडतील, एवढे देणे
लागतो मी त्यांचे!
हर्षदा म्हणाली सुद्धा, “तुमची जिद्द
पाहूनच मी ठाम निर्णय घेऊ शकले.” हम्प्टी डम्पटी प्रकरणानंतर
(मी एयर बेड वरून पडलो तो प्रकार) सगळ्यांचे म्हणणे पडले की मी जवळच्याच अपोलो
हॉस्पिटलमध्ये जावे (फोर्टिस सोडून). पण हर्षदाला वाटत होते की ‘पडण्याचा प्रकार हा चुकून झाला असून, फोर्टिस चा ICU
चा कर्मचारी वर्ग व परिचारिका (स्टाफ व नर्सेस) चांगल्या आहेत.
त्यामुळे ती मला अपोलोमध्ये न हलवण्याच्या निर्णयावर ठाम होती आणि मी ही त्याला
दुजोरा दिला. ती मला बऱ्याच वेळी सोबतीला आलेल्या किंवा ICU कर्मचाऱ्यांनी
सांगितलेल्या गुजगोष्टी सांगत असे. तिने हेही सांगितले की बऱ्याच लोकांना याचे
आश्चर्य वाटत होते की एवढे सगळे लोक आणि इतक्या तळमळीने मदत कशी काय करताहेत ?
त्या दिवसांमध्ये हर्षदा १०मिनिटे घरातल्या देवांची पूजा ना चुकता
करीत असे. मी सुद्धा ही विशिष्ट पूजा रोज निजण्यापूर्वी करतो.
मला जनरल वॉर्डमध्ये
हलवल्यावर तिने मुलांना घरी आणले. तोवर दोन्ही मुले CFL च्या वेगवेगळ्या पालकांकडे राहात होती
व त्यांची सर्व देखभाल अत्यंत व्यवस्थिपणे घेतली जात होती. अनेक गोष्टी कुणीही न
सांगता परस्परच घडत होत्या. हर्षदाकडून एक बातमी फोनवरून ज्योतीमाई आणि डॉ भानुदास दादाला कळली, की ती मुंबईतील १००च्या वर संख्येने असलेल्या परिचित, नातेवाईकांना पोहोचत असे. त्यांनी कधीही हर्षदाला
थेट फोन केला नाही. तिला सतत चौकशीचा त्रास नको म्हणून ते माई आणि दादाकडून माझी प्रगती
विचारून घ्यायचे. भूषणला एक फोन गेला की तो निरोप डझनभर मित्र परिवाराला झिरपत जाई, जे मित्र मला GBS साठी लढण्यासाठी अहोरात्र बळ देत होते, मदत करत
होते. गीतू सुद्धा तिच्या अनेक व्यापांमधून वेळात वेळ काढून अनेकदा भेटून जाई. कधी भेटण्याच्या वेळात तर कधी
कोणत्याही वेळी! तिच्यामार्फत ICU मधील बातमी CFL
परिवाराला पोहोचत असे.
ICU मध्ये दाखल
झाल्यापासून अनेक दिवसात मी दांत घासले नव्हते. एकदा हर्षदा माझे लहान मुलांच्या ब्रशने दात घासत असताना डॉक्टरांनी पाहिले. मग त्यांनी नर्सला सांगितले की कापसाचे बोळे
लिस्टरिन किंवा तत्सम माऊथ वॉशमध्ये बुडवून यांच्या दातांवरून फिरवा. मग नर्सने युक्ती केली. कापूस एक लांब बारीक चिमट्यावर (ट्वीझर) घट्ट
गुंडाळला मग माऊथवॉशमध्ये बुडवून माझे दात घासले. नर्स मंडळींनी माझे दात त्यांचे
स्वतःचे घासतात त्याप्रमाणे घासले. काही नर्स अगदी काळजीपूर्वक प्रत्येक दात काना
कोपऱ्यापासून घासायच्या तर इतर काही धसमुसळेपणाने, जणू तारेच्या ब्रशने बाथरूम घासल्याप्रमाणे! मग मी
त्यांना माझ्या दातांवर दया दाखवण्याची विनंती करत असे. हर्षदाने त्यांना फ्लॉस
वापरून दातांच्या फटी कशा स्वच्छ करायच्या ते दाखवले. तोपर्यंत त्यांना ते ठाऊकही
नव्हते. मग एक ‘अर्धा न्हावी
माझी दाढी करण्यासाठी ICU मधे आला. तो हॉस्पिटलच्या पोशाखात
होता. दाढी उरकल्यावर मी त्याला मिशांना थोडे कापायला (ट्रिम करायला) सांगितले.
त्याने चक्क नकार दिला आणि तुसडेपणाने सांगितले, की 'मी फक्त दाढीचेच काम करतो, केस कापणे, मिशा भादरणे नाही'. म्हणून मग मी त्याला ‘अर्धा न्हावी’ ही पदवी दिली. मी वॉर्डात
आल्यावर तो पुन्हा आला, माझी पांढरी दाढी घोटून मला तरुण करायला.
निष्णात डॉक्टर आणि नर्सच्या
जोडीला तेथील पोषण व आहारतज्ञ सुद्धा तोडीस तोड होते. “तुला न्याहारीला, दुपार व रात्रीच्या जेवणाला काय काय आवडेल?” असे
तेथील आहारतज्ञ डॉक्टरने विचारले. त्यांच्याकडे पुष्कळसे पर्याय उपलब्ध होते.
पहिल्याच दिवशी मी पूर्ण अगदी चपाती भातासकट जेवण मागवले. दुसऱ्या दिवशी मला चपाती
चाववेना, मग भात आणि पातळ भाजीवर भागवले. तिसऱ्या दिवशी मी
मऊभात व भाज्या बारीक कुस्करून मागितल्या. चौथ्या दिवशी मला दातांनी थोडेसुद्धा चाववेना. तेव्हा मी इडली, डाळभात, भाज्या
सगळे काही मिक्सरमधून बारीक करून मागितले. आहारतज्ञ डॉक्टर
सारखे बदलत होते. पण एक दोन अपवाद वगळता त्यांनी मला जे मागितले ते ते
खाऊ दिले. शालिनी नावाच्या एका आहार डॉक्टरला मला व हर्षदाला मराठीत बोलताना पाहून
तिचे माहेर आठवले. जवाहरनगर, भंडारा
जिल्हा, महाराष्ट्र! तिने मला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
दिल्या. मला चांगले ठाऊक होते की चांगली शेकलेली व कोरडी चपाती ही मिक्सरमधून छान
बारीक होते. पण फोर्टिसच्या खानावळवाल्यानी पूर्वी हे कधी केले नसावे. त्यामुळे मी
मागितल्यावर त्यांनी तसा प्रयत्न केला, पण पोळी नीट बारिक न होता फक्त जाड बारीक तुकडे त्यांनी सांबार घालून दिले. ते लागले
मात्र चविष्ट. जसे दिवस जात होते तसा माझ्या जबड्यात जोर पण येत होता. त्यामुळे
आता शिजवलेले पदार्थ मूळ स्वरूपात खाता येऊ लागले होते. मिक्सरमध्ये काढावे
लागत नव्हते. हॉस्पिटल सोडतेवेळी मी नेहेमीप्रमाणे भात, वरण व भाज्या खाऊ शकत होतो. फक्त
चपाती तेवढी चावत नव्हती.
एक दिवशी हर्षदाने अवचितपणे
विचारले “या नर्सेस तुमच्याशी कशा वागतात ?
मला ह्या गुगली प्रश्नाचा नेमका रोख कळेना. दहा एक वर्षांपूर्वी
हर्षदा वारंवार बंगलोरहून पुण्याला तिच्या आजारी वडिलांना २-३ हॉस्पिटलमध्ये
भेटायला जात असे. तिच्या वडिलांना डायालिसिस लागत असे. त्यावेळच्या आठवणी तिच्या
मनात घर करून होत्या. त्यापैकी एका हॉस्पिटलमधल्या नर्स अत्यंत उर्मट व शिवराळ
भाषा वापरणाऱ्या होत्या. माझे सासरे अत्यंत सभ्य व् मृदु भाषी होते. त्यांनी तशाही
प्रकारच्या नर्सेस आणि सेवकवर्गाशी मैत्री जमवली. वेळोवेळी ते त्यांचे आभार मानायचे, निसर्गविधी नियंत्रण राहिले नाही, तर दिलगिरी व्यक्त करायचे. पण अशा शिवराळ नर्सेस रोगी व रोग्यांच्या
परिवारासाठी मात्र तापदायक ठरतात. काळजी घेणे राहिले दूर!
पण फोर्टीसच्या ICU मध्ये मला असे जराही जाणवले नाही. पुण्याच्या हॉस्पिटलच्या अगदी विरुद्ध अनुभव मला येथे आला. येथील कर्मचाऱ्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी किंवा नकारात्मकतेची बारिकशी छटा देखील दिसली नाही. एखाद्या नवजात अर्भकाची घ्यावी
तशी ते माझी काळजी घेत होते. मला स्पंज बाथ देत, दात घासत, वारंवार रक्तदाब मोजायची
आवश्यकता उरली नाही तेव्हा हात आखडू नये म्हणून BP यंत्राची
वारंवारताही कमी करून ठेवीत. दर १५मिनिटांऐवजी दर ३० मिनिटे करून ठेवत. माझ्यासाठी आणलेल्या प्रत्येक गोष्टीवर, उदा. कॅनूला वगैरे, त्या तारीख टाकत व वेळेवारी बदलत. आधी
सांगितल्याप्रमाणे माझी लघुशंका कंडोम कॅथेटर बदलण्यासाठी ते मला मदत करत. तसेच दीर्घशंकेच्या कार्यक्रमात सुद्धा मला मदत करत. कमी खाण्यामुळे तसेच चयापचय क्रिया मंदावल्यामुळे
मला नीट शौचाला होत नसे. मग एनिमा घ्यावा लागे. ह्या सगळ्या गोष्टी नर्सेस
बिनबोभाटपणे, सहजपणे करत
होते.
त्या मला मिक्सरमध्ये बारिक
केलेले अन्न भरवत, हातापायाला
मुंग्या आल्या तर चोळून देत, हवेच्या बिछान्यावर पाठ
व्यवस्थित टेकवून देत. गुबारून आल्यामुळे बऱ्याच वेळा अपानवायू सारायला (पादायला)
होई. मी त्यांना त्याची पूर्वसूचना देत असे. त्यामुळे त्या धोक्यापासून
वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यास त्यांना अवधी मिळे! या सर्व ICU मधल्या नर्सेसना अविश्रांत काम करताना पाहणे खरोखरच उत्साहवर्धक होते.
त्याबद्दल त्यांना मिळणारा चार-पाच आकडी पगारसुद्धा वाजवी म्हणावा लागेल.
त्या सगळ्यांचे दुबई, दोहा आणि अमिराती देशांमध्ये जाऊन
काम करण्याचे स्वप्न होते. भारतातील इस्पितळे ही त्यांच्यासाठी अनुभव मिळवण्याचे
साधन होते. त्यांच्यापैकी बऱ्याच जणी केरळी होत्या. साहजिकच त्या एकमेकींशी
मल्याळम भाषेतून बोलत. त्यांच्याशी नेहेमी बोलल्यामुळे मला त्यांच्याविषयी बरीच
माहिती मिळाली. काहींशी ऋणानुबंध जुळले. त्यांनी मला मल्याळम चित्रपट “दृश्यम” पाहायला सांगितला. पण अजूनही तो पाहायचा
योग आलेला नाही.
मी त्यांना माझ्या तबला क्लास
आणि ड्रम जॅमींग बद्दल सांगितले. पहाटे ५.३०ला स्पंज
बाथच्या वेळी मी त्यांना मराठी व हिंदी गाणी म्हणून दाखवत असे. मला जमेल तसे
त्यांना - इतनी शक्ति हमे देना दाता - मन का विश्वास कमजोर हो ना.. (हिंदी गाणे,
चित्रपट: अंकुश) तसेच मोगरा फुलला, मोगरा फुलला
(मराठी गाणे) - यांचा भावानुवाद समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग मी
त्यांच्यापैकी एकीला मल्याळम गाणे म्हणायला सांगितले, पण
तिने प्रांजळपणे कबुल केले, की ती तानसेन नसून कानसेन आहे. त्यापैकी काहींची नावे - एजिल, शीतल, विनीता
आणि राजेश - मला आठवतात. माझ्या ICU मधील शेवटच्या ४-५
दिवसात ते माझ्या बरोबर होते.
क्रमश:--
भाषांतर : सुनीत राजहंस
ट्रान्स्क्रिपशन मदत : अजय चौधरी
मूळ इंग्रजी लेखक : आशिर्वाद आचरेकर
Interesting !! Looking for next one now ...
ReplyDelete