GBS प्रकरण ९वे - भेटायला येणारे पाहुणे



वॉर्डमध्ये - खोली नंबर ७६७ - आल्यानंतर भेटण्याच्या वेळेला अनेक लोक येऊन गेले. ललिता - वसंत, CFL चे पालक आणि योगाशिक्षक, २० जानेवारीला भेटून गेले.  त्यांनी माझ्यासाठी डबा भरून ठेपले, खिचडी, चिक्की आणि थरमॉस भरून गरम गरम चहा आणला होता.  मी अद्याप हॉस्पिटलच्या आहारावर होतो. मग त्या सगळ्या पदार्थांवर हर्षदा, मुले, दिदी व भेटायला आलेल्या इतरांनी ताव मारला. हर्षदा आणि दिदी सांगत होत्या की त्या डब्यातून अगदी अक्षयपात्राप्रमाणे पदार्थ न संपता येतच होते. बरेच जण बाहेर बसून आपला संध्याकाळचा फराळ खात असताना वसंत आणि ललिता माझ्याजवळ थांबले होते. त्या संध्याकाळच्या वेळी मला माझी फिजिओथेरपी करून घ्यायची असे. ललिताने मला अगदी साधे सोपे व्यायाम प्रकार - बोटे, हात व पायाचे सांधे ताणणे व वाकवणे इत्यादी सांगितले. त्यातले बरेचसे प्रकार मला ठीक ठाक करता आल्यामुळे मला उत्साह वाटला. हे व्यायाम साधारण १५ मिनिटे केल्यावर वसंतने अजून काही व्यायाम प्रकार सांगितले. माझ्या लक्षात आले की या लहान लहान व्यायामांमुळे माझ्यात उत्साह संचारत आहे, ऊर्जेचा एक स्रोत सुरु होत आहे - ईशायोगात शिकलेल्या ‘सूर्यक्रियाकिंवा ‘शक्ती चलन क्रियाकरताना होतो त्या प्रमाणेच! मग मी डोळे बंद करून त्या उर्जित अवस्थेत काही वेळ पडून राहिलो. ललिता आणि वसंतची भेट ही भर उन्हळ्यात थंड हवेची झुळूक यावी तशी भासली.

एका मुख्य नर्सने श्रीयुत आनंद यांना बोलावले होते, ज्यांना पूर्वी GBS झाला होता. ते मला वॉर्डात भेटायला आले. ते पेशाने व्यायामशाळा प्रशिक्षक (Gym Instructor) होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांची GBS ची ट्रीटमेंट एक आठवडाभर उशिराने सुरु झाली होती. हा उशीर झाल्यामुळे त्यांना तब्बल ५०दिवस ICU त राहावे लागले होते. तिथे दिवसाचे शुल्क सुमारे ७५०० रुपये असते. म्हणजे ५० दिवसांचे झाले ३.७५ लाख (पावणेचार लाख रुपये). ते म्हणाले की त्यावेळी त्यांच्या व्यायामशाळेने त्यांचा अमर्याद स्वरूपाचा विमा केलेला होता. फोर्टिसमधून डिस्चार्ज मिळाल्यावर ते थेट कोट्टकल, केरळ येथे आयुर्वेदिक मसाज उपचारांसाठी गेले. ६० दिवस मसाज उपचारांनंतर त्यांना पहिले बोट (तर्जनी) थोडेफार हलवता येऊ लागले होते. माझे पांढरे केस, ओठावर येणाऱ्या झुपकेदार मिशा आणि बऱ्यापैकी पांढऱ्या भुवया या सगळ्या अवतारामुळे ते मला आहे त्यापेक्षा बराच जास्त वयस्कर समजले असावेत. कारण त्यांनी मला हर्षदा तुमची मुलगी आहे का? चक्क असे विचारले. माझ्या पांढऱ्या केसांच्या किस्स्यांमध्ये ही अजून भर पडली. मला जेव्हा मुंबईला वारंवार जावे लागे तेव्हा मी नवीन विमानतळाला जाणाऱ्या ‘वायूवज्रा ‘बसचे सवलतीचे तिकीट घेत असे. जर का कोणी प्रवासी एक महिन्याच्या अवधीत परत आला तर ते परतीच्या तिकिटावर सुमारे ७० रुपये सवलत देत. खुद्द BMTC च्या TC ला या सवलतीचा नियम माहिती नव्हता. त्याने मला विचारले की - सर ही काही वयस्कर नागरिकांसाठी खास सवलत आहे काय? याच प्रकारची अजून एक गोष्ट आहे जी आठवली की आजही हसून मुरकुंडी वळते. सर्व श्रेय पांढऱ्या केसांना अर्पण!

या आजारात मला एक नवीन साक्षात्कार झाला - माझी दोन प्रकारची बँक जमाराशी आहे. एक म्हणजे पैशाच्या मिळकतीतून जमा केलेली, दुसरी म्हणजे वैयक्तिक हितसंबंध! पहिल्या प्रकारची रक्कम वाढत्या खर्चामुळे घटत चालली होती, तरी दुसरी मात्र पूर्ण जोमाने उभारून येत होती. लोकांनी या कठीण प्रसंगात माझ्यावर जे प्रेम केले त्याच्या सागरावर मी अक्षरशः तरंगत होतो. आजही त्या विषयी बोलताना मला गहिवरून येते. अनेकांनी मला खात्यात पैसे जमा करण्यासाठी बँकेचा खाते क्रमांक विचारला. पण हर्षदाने आणि मी ठरवून त्यांना नम्र नकार  दिला. माझे होमलोन हे स्टेट बँक ऑफ इंडिया - MaxGain - प्रकारचे आहे ज्यामध्ये पगाराची व बचतीची रक्कम ठेऊन वेळप्रसंगी उचलता येते, ज्याने व्याज बरेच घटते. ही सोयीस्कर परतण्याची योजना अशाच प्रकारच्या आपदांसाठी असते.  तिचा आम्ही पुरेपूर उपयोग करून घेत होतो.

माझ्या कार्यालयातील सहकारी सुद्धा मला साहाय्य करण्यास पुढे सरसावले. बरेचसे मला अतिदक्षता विभागात आणि साधारण वॉर्डात भेटून गेले. त्यांचा एकूण सूर असा होता - ऑफिसच्या कामाची काळजी करू नकोस, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. पैशा वगैरेची गरज असली तर संकोच करू नकोस. माझे बॉस आणि HR विभागाचे लोक हर्षदाच्या संपर्कात होते. मी सध्या ब्रॉडकॉम कंपनीत कॉन्ट्रॅक्टर आहे, नियमित नोकरीदार नाही. मला जेव्हा ICU मधून वॉर्डात नेत होते तेव्हा माझ्या सहकार्यांना पाहून मी आनंदाने हात हलवला. एके दिवशी संध्याकाळी मुजीबा - माझी फिजीओथेरपिस्ट - मला आजारपणानंतर प्रथमच स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत होती. माझे ऑफीस मधील बॉस मागेच उभे राहून मला उभे करण्यासाठी किती परिश्रम घेतले जात आहेत ते पाहत होते. माझे पाय, गुढगे अक्षरशः मुड़पून कोलमडत होते. त्या दिवशी मी फार प्रयत्न केले नाहीत. पण हर्षदाने मला सांगितले की - माझी तशी अवस्था पाहुन माझे साहेब पुरते हादरून गेले होते.

डिस्चार्ज (रजा) मिळण्याच्या एक दिवस आधी मला कंडोम कॅथेटर पासून मुक्तता मिळाली. लघवीचे भांडे परत आले. घरीसुद्धा एक आठवड्यापर्यंत मी तेच वापरात होतो. डिस्चार्ज मिळतेवेळी मी हॉस्पिटलचे बिल काळजीपूर्वक तपासले.  सुखद आश्चर्य म्हणजे - मी ICU मध्ये पलंगावरून पडलो तेव्हा आलेल्या हाडांच्या डॉक्टरचा खर्च लावला नव्हता.

क्रमश:--

भाषांतर: सुनीत राजहंस
ट्रान्स्क्रिपशन मदत: अजय चौधरी

मूळ इंग्रजी लेखक: आशिर्वाद आचरेकर

No comments:

Post a Comment