GBS प्रकरण ८वे - वॉर्डमध्ये


मागील भाग: GBS एक अनुभव - प्रकरण ७वे: ICU तील मृत्यू, स्पायरोमीटर व फिजिओथेरेपी

१६ जानेवारी, ICU त दाखल होऊन आठवडा उलटलेला, मला माझ्या ICICI बॅंकेच्या खात्यात काही अजून पैसे जमा करायचे होते. मी हर्षदाला स्टेट बँकच्या साईटवर ऑनलाईन लॉगिन करायला सांगितले. ती www.onlinesbi.com वगैरे टाईप करत असताना मी चष्मा लावून पाहत होतो. माझ्या लक्षात आले की मी कॉम्प्युटरवरची अक्षरे नीटपणे वाचू शकत नाहीये. मग मी चष्मा पुढे मागे सरकवून, फक्त डाव्या डोळ्याने, फक्त उजव्या डोळ्याने असे निरनिराळ्या पद्धतीनी प्रयत्न केले. मग लक्षात आले की माझी दृष्टीही अधू झाली होती. डॉ. शीला यांनी ICUत माझे डोळे तपासण्यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरना पाचारण केले. डॉ. उषा म्हणून डोळ्यांच्या डॉक्टर आल्या - थोड्याशा वयस्कर, जुन्या काळच्या डॉक्टरांसारखा विचार करणाऱ्या - म्हणजे ‘औषधाची गरज नसेल तर औषधे विनाकारण न देणाऱ्या. संध्याकाळच्या सुमारास सोबत डोळे तपासण्याचे साहित्य असलेली आटोपशीर पेटी घेऊन त्या आल्या होत्या. अत्यंत सावकाश पण काळजीपूर्वक इत्यंभूत तपासणी करून त्यांनी आपले निदान जाहीर केले. त्या म्हणाल्या - “रेटिना (नेत्रपटल), कॉर्निया (डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा) आणि डोळ्यांचे इतर भाग सुस्थितीत आहेत, फक्त डोळ्यांचे स्नायू कमकुवत झालेत. तसेच तुझ्या उजव्या डोळ्याला ह्रस्व दृष्टिदोष (short sightedness) तर डाव्या डोळ्याला दीर्घ दृष्टिदोष (long sightedness) आहे. पण खरा त्रास स्नायूंचा कमकुवतपणा हाच आहे. त्यांनी डोळे ओले राहाण्यासाठी कृत्रिम अश्रूद्रव्य वापरायचा सल्ला दिला, कारण माझ्या पापण्या पूर्णपणे मिटू शकत नव्हत्या, त्यामुळे डोळे कोरडे पडत होते. दुसऱ्या दिवशी डॉ. शीला यांनी खुलासा केला की - “नुसत्या GBS मध्ये रुग्णाच्या डोळ्यांना त्रास होत नाही. पण ज्या अर्थी तुझ्या डोळ्यांवर परिणाम झालाय त्यावरून तुला Miller Fisher नावाचा GBS चा एक पोटप्रकार झालेला आहे.” आता जिथे नुसता GBS लोकांना समजावताना पुरेवाट होत होती त्यात आता या Miller Fisher (MF) ची भर पडली होती. GBS चे नामकरण आम्ही Girls Boys Syndrome असे आधीच केले होते त्यापुढे MF ला आम्ही Mother and Father असे विस्तारित करून जोडून दिले. असो. असेच अजून १० दिवस गेले.  मी एका इन-सिंक नावाच्या TV चॅनल विषयी ऐकून होतो. हे चॅनल काही दुर्मिळ तर काही नवीन पण मजेदार संगीत प्रसारित करते. वॉर्डात असताना मी या चॅनलला सतत चिकटून असे. चष्मा लावल्यावर मला माझी मान आणि माझा चेहेरा बऱ्याच वेगवेगळ्या कोनात हलवून TV नीट दिसेल अशा पद्धतीने ठेवावा लागत असे. हर्षदा आणि मला वाटून गेले की डॉ. उषानी (डोळ्याच्या डॉक्टर) माझे डोळे पुन्हा एकदा तपासून काही सुधारणा आहे का ते पाहावे. मी जे काही पाहात होतो त्यावरून मला डोळ्यात काही सुधारणा होतेय का नाही याचा काही पत्ता लागत नव्हता. मला वाचण्याइतके स्पष्ट दिसत नव्हते, मी फक्त TV पाहणे, रूमच्या आतमधल्या गोष्टी पाहाणे, खिडकीतून बाहेर आकाशाकडे किंवा जवळपासच्या उंच इमारतींकडे पाहणे एवढेच करत होतो. अजूनही मी बिछान्याच्या बाहेर येऊ शकत नव्हतो. फोर्टिस हॉस्पिटलमधला आज बारावा दिवस - आज डॉ. शीलांशी फुटबॉल मॅच खेळायचे ठरले होते. मी फक्त बेडवर पडल्या पडल्या कसाबसा पाय हलवण्याच्या अवस्थेत होतो, मैदानात फुटबॉलला लाथ मारणे दूरच होते. अर्णवशी (माझा धाकटा मुलगा) मैदानात जाऊन फुटबॉल कधी बरं खेळता येईल? माझ्याकडे याचे उत्तर नव्हते.

वॉर्डात हलवण्यापूर्वी एक दिवसभरासाठी त्यांनी मला ICU मधील ‘शांतता विभागातठेवले. वॉर्डात हलवल्यावर पहिल्या दोन रात्री हर्षदा माझ्याजवळ थांबली - वीकएंडला (शनिवार-रविवारी). तिने खात्री करून घेतली की उपचार आणि फिजिओथेरपी व्यवस्थित ठरल्याप्रमाणे होते आहे तसेच नर्सेसला सुद्धा काय करायचे - काय नको हे चांगले ठाऊक आहे की नाही. मला अजूनही लघवीची पिशवी जोडलेली होती. हर्षदाला मग पुढचे काही दिवस माझ्या इंजिनियरिंगच्या मित्रांनी रात्री घरी जाण्यासाठी मोकळे केले.

सोमवारी रात्री राहायला मनीष डागा आला.  आम्ही ग्रुप ड्रमिंग, वाढत्या मुलांसाठी करियरची संधी, (त्याची मुलगी दहावीत आहे) वगैरेवर चर्चा केली. मंगळवारी रात्री भूषण आला. त्याला रात्री उशिरा ऑफिसचा कॉल होता, पण तो ती मीटिंग फक्त ‘ऎकणारहोता. मी त्याला माझ्या युद्धसदृश्य ICU मधील दिवसांबद्दल सांगितले. आशुतोष हॉस्पिटलजवळच असलेल्या L&T South City Towers या अपार्टमेंटमध्ये राहतो. तो एक रात्र आला. अजय - रात्री सोबतीला येईल असा खात्रीचा उमेदवार - पण तो काही दिवसांसाठी ऑफिसच्या कामानिमित्त अमेरिकेला गेला होता. या सर्व मित्रांनी whatsappवर एक ग्रुप बनवला व कोण, कधी, कसा सोबतीला जाईल याचे नियोजन केले. एका रात्री दीदी सोबतीला आली. पहिले ३ दिवस मी वॉर्डातल्या खोलीत एकटाच रुग्ण होतो. चौथ्या दिवशी अजून एका रुग्णाच्या आगमनाची तयारी सुरू झाल्याचे जाणवले.

त्याच दिवशी संध्याकाळी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेला रुग्ण दुसऱ्या बेडवर दाखल झाला. तो आणि त्याच्या बरोबरचे लोक कन्नडमध्ये बोलत होते. ते ज्या ढंगाने कन्नड बोलत होते त्यावरून मी आणि हर्षदाने ताडले की ते लोक उत्तर कर्नाटक भागातले असावेत. त्यांचाही फिजियोथेरपिस्ट माझ्या फिजियोप्रमाणेच दिवसातून दोन वेळा येत असे. हा माझा सोबती फिजियोथेरपिस्टने त्याचा पाय वाकवला, वळवला की किंचाळत आणि ओरडत असे. तो फिजियो स्नायूला ताण देताना एक ते दहा अंक मोजीत असे - कधी खूप भरभर तर कधी अत्यंत सावकाश - येरडू (दोन) ओंदु (एक) नंतर ३-४ सेकंदांनी येई, मग पुढचा अंक आणखी ३-४ सेकंदांनी. तो ज्या पद्धतीने अंक मोजीत असे त्यावरून तो किती काळजी घेतो आहे हे प्रतीत होई. त्याचे अंक म्हणणे अगदी संगीताच्या तालासुरात होते. नाहीतर माझा फिजियो सैनिकी अधिकाऱ्यासारखा - एक, दो., ती.., चा.., मधेच तोडल्यासारखे पण उच्च स्वरात म्हणे. हा माझा सोबती इतर नैसर्गिक बाबतीतही त्याचा धटिंगणपणा दाखवत असे. तसे पाहिले तर दीदी आणि माझी आई बऱ्याच जोरात ढेकर देतात. पण हा भिडू त्यांच्यापेक्षा कित्येक डेसिबलने जोरदार ढेकर देई. एकदा दीदी माझ्याबरोबर असताना त्याने ढेकर दिला, त्याबरोबर मी दीदीला म्हटले - “तुझ्यापेक्षा वरचढ.” आणि आम्ही दोघेही खूप हसलो. हाच जोरदारपणा तो पादण्याच्या वेळीसुद्धा दाखवे. अत्यंत धडाकेबाज! पण या क्षेत्रातल्या माझ्या स्वतःच्या कौशल्याबद्दल न बोललेलेच बरे! 😊

बिछान्याला खिळून राहिल्यामुळे अजून एक ब्याद जडली होती - ती म्हणजे अत्यंत तंग असे मांडीपर्यंत चढवलेले मोजे (स्टॉकिंग्स). त्यांना वैद्यकीय भाषेत compression stockings (दाब निर्माण करणारे मोजे) म्हणतात.  ते चढवण्यासाठी नर्स मला मदत करीत. त्यांना वळ्या पडू नयेत म्हणून काळजी घेत, विशेषतः डॉक्टर बघायला येणार असतील तेव्हा. या मोज्यांमुळे माझे पायाकडचे रक्ताभिसरण योग्य ठेवले जात होते आणि रक्ताची गुठळी होऊ देत नव्हते. त्याला वैद्यकीय भाषेत DVT-Deep Vein Thrombosis म्हणतात. हे मोजे मी जवळ जवळ ३ आठवडे - वॉकरशिवाय चालू लागेपर्यंत, म्हणजेच हॉस्पिटलमधून रजा मिळाल्यावर १ आठवड्यापर्यंत - वापरत होतो. डॉक्टरांनी सांगून ठेवले होते की एकदा का माझी हालचाल रक्ताभिसरण सामान्य होण्याएवढी झाली की हे मोजे वापरायची गरज नाही.  एके दिवशी हॉस्पिटल वॉर्डात असताना ही महागडी २००० रुपये किमतीची मोज्यांची जोडी दिसेनाशी झाली. दीदी आणि हर्षदाने सगळीकडे शोधाशोध केली, पण व्यर्थ. मग थोडा शोधक बुद्धीने विचार केला असता आम्ही असे अनुमान काढले की चादरी बदलताना वॉर्डबॉयने ते मोजेसुद्धा गुंडाळून नेले असावे. हा तर्क चक्क खरा ठरला! त्या कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या चादरींच्या गठ्ठ्यातून माझे महागडे मोजे शोधून मग अगदी स्वच्छ धुवून ती मौल्यवान मोज्यांची जोडी पुन्हा माझ्या चरणसेवेत रुजू झाली.

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर पहिल्याने शौचाला व्यवस्थित झाली. नर्स लोकांनी पॉटचेअर (संडासखुर्ची) पर्यंत नेले. ‘धुण्याचे’ काम मी स्वतः केले. नंतर मात्र शारीरिक हालचाल नसल्यामुळे आणि कमी खाण्यामुळे परसाकडे खंड पडला - ३ दिवसांचा. १३ जानेवारीला डॉक्टरांनी मला एनिमा देण्याचे ठरवले. एक नर्स आली. तिने मला स्वस्थ पडून राहून सहज श्वासोच्छ्वास घेत राहायला सांगितले, ज्यामुळे एनिमा व्यवस्थित आत जाईल. मी जवळ जवळ १०-१५ मिनिटे तो रोधून धरला. दोन नर्सने मला वर उचलून बेडपॅन दिला. मग मला धुवून-पुसून दिले. त्यानंतर परसाकडे पुन्हा चार दिवसांची सुट्टी लागली. १७ जानेवारीला, मी ICU मधून वॉर्डात आलो त्या दिवशी, राजेश नावाच्या नर्सने मला पुन्हा एनिमा दिला, पण मी तो फारवेळ रोधू शकलो नाही. मी मागच्या वेळेप्रमाणे बेडपॅन मागवला आणि अपेक्षा होती की मागच्यासारखे सर्व व्यवस्थित होईल. पण नाही, अर्ध्यातच मला जाणवले की एका टेबलटेनिसच्या चेंडूएवढा शौचाचा खडा अडकून बसला आहे. तो बाहेर येत नव्हता आणि परत आतही जात नव्हता. मी डॉक्टरांना बोलावले आणि ‘काय करू?’ विचारले. त्यांनी पुन्हा एनिमा द्यायला सांगितले. या वेळी मी तो तब्बल १५मिनिटे रोधून धरला आणि मग अर्धवट राहिलेले मोठे काम पूर्ण झाल्यावर मी सुटकेचा निःश्वास टाकला. वॉर्डात असताना मला अजून दोन वेळा एनिमा द्यावा लागला. २० जानेवारीला आणि मग डिस्चार्जच्या दिवशी २४ जानेवारीला. प्रत्येक वेळी मी नर्सलोकांना मनापासून धन्यवाद दिले. पण आभार मानताना त्यांच्या नजरेला नजर देऊन त्यांचे आभार मानणे हा एक विलक्षण अनुभव होता.

भाषांतर : सुनीत राजहंस

ट्रान्स्क्रिपशन मदत : अजय चौधरी 


मूळ इंग्रजी लेखक : आशिर्वाद आचरेकर



No comments:

Post a Comment