।। श्री ।।
।। गजानन प्रसन्न ।।
GBS एक अनुभव
मूळ इंग्रजी लेखक : आशिर्वाद आचरेकर
भाषांतर : सुनीत राजहंस
ट्रान्स्क्रिपशन मदत : अजय चौधरी
प्रकरण २ रे : हॉस्पिटलात भरती
आम्ही फोर्टिस हॉस्पिटलला पोहोचलो. अतिदक्षता (emergency) वॉर्डच्या स्टाफने मला चाकाच्या खुर्चीवर (wheelchair वर) बसायला मदत केली आणि ढकलत ढकलत आत घेऊन गेला. हर्षदा मागुन धावतच आली आणि डॉ.शीला ना दिलेले संदर्भ पत्र (reference letter) काउंटर वर दाखवले. डॉ.शीला यांचा पेशंट हे सांगताच अतिदक्षता कक्ष अत्यंत त्वरेने हालचाल करू लागला. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी मला सांगितली की पेशंटचा ठराविक पेहेराव (युनिफ़ॉर्म) घातला पाहिजे - एक निळ्या रंगाचा, उघड्या पाठीचा अत्यंत ढगळ असा गाऊन ! मी माझी साखरपुढ्यात घातलेली अंगठी आणि अजून एक मौल्यवान खड्याची अंगठी काढून हर्षदा ला दिली. इथे माझ्या उजव्या हाताच्या मनगटावर पहिली सुई टोचली गेली. प्रथम नर्सने माझ्या धमनीतील रक्त घेण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यानंतर रंगीबेरंगी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेल्या एका बंगाली डॉक्टर ने तिला मदत केली व जराही नं दुखावता रक्ताचे नमुने घेतले गेले. त्या डॉक्टर चे कौशल्य पाहून मी चकित झालो. GBS चे गंभीर स्वरूप माहित असल्यामुळे तिने हर्षदाला धीर द्यायला सुरुवात केली.
मग ते मला नर्व्ह कंडक्शन टेस्ट ला घेऊन गेले. त्या टेस्टबद्दल मी नुकतेच दोन जणांकडून ऐकले होते. एक माझ्या मित्राकडून आणि दुसरे म्हणजे माझ्याकडे जेम्बे (djembe) शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्या कडून. एका तरुण हसऱ्या चेहऱ्याच्या - फ्रेंच कट दाढी असलेल्या टेक्निशियन ने माझे स्वागत केले व तपासणी टेबल वर मला आडवे पडायला मदत केली. माझ्या हाताला मनगटाच्या मागे विजेची तार जोडून पॉझिटीव्ह तारेने तळव्यावर निरनिराळ्या ठिकाणी कमी तीव्रतेचे विजेचे झटके देण्यात आले. या टेस्ट चा सर्व डेटा एका कॉम्पुटर मध्ये घेण्यात आला. याच पद्धतीने माझ्या पायावरही प्रयोग केले गेले. ही टेस्ट मज्जातंतूंच्या (nerves) मार्गातला अडथळा किंवा विरोध किती प्रमाणात आहे - हे कळण्यासाठी असते. मी त्या टेक्निशियन ला जराश्या सलगीनेच विचारले की ही तपासणी GBS झाल्याचं दर्शवते आहे का? तो म्हणाला - बहुतेक होय - पण लगेच व्यावसायिक पणे पुस्ती जोडली - कृपया डॉक्टरांकडूनच खात्री करून घ्या. पण ज्याप्रमाणे माझे एक एक अवयव बधीर होत होते आणि नर्व्ह कंडक्शन टेस्ट दर्शवत होती त्यावरून मला खात्रीच वाटू लागली की मला GBS झालाय.
डॉ.शीला मला ICU मध्ये पाहायला आल्या. साधारण पन्नाशीतल्या, पुरुषी चाल, मोठे डोळे (किंवा काजळ घातल्या मुळे मोठे दिसत असावेत), मोकळे सोडलेले कुरळे केस. त्या केसांमुळे त्या बंगाली आडनाव असून, मल्याळी महिलांसारख्या दिसत होत्या. भडक रंगाची साडी घातलेल्या डॉ.शीला मला खेळकर व आनंदी वृत्तीच्या वाटल्या. त्यांच्या बरोबर रुग्ण तपासणी साठी डॉ.संध्या आल्या होत्या. त्या दोघी आमच्याशी बोलायला लागल्या आणि या दुर्धर GBS शी दोन हात करण्यासाठी हर्षदा व माझी मानसिक तयारी सुरु केली. ICU मधल्या पहिल्या दिवशीच मी डॉ.शीलांना म्हणालो - “डॉक्टर, आजपासून पाचव्या दिवशी तुम्ही माझ्याशी फ़ुटबॉल खेळायला तयार रहा.” त्या एकदम मागे झाल्या आणि म्हणाल्या, “मला फुटबॉल खेळता येत नाही.” मी म्हणालो, “हरकत नाही.” डॉक्टर पी. आर. कृष्णन माझे neuro physician होते. त्यांच्या चेहेऱ्यावर नेहमी मंद हास्य असे.
डॉ.शीला व डॉ.कृष्णन रोज एकदा मला भेट देऊन जात असत. ICU टीम मध्ये डॉ.उल्हास, डॉ.पद्मकुमार, डॉ.संजय, डॉ.भरत, डॉ.गगन आणि ५-७ जण होते - त्यांची नावे लक्षात नाहीत. डॉ.गगन आणि अजून एक खांद्यावर बारीक बंदाची पर्स अडकवणाऱ्या दोन महिला डॉक्टर्स होत्या. थोडेसे वयस्कर डॉ.उल्हास आणि डॉ.पद्मकुमार सोडले तर बाकी सर्व जण तरुण होते. हे सर्व जण मिळून ICU तील रुग्णांची अहोरात्र देखरेख करत होते.
GBS असा एक आजार आहे जो रोग्याच्या प्रतिकार कार्यप्रणालीलाच (इम्म्युन सिस्टिमलाच) फसवतो. इम्म्युन सिस्टिम ची अशी गफलत होते की तिला
वाटते,रोग्याची बाह्य मज्जा संस्था ही जणू काही विषाणूंप्रमाणे आहे आणि मग ती बाह्य मज्जा तंतूंचे आवरण खायला सुरुवात करते. या आवरणाला वैद्यकीय भाषेत मायलिन शीथ (myelin sheath) म्हणतात, तर ते नष्ट होण्याच्या प्रक्रियेला डीमायलिनेशन (demyelination) म्हणतात. त्यातल्या त्यात चांगला योग असा की GBS फक्त बाह्य मज्जा संस्थेवरच परिणाम करतो, मध्यवर्ती मज्जा संस्थेवर नाही! तसेच बाह्य मज्जेचे फक्त मायलिन आवरण खातो, संपूर्ण मज्जा तंतू नाही. संपूर्ण शरीरात एक प्रकारचा बधिरपणा आणि झिणझिण्या पसरल्याचे जाणवत राहते.
रुग्णालयाच्या बिछान्यावर माझ्या हाताला एक ब्लड प्रेशर चे मशीन जखडले होते. ते दर १५ मिनिटांनी हवेने फुगवून माझा रक्त दाब मोजून नोंदवत असे. हाताच्या पहिल्या बोटाला एक चिमटा जोडला होता, तो हृदयाचे ठोके मोजत असे. एक ECG मशीन सतत माझ्या हृदयाच्या कामावर लक्ष ठेवून होते. त्या मशीन चे ५/७ प्रोब्स माझ्या छातीवर वेगवेगळ्या ठिकाणी चिकटवले होते. हा सर्व लवाजमा ICU मधल्या प्रत्येक रोग्याला साधारणपणे जोडलेला असतोच. उजव्या हातापाशी एक लाल रंगाचे बटण होते- आणिबाणी (emergency) साठी.
दुसऱ्या दिवशी दुपारी कधीतरी डॉक्टर माझ्या माणक्यातले पाणी - Cerebro Spinal Fluid - CSF - काढणार होते. GBS असण्याची पुन्हा खात्री करण्यासाठी त्या पाण्याची तपासणी करतात. एक गुळगुळीत दाढी केलेले, ठेंगणेसे जाडसर, चेहेऱ्यावर सच्चे हास्य, कुरळे करडे केस असलेले डॉक्टर आले. त्यांनी मला एका कुशीवर झोपवले. त्यांनी त्यांचा खास ऑपेरेशनचा गाऊन चढवला, माझ्या पाठीवर शास्त्रक्रिये वेळचे कपडे गुंडाळले. डॉक्टरांनी मला लोकल अनास्थेशिया दिला. त्यांनी माझ्या मणक्यातून काही पाणी काढले ते मला समजले सुद्धा नाही. CSF चा रिपोर्ट येण्यास एक दिवस लागतो. पण डॉक्टर औषध
उपचारांसाठी तेवढे थांबणार नव्हते.
GBS च्या उपचाराचे आमच्यापुढे दोन, खरेतर तीन मार्ग होते. पहिला मार्ग सोपा होता - काहीही उपचार न करणे व मज्जा तंतूंचे आवरण त्यांचे त्यांनाच पुन्हा बनवू देणे! पण याला वेळ लागू शकतो - अगदी वर्षभर किंवा त्याहूनही जास्त. दुसरा मार्ग होता - प्लाझ्मा फेरेसिस (Plasmapheresis). माझ्या रक्तातून अँटीबॉडीज (विघातक पेशी) बाजूला करून दुसऱ्याच्या रक्तातील प्लाझ्मा त्यात मिसळतील. जवळ जवळ डायालिसीस (dialysis) सारखेच. याचा खर्च दिवसाला ५०,००० रुपये इतका होतो. ही उपचार पद्धत सतत ५ दिवस करावी लागते. म्हणजे एकूण खर्च २.५ लाख झाला. तिसरा मार्ग ही त्यातल्या त्यात कमी धोकादायक उपचारपद्धत होती - तिचे नाव IVIG (Intravenous
Immunoglobulin) प्रतिकारक द्रव्याची थेट व्हेन्स (धमणींमध्ये) सोडणे. असे औषध सोडण्यासाठी लागणारी सुई माझ्या मनगटात पहिल्या दिवशीच टोचून ठेवलेली होती. पण अद्यापि त्यातून कोणतेच औषध सोडले नव्हते. हर्षदा व मी एकमताने हा IVIG चा निर्णय घेतला. बहुतकरून IVIG मध्ये ते इतक्या काही अँटीबॉडीज बाहेरून रक्तात सोडतात की आतल्या मज्जा संस्थेवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीज नगण्य ठरतात. प्रश्न एवढाच होता की या कमी धोकादायक IVIG उपचाराचा खर्च होता दिवसाला एक लाख रुपये फक्त! हा उपचारही सलग ५ दिवस घ्यायचा असल्याने एकूण ५ लाख रुपये होणार होता. पहिला - न उपचाराचा मार्ग - आम्ही रद्द केला कारण कालावधी अनिश्चित होता. मग राहिले दोन मार्ग. प्लाझ्मा फेरेसिस आणि IVIG.
माझ्या सर्व सहृदय नातेवाईक आणि मित्रांच्या हातातील स्मार्ट फोन किंवा तत्सम यंत्रा मार्फत गुगल वरील उपलब्ध माहिती हर्षदाला मिळत होती. “जरा जपून, कोणाकोणाला IVIG झेपत नाही.” “एकदा IVIG चालू केल्यावर मध्येच प्लाझ्मा फेरेसिस करता येत नाही.” “अरे, प्लाझ्मा फेरेसिस मध्ये कोणाच्या रक्तातून प्लाझ्मा घेणार हे आपल्याला काय माहित?” असो. पण अवघड निर्णय घेण्याची ही काही आमची पहिलीच वेळ नव्हती. प्रश्न होता, खूप जास्त माहितीमुळे उडणाऱ्या मनाच्या गोंधळाचा. मग आम्ही या सगळ्याची माझे neuro सर्जन डॉ. पी.आर.कृष्णन यांच्याशी सखोल चर्चा केली आणि शेवटी IVIG उपचार घेण्याचे नक्की केले.
---------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment