GBS – भाग – ५ - त्या जागरणाच्या रात्री, ती घोर उपासना



माझ्या मित्र आणि नातेवाईकांच्या मनात या आजाराविषयीची कुतूहल युक्त आस्था आणि माझी ढासळती प्रकृती या प्रबळ कारणांमुळे त्यांनी उपचारासाठी साहजिकच दुसरे आणि तिसरे मत घ्यायचे ठरवले. हर्षदा, डॉ.पालांडे - मुंबईच्या JJ हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन आणि विभागप्रमुख - यांच्याशी बोलली. ते माझ्या बहिणीच्या मैत्रिणीचे मिस्टर.  माझ्या मुलांच्या शिक्षकांच्या बहिणीला - ज्या इंग्लंड मध्ये बालकांच्या न्यूरोसर्जन आहेत - त्यांच्याकडे शब्द गेला. त्यावेळी त्या योगायोगाने बंगलोरमध्येच आल्या होत्या. राजशेखर हॉस्पिटलच्या भूल तज्ज्ञ (anesthetist) डॉ.संध्या यांच्याशी गीतू बोलली. एक मित्र त्याच्या मित्राच्या मित्राशी - जे की डॉ. जनार्दन - बावरिंग हॉस्पिट्लचे न्यूरो सर्जन आहेत - त्यांच्याशी बोलला. माझे उपचार करणाऱ्या फोर्टिसच्या न्यूरो फिजिशियन डॉ.कृष्णन यांनी अतिशय संयमितपणे, आपल्या या सर्व व्यावसायिकांशी फोनवर चर्चा करून माझ्या तब्बेतीबद्दल कल्पना दिली.

मुंबई आणि बंगलोरचे मिळून एकूण ५घरातलेचडॉक्टर माझ्यावर बारीक लक्ष ठेवून होते. एक - माझे काका, डॉ.रमेश आचरेकर; दोन- माझा आत्ये भाऊ, डॉ.रवींद्र नार्वेकर; तीन - माझ्या GBS चे नुसत्या फोनवरून अचूक निदान करणाऱ्या CFL -पालक, डॉ.विजया शेरबेत; चार - माझा अजून एक नातलग भाऊ, डॉ.भानुदास वालावलकर; आणि पाचवी - डॉ.हर्षदा आचरेकर - माझी सर्वतोपरी काळजी घेणारी माझी पत्नी - सगळ्यात जवळच्यांपैकी. एवढेच नव्हे तर काही दूरच्या परिचितांपैकी डॉक्टरांना सुद्धा सोडले नाही. एक बेळगावचे डॉक्टर माझ्या साडूच्या मित्रांपैकी होते, अजून एक औरंगाबादचे डॉक्टर माझ्या मित्राचे मित्र होते, ही यादी अजून बरीच लांब होईल. पण थोडक्यात सगळ्यांचा सूर असा होता की - काळजीचे कारण नाही, GBS चे रोगी हमखास बरे होतात. फक्त बरे होण्यासाठी लागणारा कालावधी हा प्रत्येक रोग्याचा वेगवेगळा असतो. 

GBS झाल्यापासून सहाव्या दिवशी मी पूर्णपणे बधीर झालो होतो, आणि पुढचे अनेक दिवस त्याला उतार नव्हता. मला रात्र-रात्र झोप येत नसे. ICU मधील सतत येणाऱ्या निरनिराळ्या आवाजांना त्याबद्दल दोष देता येणार नाही. खरेतर नेमकी कशामुळे झोप येत नव्हती हेच सांगता येणार नाही. शा योगाच्या डॉ.वीणा आक्कांनी सुचवले, की मी ओंकाराचा जप करावा. तसेच अजून एक मंत्रब्रम्हानंद स्वरूपा इशा जगदीशा, खिलानंद स्वरूपा इशा महेशाहा सुद्धा म्हणायला सांगितला. काका सहस्त्रबुद्धे - एक योगगुरू आणि healer जे यवतमाळ येथील आहेत त्यांनी मला सूर्यभेदन प्राणायाम करायला सांगितला. ह्या प्राणायाम प्रकारात एक अंकापर्यंत पूरक(श्वास घेणे), चार अंकांपर्यंत कुंभक (श्वास रोधणे) आणि दोन अंकांपर्यंत रेचक (श्वास सोडणे) असा श्वासोच्छ्वास करतात. त्यांनी हा प्राणायाम मला व हर्षदाला शिकविला होता. पण खरेतर सूर्यभेदन प्राणायाम हा ब्रम्हचर्यावस्थेत (अविवाहितांनी) करावा असे शास्त्र आहे, कारण त्यातून निर्माण होणारी प्रचंड उर्जा ही ब्राम्हचर्याला पूरक ठरते. लग्नाच्या वेळी हा प्राणायाम श्री हनुमंत चरणी अर्पण करून वैवाहिक जीवनाला सुरुवात करतात. आता मला माझ्या आजारपणात हा प्राणायाम करण्याची संधी मिळत होती.

माझ्या मुंबईच्या बहिणीने - ज्योती माईने - निरोप पाठवला की, “प्राण मुद्राकरावी. मुद्राशास्त्र म्हणजे हाताची बोटे विशिष्ट प्रकारे वळवून उर्जा प्रवाहित करण्याचे तंत्र आहे. माझ्या या आजाराविषयी हर्षदाने माझे आध्यात्मिक गुरु - गुरुजी विनय विनेकर - ह्यांना आधीच कळवले होते, पण ते तेव्हा चेन्नईला होते. त्यांनी सुद्धा मला प्राणमुद्रा करायला सांगितले, प्राणमुद्रा म्हणजे हाताची करंगळी आणि अनामिका जोडून त्यावर अंगठा धरायचा आणि तर्जनी व मध्यमा सरळ रेषेत ठेवायची, थोडक्यात दोन्ही हातांची पिस्तुले धरल्यासाराखी ! त्यांनी मला अजून एक मुद्रा करायला सांगितली ज्यामध्ये मधल्या बोटाचे आणि अंगठ्याचे टोक एकमेकांना शक्य तेवढ्यावेळ भिडवून ठेवायचे, मग मधल्या बोटांनी अंगठ्याच्या तळाशी स्पर्श करायचा. ह्या मुद्रेचे नाव मला आठवत नाही.

गुरुजी चेन्नईहून परत आले, त्याच दिवशी भूषण त्यांना मला भेटायला घेऊन आला. तो दिवस होता १५ जानेवारी - मकर संक्राती  - वसंत ऋतूचे आगमन! गुरुजी मला भेटायला आल्याचे पाहून मला आनंदाने नाचावेसे वाटले. आम्ही एकमेकाचे हात अत्यंत प्रेमाने धरले. ते त्यांच्या नेहमीच्या पेहरावात - कुर्ता व वेष्टीत (पांढरी लुंगी) होते. त्यांच्या चष्म्यातून बघणाऱ्या मोठ्या डोळ्यात मला त्यांचे प्रेममय हृदय दिसत होते. ते म्हणाले, "आशीर्वाद, तू हे पेलू शकशील” .. की असेच काहीतरी डिसेंबर १९९६ मध्ये त्यांनी मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात जास्त प्रबळ ध्यात्मिक अनुभव दिला होता. त्या उपासना वर्गात मी आत्यंतिक उर्जेने भरून गेलो होतो. मी त्यांना सांगू पाहत होतो की तो अनुभव आज मला ह्या परिस्थितीत उपयोगी पडतो आहे. पण त्यांनी माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत मला सांगितले की मागचे सर्व विसरून जावे. मी तिथे असलेल्या नर्सला माहिती दिली - माझ्या दोन माता आहेत एक जन्मदात्री आणि दुसरी आध्यात्मिक, म्हणजे माझे गुरुजी. गुरुजींनी मला बधीरतेतील संवेदना, तसेच आजूबाजूला होणारे आवाज, मनात येणारे विचार इत्यादींना पाहायला सांगितले; फ़क़्त अस्तित्वाच्या भावनेतून पण कशाविषयी काहीही कृती न करता. ते म्हणाले, “मन शांत होईल.

त्यांनी हर्षदाला सांगितले की - तू आपल्या हातांच्या तळव्यांचा त्याच्या पायाला हळुवार स्पर्श कर, मग तळवे सावकाशपणे शरीरावरून डोक्याकडे सरकवत ने. त्याच्या पूर्ण शरीराला प्रेमाचा स्पर्श अनुभवू दे आणि रोज त्याला १०-१२ मोड आलेले मूग खाउ घाल. ICU मध्ये परवानगी नसल्याने हर्षदा लपवून ते मूग मला देत असे. मी ते माझ्या उजव्या बाजूच्या जबड्याने चावून खाई. त्यांनी मला जमेल त्या पद्धतीनेसुख प्राणायामकरायला सांगितला. त्यांच्याच शब्दात -जर अंगठा आणि करंगळीने (जोर नसल्यामुळे) नाकपुडी बंद होत नसेल तर मनगटाचा वापर करून नाकपुडी बंद कर. जर प्रत्येक श्वासउच्छ्वासाच्या वेळी डावी-उजवी नाकपुडी बदलणे शक्य नसल्यास, सलग १० आवर्तने उजव्या नाकपुडीने व नंतर हात बदलून १० आवर्तने डाव्या नाकपुडीने कर. त्यांनी पुन्हा आवर्जून सांगितले की मी प्राणमुद्रा आणि तत्सम काही मुद्रा (मध्यम बोटाच्या टोकाचा स्पर्श अंगठ्याला वर / खाली करणे) अवश्य कराव्या.

एवढ्या सगळ्या महत्वाच्या, सल्लावजा सूचना मिळाल्यामुळे, मला त्या कठीण रात्री सुसह्य झाल्या इतकेच नव्हे तर त्यांचाहीउपयोग" मला करून घेता आला. IVIG ची इंजेक्शन रात्री बारा - साडेबाराला संपत. साडेबारा ते साडेपाच मी ह्या सर्व उपासना, प्राणायाम, मुद्रा, ओंकार वैगेरे आळीपाळीने करत असे. त्यावेळी निर्माण होणारी उर्जा नक्कीच माझ्यावर आघात करणाऱ्या बधीरपणाच्या उर्जेपेक्षा भिन्न होती. एक मला नवं चैतन्य देत होती तर दुसरी माझ्यातल्या चैतन्याचा जणू निचरा करीत होती. ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी घडतांना येणारा अनुभव खूपच वेगळा होता. हे सर्व माझ्या शरीर व मनाच्या आत घडत असतांनाच, बाहेर डॉ वीणा (शा शिक्षक) यांनी सुचवले की हर्षदाने कोइम्बतुरच्या भैरवी मंदिरात देवी पूजा करावी. अजयने आवश्यक तो दाननिधी देऊन माझ्या वतीने ती पूजा करवून घेतली. माझे वडील व चुलते आमच्या कुलदैवत व कुलदेवतेला अभिषेक करण्यासाठी गोव्यात नागेशीला गेले. स्नेहधाराचे पालक, कर्मचारी वर्ग, माझे ड्रम जॅमिंगचे सोबती यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. ह्याशिवाय मी बरा होण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्यांची यादी फार मोठी आहे.

या अशा चैतन्यदायक रात्री नंतर सकाळी साडे पाचला स्पंजबाथ होई, मग सुमारे अर्धा तास डुलकी. ह्या सगळ्या प्रकारात माझी झोप पुरेशी होत नसली, तरी डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या टाळायला सांगितले. हेतू हा की माझ्या श्वसनक्रियेकडे मला बारीक लक्ष ठेवता यावे. श्वास घ्यायला थोडा जरी त्रास जाणवला तर मला ताबडतोब धोक्याची सूचना देणारा गजर (लार्म) वाजवायला सांगितला होता.

क्रमश:--

भाषांतर: सुनीत राजहंस
ट्रान्स्क्रिपशन मदत: अजय चौधरी


मूळ इंग्रजी लेखक: आशिर्वाद आचरेकर

1 comment:

  1. ही लेखमालिका न करता मोठा लेख केला असता तर बरे झाले असते असे वाटावे इतके चित्तथरारक आणि उत्कंठा वाढवणारे लिखाण आहे. हा लेख तर वाचला - आता पुढच्या महिन्यापर्यंत वाट !

    ReplyDelete