Gender Equality


"सगळं सेटींग आहे हे. माझा तर ह्या बक्षिसे सिस्टमवरचा विश्वास कधीच उडालेला होता. पण आज मात्र खात्री पटली. मॅच फिक्सिंग आहे इकडे पण."
"का?" मी शेखरला विचारलं. आमच्या आजच्या 'चाय पे चर्चा' चा विषय, सकाळी जाहीर झालेले अॅन्युअल अॅवॅार्डस, हा होता.
"अरे श्रावणीला Early Career Award मिळालं, बघितलंस ना?"- शेखर.
"मग?" -मी.
"राजकारण आहे रे हे सगळं. 'वूमेन इन स्टेम (सायन्स, टेक्नोलॉजी, इंजिनियरींग, मॅथ्स.)' कॅम्पेनला प्रमोट करायला केलंय हे. दाखवायला फक्त, की आम्ही बायकांना करिअर ग्रोथ मधे किती सपोर्ट करतो." - शेखर.
"काय सांगतो? तरीच, मला पण ती डिझर्विंग नाही वाटली. एक तर तीन महिने मॅटर्निटी लीव्ह वर होती गेल्या वर्षी. त्यानंतर तीन महिने हाफ टाईम. कुठल्या बेसिसवर तिचं सिलेक्शन केलं? बाय वे, कमिटीमधे समीर शुक्ला होता. दॅट कॅन एक्सप्लेन." आता सतीश पण शेखरच्या बरोबरीने उतरला होता. शेवटच्या ओळीवर शेखरकडे बघून त्याने डोळा मारला.
"अरे, तुम्हा दोघांपैकी कोणी तिच्या बरोबर काम केलंय का?" मी ह्याच्या मुळाशी जायचं ठरवलं.
"तू केलंयस? आम्हाला विचारतोयस ते?" शेखरने प्रश्न उलटवला.
"नाही. पण मी तुमच्यासारखे मोठे क्लेम्स करत नाहीये. बरं, जर तुम्हाला ह्या अवॉर्ड बद्दल काही आक्षेप असेल तर आपल्याकडे एच. आर. प्रोसेस आहे त्याची तपासणी करायला. चला जाऊ या एच. आर. कडे?"
"वेडा आहेस का? एवढ्यासाठी काय HR कडे जायचं? त्याने काही होणार नाहीये. सबलोग मिले हुए है. परत आपल्यालाच सेक्सिस्ट म्हणतील."
"हे बरंय. म्हणजे तुमच्याकडे कशाचं प्रूफ नाही. तुम्हाला ह्याबाबतीत काही करायचं नाही. पण अशी नुसती अफवा सोडायची आहे. ही आपण इथेच अडवली नाही तर काही तासांतच ही ऑफीसमधे सगळ्यांच्या फोनवर पोचेल. आजकाल अफवा पसरायला आणि कोणाची इमेज खराब व्हायला वेळ लागत नाही. आणि आलेल्या मेसेजची शहानिशा करायलाही कोणाकडे वेळ नसतो. पण तरीही मेसेज पुढे पाठवत राहतात."
"तू थोडी जास्तीच तीव्र प्रतिक्रिया देतो आहेस, असं नाही वाटत? आणि तुला माहिती आहे, की मी सुद्धा स्त्री-पुरुष समानतेच्या बाजूनेच आहे. आपल्या टीममध्ये मी equality measures implement करण्यासाठी कितीतरी पुढाकार घेतला आहे." शेखर बचावात्मक पवित्रा घेत म्हणाला.
"असेल. पण एक सांगू शेखर, सतीश - तोंडावर सगळेच कौतुक करतात रे. पण जोपर्यंत यशस्वी बायकांबद्दल त्यांच्यामागे काहीबाही बोलणं थांबत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समानता येणार नाही. ती फक्त एक प्रक्रिया बनून राहील, पण आपल्या विचारात येणार नाही." माझे बोलणे त्यांना आवडले नसेल कदाचित, पण ह्या व्यावसायिक दुटप्पीपणावर ही चपराक वेळीच बसणे गरजेचे होते.

                              मानस




1 comment: