मी घर बोलतोय, काय झालंय? काहीतरी वेगळं घडतंय... एरवी घरात न थांबणारी ही मंडळी काही दिवसांपासून घरातच आहेत... करोना करोना असे काही तरी त्यांच्या बोलण्यात येतंय आणि कधी हसत खेळत असतात तर कधी चिंतातूर दिसतात सगळे. आणि सगळे एकत्र घरात तेही इतके दिवस! तसे बघायला गेले तर मी म्हणजे, भिंती, छत, फरशी, दारे, खिडक्या म्हटलं तर निर्जीव...पण मलाही कान, डोळे आणि मन असतं हे बहुतेकांना माहीतच नसतं, हे चौघे आणि मी दहा वर्षापासून एकत्र आहोत.
या चौघांत मला ‘ती’ च जास्त आवडते... कारण ती प्रेमळ आहे, माझी
काळजी घेते, मला स्वच्छ, नीटनेटकं
ठेऊन, सजवते, नटवते, माझं
दुखलं खुपलं बघते.. एकटीला होत नाही तिला, पण
ती इतर कामाच्या बायकांना हाती धरून सावरत असते सगळं. ती
अर्थार्जन ही करते आणि सगळ्यांच सगळं बघते.
यांच्यातला
‘तो’
कुटुंबप्रमुख आहे.. पण तो पाहुणाच वाटतो मला.. अगदी ताटावरून पाटावर आणि पाटावरून
ताटावर..सारखा रिमोट हातात आणि TV पाहात
असतो. माझ्या अंगा-खांद्यावर
वाढलेली दोन गोड पिल्लं आहेत.. ती जरा खट्याळ आहेत.. तिला कधी कधी त्रास देतात, पण गुणी
आहेत...मला नाही समजत त्यांना माझा लळा आहे की नाही, ती बाहेर
जातात-येतात, कधी चिवचिवतात तर कधी तासंतास
कानाला वायरी लावून त्या चपट्या यंत्रात काही तरी बघत असतात... मला वाटतं सगळेच
हल्ली त्या चपट्या यंत्राकडे तासन तास बघत बोटाने काही तरी वर खाली करत स्वतः शीच
हसत असतात.
मला भारी
कुतूहल वाटतं आणि
रागही येतो. त्या
यंत्राची असूयाही वाटते. माझ्याकडे दुर्लक्ष होतं म्हणून.. या सर्वांवर माझा खूप
जीव आहे.. हे सगळे एकत्र माझ्या उबेला असले की मला खूप बरं वाटतं ... कधी
कधी भांड्याला भांडी लागतात तेव्हा मी कावराबावरा होतो पण मला आता कळून चुकलंय ती
सावरते सगळं...स्वतःच 'सॉरी' म्हणून पुन्हा काहीच झालं नाही अशी वावरते, आणि मग सगळं नीट होतं. त्यामुळे मला तसं निर्धास्त वाटतं. रात्री हे सगळे
झोपतात तेव्हा अंधारात मी त्यांच्याकडे पाहात असतो .. ते मला सोबत करतात आणि मी
त्यांना.
काही
गोष्टी खटकतात मला.. सुट्टी पडली की मोठ्ठया मोठ्ठया बॅगा भरून मला एकटं सोडून हे सगळे
बऱ्याचदा निघून जातात. शनिवार रविवारी जेमतेम घरात असतात नाहीतर सारखे सगळे नटून
थटून बाहेरच जातात. मला किती एकटं वाटत कुणालाच माहित नाही.. मी कित्ती वाट बघतो
यांच्या येण्याची... कधी कधी अगदी रडकुंडीला येतो..
मला आता
छान वाटतंय या सगळ्यांना एकत्र माझ्या कुशीत शिरलेलं बघून. पण तिची जरा जास्तच धाव
धाव होतेय .... मी काही मदतही करू शकत नाही... गंम्मत सांगू का.. कुणाला सांगू
नका... काल मी चक्क त्याला भांडी घासताना पाहिलं.. मी इतक्या वर्षात कधीच नव्हतं
त्याला असलं काही करताना पाहिलं .. आणि सकाळी तर तो पोछा घेऊन आला मला पुसायला...
मला गुदगुल्याचं झाल्या...लेकाला कोणी शिकवलंच नाही साधा पोछा कसा मारतात.
पण असं
काय झालं... त्यामुळे इतकं सगळं
बदललं? त्या करोना मुळे? अजबच
आहे.. हे सगळे माझ्या उबेला आले ते मला छानच वाटतंय, पण यांचे चिंतातूर.. धास्तावलेले चेहरे मात्र बघवत
नाहीत... हे काय ते कोरोना संकट टळून जाऊ दे बुवा... माझा जीव आहे या सर्वांवर...
बाहेरच्या भयापेक्षा एकमेकांच्या आणि माझ्या प्रेमापोटी हे सगळे एकत्र आले आणि
माझ्या कुशीत शिरले तर मला जास्त छान वाटेल.
chaan...
ReplyDeleteGhar, home, house hi ek chatra chaya aahe. Tya aaplya gharane kiti chaan mnogat vykat kele aahe
ReplyDelete