गीताई : अध्याय १८ (भाग १) - मोक्ष संन्यास योग

 


खरेच वाटत नाही, की मी अठराव्या म्हणजे शेवटच्या अध्यायात येऊन पोहोचले आहे. मागच्या श्रद्धात्रयविभाग योगात आपण पाहिलं की श्रीकृष्णांनी सत्व, रज, तम अशा तीन प्रकारच्या श्रद्धा, तीन प्रकारचे आहार, तप, यज्ञ, दान, वाणी यांची अगदी मुद्देसू माहिती सांगितली. अपरंपार ज्ञानाने भरलेली ही भागीरथी सतराव्या श्रद्धात्रय विभाग योगातून मोक्ष संन्यास योगात अखंड वाहत राहते.

या योगात एकूण ७८ श्लोक आहेत. वाचकांच्या सोयीसाठी हा अध्याय मी दोन भागात लिहिते आहे. एक गंमत आहे. हा शेवटचा अध्याय असल्याने या अध्यायात पूर्ण गीतेत सांगितलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टी पुन्हा उद्धृत केलेल्या आढळतात. फार सुंदर अध्याय आहे..अनेक जीवनोपयोगी उपदेशानी खचून भरलेला.

अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या एका प्रश्नाने होते. अगदी साधा प्रश्न आहे...

संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचे हि कसे असे।

मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे॥ १ ॥

 अर्जुन विचारतो, कृष्णा, संन्यासाचे आणि त्यागाचे खरे तत्त्व काय असते? ते मला जाणून घायचे  आहे. तेव्हा मला हे वेगवेगळे  करून सांग. पहा, सतरा अध्यायांतून ज्ञानाच्या विविध दालनातून जाऊन ही अर्जुनाची जिज्ञासा कशी कायम आहे. जिज्ञासा, कुतूहल, हे माणसाला प्रश्न विचारायला भाग पाडते. आणि योग्य व्यक्तीला योग्य प्रश्न विचारले तर त्यांच्या ज्ञानाचे, अनुभवाचे चार-दोन थेंब प्रश्न विचारणाऱ्याला जरूर मिळतात. अर्जुन प्रत्यक्ष परमेश्वरालाच प्रश्न विचारत आहे, आणि इथे भगवान कृष्णांनी त्याला ज्ञानाचे चार दोन थेंब नाही तर ज्ञानाचा सागर अर्जुनाला आणि पर्यायाने आपल्याला भेट दिला आहे.

श्री भगवान् म्हणाले -

सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती।

फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग बोलती॥ २ ॥

दोष-रूप चि ही कर्मे सोडावी म्हणती कुणी।

न सोडावी चि म्हणती यज्ञ-दान-तपे कुणी॥ ३ ॥

 इथे श्रीकृष्णांनी लोकांचे दृष्टिकोन मांडले आहेत. ते म्हणतात, काही ज्ञानवंत लोक सर्व काम्य कर्मांचा म्हणजे सर्वच कर्मांचा त्याग करणे  याला संन्यास म्हणतात, तर काही लोक कर्म केल्यानंतर निर्माण होणाऱ्या फळाच्या लाभाच्या त्यागाला त्याग असे म्हणतात. सर्व कर्मे ही सदोष असतात त्यामुळे सर्व कर्मेच सोडून द्यावीत असे  कुणी म्हणतात, तर कुणी म्हणतात की हे यज्ञ, दान, तप हे सगळं सोडून दिले  पाहिजे.

तरी ह्याविषयी ऐक माझा निश्चित निर्णय।

त्याग जो म्हणती तो हि तिहेरी भेदला असे॥ ४ ॥

यज्ञ-दान-तपे नित्य करणीय अवश्यक।

न सोडावी चि ती होती ज्ञानवंतास पावक॥ ५ ॥

परी ही पुण्य-कर्मे हि ममत्व फळ सोडुनी।

करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय॥ ६ ॥

 तर हे अर्जुना, तू हे ज्ञानवंत लोकांचे संन्यास आणि त्याग या विषयीचे दृष्टिकोन ऐकलेस. आता माझा या विषयीचा निश्चित निर्णय ऐक. हा जो त्याग आहे, तो ही त्रिविध आहे  म्हणजे सात्विक, राजस आणि तामसिक. यज्ञ, दान, तप हे जरूर केले  पाहिजे. ज्ञानवंत व्यक्तींसाठी या पावक गोष्टी आहेत. माणसाने पुण्य किंवा योग्य कर्मही करत राहीले पाहिजेत. परंतु  कसे, तर कुठलीही आसक्ती, ममत्व किंवा फळाची अपेक्षा न ठेवता. अर्जुना, हा मी तुला दिलेला निर्णय आहे.

 

हे किती मूलभूत ज्ञान आहे.... इथे आपल्या संदर्भात यज्ञ आणि तप हे आपण एखाद्या श्रेष्ठ ध्येयासाठी झोकून काम करणे, किंवा शिक्षणाचा ज्ञानयज्ञ किंवा ध्यासाने हाती घेतलेले कुठलेही काम अशा अर्थाने घेतले पाहिजे.

नेमिले कार्य जे त्याचा संन्यास नजुळे चि तो।

केला तसा जरी मोहे त्याग तामस बोलिला॥ ७ ॥

कष्टामुळे चि जे कर्म सोडणे आंग राखुनी।

त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ॥ ८ ॥

 ज़े निषिद्ध कर्म आहे, त्याचा त्याग करणे योग्यच आहे. पण मोहाने ज़े निहित कर्म आहे, ज़े कर्तव्य आहे, त्याचा त्याग करणे  हा तामसिक त्याग आहे. पुढच्या ओळी पहा, किती सुंदर आहेत आणि मजेशीरही. मानवी स्वभावाची किती सूक्ष्म जाण इथे दिसून येते.

 

परमेश्वर म्हणतात, "कष्टामुळे चि जे कर्म सोडणे आंग राखुनी। त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ'  थोडक्यात, जो आळसापोटी किंवा आपल्या अंगाला तोशि पडू नये म्हणून जो विहित कर्माचा त्याग करतो, तो निष्फळ असा राजस त्याग असतो.

करणे नेमिले कर्म कर्तव्य चि म्हणूनिया।

ममत्व फळ सोडूनि त्याग तो मान्य सात्त्विक॥ ९ ॥

 फार महत्त्वाच्या ओळी आहेत. जो नेमलेले  किंवा विहित कर्म कर्तव्य बुद्धीने करतो, कर्म फळाविषयी आसक्ती, ममत्व राखत नाही, तो त्याग सात्विक मानला जातो... फार मोठे  काही पाहायला नको... आईचेच उदाहरण घ्या..ती मुलांसाठी, कुटुंबासाठी कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता खूप काही करत असते.. स्वतः उपाशी राहते, पण लेकरांच्या पानात वाढते.. हा घरात दिसणारा सात्विक त्याग आहे.. अशी अनेक उदाहरणे  घरात, समाजात भरपूर दिसतात.

कर्मी शुभाशुभी जेंव्हा राग-द्वेष न राखतो।

सत्त्वांत मुरला त्यागी ज्ञाने छेदूनि संशय॥ १० ॥

अशक्य देहवंतास सर्वथा कर्म सोडणे।

म्हणूनि जो फल-त्यागी तो त्यागी बोलिला असे॥ ११ ॥

तिहेरी फळ कर्माचे बरे वाईट मिश्रित।

त्याग-हीनास ते लाभे संन्यासी मुक्त त्यांतुनी॥ १२॥

 जी व्यक्ती कर्म चांगली, वाईट कशीही असली तरीही त्यांच्याविषयी राग, द्वेष ठेवत नाही, ती व्यक्ती सात्विक आणि ज्ञानवंत असते. देहवंत जीवाला संपूर्णपणे कर्माचा त्याग करणे नेहमीच अशक्य असते. त्यामुळे जो कर्मफळाचा त्याग करू शकतो तोच खरा त्यागी. ज्यांनी कर्मफळाचा त्याग केला नाही अशांना त्यांच्या कर्माच्या तिहेरी स्वरूपानुसार सत्त्व, रज, तम, मिश्र फळ प्राप्ती होते. परंतु ज़े कर्म फळाचा त्याग करतात असे संन्यासी लोक कर्मफळापासून मुक्त असतात.

ऐक तू मजपासूनि ज्ञात्यांचा कर्म-निर्णय।

परभारे चि हे कर्म करिती पांच कारणे॥ १३ ॥

अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने।

वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे॥ १४ ॥

काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी। 

धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे॥ १५ ॥

 त्याग आणि संन्यास या विषयी सांगून झाल्यावर श्रीकृष्ण पुढे कर्माच्या सिद्धीविषयी सांगू लागतात. ते म्हणतात, अर्जुना ऐक... कर्म, सिद्धी किंवा कर्माचा निर्णय हा पाच कारणांमुळे होतो. अधिष्ठान, अहंकार (कर्ता ), अनेक कारणे, नानाविध क्रिया, आणि पाचवे  दैव अशा या पाच गोष्टीतून कर्माची सिद्धी किंवा त्यांचा निर्णय होतो.

काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी।

धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे॥ १५ ॥

 

काया, वाचा, मन यांद्वारे मनुष्य या जगात ज़े ज़े कर्म करतो, ज़े ज़े धर्माला किंवा अधर्माला धरून वर्तन करतो, त्या सर्वांच्या मागे ही पाच कारणे  असतात. किती शास्त्रीय मीमांसा आहे. आपल्या प्रत्येक कृतीचा निर्णय किंवा सिद्धी ही काहीतरी उद्देश (अधिष्ठान), कृतीचा कर्ता, काही तरी गरज किंवा सबळ कारण, प्रत्यक्ष हालचाल, कृती आणि अदृश्य असे  दैव या पाच गोष्टींनी बांधलेली असते... पटण्यासारखे आहे!

तेथ जो शुद्ध आत्म्यास कर्ता मानूनि बैसला।

संस्कार-हीन तो मूढ तत्त्व नेणे चि दुर्मति॥ १६ ॥

नसे ज्यास अहंभाव नसे बुद्धीत लिप्तता।

मारी विश्व जरी सारे न मारी चि न बांधिल ॥ १७॥

 अर्जुना, तर जो कोणी आत्म्यालाच कर्ता समजत असेल, तर त्याला खरे  काहीच कळलेले  नसते . ज्याला अहंभाव नाही म्हणजे "मी" केले ... मीच सगळे  करतो अशी ज्याची भावना नाही, ज्याच्या बुद्धीला कुठल्याच गोष्टी चिकटत नाहीत, ज्याला अलिप्त राहायची कला अवगत झाली आहे, तो सर्व लोकांना मारूनही वास्तविक कोणालाच मारत नाही. हा शब्दशः अर्थ झाला. परंतु  मी याचा विपर्यासी अर्थ काढण्यापेक्षा असा अर्थ घेते, की कुठल्याही गोष्टी अहंभावनेने करू नयेत आणि निर्लेप बुद्धि ठेवावी.

ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्म-बीज हे।

क्रिया करण कर्तृत्व कर्मांगे तीन त्यांतुनी॥ १८ ॥

ज्ञाता-कर्मांत कर्त्यांत त्रिगुणी तीन भेद जे।

रचिले ते कसे ऐक गुण-तत्त्वज्ञ वर्णिती॥ १९ ॥

 श्रीकृष्ण म्हणतात, कर्माचे  ज़े बीज किंवा प्रेरणा आहेत त्या तिहेरी आहे. ज्ञाता, ज्ञेय, आणि ज्ञान हे कर्माच्या बीजाचे तीन प्रदर आहेत. क्रिया, कर्ता आणि कर्तृत्व हे तीन प्रकारचे कर्म संग्रह आहेत. ज्ञान, कर्ता आणि कर्म यातला जो त्रिगुणी भेद आहे, तो हे अर्जुना मी तूला सांगतो. श्रीकृष्ण एक उत्तम शिक्षक, मार्गदर्शक आहेत. आपल्या वत्साला ते किती छोटे छोटे बारकावे उदाहरणासहित समजावून देतात पहा.

भूत-मात्रांत जे पाहे भाव एक सनातन।

अभिन्न भेदलेल्यांत जाण ते ज्ञान सात्त्विक॥ २० ॥

भेद-बुद्धीस पोषूनि सर्व भूतांत पाहते।

वेगळे वेगळे भाव जाण ते ज्ञान राजस॥ २१ ॥

एका देहांत सर्वस्व मानुनी गुंतले वृथा।

भावार्थ-हीन जे क्षुद्र जाण ते ज्ञान तामस॥ २२ ॥

 हे अगदी सोपे  तत्वज्ञान आहे. श्रीकृष्ण ज्ञानाच्या त्रिगुणी रूपाविषयी काय सांगतात पाहूया. 

ज्ञान : ज़े ज्ञान सर्व भूतमात्रात एकच सामायिक सनातन भाव पाहायला शिकवते. अनेक भेदांमध्ये अंतर्भूत असलेली अभिन्नता किंवा वैविध्यातली एकतानता पाहायला शिकवते ते खरे ज्ञान सात्विक ज्ञान होय. ज़े ज्ञान सर्व प्राणीमात्र जशी वेगवेगळी दिसतात तशीच ती वेगवेगळी आहेत, या गृहितकावर पोसलेले असते ते ज्ञान राजस ज्ञान मानावे. ज़े ज्ञान फक्त एका देहालाच सर्वस्व मानून, त्यात आसक्त मानून त्यातच गुंतून राहायला सुचवते ते भावार्थहीन आणि तामस ज्ञान आहे हे समजावे.

नेमिले जे न गुंतूनि राग-द्वेष न राखता।

केले निष्काम-वृत्तीने कर्म ते होय सात्त्विक॥ २३ ॥

ध्रूती कामना चित्ती जे अहंकार-पूर्वक।

केले महा खटातोपे कर्म ते होय राजस॥ २४ ॥

विनाश वेच निष्पत्ति सामर्थ्य हि न पाहता।

आरंभिले चि जे मोहे कर्म ते होय तामस॥ २५ ॥

 

कर्म : ज़े विहित कर्म निष्काम वृत्तीने कुठलाही राग, द्वेष न ठेवता त्यात अजिबात गुंतून न जाता केले जाते ते सात्विक कर्म होय.

ज्या कर्माच्या धारणा किंवा इच्छा या अहंकारपूर्वक असतात आणि ज़े परिश्रमाने खटाटोपाने केले जाते ते राजस कर्म मानावे.

ज़े कर्म विनाश, त्यातून काय उत्पन्न होईल याचा विचार न करता, सामर्थ्य आहे किंवा नाही याचाही विचार न करता, केवळ मोहापायी आरंभले जाते ते तामसिक कर्म मानावे.

निःसंग निरहंकार उत्साही धैर्य-मंडित।

फळो जळॉ चळे ना तो कर्ता सात्त्विक बोलिला॥ २६ ॥

फल-कामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक।

मारिता हर्ष-शोके तो कर्ता राजस बोलिला॥ २७ ॥

स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी।

दीर्घ-सूत्री सदा खिन्न कर्ता तामस बोलिला॥ २८ ॥

 

आता कर्त्याचे त्रिगुणी प्रकार पाहू.

कर्ता : जो कर्ता निःसंग, निरहंकारी, उत्साही आणि धैर्यवान असतो, जो फळ मिळाले किंवा  नाही मिळाले  तरी विचलित होत नाही तो कर्ता सात्विक मानावा.

जो कर्ता फळाच्या आसक्तीने बद्ध, लोभी, अस्वछ, हिंसक असतो, कर्माच्या परिणामानंतर जो आनंद, दुःख, शोक या अशा भावनांनी ग्रस्त होतो तो राजस कर्ता समजावा.

जो कर्ता मन मानेल तसे करणारा, हलक्या विचारांचा, गर्विष्ठ, घातकी, आळशी, दीर्घसूत्री, सदानकदा खिन्न असणारा असा कर्ता तामस मानावा. (दीर्घसूत्री हा नवीन शब्द सापडला. याचा अर्थ हळू हळू काम करणारा)

मूळ संस्कृत श्लोक आवडला म्हणून तो ही देत आहे.

अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः।

विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते॥ १८-२८॥

 

आपण ज्ञान, कर्म, कर्ता यांचे त्रिगुणी प्रकार पाहिले. या पुढे भगवंतांनी बुद्धी आणि धृति म्हणजे धारणा, यांच्या त्रिगुणी रूपांविषयी विस्ताराने सांगितले आहे.

बुद्धीचे भेद जे तीन धृतीचे हि तसे चि जे।

गुणानुसार ते सारे सांगतो वेग्वेगळे॥ २९ ॥

अकर्तव्ये बंध-भय कर्तव्ये मोक्ष निर्भय।

जाणे सोडू धरू त्यांस बुद्धि सात्त्विक ओळख॥ ३० ॥

कार्याकार्य कसे काय काय धर्म अधर्म तो।

जी जाणू न शके चोख बुद्धि राजस ओळख ॥ ३१ ॥

धर्म मानी अधर्मास अंधारे भरली असे।

अर्थ जी उलटा देखे बुद्धि तामस ओळख ॥ ३२ ॥

 

श्रीकृष्ण म्हणतात, बुद्धिचे तीन भेद आहेत, तसेच धृतीचे म्हणजे धारणेचेही तीन भेद आहेत. त्यांच्या त्रिगुणानुसार मी तुला ते वेगवेगळे सांगतो.

 

बुद्धि : हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यातील फरक यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी हे तू ओळख.

कार्य काय असते, अकार्य काय असते  यातला फरक जी चोखपणे जाणू शकत नाही, ती राजस बुद्धि हे तू ओळख.

जी बुद्धि अधर्मालाच धर्म मानते, जी अंधःकाराने भरलेली आहे, जी प्रत्येक गोष्टीत उलटा, विपरीत अर्थ काढते ती तामसिक बुद्धी हे तू अर्जुना ओळख.

जी इंद्रिये मन प्राण ह्यांचे व्यापर चालवी।

समत्वे स्थिर राहूनि धृति सात्त्विक जाण ती॥ ३३ ॥

धर्मार्थकाम सारे चि चालवी सोय पाहुनी।

बुडवी जी फलाशेत धृति राजस जाण ती ॥ ३४ ॥

निद्रा भय न जी सोडी शोक खेद तसा मद।

घाली झांपड बुद्धीस धृति तामस जाण ती॥ ३५ ॥

 

धृति : धृति म्हणजे धारणा. जी धारणा स्थिर आणि समत्व बुद्धीने इंद्रिय, मन आणि प्राण यांचे व्यापार चालवते ती सात्विक धृति समजावी.. आतापर्यंतच्या अनेक अध्यायात या समत्व बुद्धीचा उल्लेख आढळतो...जी आपल्या जगण्याची मूलभूत धारणा बनली तर.... आपल्याला अनेक दुःखांपासून मुक्ती मिळेल.

जी धारणा धर्माला अनुसरून पण सोयीनुसार सारी कार्यें पार पाडते, जी फळाच्या आशेने लुब्ध आहे ती धृति राजस समजावी.

जी धारणा भीती, झोप, आळशीपणा यांनी बुद्धीला वेढणारी, झापडं घालणारी असते ती धृति तामसिक समजावी.

 

आता श्रीकृष्ण तीन प्रकारच्या सुखांची माहिती देतात.

तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐक ते॥ ३६ ॥

अभ्यासे गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी।

जे कडू विख आरंभी अंती अमृत-तुल्य चि।

आत्म्यांत शुद्ध बुद्धीस लाभले सुख सात्त्विक॥ ३७ ॥

आरंभी गोडसे वाटे अंती मारक जे विख।

भासे विषय-संयोगे इंद्रिया सुख राजस॥ ३८ ॥

निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी।

आरंभी परिणामी हि गुंगवी सुख तामस ॥ ३९ ॥

 श्रीकृष्ण म्हणतात -

हे अर्जुना, ज़े सुख अभ्यासातल्या गोडव्यात रमते  आणि दुःखाचा अंत करते ते सुख सात्त्विक सुख मान. असे  सुख सुरवातीला विषासारखं जरी वाटलं तरी शेवटी अमृताप्रमाणे गोड असते. अशा प्रकारे शुद्ध बुद्धि जी परमात्म्याच्या आत्मिक ज्ञानाने तृप्त तृप्त आहे, त्या स्थितीत अनुभवलेले सुख हे सात्विक सुख समज. आपल्यासाठी उदाहरण घ्यायचे तर आपल्या छंदांच्या जोपासनेतून होणारा आनंद, भजन पूजनातून मिळणारा  आध्यात्मिक आनंद. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून निर्माण होणारे ज़े सुख सुरवातीला गोड वाटते, ते अंती विषसमान मारक ठरते. ते सुख राजस सुख समजावे. उदाहरण द्यायचे  तर आताच्या आधुनिक जगात आपल्याला मोबाईलचा झालेला OCD. याचे दुष्परिणाम शेवटी भोगावे लागणार आहेत. ज्या सुखात आत्म्याला, म्हणज़े भोगणाऱ्याला जरी गोड वाटलं तरी सुरवातीला आणि शेवटीही माणसाला गुंगवून ठेवणारे  हे सुख तामस सुख मानावे. याचे  उदाहरण काय द्यायचे?  आळसात लोळणारी, कर्तव्य आणि कर्तृत्वशून्य, शेच्या आहारी गेलेली कितीतरी माणसे आपण नित्य पाहतोच.

 

या भागात इथे थांबते. इतका सुंदर, मित्र, सखा, सारथी, मार्गदर्शक मिळायला भाग्य लागते. जो कठीण काळात जगण्यातले, जीवनातले, चांगले काय, वाईट काय या सगळ्याचे इतके सूक्ष्म प्रदर इतक्या सोप्या शब्दांत  उलगडून दाखवतो. जगण्याचा असा कुठलाही पैलू नाही ज्यावर श्रीकृष्णांनी गीतेत प्रकाश टाकला नाही. श्रद्धात्रय विभाग योगापासून ते मोक्षसंन्यास योगापर्यंत श्रीकृष्णांनी श्रद्धा, यज्ञ, तप, आहार, वाणी, ज्ञान, त्याग, कर्ता, कर्म, धृति, बुद्धि, सुख या इतक्या महत्त्वाच्या पैलूंचे सत्त्व, रज आणि तम हे त्रिविध रूप आपल्या समोर उलगडून दाखवले..याहून अधिक काय पाहिजे? श्रीकृष्णा तुझी अपार माया अशीच आमच्यावर राहो.


क्रमश:


अलका देशपांडे 




1 comment: