गीताई : अध्याय ९ - राजविद्या राजगुह्य योग

बघता बघता नवव्या अध्यायात पोहोचले. मागच्या 'अक्षरब्रम्ह योग' अध्यायात श्रीकृष्णांनी त्यांच्या लाडक्या अर्जुनाला आत्मशक्तीच्या ब्रम्हरूपाची तिच्या अक्षर अविनाशी रूपाची ओळख करून दिली आणि अर्जुनाच्या अनेक प्रश्नाची मुद्देसुत उत्तरही दिली. 'राजविद्या राजगुह्य योग', या अध्यायात एकूण ३६ श्लोक आहेत.

श्रीकृष्ण अध्यायाची सुरुवात अशी करतात -

आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज

विज्ञान कसिले ज्ञान अशुभातूंनी सोडवी

अर्जुनाला मी अनेकदा श्रीकृष्णाचा लाडका मित्र असे  म्हटले, ते उगीच नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनासाठी अनेक ठिकाणी अनेक विशेषणे  वापरली आहेत. महाबाहो, पऱंतप, श्रेष्ठ पुरुष, पार्थ (पृथा पुत्र), भारत (भारतवंशी), धनंजय, निष्पाप अशा अनेक नावांनी कृष्ण गीतेत जागोजागी अर्जुनाला संबोधतात. या श्लोकात ते अर्जुनाला "निर्मळ" संबोधून, गुप्त असा या आधी कुणालाही सांगितलेला नाही असा गुह्य 'राजयोग' सांगतात. ते म्हणतात, या योगात मी तुला गुप्त असे विज्ञानासहित ज्ञान सांगतो ज्यामुळे तुझी अशुभातून सुटका होईल.

राज विद्या महा गुह्य उत्तमोत्तम पावन

प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म सार सनातन

पहा श्रीकृष्ण म्हणतात गुप्त असा राजविद्या योग हा सनातन धर्माचे  सार आहे. हा योग सर्व योगांचा राजा, उत्तमात उत्तम असा आहे.

श्रीकृष्ण पुढे म्हणतात - 

मी चि अव्यक्त रूपाने जग हे व्यापिले असे

माझ्यांत राहती भूतें मी न भूतांत राहतो

न वा भूतें हि माझ्यांत माझा हा दिव्य योग

की करितो धरितो भूतें परी त्यात नसे कुठे

देव खरंच दिसतो का आपल्याला कधी? आणि आपल्यालाही माहित असते, तो असा देव म्हणून प्रकट रूपात दिसणारही नाही कधी. पण आपण त्याला निरनिराळ्या प्रतीकात्मक रुपांत  पुजतो. पहा इथे श्रीकृष्ण काय सांगतात की मी हे संपूर्ण जग व्यापलंय पण अव्यक्त रूपाने... ईश्वरी शक्ती चराचर व्यापुन उरलेली आहे....भगवान म्हणतात, ही जी पंच महाभूते  आहेत, ज्या पासून विश्वाची धारणा झाली आहे, ही सगळी माझ्यात सामावलेली आहेत. पण मला त्यांत व्यक्त रूपात शोधाल तर मी त्यात नाही. मी पंच महाभुतांची जरी निर्मिती करीत असलो, जरी त्यांची धारणा करीत असलो तरी मी त्यात बांधलेला नसतो. मी त्यांच्या गुणांहून वेगळा असतो.

आकाशात महा वायु सदा सर्वत्र राहतो

माझ्यात सगळी भुते राहती जाणं तू तशी

कल्पांती निजवि भूतें मी माझ्या प्रकृतीमध्ये

कल्पारंभि पुन्हा सारी मी ची जागवितो स्वये

हाती प्रकृती घेऊनि जागवी मी पुन्हा पुन्हा

भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो

आकाशात जसा वायु म्हणजे हवा भरून राहिलेली असते, तशी ही पंचमहाभूते  माझ्या ठायी निवास करतात, हे तू अर्जुना जाणून घे... कल्पांत म्हणजे जेव्हा सर्व सृष्टीचा विनाश होतो तेव्हा मी पंच महाभूतांना झोपवतो आणि जेव्हा मी कल्पारंभ करतो, सृष्टीची पून्हा रचना करतो तेव्हा त्यांना पून्हा मी स्वतः जागवतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंच महाभूते अशा प्रकारे प्रकृतीच्या अधीन आहेत त्यांना मी पुनः पुनः जागवत, उद्दीपित करत असतो.

विनोबांचे  कवित्व गीताईच्या प्रत्येक श्लोकांत  उजळून निघालेलं  मला जाणवतंय... निजवी आणि जागवी हे शब्दप्रयोजन खूप सुंदर आहे.

परी ही सगळी कर्मे बांधू न सकती मज

उदासीनापरी राहे अनासक्त म्हणूनिया

साक्षी मी प्रकृती द्वारा उभारी सचराचर

त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे


आता लिहिता लिहिता मला कळतंय श्रीकृष्णांनी या योगाला गुह्य, गुप्त का बरं  म्हटलं आहे..विश्वाची निर्मिती, नाश कसा होतो या विषयीचे  ज्ञान हे सामान्य ज्ञान नव्हें... परमेश्वर त्यांचे  एकदम secret knowledge share करत आहेत. तर ते म्हणतात की प्रकृतीच्या गुणांनी निर्माण होणारी ही जी कर्म आहेत ती मला परमेश्वराला किंवा आपल्या आत्मशक्तीला, त्या उर्जेला बांधून ठेऊ शकत  नाहीत..परमेश्वर स्वतःला उदासीन अनासक्त म्हणतात कारण सामान्य माणूस जसा कर्म आणि त्यांच्या बऱ्या वाईट परिणामांनी बांधलेला असतो पण परमेश्वर त्या सर्वांच्या निर्मितीला कारणीभूत असूनही निर्लेप त्यापासून अलिप्त असतो. परमेश्वर म्हणतात साक्षी भावाने मी या चराचराची निर्मिती करतो ज्यातून सृष्टीच्या सर्व घडामोडी घडत असतात.

पुढच्या ओळी फार सुंदर आहेत. परमेश्वराने इतक्या सुंदर शब्दात तो कुठे कुठे आणि कशा कशात आहे ते सांगितले आहे.

मी चि संकल्प, मी यज्ञ स्वावलंबन अन्न

मंत्र मी, हव्य ते मी चि, अग्नी मी, मी चि अर्पण

मी ह्या जगास आधार माय, बाप, वडील मी

मी तिन्ही वेद, ओमकार जाणण्या योग्य पावन

साक्षी, स्वामी, सखा, भर्ता, निवास, गति, आसरा

करी हरी धरी मी चि ठेवा मी बीज अक्षय

तापतो सूर्य रूपे मी सोडितो वृष्टी खेचितो

                             मृत्यु मी आणि मी मोक्ष असे आणी नसे हि मी 

यज्ञाआधी सोडलेला संकल्प ही मीच आणि यज्ञही मीच, जिची आहुति देतात ती हव्य वस्तू ही मीच आणि तिला स्वीकार करणारा अग्नी ही मीच. आई, वडील, आजोबा जो कोणी म्हणाल त्या रूपात या जगाचा आधार मी आहे. मीच ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आहे, सर्वांनी जाणून घ्यावा असा परम पावन ओंकार मी आहे. गुरु, स्वामी, मित्र, सर्वांचं भरण-पोषण करणारा, सर्वांचं निवास, आश्रय, गती सर्व काही मीच आहे. अक्षय अविनाशी असे  बीज मीच आहे. मीच सूर्य रूपाने पाण्याचं बाष्प करून पाऊस पाडतो. मीच मृत्यू आहे आणि मीच मोक्ष आहे....या श्लोकाचा शेवट भारी आहे.."मृत्यू मी आणि मी मोक्ष, असे आणि नसे ही मी 'that's the real secret...' की या सगळ्यात मी आहे पण तरीही "मी" कशातच नाही..... फार सुंदर... विश्वाचा चालक जो सर्व निर्माण आणि नाश करू शकतो तो जर असे  म्हणू शकतो तर आपण केवढे... आपले  काम केवढे .....आणि आपला "मी" केवढा मोठा... हसू येते.

अनन्यभावे चींतूनी भजती भक्त जे मज

सदा मिसळले त्यांचा मी योगक्षेम चालवी

श्रद्धापूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते

यजिती ते हि मातें चि परी मार्गास सोडूनि

पत्र वा पुष्प जो प्रेमें फळ वा जळ दे मज

ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे

भगवत गीता ही कुण्या एका धर्माची नाही... ते जगण्याचे, जीवनाचे  मार्गदर्शक आहे. केवढे उन्मुक्त विचार आहेत. पहा, काय सांगतात श्रीकृष्ण वरच्या श्लोकात. जे भक्त श्रद्धेने, अनन्यभावाने म्हणजे निष्ठेने माझं स्मरण करतात ते माझ्यात मिसळतात, मला प्राप्त होतात आणि त्यांची  योगक्षेमाची, रोजी-रोटीची व्यवस्था मी पाहतो. पण.... जे कोणी इतर दैवतांची श्रद्धापूर्वक पूजा करतात, ते ही मलाच येऊन प्राप्त होतात, फक्त त्यांचे मार्ग वेगळे असतात.... this is the beauty.. and the guideline for rest of the world.   

भगवान म्हणतात- फुले, पाने, फळे, पाणी जो मला प्रेमाने देतो त्या पवित्र भक्ताने दिलेला हा खाऊ मी सुखाने खातो... how sweet! किती गोड आहे श्रीकृष्ण.. अगदी साध्यासुध्या वस्तू जरी प्रेमाने दिल्यात तर मी त्याचा सुखाने स्वीकार करीन हे परमेश्वराचं अभिवचन आहे.

अशाने तोडूनी सर्व कर्म बंध शुभाशुभ

योग संन्यास साधुनी मिळसी मज मोकळा

अशा प्रकारे हे अर्जुना बरे वाईट सर्व कर्मबंध तोडून कर्म करून पण त्यापासून अलिप्त राहून माझ्यात मोकळेपणी मिसळून जा.

सम मी सर्व भूतांस प्रिया प्रिय नसे मज

परी प्रेम बळे राहे भक्त माझ्यांत त्यात मी

श्रीकृष्ण पुनः एकदा खूप छान सारांश सांगतात. ही जी पंचमहाभूते  आहेत ती सगळी मला समान आहेत. यात एक माझे  आवडते, दुसरे  नावडते  असे  काही नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्ताला मी माझ्यात सामावून घेतो आणि मी स्वतः त्यांच्या ठायी वास करतो.

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज

असे जोडूनी आत्म्यास मिळसी मज मत्पर

जे प्रेमाने माझा ध्यास घेऊन उत्कटतेने माझ्यावर प्रेम करतात ते स्वतःला आत्मशक्तीशी जोडून मला येऊन मिळतात.

या अध्यायाबद्दल लिहून मला एक आंतरिक समाधान लाभले. खरोखर आपण भाग्यवान आहोत. आपण भारत कन्या आणि भारत पुत्र आहोत. इतके  सुंदर अभिवचन आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराने दिले. भगवत गीते सारखे  ज्ञान भांडार आपल्याला वारसा हक्काने मिळाले  आहे. आम्ही ऋणाईत आहोत त्या अगणित पूर्वजांचे ज्यांनी आपले प्राण अर्पून यवनी आक्रमणापासून या सनातन धर्माला जिवंत ठेवले, त्याचे  रक्षण करून हा अमोल ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवला.

THANK YOU.

क्रमश:


अलका देशपांडे





2 comments:

  1. नववा अध्याय विशेष महत्त्वाचा आहे, त्यावरील आपले निरूपण वाचताना खूप आनंद झाला.
    माधव काणे

    ReplyDelete
  2. अलका, कसं आणि किती कौतुक करू तुझं!! सुंदर लेख

    ReplyDelete