वेंधळा गोंधळ माझा संभाळतेस तू

 

(आईकडून नव्याने स्वयंपाक शिकताना तिच्या मुलाची होणारी थोडी गडबड. आणि त्यावेळी घडणाऱ्या गोष्टीचे काव्यमय हितगुज)

*मुलगा...*

नवख्या कणकेचे थारोळें, सावरतेस तू,

नकाशे पोळीचे सावळे, स्वीकारतेस तू,

तहानलेला कुकर, अचूक ओळखलास तू,

करपलेल्या भाताशी, जुळवून घेतलंस तू,

गोंजारावं हळू भाजीला, सांगतेस तू,

                       मार गप्पा मसाल्यांशी, म्हणतेस तू,

                      उजवं-डावं  ताटातलं, शिकवलंस तू,

                           रांगोळी पण महत्वाची, सल्ला देतेस तू..

*आई....*


भाजी असेल हट्टी थोडी, चिडु नकोस तू,

विस्तव हा मनातलाही, कमी कर रे तू,

चित्रात पत्रावळीच्या, भर विविध रंग तू,

गोड, तिखट,आंबटाची; सांगड घाल तू,

ताका पासून पाका पर्यंत काहीही कर तू,

जिभ, डोळे अन नाकानेही; ओळख चव तू,

साधे असो की पक्वान्न, खुलव सगळे प्रेमाने तू,

नेहमी रहा प्रसन्न, करशील संस्कार नेमाने तू...

*मुलगा...*

कांदा तिखट रडवे मला, अन हसतेस तू!

खूणा ठेवी तवा बोटी, थोडी चिंतीत तू,

गरम तेल काढे नक्षी छोटी, होशी व्यथित तू,

बोट चुकून कापे माझे, अन रडतेस तू, अन रडतेस तू...

वेंधळा गोंधळ माझा संभाळतेस तू, संभाळतेस तू...











प्रशांत नांदे 



2 comments: