गोष्टींची गोष्ट


 

रोज रात्री आमचा गोष्टी सांगायचा तास ठरलेला असतो. खरेतर वर्षानुवर्षे चालत आलेल्या इसापनीती, बोधकथा किंवा तत्सम गोष्टी आम्हाला विशेष आवडत नाहीत. छोट्या छोट्या, पण आपल्याश्या वाटणाऱ्या गोष्टींकडे आमचा खास कल! पण त्या दिवशी मात्र दिवसभर कामाने जीव अगदी कंटाळून गेला होता. नवी गोष्ट शोधून सांगण्याइतकी ताकदच नव्हती. तेवढ्यात समोर आली 'दोन मांजरे आणि माकड' ही गोष्ट. चला, लवकर सांगून होईल. त्यात लहानपणापासून माहितीतली. त्यामुळे तीच गोष्ट सांगायचे मी ठरवले आणि वाचायला सुरुवात केली. दोघांनीही शांतपणे गोष्ट ऐकली. पूर्ण झाल्यावर मी उत्साहाने विचारले, "आवडली गोष्ट?" तेव्हा दोघांनी एका सुरात नाही म्हणून सांगितले.


"ते माकड लोण्याचा गोळा खात जातं
य आणि त्यांचं लोणी कमी होतय हे त्या दोन्ही मांजरींना कळले नाही की काय? असं कसं कोणी आपल्याकडचं सगळं दुसऱ्याला देऊन टाकेल. वेड्या आहेत मांजरी." मी ऐकायला लागले. त्यानंतर आमचे चिरंजीव उठून चक्क पेन घेऊन आले आणि म्हणाले, "तू पुढे असं लिही की माकड लबाडी करतंय हे मांजरींना कळलं. त्या मांजरींनी त्या माकडाला बेदम चोप दिला. माकड तिथून पळून गेले आणि मांजरींनी न भांडता तो लोण्याचा गोळा खाल्ला."

 हे सगळं ऐकल्यावर मात्र माझी झोप पुरती उडली आणि खरोखरच नव्याने कथा लिहावी असा उत्साह संचारला. मुले गोष्टी फक्त वाचत किंवा  ऐकत नसतात, तर त्या पलीकडे जाऊन ती त्यांच्या जगण्याशी संबंध जोडून बघतात. नवे काही वाचले असेल तर त्या गोष्टी नीट मनात नोंदवून योग्य वेळी त्याची पडताळणी देखील करून बघतात. तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीचे तर चक्क आम्ही प्रात्यक्षिक करून बघितले होते. त्या माठात नेमके पाणी किती असेल? किती जड दगड आत टाकल्यावर पाणी लवकर वर येईल अशी छान चर्चा किंवा प्रयोगच म्हणा हवा तर, पार पडला होता.

शाळेत असताना अनंत काणेकरांचादोन मेणबत्त्याहा लघुनिबंध अभ्यासाला होता. एकदा मुलांना हीच दोन मेणबत्त्यांची गोष्ट सांगितली. ऐकणारी मुले साधारण आठवी-नववीतली. बऱ्याच जणांनी आपापली मते अगदी मोकळेपणाने मांडली. एक मुलगा उठला आणि त्याने विचारले, "मला कायम एक प्रश्न पडतो, मी विचारू का?" मी होकार दिल्यावर तो बोलू लागला, "माणूस इतका स्वार्थी का आहे?"

"म्हणजे?"

"म्हणजे जिचा त्याला उपयोग झाला ती चांगली आणि जी मुंग्यांनी कुरतडली ती वाईट, असं का? मुंग्यांनी पण तिचा उपयोग करून घेतला ना? म्हणजे मुंग्यांनी गोष्ट लिहिली असती तर जळणारी वाईट असे म्हणायला पाहिजे ना?"

त्याला तोडत दुसरा एक मुलगा उठला आणि बोलायला लागला, "पण मेणबत्तीचं कामच जळणं आणि उजेड देणं, ते काम ती चोख करतेय म्हणून ती चांली."

आता पहिला मुलगा जास्तच भडकला, "पण ही कामं ठरवणारा माणूसच ना! म्हणून तो स्वार्थी आहे. जे त्याच्या भल्याचं ते योग्य आणि त्याच्या आड़ जो येईल तो वाईट, असंच असतं सगळ्या गोष्टीत. मला हेच पटत नाही. झाडं लावणार, वाढवणार ते त्याच्या सोयीने. माणसापेक्षा वरचढ कोणी नाही असं वाटत त्याला. पण त्याची स्थिती खरं तर सूर्यास्तापर्य्ंत धावत रहाणाऱ्या आणि अखेरीस हातात काहीच न येता मरणाऱ्या माणसासारखीच झाली आहे!" बहुतांश मुलांना ही कथा माहीत नसल्याने आता मी दुसरी कथा सांगू लागले. पण मनात मात्र त्या मुलाचा, त्याच्या मतांचा विचार करत!

 

खरंच, गोष्ट लिहिणाऱ्याची भूमिका एक, वाचणाऱ्याची किंवा ऐकणाऱ्याची भूमिका वेगळी! प्रत्यक्ष शिकताना आणि शिकवतानाही असेच होत असते. एका उद्देशाने शिकवायचे ठरवतो पण शिकणारा त्याला भावेल, त्याला पटेल ते आणि तेवढेच घेतो किंवा चक्क नाकारतो. नाही का?

 मुलांसाठी लिहिताना किंवा वाचताना एक गोष्ट कायम शिकले ते म्हणजे मुलांना कल्पनारम्य कथाही खूप आवडतात, पण त्यांच्या जगण्याशी जोडलेल्या गोष्टी त्यांना खुलवतात. गोष्ट आणि तात्पर्य ह्यांची सांगड तर अनेकदा जमतच नाही. कारण प्रत्येकाचे तात्पर्य हे ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार आणि स्वभावानुसार बदलते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीनंतर प्रश्नोत्तरांऐवजी विचार करायला मिळणारा वेळ जास्त प्रभावी ठरतो.

 अशीच एकदा एका मी काही मुलांना राजीव तांबे यांचीगुलाबी सईची गोष्ट सांगत होते. माझे त्या कथेवर विशेष प्रेम. मला वाचता यायला लागल्यावर संग्रहातल्या पुस्तकांमधले ते एक. त्याच प्रेमाने मी गोष्ट सांगायला सुरुवात केली. मुले उत्सुकतेने ऐकत होती. फक्त एक मुलगी थोडीशी अस्वस्थ दिसत होती. त्या मुलीच्या मनात काहीतरी खदखदतेय हे हळूहळू तिच्या चेहऱ्यावरूनही स्पष्ट दिसू लागले.

 जशी गोष्ट संपली तसा तिने हात वर करून लगेच प्रश्न केला की सईला एवढे कसे माहीत नाही की झाडं  आपल्यासारखी जेवत नाहीत. झाडांना चहा, बिस्कीट, पोळी देणारी सई मला पटलीच नाही. तिच्या ह्या बोलण्यानंतर इतर मुलांनीही गोष्ट फारशी पटली नसल्याचे सान्गितले. पण माझा तर जीव ह्या गोष्टीवर! आतापर्यंत किती पारायणे झाली असतील ते सांगताही येणार नाही.

 सगळे ऐकल्यावर मी बोलले, "एक सांगू का? खरं आहे तुमचं  म्हणणं. कोणताच मुलगा किंवा मुलगी एवढी वेडी नसतेच की. पण आपण म्हणजे अगदी कोणत्याही वयातला माणूस, जेव्हा एखाद्यावर खूप खूप प्रेम करायला लागतो ना, तेव्हा तो स्वत:च्या मर्जीप्रमाणे त्याची काळजी घ्यायला लागतो किंवा प्रेम व्यक्त करू लागतो. फारच कमी लोक असतात जे हा भावनांचा समतोल राखू शकतात. आता बघा हं, तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत कुठेतरी फिरायला जायचं असतं. आणि आई किंवा बाबा चक्क नकार देतात. तुम्हाला ते मत लादतात, असंच वाटतं. आईबाबांना काळजी वाटत असते. खूप प्रेम करणाऱ्या आपल्या मुलामुलीला कसला त्रास व्हायला नको म्हणून ते जपतात. जपण्याची पद्धत ज्याची त्याची वेगळी! तसंच झालं असावं सईचं. मला आता उगीचच मुलांच्या चेहऱ्यावर माझं म्हणणं पटल्याचे भाव दिसायला लागले. म्हणून मी पुन्हा सांगायला लागले, "तुमचं कसं तुमच्या मोबाइलवर आणि अर्थात तुमच्या स्वत:वरही भरपूर प्रेम आहे. पण आपल्याला त्रास होईल हे माहीत असूनही हातातला मोबाइल  तुम्ही सोडू शकत नाही. आता तर अभ्यासासाठी हातात मोबाइल  हे सुद्धा झाडाला दूध देण्यासारखंच झाल की!"

 कितीही नाही म्हटलं  तरी मुलांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न, विचारमग्न भाव मला खूष करत होते. मुलांना काही शिकवायचे नाही, त्यांचे त्यांनी शिकायला हवे असे जरी वाटत असले तरी हळूच शिकवायला मिळाल्याने माझेही समाधान झाले होते!

 

अनुजा सामंत



6 comments:

  1. खूपच छान !! सर्वांनी आताच्या नवीन पिढीच्या मुलांच्या दृष्टीने गोष्टी सांगताना वेगळा व नीट विचार करायला पाहिजे.

    ReplyDelete
  2. खूप छान लेख. सगळ्याच गोष्टींचे संदर्भ काळानुसार , व्यक्तीनुसार, अनुभवाप्रमाणे आणि हो वयाप्रमाणे पण बदलत असतात हे नक्की.

    ReplyDelete
  3. मस्त कल्पना! एकदम वेगळा विचार!!

    ReplyDelete
  4. गोष्टीची गोष्ट छान लिहिलं आहे

    ReplyDelete