हमरस्ता नाकारताना- पुस्तक परीक्षण



हमरस्ता नाकारताना- लेखिका- सरिता आव्हाड
राजहंस प्रकाशन, आवृत्ती ऑगस्ट-२०१९

हे पुस्तक नुकतंच हातात पडलं. मलपृष्ठ वाचताना कुतूहल वाटलं, ' भूतकाळाशी दोस्ती करणे' त्यानंतर 'करू नये ते केलं' अशी वाक्ये  वाचून ठरवलं की वाचूया हे पुस्तक. तसं हे पुस्तक नवीनच आहे. जो काळ या पुस्तकात आला आहे, त्या काळातच आपणही जगतोय आणि जगलोय. लेखिकेच्या सहवासात आलेल्या बऱ्याचशा व्यक्ती आपल्याला ही ठाऊक आहेत. म्हणून वाचलंच पुस्तक.

या पुस्तकात लेखिकेने तीन पिढ्यांचा आढावा घेतला आहे. पहिली म्हणजे तिची आजी. त्या काळातही ती शिकलेली होती. शिक्षणाकडे तिचा ओढा होता. ती वर्तमानपत्र वाचत असे. लग्न होऊन ती वर्ध्याला गेली. पुढे आजोबांची होशंगाबादला बदली झाली. आजोबा टिळक भक्त होते. आजी आजोबांची तिसरी बायको होती. आजोबांच्या निवृत्तीनंतर तिने पुण्याला स्थायिक होण्याचा हट्ट धरला आणि स्वतःचं म्हणणं खरं केलं. स्वतः देखरेख करून 'परांडे वाडा' बांधून घेतला. थोडक्यात काय तर आजी हुशार व कर्तृत्ववान बाई होती.

दुसरी पिढी म्हणजे लेखिकेची आई. वडिलांच्या निवृत्तीच्या काळात झालेली 'मुलगी' म्हणून आजीला ती आवडत नव्हती. तिने तिच्याकडे दुर्लक्षच केले. प्रेमाने कधीच सांभाळ केला नाही. ही लेखिकेची आई म्हणजे प्रसिध्द लेखिका सुमती देवस्थळी. त्या अतिशय हुशार असूनही त्यांना आजीने शिक्षण पूर्ण करू दिले नाही. एका बेतासबात अशा खाऊनपिऊन सुखी असणाऱ्या नोकरदार अशा एका तरुणाशी तिचे लग्न लावून दिले. त्या तरूणाला कसलीही महत्त्वाकांक्षा नव्हती, धडाडी नव्हती. त्या उलट सुमतीबाई अतिशय हुशार, मेहनती, कलासक्त मनाच्या होत्या. त्यांनी स्वतः चा विकास केलाच आणि स्वतःचा  संसार स्वाभिमानाने उभा केला. नवऱ्याची साथ त्यांना कधीच मिळाली नाही. तसंच त्यांच्याकडून कधी कौतुक, प्रोत्साहनही मिळाले नाही.

तिसरी पिढी म्हणजे लेखिका सरिता आव्हाड. सुमतीबाईंनी लेखिकेला संस्कारित केले, उत्तम शिक्षणाची संधी दिली. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास जसा त्यांनी केला तसाच आपल्या लेकीचाही व्हावा असे त्यांना वाटत होते. त्या दृष्टीने तिला प्रोत्साहन दिले. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव घ्यावे असे ही सुचवले आणि लेखिकेने ते केलेही. त्यांनी समाजातील वेगवेगळ्या स्तरांशी संबंधित काम केले. त्यांना वाचनाची आवड होती. त्यांना मित्रमैत्रिणी ही होत्या. सेवादलात, युवकक्रांती दलात सविता बाई जात. त्यामुळे त्यांची विचारधारा चाकोरीबद्ध नव्हती, नवीन विचारांची होती. स्त्रीपुरुष समानतेची अपेक्षा करणारी होती. बौद्धिक चर्चा, वादविवाद आवडत असे. त्यांनी आतापर्यंत घरी वडिलांना पुरुषी वर्चस्व गाजवताना पाहिले नव्हते. ते खूपच शांत होते. त्यांना एक प्रकारचा न्यूनगंड होता.

लेखिकेच्या मित्रमंडळीनी यथावकाश आपापले जोडीदार निवडले. ते एकमेकांना अनुरूप होते. त्यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालत. सरिताबाईंनी TISS सारख्या उत्तम संस्थेतून शिक्षण घेतले. पण फारशा उत्तम नोकऱ्या त्यांनी केल्या नाहीत किंवा त्या टिकल्या नाहीत. तसं पाहिलं तर त्यांना खूप मित्रमैत्रिणी होत्या, पण ठराविक वयात लग्न, संसार, अशी ठराविक स्वप्न त्यांनी पहिलीच नव्हती, काहीतरी वेगळे करायची उर्मी होती. तशातच लग्न वगैरे असा विचार नसताना, रमेश आव्हाड नावाचा बहुजन समाजातील मित्र मिळाला. या मुलाच्या हुशारीने म्हणा, आक्रमक विचार किंवा कृतीने म्हणा, सरिताबाई फार प्रभावित झाल्या.

आय आय टी मध्ये शिकणारा हा बहुजन समाजातील तरुण बऱ्याच आघाड्यांवर कार्यरत होता. अनेक चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेत होता. त्याच्या बुद्धिमत्तेने सरिताबाई खूपच प्रभावित झाल्या. त्यामुळे त्याचे गुणच त्यांना दिसले व दुर्गुणांकडे त्यांचे लक्षच गेले नाही की ते त्यांनी नजरेआड केले? आईने वारंवार सावध करूनही ते लक्षात न घेता, त्याच्याबरोबर आयुष्य काढायचे नक्की केले. यातूनच आईशी त्यांचे संबंध दुरावले. आईवर त्यांनी दोषारोपही केले. वडिलांबद्दलचे नातेही तितकेसे जवळीकीचे राहिले नाही. त्यांनी नवीन मार्गावरून वाटचाल सुरू केली. 'पुरुषप्रधानतेच्या भावापासून ते पुरुषप्रधानतेच्या प्रभावापर्यंत' असा सरिताबाईंचा प्रवास सुरु झाला.

या नवीन वाटेवर त्यांना बरेच भले-बुरे अनुभव आले. राजरस्त्याने (हमरस्ता) न जाता पायवाटेवरून चालणे हे कधी सुखकर, ध्येयाकडे लवकर जाणारे, वाटेवर सौंदर्य दाखवणारे असू शकते. तर कधी हीच पायवाट काट्याकुट्यांची, खाचखळग्यांची, दुर्गम असू शकते हे ही वास्तव आहे.

पुस्तक वाचून संपवताना मनात विचार आला की, लेखिकेच्या आजीने किंवा आईने स्वतःचे कर्तृत्व दाखवूनच संसार केला. आजीने त्या काळात स्वतःचा हट्ट पूर्ण केला. आईने तर समाजातही मानाचे स्थान मिळवले. हे त्या काळात चाकोरीबद्ध नव्हतेच. पण लेखिका ज्या काळात वावरली तिथे स्वकर्तृत्व शक्य होतं. एकीकडे स्त्रीपुरुष समानतेच्या गप्पा मारणारी, पुरोगामी विचारांची लेखिका पुरुषी वर्चस्वाचा हव्यास का धरते? बहुजन समाजातील जोडीदार निवडून पुरुषी वर्चस्व व पुरुषी अहंकार याचा सुखावह अनुभव तिला घेता आला का? की हा अविचारच ठरला? तिने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला का? असे अनेक प्रश्न मनात येतात. लेखिकेने नाकारलेला 'हमरस्ता' व स्वीकारलेली नवी वेगळी 'वाट' यातून त्यांना काय मिळाले हे त्यांच्या आत्मचरित्रात नक्की वाचून पहा.

वृंदा जोशी



2 comments:

  1. वृंदा, पुस्तक वाचलेलं होतं, तू केलेली समीक्षा एकदम चपखल

    ReplyDelete
  2. नीना वैशंपायनAugust 1, 2020 at 2:29 PM

    उत्तम परीक्षण. पुस्तक वाचायची उत्सुकता वाढली.

    ReplyDelete