हरवत चाललेले ......गंध



खूप वर्षांनी शिकेकाई आणली. पुडी उघडताच चिरपरिचित सुगंध दरवळला आणि मन नकळत बालपणात गेले.
रविवारचा दिवस सुरू व्हायचा तोच मुळी शिकेकाईच्या सुगंधाने. आईची पहाटेची कामे उरकलेली असायची. बंबाला जाळ घालून, तिने शिकेकाई उकळायला ठेवलेली असायची. बंबातील धुराचा आणि शिकेकाईचा वास एकदमच नाकात जायचा. न्हाण्यापासून सुगंधित सुरुवात व्हायची ती आठवडाभर पुरायची. कितीतरी कथा कादंब-यांमध्ये ह्याचे सुरस वर्णन असायचे
हळूहळू शिकेकाईची जागा साबणाने घेतली. सोपे आणि सुटसुटीत. उकळायची, गाळायची भानगड नाही. नियोजनाची जरुरी नाही. जाहिरातींचा मारा सुरू झाला. विविध शाम्पूनी आपल्या साध्याभोळ्या शिकेकाईला हद्दपारच केले. शाम्पूचा गंध चांगला असतो पण चिरकाल टिकणारा नाही. आज पन्नास वर्षांनी मी शिकेकाईच्या वासाने बालपणात गेले, पण शाम्पू काल कुठला वापरला होता हे लक्षात रहात नाही. काळाच्या ओघात असे कितीतरी गंध हरवत चालले आहेत
माझे पणजोळ सांगली जिल्ह्यातील एका खेडेगावात. मी शहरात राहिलेली आणि वाढलेली. अगदी क्वचितच तिकडे गेले. पण शेणाने सारविलेल्या जमिनीचा वास अजून आठवतो. अंगण आणि घर दररोज शेणाने सारविले जायचे. तेव्हा तो वास परिचयाचा नसल्याने फारसा आवडायचा नाही. आता लुप्त झाल्याने फारच आठवतो. त्या घरी चूल होती. चूल ही सारवली जायची. आजी फार प्रेमाने चुलीला सारवण करायची. तिच्याशी गुजगोष्टी करायची. म्हणायची की चूल खुश तर घरदार खुश! चूल एकदा पेटली की गंधच गंध दरवळायला लागायचे. चुलीवरचा खरपूस स्वयंपाक! मऊभात, भाकरी, भाजलेले कणीस, वांग, अहाहा! कधी लाकडे ओली असली तर एक विशिष्ट वास स्वयंपाकाला लागायचा. तो मात्र नको वाटायचा. चुली गेल्या आणि त्या बरोबर तो गंध ही! "आमच्याकडे चुलीवरचे जेवण मिळेल!" हा आता व्यवसायिक फंडा झाला आहे आणि आपल्यासारखे भरमसाठ पैसे देऊन तो गंध पुन्हा शोधत आहेत. बडे बडे शेफ कौतुकाने पदार्थाला स्मोकिंग इफेक्ट देतात, व्हॅल्यू ऍडिशन म्हणे!
घाईगर्दीच्या जमान्यात अनेक पदार्थ बाहेरून आणले जातात. त्यामुळे स्वयंपाक घरातील बरेचसे गंध हरवत चालले आहेत. बेसनाचे लाडू भाजायला घेतले की  घरभर वास पसरायचा. त्यात वेलचीच्या वासाची भर पडायची.
असाच एक गंध उद धुपचा! वातावरण शुद्ध करणारा! मन प्रसन्न करणारा. बाळ बाळंतिणीला ह्याची धुरी देत असत, किंबहुना दुरुन सुद्धा घरांत लहान बाळ असल्याचे कळत असे. उदधुपाची शुद्धता गेली आणि त्या बरोबर तो चिरपरिचित, उल्हासित करणारा गंधही! किंबहुना सध्या मिळणाऱ्या उदधुपामुळे ऍलर्जी, श्वासाचा त्रास होतो. कितीही हा गंध आवडत असला तरी टाळला जातो. अष्टगंध, उदबत्ती, चंदन ह्या सगळ्यांचेच मूळ गंध हरविले आहेत. आजोबा रोज देवाला अष्टगंध वाहायचे आणि कधीतरी चिमूटभर आमच्या वहीत ठेवायला द्यायचे. त्याचा गंध अक्षरशः वर्गभर दरवळायचा
सेंट आणि डिओच्या जमान्यात अत्तर कुपितच बंद झाले आहे. स्वागत समारंभ आणि हळदीकुंकवाच्या समारंभात ऐटीत मिळविणारे अत्तर आणि त्याचा मंद सुवास हरवलाच आहे
जसजशी निसर्गाशी फारकत होत गेली तसतशी नैसर्गिक गंध ही नाहीसे किंवा कमी-कमी होत गेले. हल्ली घमघमाट हा शब्दच उच्चारला जात नाही. वसंतांचे आगमन, कोकिळेचे कूजन आणि मोहोराचा घमघमाट हे गणित होते. आंबा जणू त्याच्या आगमनाची वर्दीच द्यायचा. आंबा मग तो कुठलाही असो....त्याला स्वतःचा गंध असायचा. हापूस आंब्याचा गंध तर काय वर्णावा? एखादा आंबा जरी घरांत असेल तर घमघमाट असायचा. व्यापारीकरण झाले आणि झटपट पैसे मिळवायची ओढ लागली
फळांना नैसर्गिकरित्या पिकू द्यायचेच नाही असा ठराव झाला जणू! पीक भरपूर यावे म्हणून रासायनिक खतांचा भडिमार करायचा, मग तोडणी लवकर करायची आणि रासायनिक पावडर घालून पिकवायचे. रंग येतो हो.... पण गंधाचे काय? पाच सहा डझन आंबे जरी घरी असले तरी वासाचा पत्ताच नाही. हौसेने नाकाजवळ घेऊन हुंगायला जावे तर निराशाच पदरी येते.
वृक्षतोड, फ्लॅट संस्कृती, शहरीकरण ह्यामुळे असे अनेक गंध हरवत चालले आहेत. सिझन प्रमाणे विशिष्ट गंध दरवळत असायचा. फळा फुलांचे नैसर्गिक गंध वातावरण भारून टाकायचे
असाच एक हरवलेला गंध....जो हरविला तेच बरे झाले...तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये येणारा टिपिकल फिनेलचा गंध! ह्या विशिष्ठ वासानेच नको ते हॉस्पिटल असे वाटायचे. फिनेलची जागा लायझोल सारख्या फ्लोअर क्लीनरने घेतली आणि हॉस्पिटल सुगंधित झाले. रुग्णाईताला घरीच असल्यासारखे वाटू लागले. परवा फरशी पुसली तर चक्क चंदनाचा वास आला. चंदनाच्या वासाचे फ्लोअर क्लीनर! क्षणभर का  होईना मन प्रसन्न झाले.
काळाबरोबर सगळेच बदलत आहे. मनात कुठेतरी भीती वाटतं आहे. ह्या भयंकर संकटामुळे शाळा ऑनलाइन झाल्याच आहेत. अजूनतरी वह्या पुस्तके आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये गुंतल्यामुळे वाचनाची आवड कमीच झालेली आहे. डिजिटल जमान्यात ऑनलाईन शाळा आणि इ बुक्स यायची आणि आजची ही बालगोपाल मंडळी नव्या कोऱ्या पुस्तकाच्या गंधाला मुकायची!
  स्मिता बर्वे



5 comments:

  1. हा लेख वाचताना सगळे गंध परत अनुभवता आले. आपल्या नंतरची पिढी ह्या गंधाला मुकली याचं कुठेतरी वाईट वाटतं. ओल्या मातीचा सुगंध, त्यावर पडलेला पारिजातकाचा सडा, जाई जुई चमेली अशा कितीतरी फुलांचा नैसर्गिक वास जो आताच्या परफ्यूम मध्ये मिळणार नाही अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपण खूप अनुभवल्या आहेत पण आता कुठेतरी त्यांची उणीव जाणवते आहे.

    ReplyDelete
  2. एक खुशबूदार लेख!

    ReplyDelete
  3. नीना वैशंपायनSeptember 4, 2020 at 12:11 PM

    कितीतरी हरवलेल्या गंधांच्या आठवणींना उजाळा मिळाला. सुरेख लेख

    ReplyDelete
  4. खूप छान लेख.सगळे गंध मनाने अनुभवले.खासकरून मातीच्या चुलीवरच्या स्वयंपाकाचा
    गंध‌.

    ReplyDelete