हेमंत गोविंद जोगळेकर - कवी


हेमंत गोविंद जोगळेकर

एक अव्वल दर्जाचे कवी आणि तितकेच किंवा अधिक अव्वल दर्जाचे वाचकही. एकोणीसशे सत्तरच्या दशकात लिहिते झालेले व सातत्याने संयत आणि अस्सल भावकविता लिहिणारे कवी.

खूप पूर्वी डोंबिवलीतील आयरे रोडवरच्या एका रद्दीच्या दुकानात नारायण धारपांची आउट ऑफ प्रिंट पुस्तकं शोधताना "कविता दशकाची" हे पुस्तक दिसलं. "कविता दशकाची" हे सत्तरीच्या दशकातील उल्लेखनीय परंतु त्यावेळेस अप्रकाशित (अप्रसिद्ध नव्हे) कवींच्या कवितांचे संकलन आहे. या पुस्तकाला अत्यंत समर्थ असं संपादक मंडळ लाभलं होतं - मंगेश पाडगावकर, विजया राजाध्यक्ष, शिरीष पै, रमेश तेंडुलकर व दया पवार.

आणि निवडलेले कवी होते - द भा धामणस्कर, र कृ जोशी, गुरुनाथ सामंत, रजनी परुळेकर, हेमंत जोगळेकर, उत्तम कोळगावकर, नारायण कुळकर्णी कवठेकर, वसंत पाटणकर, अशोक बागवे, अनिल द्रविड.

हेमंत गोविंद जोगळेकर हे नाव तेव्हाही परिचित होतं पण ते वेगळ्या संदर्भात. त्यांच्या "माझा पण बेहद्द (नाममात्र) घोडा" या पुस्तकातली काही विडंबनं मी चुकून वाचली होती आणि मला ती बेहद्द आवडली होती. "कविता दशकाची"ने मला वेगळे जोगळेकर दाखवले. याही जोगळेकरांच्या मी प्रेमात पडलो. 'होड्या' मधे किशोरवयीन निरागसता जितक्या अलवारपणे जोगळेकर रेखाटतात तितक्याच नाजूक पण स्पष्टपणे 'का हसतेस' मधली पत्नी.

पण जोगळेकरांची विडंबनं मात्र प्रकाशित झाल्यापासून थोड्याच काळात आऊट ऑफ प्रिंट झाली होती, ती मात्र कुठेही मिळाली नाहीत. संयत, सभ्य व सूक्ष्म विनोदबुद्धी पोटभर अनुभवायची असेल तर ही विडंबनं वाचलीच पाहिजेत. आणि ही अशी विनोदबुद्धी जोगळेकरांच्या स्वभावातच असल्याने त्यांत अत्यंत सहजताही आहे. बहुतेक विडंबनं ही काही कवींची किंवा काही विशिष्ट काव्यविशेषांची चेष्टा करण्यासाठी केलेली नाहीत. ती मक्तेदारी अत्र्यांच्या "झेंडूची फुले" कडेच. जोगळेकरांच्या विडंबनात मूळ उत्तम कवितेतील आशयाचे पदर काहीसे अतिशयोक्त करून किंवा घाटाचं स्वरूप सांभाळून दुसऱ्या टोकाचा आशय गाठून साधलेला निर्मळ विनोद आहे. असलीच तर अशा उत्तम कवितांवरून "प्रेरणा" घेऊन दुय्यम - तिय्यम दर्जाची कविता पाडणाऱ्या नकलाकारांना दिलेली टपली! हे मूळ आशयाचे पदर अतिशयोक्त वा विकृत करताना मूळ आशयाचे योग्य पदर समजून घेणं आवश्यक. आणि इथे जोगळेकरांमधला जाणता व मर्मग्राही वाचक दिसून येतो. जोगळेकर कवितेवर मनापासून प्रेम करतात. त्यामुळेच इतक्या सहज कवितेच्या अंतरंगात शिरतात आणि बालसुलभ वृत्तीने तिच्याशी खेळूही शकतात.

वानगीदाखल त्यांचं हे एक विडंबन देतोय -

आपले दोघांचे काही तरी बिनसले होते
तशात तू मोगऱ्याच्या कळ्या आणल्या आणि माझ्यापुढे ठेवल्या
मी रागाच्या भरात त्या भिरकावल्या केराच्या कोपऱ्यात
तू हिरमुसून निघून गेलीस
आता संध्याकाळ झाली आहे आणि केराच्या
कोपऱ्यात त्या कळ्या उमलल्या आहेत!
~ शंकर वैद्य

किरकोळ भांडणानंतर निवळलेलं मन त्या दिवसअखेर उमललेल्या कळ्या किती सुंदर सुचवून देतात. त्याचंच हे विडंबन - 

आपल्या दोघांचे काहीतरी बिनसले होते
तशात तू फणसाचे गरे आणून माझ्यापुढे ठेवलेस
मी रागाच्या भरात ते भिरकावले खिडकीच्या बाहेर
तू रागावून निघून गेलीस.
आता संध्याकाळ झाली आहे आणि खिडकी बाहेर
फणसाच्या झाडाला फणस लटकले आहेत!

~ हेमंत गोविंद जोगळेकर

किती पातळ्यांवर हा विनोद साधलाय. एकतर नाजूक कळ्यांच्या जागी बटबटीत गरे आणलेत. कळ्यांची फुलं व्हायला दिवस पुरतो पण गऱ्यांचं झाड होऊन फणस यायला कित्येक वर्षं जायची. इतक्या उशीरा झालेली ही उपरती. त्या उपरतीचं स्वरूपही असं बाहेरून काटेरी खडबडीत भासणारंच असेल. पण हे सगळं लक्षात नाही घेतलं तरी विडंबन वाचता वाचताच हसू फुटतं.

मर्ढेकरांच्या "असें कांही तरी व्हावें" या कवितेत संवेदनशील कलावंताचं वर्णन आहे. उत्कट अनुभवाची आस धरावी आणि खरंच तो अनुभव येतां त्या उत्कटतेपुढे भाषाच थिजावी अशी अवस्था. त्या कवितेचं विडंबन तो सारा अनुभव हंगामी आंबे विकणाऱ्याच्या पातळीवर आणून जोगळेकर कुठलंही साहित्यिक भाष्य न करता निव्वळ विडंबन साधतात.

कवी हेमंत गोविंद जोगळेकर अधूनमधून भेटत असतात आणि अर्थात त्यांच्याबरोबरच विडंबनकार हेमंत गोविंद जोगळेकरही. जोगळेकरांचा विडंबनकार हा कवीच्या आगेमागेच असतो. दुसऱ्या कवीचे संस्कार (संस्कार ही जरा खोलातली गोष्ट झाली म्हणा! कधी कधी फक्त हाताला लागतील ते शब्दच) उचलून स्वतःच्या नकळत किंवा स्वतःला फसवून, हट्टाने कविता पाडून "मी ही कवीच!" मिरवणाऱ्या कवींपेक्षा हे फार वेगळं आहे!

दुसऱ्या कवीचे संस्कार, काव्य-व्यक्तिमत्त्व नीट ओळखून त्याची उघड पावती देणारा हा कवी/विडंबनकार आहे. त्यामुळेच रमेश तेंडुलकर म्हणतात की "त्यांच्या भावपर कवितेवर त्याचा (विडंबनाचा) विपरीत परिणाम न होता अनुभवांकडे पाहण्याची निकोप व निर्मळ दृष्टी जतन करण्यासाठी ही विडंबनाची वृत्ती एका प्रकारे त्यांना उपकारकच ठरली आहे असे म्हणता येईल".

जोगळेकरांच्या विडंबनात अजून एक स्पष्ट न दिसणारी पण मला जाणवणारी गोष्ट असते. मूळ कवितेसदृश शब्द वापरून थिल्लर वा सामान्य आशय उभा करतानाच जोगळेकर वाचकाला मूळ कवितेच्या खोलीची वा उत्कटतेची जाणीव करून देत असतात. तसंच एखाद्या प्रसिद्ध कवितेच्या घाटाइतकाच आशयाचाही आधार घेऊन जोगळेकर अधिक गंभीर भाष्य करतात. आणीबाणीनंतर भरलेल्या साहित्य संमेलनाचं वर्णन करताना जोगळेकर पाडगावकरांच्या "सलाम" चा आधार घेतात. हे विडंबन "सलाम"चं असलं आणि मिस्किल दिसलं तरी त्याचा रोख संमेलनातील घटनांवर आहे. पण हे सगळं सांगून झाल्यावर शेवटी जोगळेकर;

अनेक हात उगवले असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ करना भाईयों
हात तर दोनच आहेत
आणि उजवा हात पापड खाण्यात गुंतला आहे
म्हणून फक्त डाव्या हाताने सलाम,
सलाम मेरे अझीझ दोस्तों, सबको सलाम.

असं कवितेला विडंबनाच्या पातळीवर आणून संपवतात.

पुढच्या-पुढच्या महाराष्ट्रगीतात,” “पितात सारे गोड इंग्रजी - पुरेसे परपुष्ट व्हावे म्हणूनअसं मर्ढेकरांच्या शब्दांबरोबरच विचारांचंही विडंबन येतं तेव्हा वाचक अंतर्मुख होत जातो. कवी जोगळेकर समजून घेतले तर विडंबनकार जोगळेकर नीट समजून घ्यायला मदत होते. जोगळेकरांच्या कवितेतली उत्स्फूर्तता, निरागस संदिग्धता, भावपरता जसजशी आपल्याला भिडत जाते तसतशी या विडंबनामागची संवेदनशील वृत्तीही उलगडत जाते.


कौस्तुभ आजगांवकर



2 comments:

  1. वा! खूप अभ्यासपूर्ण लेख! हेमंत जोगळेकर यांचे विडंबन मी खूप वर्षांपूर्वी वाचले होते, ते आठवले.

    ReplyDelete
  2. मला हा लेख बेहद्द आवडला.

    ReplyDelete