इकिगाई Ikigai


बऱ्याच वेळा माणसाला निवृत्त झाल्यावर काय करावे असा प्रश्न पडतो. काहीजण म्हणतात, आता बरीच वर्षे नोकरी, कामधंदा केला, आता जरा आराम करायचा ठरवलं आहे. .तर काहींना चैन पडत नाही नुसतं घरी बसून. मग काहीतरी उद्योग शोधून काढतात, TV बघत वेळ घालवतात,पत्ते, रमी खेळतात, भिशी join करतात….असे बरेच निरनिराळे विचार प्रवाह आपण ऐकतो. जपानी माणसाला मात्र निवृत्ती/रिटायरमेंट हा शब्दच माहिती नसतो. जपानी कल्चरमधे रिटायरमेंट ही संकल्पनाच नाही. या विषयी बरंच ऐकलं होतं आणि मध्यंतरी याच विषयासंबंधात" Ikigai "नावच पुस्तक वाचनात आलं. Hector Garcia Francese Mirallesया दोघांनी हे पुस्तक लिहिले आहे.

इकिगाई ही एक जपानी concept आहे, ज्याचा अर्थ आहे "a reason for being" जगण्याचे कारण. तुम्ही सकाळी उठल्यावर कोणत्या कारणाने/विचाराने जागे होता, काहीतरी करण्याचे मनात घेऊन जागे होता, तेंव्हा ते तुमच्या हातून पुढे घडते. तुमची इकिगाई सापडवण्याचे मिशन हे प्रत्येक ओकिनावा(जपान मधील एक बेट) मधील जपानी माणसाचं जगण्याचं इंधन असते. एकदा का ती तुम्हाला मिळाली की धैर्याने, प्रयत्न पुर्वक तुम्हाला योग्य मार्गावर राहता येते. अर्थात हे जगण्याचे तत्व प्राचीन आहे.ते हाईयन( Heian  ) काळातील आहे. अशी ही Ikigai आहे तरी काय हे बघू.

हे एका Venn diagram ने सांगता येईल. ४ निरनिराळी वर्तुळे एकमेकांना छेदतात. ह्या चारही वर्तुळांचा सहभाग असलेली जागा म्हणजे तुमची इकिगाई. ही चार वर्तुळे म्हणजे



1.   जी गोष्ट मनापासून करायला तुम्हाला आवडते (what you love) passion
2.   ज्या गोष्टीत तुम्हाला गती आहे (what are you good at) profession
3.   ज्याची जगाला आवश्यकता/उपयोग आहे (what the world needs ) mission
4.   ज्या पासून तुम्हाला अर्थार्जन होऊ शकते (what you can be paid for) vocation
Venn Diagram

iki म्हणजे life किंवा जगणे. gai म्हणजे value किंवा कारण. काहीही करा पण निवृत्त होऊ नका, हे या मागचे मुख्य तत्व.


या चार गोष्टी ज्यात common असतील ती तुमची इकिगाई. ओकिनावा मधील प्रत्येक जपानी माणसाला त्याची इकिगाई माहिती असते, त्याने ती चिंतन, मनन करून शोधून काढलेली असते. त्यानुसार तो आयुष्यभर जगत असतो अर्थात काही नियम पाळून.

तुमची स्वतः ची इकिगाई शोधून काढण्यासाठी, मला कोणत्या चार गोष्टी करायला आवडतात ते तुम्ही लिहून काढा. मग कोणत्या चार गोष्टीत मला गती आहे किंवा करता येतात, किंवा माझ्याकडे कोणती स्किल्स आहेत हे लिहून काढा. मग जगाला कोणत्या गोष्टीची जरुरी आहे व या पैकी कोणत्या गोष्टींना जग पैसे देण्यास तयार आहे, हे लिहून काढले की या चारीमध्ये जे काही समान असेल ती तुमची इकिगाई. एकदा का ती तुम्हाला गवसली की तुमचा मार्ग सुकर होतो.

Dan Buettner नावाचे नॅशनल जॉग्रफिकचे फेलो व न्यूयॉर्क टाइम्सचे लोकप्रिय लेखक, Educator, Explorer आहेत. त्या लेखकाने जगातील असे पाच भाग शोधून काढले की तेथील लोकं दीर्घायुषी पण आनंदी जीवन जगतात. वयाची शंभरी गाठणे याचे कोणालाच आश्चर्य वाटत नाही. ते पाच भाग खालील प्रमाणे आहेत.
1.   Okinawa - जपान
2.   Sardinia - इटली
3.   Nicoya - कोस्टा रीका
4.   Icaria - ग्रीस
5.   Loma Linda -कॅलिफोर्नीया


या पाच भागांवर त्यांनी ‘Blue Zones' असे एक पुस्तक लिहिले आहे. दीर्घायुष्यावर अभ्यास करून त्यांनी काही आश्चर्यकारक गोष्टी शोधून काढल्या. 2012 मध्ये त्यांनी जगभर प्रवास केला. जगातील काही भागातील लोकं इतर जगभरातील लोकांपेक्षा दीर्घायुषी का असतात या भेडसावणाऱ्या प्रश्नाचे सर्वच डॉक्टर व तत्वज्ञाते विचार करत होते. त्यावेळी काही प्रवाशांनी त्यांना ग्रीस, निकरागुवा, जपान अशा ठिकाणी नेले. त्या अभ्यासातून त्यांनी अमेरिकेत परत येऊन “The Blue Zones Solution” असे पुस्तक लिहिले.
अशा या जगभरातील 'ब्लू झोन्स' मधील लोकं निरनिराळ्या भूप्रदेशातील असून त्यांच्यात 8 ते 9 समान घटक आढळले, जे त्या लोकांच्या दीर्घायुषी, आनंदी राहणीमानाशी निगडित आहेत. मानववंशशास्त्राचे अभ्यासक, लोकसंख्या शास्त्रज्ञ, साथीच्या रोगांचे वैद्यकीय विशेषज्ञ अशा टीमने सर्व पुरावे गोळा केले व त्यातून समान संप्रदायातील पुरावे घेऊन खालील 8-9 घटक त्यांच्यात समान असल्याचे सांगितले. या पाचही भागातील लोकांना स्वतःची इकिगाई सापडवण्याची सवय असते.

बऱ्याचदा असे होते, की जीवनात तुम्हाला एखादी गोष्ट करायला खूप आवडत असते, त्यात गती देखील असते व ती गोष्ट तुम्ही बऱ्याच वेळा लहानपणी केलेलेही असते. पण कुटुंबातील काही प्राधान्यामुळे म्हणा किंवा त्या त्या वेळेची निकड वेगळी असल्याने, बरेच वर्ष ती तुम्ही केलेली नसते व त्यामुळे ती गोष्ट आपल्याला करायला येते, हेच मागे पडलेले असते. इतके, की ती गोष्ट मनातूनही निघून जाते पण हुरहूर मात्र उरते आणि कशाची हुरहूर आहे ते मात्र कळत नाही.
हे शोधून काढण्यासाठी तुम्ही चार तास घ्या, एक दिवस घ्या, हवं तर महिना घ्या पण शोधून काढा. थोडा वेळ वाया गेला तरी चालेल. .....आत्तापर्यंत तुम्ही जर नुसते बसलेले असाल तर तुमचा असाही वेळ वायाच जात होता तेंव्हा तुम्हाला काय करायला येतं, तुम्हाला कशाची आवड आहे, अशी कुठली गोष्ट आहे, की जी जगाला उपयोगी पडणार आहे आणि त्यासाठी जगात तुम्हाला मान मिळेल किंवा अर्थार्जन होऊ शकेल, अशी ही इकिगाई शोधून काढणे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. केवळ असा आहार करा, तसा व्यायाम करा वगैरे सांगण्यात अर्थ नाही, तर पहिल्यांदा तुमची इकिगाई काय आहे, तुमचे goal काय हे तुम्हाला माहित असायला हवे.

जसे एखाद्या बाईला खूप छान स्वयंपाक येत असेल, तिच्या हाताला छान चव आहे, परंतु मधल्या काही वर्षात तिला असा छान छान स्वयंपाक करायला वेळच मिळाला नसेल, ती पूर्णतः विसरून गेलेली असेल, की तिला हे, हे पदार्थ छान जमतात. तर आता छान चविष्ट पदार्थ करणे तिची इकिगाई असू शकते. ती जेथे राहत असेल तेथे ती हे पदार्थ करून देऊ शकते, मुलं छोटी आहेत, नोकरीवर जायचे आहे अशा गृहिणीला याचा उपयोगही होऊ शकतो.

ओकिनावा बेटावरील एका 65 वर्षाच्या आनाआजीला आत्तापर्यंत मुलं, नोकरी, यात गुरफटल्यामुळे विणकाम करायला वेळच झालेला नसतो. लहानपणापासून तिला खूप वेगवेगळ्या डिझाईनचे स्वेटर, जॅकेट विणायची खूप हौस होती, आवडही होती व गतीही होती. नोकरीतून रिटायर झाल्यावर ती छोटे स्वेटर, मफलर यांच्या ऑर्डर्स घेऊ लागली. नवनवीन रंगसंगतीची डिझाइन्स करू लागली. moai ग्रुपमधे तिला खूप ऑर्डर्स मिळू लागल्या. वेळ कसा घालवायचा असा प्रश्नच तिला पडला नाही. तिची इकिगाई तिला सापडली.

प्रत्येक माणसाकडे असे काहींनाकाही कौशल्य असतेच. पण ते माणूस विसरून गेलेला असतो. आणि त्याला उगीचंच वाटत असते, की आपण खितपत पडलो आहोत. पण तुमची इकिगाई तुम्ही एकदा का शोधून काढली, की तुमचा पुढचा मार्ग सुकर होतो.

रिटायर झाल्यावर कोणाची भजनाचा क्लास घेण्याची, तर कोणाची योगासने शिकवण्याची इकिगाई होऊ शकते. त्यातून थोडे अर्थार्जन पण होते आणि आदरपूर्वक म्हातारपण जगता येते.

ही तुमची इकिगाई बदलूही शकते. वयाच्या पन्नाशीमध्ये असलेली इकिगाई, साठीमध्ये वेगळी असू शकते. तसेच भौगोलिक परिस्थितीप्रमाणेही इकिगाई बदलू शकते. वरील चारही घटकांपैकी पहिले दोन घटक शक्यतो कायम राहतात. म्हणजेच मला काय करायला आवडते व मला कशात गती आहे हे घटक स्थिर राहिले, तरी शेवटचे दोन, म्हणजे, जगात कशाची आवश्यकता आहे आणि लोकं कशासाठी पैसे अथवा आदर देण्यास तयार आहेत हे जागेप्रमाणे, काळाप्रमाणे बदलू शकते.

कोणाची गणित किंवा फिजिक्स शिकवण्याची आवड तिची इकिगाई बनू शकते. त्यातून जगाला असलेली गरज भागवणे आणि अर्थार्जन किंवा त्यातून मिळणारा आनंद, आदर या गोष्टी तिला आयुष्यभर उपयोगी पडतात. एखाद्या विद्यार्थ्याने मार्क मिळाल्यावर व्यक्त केलेला आनंद, स्मितहास्य यामूळे तिची जगण्याची उमेद वाढते.

अर्थार्जन हे नेहमी पैशांच्या स्वरूपातच असणे अभिप्रेत असते असे नाही, तर तुम्हाला lecture देण्यासाठी एखाद्या ग्रुपमध्ये बोलावणे, आदर देणे, तुमच्यातील कलेला प्रोत्साहन मिळणे, या स्वरूपातही pay/अर्थार्जन असा अर्थ अभिप्रेत आहे.

इकिगाईत आहार-विहारासंबंधी ही काही तत्वे पाळली जातात. तसेच व्यायाम, सामाजिकदृष्ट्या कसे एकत्र राहता येते याबद्दलही विस्ताराने विचार केलेला आहे. 
पण त्याबद्दल पुढच्या भागात.......
रत्ना गोखले


7 comments:

  1. स्वतःची इकीगाई शोधून त्यप्रमणे जगल्यास...
    तुम्हाला मनशांती तर मिळेलच, शिवाय तुम्ही समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणण्यास कारणीभूत व्हाल.
    किंवा तुम्ही समाजात सकारात्मक बदल घडवताना तुम्हाला तुमची मनशांती मिळेल.

    ReplyDelete
  2. सुरेख, अगदी मनापासून पटले.

    ReplyDelete
  3. मस्त!असा विचारच केला नाही कधी.

    ReplyDelete
  4. खूप छान लेख. अभिनंदन रत्ना

    ReplyDelete