जीवनातील फोमो

 मागच्या आठवड्यातला प्रसंग. माझ्या भाचीकडे गेलो होतो. तिचा सहा महिन्याचा मुलगा आहे. मी गेलो होतो, त्या वेळी थोडं खेळून झाल्यावर त्या मुलाला खरी खूप झोप आलेली होती. पण तो झोपायला काही तयार नव्हता. शेवटी गाणं ऐकव, मांडीवर घेऊन थोपट असे सगळे उपाय करून तो झोपला एकदाचा. साधारणतः मुलं वर्ष-सहा-महिन्याची झाली की ही गंमत सुरु होते. डोळ्यावर खूप झोप आलेली असते पण मुलं झोपायला अजिबात तयार नसतात. ताणून ताणून जागं राहण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असतो. मी कुतूहल म्हणून एकदा याबद्दल एका डॉक्टरना विचारलं होतं. त्यावर त्यांनी एक खूप स्वारस्यपूर्ण माहिती दिली होती. ते म्हणाले की याला बरीच कारणं असतात पण त्यातलं एक कारण म्हणजे फोमो FOMO - Fear of Missing Out हे ही असतं. म्हणजे मुलाच्या आजूबाजूला जे काही रंगीबेरंगी जग ते अनुभवत असतं, ते जग आपण झोपलो तर आपल्यापासून दूर जाईल याची त्याला भीती वाटते आणि त्यामुळे ते मूल झोपायला तयार नसतं.

 

मला या गोष्टीचं खूप नवल वाटलं. मुलाच्या न झोपण्याच्या अनेक कारणामागे फोमो (FOMO) हे कारण असेल तर माणूस भावनिकदृष्टया आपल्या आजूबाजूला असलेल्या अनुभवसृष्टीत नकळत कसा गुरफटला जातो आणि याची सुरुवात लहानपणापासूनच कशी होते हे जाणवलं. माणसाच्या गुंतागुंतीच्या भावनिक जडणघडणीचा एक कंगोरा या निमित्ताने माझ्यासमोर उलगडला गेला.

 

माझ्या संगणक क्षेत्रातील कामानिमित्त माझा खूप विमानप्रवास घडला. या विमानप्रवासात आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात विमानात प्रत्येक व्यक्तीला समोर स्क्रीन असतो. त्यावर विविध कार्यक्रम, सिनेमे, खेळ आणि असे बरेच मनोरंजनाचे कार्यक्रम उपलब्ध असतात. हे कार्यक्रम इतके असतात की काय पाहू आणि काय नको असं होतं. मी प्रामाणिकपणे मान्य करतो की अक्षरशः शेकडो विमानप्रवास घडून सुद्धा माझंही बऱ्याचदा असं होत असे. विशेषतः अमेरिकेत जायचं असलं म्हणजे विमानात २२-२४ तास काढायचे असतात. अर्थात इतक्या लांबच्या प्रवासात विमानात कधीतरी झोप येणं साहजिक असतं. पण मी त्या सिनेमांच्या आणि खेळांच्या मोहात पडून बऱ्याच वेळा विमानात झोपायचं टाळत असे. जेव्हा फोमो (FOMO) या संकल्पनेबद्दल ऐकलं तेव्हा मीही विमानप्रवासात त्याच 'फोमो' ला बळी पडत होतो हे लक्षात आले.

 

या संकल्पनेला FOMO हे नाव २००४ साली पॅट्रिक मॅकगिनिस या व्यक्तीने हार्वर्ड बिझनेसच्या नियतकालिकात एका लेखात सर्वप्रथम वापरलं. आणि ते पुढे खूप प्रसिद्ध झालं. सध्याच्या जमान्यात सोशल मीडिया आणि ऍप्स यांच्या भडिमारामुळे व्यक्ती याच 'फोमो'च्या शिकार होत आहेत. सतत समाजमाध्यमांवर राहण्याची मानसिक आणि भावनिक गरज का निर्माण होत आहे यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने त्याने हा लेख लिहिला गेला होता. नंतर त्याने याच विषयावर पुस्तकही लिहिले.



एखादी व्यक्ती, जिला असं वाटतं की, माझ्या अनुपस्थितीत माझ्या संपर्कातील मंडळी खूप मजा करतायत, माझ्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टीची माहिती आहे, मी नसलो तर माझे मित्र किंवा मैत्रिणी समाज माध्यमांवरील इतर मित्र मैत्रिणींबरोबर अधिक जोडले जाऊन माझं महत्व कमी होईल, अशी व्यक्ती 'फोमो'ची शिकार झालेली असते. त्यामुळे सतत समाज माध्यमांवर राहणं, सतत पडत असणाऱ्या पोस्टना सतत वाचत राहणं, आपण टाकलेल्या पोस्टवर काय प्रतिक्रिया आल्या, किती लाईक्स मिळाले, किती कमेंट मिळाल्या याची सतत चिंता करणं, खूप लाईक्स मिळाल्या तर खुश होणं आणि अपेक्षेप्रमाणे लाईक्स मिळाले नाही तर खट्टू होणं, रागावणं, अगदी संबंध तुटण्याइतके वितुष्ट येणं असे अनेक प्रकार ज्यांच्या बाबतीत घडतात ते फोमोचे शिकार झालेले असतात असं म्हटलं जातं.

 

या फोमोची लक्षणं इतर कुठे दिसतात याचा विचार केला तर एक एक पदर उलगडत गेला. माझ्या संगणक क्षेत्रातील नोकरीच्या काळात 'करिअर'साठी मी धावपळ करत असताना मला असं लक्षात येत होतं की आमची पिढी खूप बिझी आहे. आयुष्यात पुढे जाण्याची स्पर्धा लागली आहे. या विचारातच पुढच्या अनेक प्रश्नोत्तरांची शृंखला निर्माण झाली.

बिझी कशात? - कामात;

कुठलं काम? - नोकरी;

नोकरी कशासाठी? - पहिली काही वर्षे जीवनावश्यक गरजांसाठी,

नंतरची काही जीवनशैली उंचावण्यासाठी आणि नंतरची बरीचशी उंचावलेली जीवनशैली टिकवण्यासाठी;

उंची जीवनशैली कशासाठी? - प्रतिष्ठेसाठी;

प्रतिष्ठा कशासाठी? - अहंकार सुखवण्यासाठी;

अहंकार सुखावला तर काय होईल? - यशस्वी असल्याचा भास मनात निर्माण होईल आणि टिकून राहील;

त्यासाठी काय करावं लागेल? - आयुष्यभर शक्य तितकं धावत रहावं लागेल त्याच भासामागे.

नाही धावलो तर? - इतर लोक पुढे जातील आणि मी मागे राहीन

म्हणजेच इथे पुन्हा Fear Of Missing Out - फोमो.... या स्वसंवादाने पुन्हा एकदा सिद्ध झालं की मी सुद्धा फोमोची शिकार आहे...

मला आठवतंय की त्यावेळी ही प्रश्नमंजुषा इतक्यावर थांबली नव्हती. पुन्हा प्रश्न पडले की - 

 

पुढे जाणं म्हणजे काय आणि मागे रहाणं म्हणजे काय?

कुणाच्या पुढे मी जाणार आणि कुणाच्या मागे मी रहाणार?

 

म्हणजे हे पुढे जाणं किंवा मागे रहाणं कुठल्यातरी बाह्यसंदर्भाने ठरणार का? तो बाह्यसंदर्भ काय?

उत्तर आलं - तो बाह्यसंदर्भ म्हणजे दुसऱ्याची मोजपट्टी. मग तो दुसरा म्हणजे आजूबाजूचा समाज असेल, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, किंवा ऑफिसमधले सहकारी.

 

म्हणजे पहा की मोजपट्टी दुसऱ्याची आणि फोमोची शिकार मी होत होतो.

मग या Fear of Missing Out च्या मुळाशी ही Fear म्हणजे भीती मुळात आहे कसली?

उत्तर मिळालं - दुसऱ्याच्या मोजपट्टीनुसार आपण मागे पडण्याची भीती.

म्हणजे आयुष्य माझं आणि मोजपट्टी दुसऱ्यांची? असं का? माझ्या आयुष्याच्या यशाची मोजपट्टी माझी नको?

हे लक्षात आलं तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की आयुष्य माझं तर मोजपट्टीही माझीच हवी. मग पुढचा प्रश्न की ही माझी स्वतःची मोजपट्टी कशी ठरवायची? तर पुन्हा एकदा उत्तर श्रीमद्भगवद्गीतेत सापडलं.

 

'योग: कर्मसु कौशलम्' अमलांत आणत 'कृष्णार्पणमस्तू' भावना मनात ठेवून स्वेस्वेकर्माभिरत:' म्हणजे स्वतःची त्या त्या वेळच्या भूमिकेनुसार समोर आलेली आपली निहित कर्म शक्य तितक्या स्थितप्रज्ञतेनं पण भावभक्तीपूर्ण समरसतेने करता येणं हीच ती स्वतःची मोजपट्टी. आणि ही मोजपट्टी समोर ठेऊन स्वतःला पडताळत मार्गक्रमण करीत रहाणे म्हणजेच जीवन आणि हीच योग्य जीवनशैली.


ही जीवनशैली पद, प्रतिष्ठा, पैसा या कर्मफळांना सहज सामावून घेणारी असली, तरी ती त्यावर अवलंबून मात्र नसेल. आणि अशी स्वतःचीच मोजपट्टी असली की, ना पुढे धावण्याची गरज, ना मागे पडण्याची भीती. असं झालं तर 'स्वान्तः सुखाय' ही स्थिती येईल आणि मनाची ही स्थिती आली तर फोमोची शिकार बनण्याचं मग कारणच कुठे उरतं?

 

राजेंद्र वैशंपायन



 

7 comments:

  1. पटलं आणि आवडलं देखील. फोमोमुळे कोणत्याच गोष्टीचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही कारण मन सतत पुढे धावत असते.

    ReplyDelete
  2. खूप मस्त लेख.. आवडला एकदम... Alka

    ReplyDelete
  3. छान लेख.वाचकाने आत्मपरीक्षण करावं असा.

    ReplyDelete