॥ब्रह्मी ज्ञानराज मेळविला॥
श्री. संत ज्ञानेश्वर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या
समाधीला नुकतीच ७२५
(सातशे पंचवीस) वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने
मनामध्ये असलेली माऊलींची थोरवी पुन्हा एकदा अचंबित करून गेली. सप्त-शतके आणि वर पंचवीस वर्षे एखाद्या
व्यक्तीचा महिमा अबाधित राहतो,
या गोष्टीवरूनच या व्यक्तीला संतश्रेष्ठ का म्हटलं जातं याची कल्पना
येईल. गेल्या सातशे पंचवीस वर्षात जगात नाना तऱ्हांचे आमूलाग्र बदल झाले. विज्ञानाने अफाट
प्रगती केली. प्रचंड मोठी बांधकामे झाली. युद्धे, महायुद्धे झालीं. ऋतुचक्रात बदल झाले. उत्पत्ती, स्थिती, लय या रहाट गाडग्यानुसार जगातल्या उलथा पालथी होत राहील्या. पण सामान्य
माणसाला आश्चर्य आणि कोड्यात टाकणारी एक गोष्ट जशीच्या तशी राहिली ती म्हणजे
संतमहिमा. काळ सर्व काही पुसून टाकतो पण ज्ञानदेवांच्या
नावाला धक्का लावणेही त्याला जमलेलं नाही.
म्हणूनच आज २०२१ साली सुद्धा आपण आळंदीमध्ये
कार्तिकी वारी साजरी केली. माऊलींचा समाधी दिन कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे २ डिसेंबर रोजी होता. पण उत्सवाची सुरुवात २७ नोव्हेंबर रोजीच झाली. या सोहळ्याला
महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून वारकरी मुद्दाम आळंदीमध्ये आले होते. इंद्रायणी
घाट दोन वर्षांच्या मध्यंतरानंतर गजबजून
गेला होता. विविध गावांमधून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या आळंदीत दाखल झाल्या
होत्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम या नामघोषात
श्री क्षेत्र आळंदी उत्सवपीठ झाले होते.
२७ नोव्हेंबर रोजी हैबतबाबांच्या पायरी
पूजनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर माऊलींचा रथोत्सव, पालखी प्रदक्षिणा,
कीर्तन सेवा, पालखी सोहळा, 'श्रीं'ना पवमान अभिषेक, पुष्पवर्षाव,
घंटानाद, आरत्या, महाद्वारी
काल्याचे कीर्तन असे अनेक धार्मिक कार्यक्रम होऊन परंपरेचे चोख पालन झाले. समाधी
दिनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे संत नामदेवांच्या वंशजांनी ज्ञानेश्वरांच्या संजीवन
समाधीच्या प्रसंगावर आधारित कीर्तन केले. ४ डिसेंबर रोजी अमावस्येच्या दिवशी
माऊलींचा छबिना निघाला आणि सोहोळ्याची सांगता झाली.
श्री. संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी, आळंदी |
सव्वासातशे वर्षांपूर्वी ज्ञानदेवांनी समाधी घेतली तेव्हा इसवी सन १२९६ हे वर्ष चालू होते. ज्ञानदेव अवघे २१ वर्षांचे होते. पण एवढ्या लहान वयातच त्यांनी फार महान कार्य केले होते. त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थदीपिका हा नऊ हजार ओव्यांचा ग्रंथ, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ आणि अभंग, विराण्या, गौळणी असे स्फुटलेखनही विपुल केले होते. या पैकी आपल्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथातील आठव्या अध्यायात त्यांनी समाधीविषयक लिखाणही केलेले आहे. पण समाधी घेण्याचा आपला विचार त्यांनी अमृतानुभव लिहून झाल्यावर निवृत्तीनाथ यांचे समोर मांडला. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचे कार्यही सर्वत्र प्रसारित केले होते. सर्व जातीच्या लोकांना विठ्ठल भक्तीचा सोपा सोज्वळ मार्ग दाखवला होता. आता आपले कार्य पूर्ण होत आले आहे, आता अव्यक्ती समरस होण्यास परवानगी द्यावी असे मागणे त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाकडे मागितले.
ज्ञानेश्वरांचे समकालीन संत म्हणजे
नामदेव महाराज. त्यांचे ज्ञानदेवांवर आत्यंतिक प्रेम होते. संत नामदेव यांच्या
समाधी महिम्यामध्ये
सुरवातीलाच स्पष्ट केले आहे की स्वतः ज्ञानदेवांनीच साक्षात पांडुरंगाकडे समाधीची
मागणी केली. (नामदेव गाथा शासकीय प्रत अध्याय क्रमांक ९६५) विशेष म्हणजे या
प्रसंगाला स्वतः संत नामदेव साक्षी होते. त्यांच्या उपस्थितीतच ज्ञानदेव आणि
विठ्ठलाचा संवाद झाला. त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंगाने समाधी पंढरपुरात न घेता
आळंदीत घ्यावी असे सुचवले. मग ज्ञानदेवांनी आपला समाधिस्थ
होण्याचा निर्णय आपले गुरू आणि वडिलबंधू निवृत्तीनाथ यांना सांगितला. निवृत्तीनाथ यांनी तो
अन्य संतांना
कळवला.
सर्व संतांनी आळंदीकडे धाव घेतली. समाधीपूर्वी ज्ञानदेवांचे दर्शन
घेण्यासाठी ते त्वरेने आले होते. तरी पण सर्वांची अंतःकरणे भरुन आली होती. आळंदीमध्ये अहोरात्र
नामाचा गजर
सुरू होता. भजन,
कीर्तन, हरी नामाने
आसमंत दुमदुमत होता. मुक्ताबाई, सोपानदेव हे पण रडत होते. नामदेव सर्वांना सावरत
होते. दशमीच्या दिवस आला आणि निवृत्तीनाथांचे प्राणही कासावीस झाले. एकादशीला
तिन्ही भावंडांचा बांध फुटला. ज्याने तिन्ही भावंडांना भरभरून ब्रम्हरस पाजला, तो ज्ञानदादा चालला होता. मुक्ताबाई
आणि सोपानदेव स्फुंदून स्फुंदून रडू लागले.
आम्हा माता पिता नित्य
ज्ञानेश्वर
आता नाही थार वैष्णवांसी
- अशी त्यांची अवस्था झाली होती
समाधीचे स्थान आधीच तयार करण्यात आले
होते. सिद्धेश्वराच्या देवळाजवळ एक विवर होते. ती जागा स्वच्छ करण्यात आली. संत नामदेव यांचे चार
पुत्र नारा, विठा, गोंदा आणि महादा यांनी या कामात पुढाकार घेतला होता. एकीकडे
ते रडत होते आणि रडता रडता विवर तयार
करत होते. इतर सर्व संत सुद्धा आकंठ दुःखात बुडाले होते. द्वादशीला एकादशीचे पारणे
झाले आणि माउलींनी ठरवलेला दिवस आला.
आज ते संजीवन समाधीत जाणार होते. निवृत्तीनाथांनी त्यांचा हात धरला होता. त्यावेळी ज्ञानदेवांच्या हृदयात गुरू म्हणजेच निवृत्तीदादांविषयी कृतज्ञता दाटून आली. निवृत्तीनाथांना नमस्कार करताना ते म्हणाले, -
पाळीले पोशिले चालविला
लळा॥
वा माझ्या कृपाळा
निवृत्तीराजा॥
स्वामींचीया योगे
जालों स्वरूपाकार॥
उरलो पार मायानदी॥
टाळ मृदुंग वाजायला लागले. सगळे संत
ज्ञानेश्वर माऊलींचे पाय धरत होते. ज्ञानदेवांनी सोपान मुक्ताईला पोटाशी धरले. त्यांची
अखेरची भेट घेतली आणि ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांचा हात धरून विवरामध्ये उतरायला
सुरुवात केली. सद्गुरु आणि सदशिष्य दोघेच समाधीत उतरले. बेल, तुळशी, दर्भ, आणि, फुले अंथरलेल्या
त्या विवरात ज्ञानदेवांनी पद्मासनात भीममुद्रा केली आणि त्यांची संजीवन समाधी
लागली. निवृत्तीनाथ वर आले आणि विवरावर शिळा ठेवली. संत नामदेवांनी आपल्या
समाधीच्या २५० अभंगात या संपुर्ण प्रसंगाचे वर्णन केले आहे. 'समाधीचे अभंग' म्हणून हे वाङ्मय अजरामर झालेले आहे.
नामदेवांच्या समाधीविषयीच्या
लिखाणातच त्यांनी साक्षात पांडुरंगांचा आणि ज्ञानेश्वरांचा संवाद लिहिला आहे. पांडुरंगाशी
झालेल्या या संवादाचा पूर्ण तपशील आज उपलब्ध नाही. पण संत नामदेव लिहितात, -
'देव
म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्रसूर्य जव दिनकरा, तव
तुझी समाधी राहो रे निरंतर।
तैसेंच म्हणे विठोजी,
जववरी धरा, तव वरी समाधी स्थिरा।
हरिकीर्तन करीत सैरा,
वंशपरंपरा उद्धरील॥'
असा साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद ज्ञानेश्वर माऊलींच्या
समाधीला आहे. ती चिरस्थायी आहे. हे विश्व आहे तेथवर माऊलींची समाधी आहे. आज सात
शतकानंतर आपण त्याचा प्रत्यय घेत आहोत, व येणाऱ्या अनेक पिढ्यांना हा प्रत्यय येत राहील. राजवट इंग्रजांची असो की
मुघलांची,
पेशव्याची असो की लोकशाहीची, युग
इलेक्ट्रॉनिक्सचे असो की कॉम्पुटरचे तंत्रज्ञान कितीही प्रगत होवो ज्ञानदेवांच्या
समाधीचा महिमा कदापिही कमी होणार नाही याची खात्रीच या ७२५व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने
मिळाली असे म्हणता येईल.
शर्मिला पटवर्धन फाटक
Live and simply flawless picturisation of divine events
ReplyDelete