जीवनस्पर्शी -भाग ५

लावण्य काही आगळे


 


वसंत ऋतूला स्वतःचं आगळं वेगळं लावण्य आहे.  इतर पाचही ऋतूंचे राजेपण याला बहाल केलेलं आहे, त्यामुळे याचं नाव ऋतुराज असंही आहे.  या वसंत ऋतूची महती आदिकवी वाल्मीकींनी  वर्णिली आहे.  महाकवी कालिदासाला तर वसंतवेडा कवी असे म्हटले जाते.  वसंतश्री चे सौंदर्य लुटण्यासाठी देवी शारदेने कविकुलगुरु कालिदासाला चिरयौवन दिले आहे. संस्कृत साहित्य गाजवणारे आणि शारदेचे लाडके सुपुत्र माघ,भा रवी श्रीहर्ष ,आणि जयदेव यांनी त्यांच्या साहित्यातून केलेली वसंत ऋतूची वर्णने अजरामर झालेली आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये. एकूणच वसंत ऋतू हा प्राचीन काळापासून प्रतिभावंतांच्या जिव्हाळ्याचा विषय. भगवद्गीतेत तर विभुतीयोगामध्ये साक्षात जगद्गुरू भगवान गोपालकृष्णांनी सांगितले आहे की वसंत ऋतू म्हणजे मीच आहे. त्यामुळे या ऋतूला पारमार्थिक लोकांमध्येही खूप महत्वाचे स्थान आहे.

चित्र- सीमा ढाणके  

या वर्षी ऋतुराजाचे आगमन सृष्टीक्रमाप्रमाणे माघ वद्य पंचमीला म्हणजे पाच फेब्रुवारी रोजी होत आहे. वसंत ऋतूचा प्रारंभ. वातावरणात सुखद गारवा आणि संपूर्ण सृष्टीला आलेला प्रसन्नतेचा बहर. वातावरण इतकं लोभस की हे निर्माण करणाऱ्या आदिशक्तीलाच स्वतःच्या निर्मितीचा आस्वाद घ्यावा असे नक्की वाटत असेल. कदाचित म्हणूनच तिने जन्म घेतानाही याच दिवसाची निवड केली असावी. साक्षात सरस्वतीचा हा जन्मदिवस. हीच वसंत पंचमी, सरस्वती पंचमी, श्री पंचमी, ज्ञान पंचमी म्हणून ही ओळखली जाते. वसंताचे बहर साक्षात सरस्वतीच्या स्वागताला! कल्पनाच किती मनोहर वाटते.





आईच्या स्वागताला बाळांनी अतीव प्रेमाने घर सजवून तिला खुश करावं त्यासारखंच वाटतं हे. आपल्या संस्कृती मध्ये सण आणि उत्सव निसर्गाशी सख्य सांगतातच. ऋतुचक्रात बदल झाले की ते जीवनाला भिडतातच. ते बदल आनंदाने स्वीकारून जीवनातील हर्ष, उल्लास, सौन्दर्य वाढवायचा प्रयत्न करणे ही सण उत्सव साजरे करण्याची पहिली प्रेरणा असावी.

वसंत पंचमीचा दिवस असाच साक्षात सरस्वतीला म्हणजे विश्वजननीला मानवंदना देणारा तिच्या सृजनशीलतेला अभिवादन करणारा. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये वर्षातून तीन वेळा महासरस्वतीचे पूजन केले जाते. अश्विन महिन्यामधल्या नवरात्रात म्हणजेच शारदीय नवरात्रात शेवटचे तीन दिवस परम गुह्य ज्ञानस्वरूप ब्राम्हविद्या प्रदायिनी महासरस्वतीच्या पूजनाचे असतात. या नवरात्राच्या व्यतिरिक्त कार्तिक शुक्ल पंचमी आणि माघ शुक्ल पंचमीला सरस्वतीचे पूजन करण्याची प्रथा बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान इत्यादि राज्यात आढळते. या तिथींना पाटी पूजन, पुस्तकपूजा आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला ज्ञान देतात त्या सर्व साहित्याची पूजा करण्यात येते. शाळेत प्रवेश घ्यायला किंवा कोणत्याही विद्याभ्यासाचा प्रारंभ करण्यास हा दिवस अत्यंत शुभ समजतात. सरस्वतीची मूर्ती बनवून तिचे पूजन करण्याची प्रथा काही राज्यात आढळते. 

सरस्वतीचे निष्ठावंत पूजक सरस्वती पूजनाची ही संधी सात्विक हेतूने साधून घेतात. कारण कुळधर्म कुलाचार यात सरस्वतीला फारसे महत्व नाही आणि सरस्वतीची सार्वजनिक मंदिरे पण आपल्या देशात इतर मंदिरांच्या तुलनेने खूपच कमी आहेत. नवव्या शतकातील शृंगेरीचे शारदा मंदिर, अकराव्या शतकातील कर्नाटक मधीलच गदग येथील सरस्वती मंदिर आणि बाराव्या शतकातील कथनूर (जिल्हा तंजावर, राज्य तमिळनाडू)येथील प्राचीन सरस्वती मंदिरे विशेष प्रसिध्द आहेत.

 

कथनूर सरस्वती मंदिर

आपण भारतीयांनी परमात्म्याच्या शक्तीची तीन रूपे मानलेली आहेत महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली. या विश्वात शक्तीखेरीज कोणतेही कार्य चालू शकत नाही. प्रत्येक देवाला शक्ती आहे. जिथे जिथे ईश्वराची कल्पना आहे तिथे तिथे शक्तीची कल्पना आहे. या विश्वाचा सर्व कारभार शक्तीमुळेच चाललेला आहे.

गदग सरस्वती मंदिर
यातील महालक्ष्मी हे आदिदेवतेचे रूप आहे. देवी भागवतात सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीनेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांना  प्रकट केले. महासरस्वती आणि महाकालीने हिच्या मधूनच आकार घेतला. पूर्ण जगताचे संचालन करण्याकरता ही भगवान विष्णूबरोबर राहते. जीवनाची उत्पत्ती हिच्यातूनच झाली आहे. सर्व सजीवांना प्राण प्रदान करणारी देवी महालक्ष्मीच आहे.

महासरस्वती बुद्धीची, वाणीची देवता आहे. कोणत्याही गोष्टीला भव्यता, दिव्यता, सौंदर्य हीच प्रदान करते. उदाहरण घ्यायचे झाले तर सोनं हा धातू स्वतःच, स्वतःचा सुंदर आकार घेत नाही. कुशल कारागीर त्याला आपल्या कल्पनेने आकर्षक दागिन्यांच्या रुपात आणतो. तसं मूळ परमात्म तत्व निराकार निर्गुण आहे. त्यातून हा विश्वाचा पसारा जी उपयुक्त आणि मोहक स्वरूपात साकार करते ती परमेश्वराची शक्ती म्हणजे महासरस्वती. सृष्टीची सारी रचनाच तिची आहे. ईश्वराचा संकल्प घेऊनच ती सगळं निर्माण करते आणि ईश्वरमय विश्व घडते. महासरस्वती योजना करते. ही चौदा विद्या चौसष्ट कलांची जननी, स्वामिनी आहे. चमत्कार, सौंदर्य, विविधता आणि एकूणच वैचित्र्यपूर्ण विश्व ती निर्माण करते. तिची सृजनशीलता अफाट अनंत आहे. परमेश्वराच्या अतिभव्यतेची आणि मानवी आकलनाच्या पलीकडच्या सामर्थ्याची कल्पना या महासरस्वतीच्या निर्माणकार्यामुळे सामान्य माणसाला थोड्या प्रमाणात तरी येते.

 

तिसरी शक्ती आहे महाकाली. निर्माण करणे त्याच प्रमाणे नाहीसे करणे हे तिचे या विश्वातले कार्य आहे. सरोवराच्या पाण्यात तरंग उठतात आणि क्षणात नाहीसे होतात. हे काम या महाकालीचे! निर्माण करणे  आणि नष्ट करणे या टोकांमध्ये ती लीला करते.

 

गदग सरस्वती मंदिर

आपण इथे विचारात घेत आहोत महासरस्वतीला. तिने हा जगाचा खेळ मांडला आहे. तीच शारदा नावाची शक्ती आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आसक्त ठेवते. ती भगवंताची शक्ती आहे. ती आपल्या बुद्धिपटलावर काम करत असते. ही जेव्हा आपल्याला अंतर्मुख करते तेव्हा आपल्याला ज्ञानाची ओढ लागते आणि जेव्हा बहिर्मुख करते तेव्हा प्रपंचच खरा वाटायला लागतो. आपण संसारात आसक्त असतो त्याचे कारण सुद्धा ही सरस्वतीच असते. म्हणून आपले मन योग्य मार्गावर राहून हाती घेतलेले काम सिद्धीस जावे म्हणून शारदेला वंदन करायचे असते. जिंकायला अत्यंत कठीण असलेल्या या मायाशक्तीला शरण जायचं असतं. हाच संदेश आपल्या शास्त्रकारांनी सरस्वती पूजेचा विधी सांगून आपल्याला दिला आहे.

 

हा एकच सण असा आहे की या दिवशी लक्ष्मीची पण पूजा करतात. कोणताही आनंद सोहळा साजरा करायचा तर आई भवानी आदिमाता प्रथम पुजली पाहिजे आणि लक्ष्मीच्या कृपेशिवाय कोणताही सण उत्सव साजरा होऊच शकत नाही. म्हणून या पंचमीला थाटामाटात लक्ष्मीची पूजा होते. या सणाचे आणखी एक नाव श्री पंचमी किंवा लक्ष्मी पंचमी आहे.

 


ज्ञानदायिनी, धनदायिनी आणि वसंत ऋतूच्या बहरात धुंद झालेली नवनवोन्मेषशालिनी सृष्टी या तिघींचाही हा उत्सव मनाला नवचैतन्य देणारा आहे.


शर्मिला पटवर्धन फाटक




2 comments: