जीवनस्पर्शी- ७

 

सुरंगीचा सुगंध

काही म्हणा पण आमचं कोकण सुद्धा देवाची लाडकी भूमी आहे यात तीळमात्रही संशय नाही. असं नसतं तर जगाला वेड लावणाऱ्या हापूस आंब्याच्या निर्मितीचं कंत्राट परमेश्वराने या भूमीलाच कायमस्वरूपी कशा करता बहाल केलं असतं? मलाईदार शहाळ्यांचा आणि श्रीफलांचा महामुर ठेवा इथेच कशाला जन्माला घातला असता? डोळ्यांचं पारणं फेडणारं सृष्टी सौंदर्य या इथेच कशाला उधळून दिलं असतं? इथल्या समुद्राच्या पोटात अफाट मत्स्यवैभव कशाला ठेवलं असतं?  

एकूण ही कोकणची भूमी निसर्गमातेची लाडकी आणि तिचा भरभरून आशीर्वाद मिळालेली.

वसंत ऋतू सुरू झाला की तर बघायलाच नको. कोकणात वसंत ऋतू सुरू झाल्याचा उत्सव वगैरे कोणी करत नाही पण सृष्टीच त्यावेळी खऱ्या अर्थाने कोकणच्या भूमीचे डोहाळे पुरवत असते.

कारण पुढच्या काही महिन्यात तिच्यामधून खूप नवनिर्मिती होणार असते आंबे, काजू, जांभळे, करवंद, फणस, कोकमं या बरोबरीनेच सुंदर-सुंदर फुलं सुद्धा कोकणातली सर्वात प्रसिद्ध सुरंगीची फुलं सुद्धा याच काळात आपल्या आगमनाची सुगंधी वार्ता देतात.

       आपल्या इवल्याशा आकारातून सुगंधाचं साम्राज्य निर्माण करणार हे छोटंसं नक्षत्रा सारखं फूल. सुरंगी म्हणजे ज्याच्या अंगागातून सुगंधाचा शिडकावा होतो ते मोतीया पाकळ्या असलेलं सोनेरी केसराचं फूल. सुरंगीचे वळेसर पाहिले तर सोन्या-मोत्याची लड कोणीतरी एकत्र गुंफून सुबकतेने मांडून ठेवली आहे असंच वाटतं. पूर्वी मला वाटायचं सुगंधाचं बन फक्त कवितेतच असतं पण प्रत्यक्षात देखील सुरंगीच बन साक्षात सुगंध उधळत असतं. दूर अंतरावरून देखील कळत इथे जवळपास सुरंगी सुवास उधळते आहे. या सुगंधाकडे माणसंच नाही तर कीटक आणि मधमाश्या सुद्धा आकर्षित होतात.


         सुरंगी कितीही फुलून आली तरी झाडाशी असलेलं तिचं नातं अगदी घट्ट-घट्ट असतं. सुरंगीचे कळे खोडाला घट्ट बिलगूनच जन्मलेले असतात. फांदीवरचे सुरंगीचे कळे पाहिले तर मोत्याची माळ घातल्यासारखे दिसतात.

सुरंगीची फुले कोकणी माणसाच्या कष्टाळूपणाची पुन्हा-पुन्हा परीक्षा घेतात. झाडावरून याचे कळे तोडावे लागतात आणि ते फुलायच्या आत ते गजऱ्यात बांधून टाकावे लागतात. हे गंध भरलं फुल निसर्गाशी असलेलं आपलं नात सहजासहजी विसरायला तयार नसतं त्यामुळे हे कळे आदल्या दिवशी झाडावरून काढून गजरे केले तरी रात्रभर घराबाहेर दव बिंदूत ठेवतात किंवा पहाटे उठून उंच झाडावर चढून कळे काढावे लागतात मग ते केळीच्या पानात ठेवले जातात.

सुरंगीची झाड आकाराने मोठी असतात त्याचे कळे पहाटे उठून काढणं सोपं नसतं. झाडावरचे लाल डोंगळे, मधमाश्या इतर कीटक या सगळ्याला टक्कर देत कोकणी माणूस ही सुगंधाची खाण जमिनीपर्यंत आणतो आणि मुंबई पर्यंत सुद्धा पोचवतो.

सुरंगीचा हंगाम जेमतेम दोन महिने असतो. याची वाळलेली फुले पण आपले सुगंध दानाचे व्रत सोडत नाहीत. अत्तर उद्योगात ती उपयोगी ठरतात.ही आपोआप गळणारी फुले पण झाडाखाली साड्या चादरी अंथरून गोळा केली जातात आणि पुढील कामासाठी काळजीपूर्वक पाठवली जातात. खरंच कोकणी माणूस अजूनही खूप कष्टाळू आहे. इथलं निसर्गदत्त वैभव जपण्याची त्याची आजच्या कॉम्प्युटरच्या युगातही तयारी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवळा जवळच्या देवराईत आवर्जून सुरंगीचे एकतरी झाड आपल्या पूर्वजांनी लावलेलं आहे. फुलं फुलायला लागली की ग्रामदेवतेचा मान फुलांच्या सजावटी ने किंवा देवाला सुरंगीच्या वळेसरांचा सुगंधी अंगरखा भक्तिभावाने घालून केला जातो.

     लहानसं फूल पण आसमंत गाजवून सोडतं. आयुष्यात एकदा जरी भेटलं ना तरी जन्मभर मन प्रफुल्लित ठेवेल अशी आठवण मनात ठेवून जातं.

 मला आठवते सुरंगीच्या फुलाबरोबर झालेली माझी पहिली भेट. रत्नागिरीच्या दक्षिणेला असलेल्या जमिनीच्या पट्ट्यात ही फुलं खूप फुलतात. माझ्या काकूचं माहेर राजापूरला. तिच्या माहेरून केळीच्या पानात गुंडाळून सुरंगीचे गजरे रत्नागिरीला आले होते आम्ही बहिणी बहिणींनी केळीच्या पानाचा अडसर दूर करताच तो सुगंध एकदम दरवळला. मी खूप लहान होते तरीपण काही वेळ संपूर्ण अस्तित्वाचा ताबाच त्या फुलांनी घेऊन टाकला. मन वेडावलं. त्यातला एक वळेसर माझ्या चुलत बहिणींनी मला सुद्धा माळायला दिला. शाळेत बाई जेव्हा म्हणाल्या "अगं सुरंगी कुठे मिळाली तुला?" तेव्हा अगदी धन्य-धन्य वाटलं. सगळा वर्ग माझ्यामुळे सुगंधित झालाय अशी फुशारकी सुद्धा मधे-मध्ये बाहेर येऊ पाहत होती पण मी गप्प राहिले कारण मैत्रिणींनी पण माझ्या गजऱ्याला अगदी मला हवी होती तशी दाद दिली होती. इवल्याशा सुरंगी ने माझं मन कायम सुगंधित ठेवणारी एक सुंदर आठवण आयुष्यभरासाठी मला दिली. 

केव्हढं सामर्थ्य असतं परमेश्वराच्या निर्मितीत! आमच्या कोकणच्या लाल मातीकडे विश्वकर्म्याने विशेष लक्ष दिलं आहे हे निश्चित. त्याचे आभार मानतानाही स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवतात. कधीतरी त्याच्या ऋणातून मुक्त होता येईल का?                 

 शर्मिला पटवर्धन फाटक, बंगलोर.




2 comments:

  1. सुरंगीचा वर्णनाने मन सुगंधित झाले, खुप छान

    ReplyDelete
  2. शर्मिला ताई, खरंच हा लेख वाचून पुन्हा जुन्या कोकणातल्या आठवणीं जाग्या झाल्या. तसं पाहिलं तर कथा, कविता, साहित्यात सुरंगी तशी उपेक्षित. पण ज्याने सुरांगिचा सुगंध अनुभवलेला आहे तोच हे समजू शकतो. पण कोकणात बाजारात जाऊन सुरंगींचो वळेसार न आणणारो, जत्रा, खडखडे लाडु, खाजा, दशावतारी नाटक न आवडणारो, उकडो भात आणि बांगड्याची कडी न खाणारो माणूस म्हणजे स्वर्गाचो अनुभव न घेतलेलो माणूस समजाक हरकत नाय ( असा माझा मत आसा) सुरांगिच्या फुलाला व्यासपीठ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏

    ReplyDelete