जीवनस्पर्शी - क्षण ते शिकवून गेले

 


जीवनाबद्दलचे शिक्षण आयुष्यात कोणाकडून कधी मिळेल काही सांगता येत नाही. आपल्या जगण्यावर उमटणाऱ्या छोट्याश्या तरंगामागे सुद्धा अदृश्य नियतीचा हात आहे हे जाणवतं. कधी ती कोड्यात टाकते, कधी शिक्षा करते, कधी बक्षीस देते, तर कधी अचानकपणे आपल्याला काहीतरी शिकवण्याची व्यवस्था करते.  

बंगलोरच्या सुप्रसिध्द गायिका उभयगान विदुषी डॉ.श्यामला भावे यांच्या घरी अधून मधून जाण्याचा योग येत असे. पुढे त्यांचे जीवनचरित्र लिहायला घेतले त्यावेळी तर सातत्याने भेटी व्हायला लागल्या. वेळेप्रमाणे कधी त्यांच्या घरी जेवण व्हायचं तर कधी चहा. त्यांच्याबरोबरच्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षांच्या सहवासात एक दिवस एक गोष्ट माझ्या मनाला नवी जाणीव देऊन गेली. नेहमी प्रमाणे माझ्यासमोर चहाबरोबर जे बिस्कीट ठेवलं गेलं ते पाहून सहज मी श्यामला ताईंना विचारलं, "दीदी तुमच्याकडे एकदाही एवढ्या वर्षात मी चहाबरोबर मारी, ग्लुकोज, अशी सरसकट सगळीकडे मिळणारी बिस्किटे पाहिली नाहीत. तुम्ही स्वतःसाठी वेगळी बिस्किटे बनवून वगैरे घेता का मुद्दाम?



त्या म्हणाल्या, 'नाही ग, आपल्या घरी नेहमी बंगलोरमधील बेकरीवाल्यानी इथेच तयार केलेली बिस्किटे असतात. काही काही बेकरीवाले खरेच इतके सृजनशील असतात. इतके नवीन छान छान पदार्थ जीव ओतून तयार करतात. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं की नाही? आपल्यावर ती जबाबदारी असते. मोठ्या कंपन्यांना काय फरक पडणार आहे? आपण या लोकांच्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे असं मला वाटतं.

नंतर मी खरंच पाहिलं की एखादे व्रत घेतल्यासारख्या श्यामलाताई आग्रहपूर्वक आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू वापरायच्या. मेरीकेचे तेहतीस गायनदौरे केलेल्या बाईने स्वतःच्या घरात मात्र भारतभर भ्रमण करताना तेथील कारागिरांनी केलेल्या वस्तूंचा संग्रह केला होता. मला श्यामला ताईंचे विचार आणि आचार खूप प्रभावित करून गेले. मी स्वतःला प्रश्न विचारला, आपल्या देशातल्या कोणा करता मला असे काही करता येईल का? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच लगेच मिळाले नाही.



नंतर काही दिवसांनी शिर्डी जवळील येवला गावात जाण्याचा योग आला. महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून गौरवल्या जाणाऱ्या पैठणी साडीचे  हे आधुनिक जन्मस्थान. आजही इथे पैठण्या मोठ्या प्रमाणावर तयार होत असतात. इथे मिळणारी येवला पैठणी इथल्या विणकरांनी स्वतः विणलेली असते. तिथे एक तरुण विणकर मुलगा भेटला. माझ्या मुलाच्या वयाचा. त्याच्या घरी गेलो, तेव्हा गप्पा मारता मारता म्हणाला, "आपण पैठणीचे पदर विणतो. पण एकूण कारागीर कमीच झालेत. सगळी नवीन मुलं वेगळं काहीतरी शिकून कंपनीत नोकरी करतात."

मी त्याला विचारले, "तू काय करायचं ठरवले आहेस?"

तो म्हणाला, "अजून दोन-तीन वर्षे थे हे काम करून बघेन नाहीतर मी पण धरे वाट पुण्याची. करेन तिकडे नोकरी."

तो हे सर्व सांगत होता, तेव्हा पाठीमागे हातमाग चालू होता. नाजूक आवाज तालात येत होता. रेशमाच्या लडी मोरांचे आकार घेत होत्या. माझ्या मनावर त्या वातावरणाचे उभे आडवे धागे एका नव्या योजनेचं विणकाम करू लागले होते. मी त्याला म्हटले, "मी बंगलोरला काही पैठण्या विकू शकेन. देशील का मला?"त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट जाणवला.

माझ्या डोक्यात श्यामला ताईंनी पेरलेला विचार होता. आपल्या देशातल्या परंपरा आपणच टिकवायच्या आणि त्यासाठी काम करणाऱ्या लोकांना आपणच प्रोत्साहन द्यायचं. नशिबाने पैठणीकरता गुंतवणूक करणं मला शक्य होतं. मी रोख किंमत देऊन त्याने पदर विणलेल्या पैठण्या, त्याने दाखवल्या त्या दुकानातून विकत घेतल्या.

त्याला म्हटलं ,"तुझ्या अंगात कला आहे. ती जप. वाया जाऊ देऊ नको. एक ना एक दिवस ही कला तुला पैसे आणि मानसन्मान पण देईल."

मी बंगलोरला परत आले. पैठण्या विकायला आणल्या आहेत म्हणून जाहिरात दिली. लोकांनी छान प्रतिसाद दिला. लांबच्या एक दोघींच्या घरी मी स्वतः पैठण्या घेऊन गेले आणि त्यांनी त्या खरेदी केल्या. माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी मला या करता प्रोत्साहन दिले. माझ्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या काकूला माझा पैठणी विकण्यामागचा विचार खूप आवडला आणि तिने माझ्या चुलत भावाच्या लग्नात सर्व नातेवाईक स्त्रियांना पैठणी साड्याच दिल्या. माझ्या हेतूला भरीव पाठिंबा मिळाला. अवीट गोडीची पैठणी अमेरिकेतल्या बऱ्याच जणीपर्यंत पुन्हा एकदा पोचली.

त्यानंतर फार काळ मी पैठण्या विकल्या नाहीत. बरेचसे काम मनासारखे झाले. येवल्यातील त्या विणकाराचे आता स्वतःचे दुकान सुद्धा चालू झाले. विणकाम सोडून नोकरी करण्याचा विचार त्याच्या  मनातून हद्दपार झाला आणि हात पुन्हा अस्सल देशी कारागिरीत रमले.

एक भारतीय धागा कोठेतरी पक्का झाल्याचे  समाधान मनात दाटून आले, आणि शामलाताईंची आठवण मनावर मोरपीस फिरवून गेली. सहज जाताजाता देशभक्तीच्या एका वेगळ्याच पैलूवर त्यांनी प्रकाश टाकला होता.

शर्मिला पटवर्धन फाटक




1 comment: