आमच्या वेळची दिवाळी

 

बालपणीचा काळ सुखाचाही उक्ती आजही मी सत्तरीत पदार्पण केल्यानंतरही मला प्रकर्षाने जाणवते. खरंच बालपण किती सुंदर,निरागस,स्वच्छंदी फुलपाखरासारखे असते. मला साठच्या दशकातील दिवाळी आजही आठवते. त्या काळात वर्षातून दोनदाच कपडे खरेदी होत. एक म्हणजे गुढी पाडवा, दुसरे  म्हणजे ही दिवाळी. त्या निमित्ताने नवीन कपडे घालून स्वतः किल्ला करणेमुलांचे किल्ले पाहणेग्रुपने घरोघरी फराळासाठी जाणे.  सर्वांनी मिळून केलेल्या फराळाची चव आजही ओठावर रेंगाळते. आईच्या हाताची खमंग खुरखुरित चकली,लाडू,चिवडा करंज्या हे सारं आठवते. आईच्या हातच्या पदार्थांना काय अप्रतिम चव असायची. दिवाळीतील चार दिवस म्हणजे चार वर्षेच जणू अशा थाटामाटात जायचे. त्या काळात आणखी एक वाचनीय फराळ म्हणजे विविध दिवाळी अंक. आमच्या लहानपणी मोती साबण नव्हता. सुगंधी वस्तू मिळत नसे, आहे त्यात समाधान मानायचे हीच शिकवण अंगी बाळगली.

एक आठवण सांगावीशी वाटते. फटाके लावताना सुरसुर काडीने तोटे उडविताना माझा अंगठा भाजला, जखम झाली होती. नंतर जखम बरी झाली तरी पण फटाकडी पासून सावध राहण्याची सवय लागली ती अगदी आजपर्यंत. अशी ही दिवाळीची आठवण आज ही आठवते. त्या काळात खूप समृध्दी नव्हती पण खाऊन पिऊन लोक सुखी होते. शेजारधर्म पाळून सणावाराला एकमेकांना मदत करीत त्यामुळे शेजारी कधी शेजारी वाटले नाहीत घरातील एकच भाग वाटत होते. त्या काळात आम्ही शाळकरी मुले होतो. दिवाळी पूर्वी पंधरा दिवस आमची सुट्टी आकाशकंदील बनवण्याच्या मागे असे. ते काम कधी रात्ररात्र जागून करीत असू. कंदील घरापुढे टांगून त्या कंदील बनविण्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसायचा. आजही स्वतः घरी बनविलेला साधाच आकाशकंदील तयार करून ती परंपरा आम्ही अजून जपतो. म्हणून राहून-राहून वाटते की,आजच्या या झगमगाटात हरवलेलं बालपण पुन्हा मिळणार नाही.

आज प्रत्येक गोष्ट बाजारात रेडिमेड मिळते. मिठाई,कपडे,भेटवस्तू सारे तयार मिळते.  पण त्या वेळची दिवाळी या सर्वाहून लई भारी होती असच काहीसं झालं आहे. रेडिओ हा त्या काळात करमणुकीचे साधन होते. सुंदर चालीत बांधलेली प्रासंगिक गाणी, गाणारे गायक मन लाऊन गायचे. दिवाळीत धनत्रयोदशी दिवशी माणिक वर्मांचेलाविते मी निरांजनहे गाणे आवर्जून लागे. नरक चतुर्दशीच्या दिवशीआली दिवाळीउषा मंगेशकर यांच्या आवाजात गाणं कानावर पडल्याशिवाय दिवाळी वाटत नसे. पाडव्याच्या दिवशी तबकामध्येइथे तेवते निरंजनाच्या वाती’,भाऊबीजेलासोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,अशी प्रासंगिक गाणी आजही कानावर पडल्यावर त्यावेळची दिवाळी आणि बालपण आठवते आणि आजही मन प्रसन्न होते.

विविध दिव्यांनी सजलेली सजावट आणि  दिवाळी अंकातील लेख वाचतच मी पुढे लेखक झालो.  स्वतः दिवाळी अंक प्रकाशित करून नवोदितांना, त्यांच्या  लेखणीला न्याय मिळवून दिला.
गेली अठरा वर्षे मी संपादक असून आमचानवरत्न दिवाळी अंक’, त्याला अनेक वाचकांचा प्रतिसाद लाभत आहे. आमचा हा दिवाळी अंक अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आणि छत्तीस जिल्ह्यात लोकप्रिय ठरला आहे. माझ्या दिवाळी अंकाच्या कामानिमित्त कितीतरी लेखक,वाचक,संपादक यांच्याशी चांगले नाते तयार झाले आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात अनेक लेखकांचे लेख,कविता,कथा,विडंबन गीते याची निवड करणे,त्यावर मुद्रितशोधन करणे,अंकाची रचना करणे. हे सर्व आवडीचे काम मला या दिवाळीच्या सणामुळेच करता येते. याचा विशेष आनंद वाटतो.


प्रा. प्रकाश कुलकर्णी 



1 comment: