कथा अंकुरची

'अंकुर' हे "स्नेहधारा" संस्थेचे हस्तलिखित. आता त्याचा अंकुर न राहता ४१ वर्षांचा मोठा वृक्ष झाला आहे पण नाव अजूनही "अंकुर". स्नेहधारा ही एक वैचारिक व क्रियाशील संततधारा आहे. अवलोकन, विचारमंथन व सृजनशीलतेने स्नेहसख्यांच्या लेखणीतून नवविचारांचे अंकुर अंकुरित होत रहावेत यासाठी या हस्तलिखिताचे प्रयोजन आणि म्हणूनच नाव "अंकुर".

'स्नेहधारा' ही महिला संस्था १९७७ साली स्थापन झाली. डोक्याला आणि हाताला काम असावे व त्यातून मन व शरीर समृध्द व्हावे, सुशिक्षित महिलांना व्यासपीठ मिळावे, कलागुणांना वाव मिळावा, व्यक्त होण्यासाठी जागा असावी, मैत्रिणींचा सहवास लाभावा आणि त्यातून आत्मविश्वास निर्माण होऊन आत्मभान यावे व आत्मोन्नती सोबत समाजाचाही विकास करावा यासाठी स्नेहधाराची स्थापना झाली. बंगलोरच्या महालक्ष्मीपूरम भागात आमची वास्तू उभी आहे.

अंकुर - अंक पहिला 
१९७७ साली सुरू झालेल्या आमच्या संस्थेने १९७८ साली लगेचच हस्तलिखिताचा प्रथम अंक काढला. नाव “अंकुर” ठरले. अंकुरचा एक वार्षिक अंक काढायचा, दर वर्षी नवे संपादक मंडळ असावे असे नियम ठरले. प्रत्येक स्त्रीला आपल्या मनातले, आपले विचार लिहिता यावे. खऱ्या अर्थाने “अक्षरओळख” व्हावी यासाठी अंकुरने सगळ्या स्नेहसख्यांना “लिहिते” केले. अक्षरओळखीतून विकास ही भावना सुखावह ठरली. फुलापानांची नक्षी, प्रवासवर्णने, कविता, कथा, ललित, दासबोध, गीता, कोडी, बुध्दीला चालना देणारे लेख, शिवणकलेचे नमुने, शास्राचे अभ्यासपूर्ण लेख यांनी पहिलाच अंकुर सजला. नावाला योग्य मुखपृष्ठही काढले गेले.

वेलदोडा 
पुढच्या प्रत्येक वर्षी संपादक मंडळ आपापल्या परीने जास्तीत जास्त मेहनत घेत गेले. लहान मुलांसाठी वेगळा विभाग, चित्रकला स्पर्धा घेतल्या गेल्या. युवांसाठीही एक वर्ष विभाग दिला पण नंतर काही वर्षांनी फक्त स्नेहसख्यांसाठी अंकुर काढला जाऊ लागला. १८व्या अंकात थोडे टायपिंगचे प्रयोग झाले. पण सर्वानुमते “हस्तलिखित” हेच स्वरूप रहावे असे ठरले, जे आज ४१वर्ष सातत्याने सुरू आहे.

पेन्सिल, पेन, रंगीत पेन, स्केच पेन, स्पायरोग्राफ, भरतकाम, क्रेयॉन्स, रंगांचे सर्व प्रकार, फोटो, कविता, स्फुटलेख, रंगीत कागद, वेलदोड्याची साले अशा अनेक माध्यमांनी इतक्या वर्षांचे अंकुर सजले. नवनव्या कल्पनांचा वापर केला गेला. सुरुवातीला काही वर्ष मुखपृष्ठ व मलपृष्ठांसाठी फुले, पाने, पक्षी, नक्षी, स्त्री, निसर्गचित्र, बाळे, लहान मुले, प्राणी यांची चित्रे काढली जात. पण नंतर मात्र अंकाच्या मध्यवर्ती कल्पनेनुसार मुखपृष्ठ व मलपृष्ठ सजू लागली. आणि अंकातील सुशोभनही त्यानुसार केले जाऊ लागले.
पंचमहाभूते - विशेषांक 

२८व्या वर्षी, वर्षभर सगळ्यांनी लिहिते रहावे यासाठी अंकुर शिवाय अजून ३ अंक काढले.  कवडसे, मोहोर व रिमझिम अशी नावे त्या वर्षीच्या संपादकांनी ठरवली. ३२व्या अंकात “पंचमहाभूते” पंचतत्त्वांवर आधारित १-१ तत्त्व एकेका गटाला देऊन त्या त्या तत्त्वाची सर्व माहिती असलेले ५ अंक काढले. त्यांच्या खर्च स्नेहसख्यांनी आपापल्या व्यवसायाची जाहिरात देऊन उचलला. ३६व्या वर्षी संपादकानी सर्व सभासदांना ७ विभागात विभागून ७ “सान” अंकुर काढले. त्याचा उद्देशच सगळ्यांचा सहभाग व त्यातून नवनवीन लोक अंकुरसाठी तयार व्हावेत यासाठी होता. नकळतपणे त्या सातही अंकांची विशेषता वेगवेगळी निघाली. अष्टपुष्प, कथांकुर, अलंकार, दशांकम, मनापासून, कडबोळी काव्याची, मिश्किल अशी त्यांची नावे होती. प्रत्येक सभासदाने खूप मनापासून कल्पना लढवल्या व संपादकांचा मनसुबा साध्य झाला.

सान अंकुर 


हस्ताक्षराचे नमुने 

इतक्या वर्षांमधे विविधरंगी कागद, बॉर्डर्स वापरले गेले. सुरुवातीला कोऱ्या कागदाखाली रेघांचा कागद ठेवून लिहिले जात असे. आता मात्र रेघांचे व अंकांच्या मध्यवर्ती कल्पनेनुसार बॉर्डर असलेले कागद वापरले जातात. आता पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहिले जाते. फार पूर्वी चुकांवर नुस्ती काट मारली जाई, नंतर व्हाईटनर, तर आता व्हाईटनरची चिकटपट्टी वापरून दुरुस्ती केली जाते. सुयोग्य पध्दतीने शीर्षके व चित्रे, काढली जातात. आधीच्या अंकांमधे जशी जागा तसे कविता, कथा लिहिले जात असे, आता त्यांचे वेगवेगळे विभाग केले जातात. विभागांना सुयोग्य पहिले व शेवटचे पान असते. त्यातही खूप नवनवीन कल्पना वापरल्या जातात. 'अंकुर' हा स्नेहधाराचा एक उपक्रम असल्याने त्यात स्नेहधारेच्या वाटचालीचा दस्तऐवज आपोआप येत गेला. जसे की त्या वर्षीची कार्यकारिणी, स्नेहाक्षरे वाचकमंचाची माहिती, वाचनालयाची माहिती, संपादक मंडळ, स्नेहधारा साहाय्यक समिती ट्रस्ट, अशा स्नेहधारेच्या पाचही उपांगांची त्या त्या वर्षीची माहिती अंकुरमधे सामावली जाऊ लागली.

आतापर्यंत “सय” चे ३ विशेषांक काढले. १२व्या, २५व्या व ३७व्या वर्षी. त्यात तोपर्यंतच्या अंकुरमधले निवडक साहित्य घेतले गेले व ज्या कारणासाठी सय काढले गेले त्याविषयीही सर्व काही समाविष्ट केले. रौप्यमहोत्सवी वर्ष, नव्या वास्तूची निर्मिती-ट्रस्टची निर्मिती, स्नेहाक्षरेचा विशेष कार्यक्रम, वेगवेगळ्या मंडळांसोबत केलेले कार्यक्रम या सगळ्यांची नोंद अंकुरमधे झाली आहे, तसे फोटोही त्यात आहेत. स्नेहधारेच्या दर वर्षीच्या दोन्ही सहली, नाटके, विविधगुणदर्शन, सभा, पाककृती, हस्तकला, क्रिडा स्पर्धांचे, सामाजिक कार्याचे फोटो दरवर्षीच्या अंकुरमधे बघायला मिळतात. अंकुरचे तीन अंक तीन सख्यांनी एकहाती लिहून खूप जबाबदारीने पूर्णत्वाला नेले.

अंकुरच्या सुरवातीच्या दिवसामध्ये घरोघरी जाऊन लेखनिकांना कागद पुरवणे, शाईची पेन नेऊन देणे, एकमेकांच्या घरी जाऊन चित्र काढणे, लिहिणे व्हायचे नंतर मात्र बरीच वर्ष पद्माताई साठे यांच्या घरी एकत्र बसून कामे होऊ लागली, त्या सगळ्यांना रंग, पेन्सिल, पेन, लेटरिंग/अक्षर सुशोभनाची पुस्तके व अंकुरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू पुरवायच्या. त्याच्या जोडीला खाऊही आलाच, संपादक मंडळ सगळ्यांच्या पोटोबाची काळजी घेतातच तीही मजाच. आधी शाईची पेन वापरली जात. आता जेल पेनचा जमाना आला. सगळ्यांची एकत्र कुटुंबासारखी एकजूट, मिळणारा आनंद, आपलेपणा, सहकार्य, व त्यातून एकमेकांकडून नवे काही तरी शिकणे आणि दुसऱ्यांच्या गुणांचे कौतुक या गोष्टी विनासायास घडत  गेल्या. आता सगळे दूरदूर राहायला गेले. प्रवासात फार वेळ जाऊ लागल्याने आता सोयीनुसार एकएक विभाग पूर्ण केला जाऊ लागला. त्याचे लेखन, सुशोभन त्या त्या जागी होऊ लागले. आधीपासून नियोजन होऊ लागले व त्यानुसार जास्त काटेकोरपणा येत गेला.

'अंकुर' साठी कथापूर्ती, चारोळ्या, चित्रावरून कविता/ चारोळ्या/ लेख, पोस्टकार्ड वर लघुकथा लिहिण्याची स्पर्धा, प्रशस्तिपत्रक लेखनाची स्पर्धा, दिलेल्या विषयावर वैचारिक लेख लिहिण्याची स्पर्धा, विडंबन काव्य स्पर्धा, मुखपृष्ठ व मलपृष्ठ स्पर्धा, उत्स्फूर्त लेख/ कथा/ कविता/ चारोळ्या/ मुलाखतस्पर्धा, कथा/ कविता/ ललित/ वैचारिक लेख स्पर्धा, एवढेच काय तर चक्क हंडे/ कळशी/ तांबे/ खलबत्ता/ रोवळ्या/ शिदोरी/ सूप, "स्टिल लाइफ" सारखे मांडून त्यावर उत्स्फूर्त लेखन प्रकार स्पर्धाही घेतली. कविता, कथा, नाटक लिहून स्नेहसख्यांनीही पुरेपूर न्याय दिला. विविध स्पर्धांसाठी आम्ही तयार झालो. 'अंकुर' मध्ये दरवर्षी प्रथम क्रमांकाच्या कवितेला सिंधु जालीहाल पुरस्कृत फिरता चषक दिला जातो.

अंकांसाठी विविध मध्यवर्ती कल्पना घेतल्या. संस्कृती, अन्न, कलासाधना, ऋतुचक्र, प्रगती, लिपी/भाषा, विज्ञान, पंचमहाभूते, वस्त्रविभूषण, परिवर्तन, विज्ञान आणि धर्म, रंग, शोभादर्शक इत्यादी. तसेच वर्षविशेष म्हणून उत्पादन वर्ष, साक्षरता प्रसार वर्ष, वि.स.खांडेकर जन्मशताब्दी वर्ष, प्र.के.अत्रे जन्मशताब्दी वर्ष वगैरे विषयांवरही 'अंकुर' मध्ये लेखन आलेले आहे.

साहित्य विश्वात घडत असलेल्या घडामोडींची दखलही 'अंकुर' वेळोवेळी घेत आलेले आहे. ख्यातनाम किंवा विशेष दखल घेण्यासारख्या काही जणांच्या मुलाखती उदा. उत्खननासारख्या वेगळ्याच क्षेत्रात काम करून ख्याती मिळवणाऱ्या डॉ. सुषमा देव. त्याशिवाय साहित्यिकांशी गप्पा, विविध भाषांमधल्या कथांचे मराठीत अनुवाद, देश विदेशांमधल्या सफरींची प्रवासवर्णने, श्रद्धांजली इत्यादी. आमच्या एका दुर्धर रोगाने निधन झालेल्या स्नेह्सखीचे शेवटचे पत्र वाचून आम्ही हळवे होतो. वैचारिक लेख वाचून आमच्या विचारांना चालना मिळते. सहलीचे वृत्तांत वाचून परत एकदा तीच मजा अनुभवतो. एकूण काय सर्व साहित्याचा आस्वाद घेतो.

लेख स्पर्धांमध्ये विविध विषय हाताळले जातात. नाती किती खरी किती खोटी, हो मी गृहिणीच आहे, निसटलेले क्षण, आठवणीतल्या गोष्टी, नकार देणे व पचवणे समृद्ध व्यक्तिमत्वाची गरज, आम्ही मधली मी, मी कोण?, आवड असली की सवड असते, फसवणूक, स्त्रीला स्त्री असण्याचे फायदे, हल्लीच्या मुलांना आजी आजोबांची गरज असते का?, शिक्षण व डोनेशन एक घातचक्र, चाळीशीच्या उंबरठ्यावर, कशी मी अशी मी, माझी फजिती, मामाचा गाव हरवला, आजच्या काळात खरी मातृभाषा कोणती? आपण जगात मुखवटे घालून वावरतो का?, एका वेलीवरची फुले-भावंडे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, पुढील आयुष्यात काय करावेसे वाटते, ठेविले अनंते तैसेचि [न?]राहावे, आणि ती बाहेर पडली, अशी भेटली मला अंधश्रद्धा, करिअर व जोडीदार, माझी मुलगी माझी सखी, जाऊ तिथे खाऊ, माझ्या कुटुंबाच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थैर्यासाठी मी काय करते/ करू शकते, आम्ही एकमेकांच्या प्रेमात, आणि पुढे काय? असे कितीतरी.

काही संपादकांनी ख्यातनाम लेखक/ लेखिकांकडून स्पर्धांचे परीक्षण केले. एक वर्षी तर वेगवेगळ्या वयोगटातल्या तीन परीक्षकांकडून सर्व साहित्याची परीक्षा झाली. काही पाहुणे परीक्षक गावाहून आले तर काही बंगलोरचेच होते. संपादन करत असताना बारीक सारीक प्रश्न निर्माण झाले. छोट्या मोठ्या अडचणी, रूसवेफ़ुगवेही ओघाने आलेच पण त्या अडथळ्यांना पार करत अंकुरची घोडदौड सुरु आहे. सख्यांचे लेखनही प्रगल्भ होत आहे, पण अंकुर सगळ्यांचा असल्याने आणि सभासदांना "लिहिते" करण्यासाठी असल्याने सर्व प्रकारच्या लेखनाचे आम्ही स्वागत करतो.
एखाद्या अंकुरचे उदाहरण म्हणून सांगायचे झाल्यास "अन्न" विशेषांकात मुखपृष्ठावर अन्नपूर्णेचे पूजेतले देवीस्वरूप आहे, तर मलपृष्ठावर आधुनिक अन्नपूर्णा चित्रित आहे. म्हणजे फूड पिरॅमिड काढलेला आहे. पुरुष/स्त्री दोघेही स्वैपाक करतात. त्यांनी विविध प्रकारचे डाएट पाळताना चौरस आहाराच्या या आधुनिक अन्नपूर्णेची आराधना करावी म्हणून. अंकात सर्व काही अन्नाशी निगडित, सैन्यातल्या खानप्रकारापासून ते अवकाशातल्या खानप्रकारापर्यंत सर्व काही. एफ. डी. ए आणि एफ. एस. एस. ए. आय. संस्थांबद्दल माहिती, फूडपेटंट, आंतरराष्ट्रीय बियाणेगृह, वॉटर फूटप्रिंट, फूड स्टायलिंग, शेतीपासून पचनसंस्थेपर्यंत सर्व काही. या अंकात जेवणाचे वाढलेले पान ही कल्पना घेऊन पंचपाळ्यातील जिन्नस, कोशिंबिरी, भाज्या, तृणधान्य, डाळी, पक्वान्न, व मुखशुद्धीतील सर्व पदार्थांची संपूर्ण माहिती सभासदांचे गट करून लिहायला दिली आणि शास्त्रशुध्द माहिती गोळा झाली. म्हणजे आपल्या रोजच्या जेवणातून आपल्याला किती गोष्टी मिळतात ते कळले. अन्नावरील म्हणी, सिनेमे, अन्न शिजवायच्या भांड्यांचे गुणधर्म, श्लोक, वेगळी व नवी विविध उपकरणे यांची पानपूरके, विभागीय चित्रेही असा परिपूर्ण अंक तयार होतो. तसेच विज्ञानाचा सबकुछ वैज्ञानिक अंक. चीन, मेसोपोटेमिया, रोमन, ग्रीक, सिंधू, इजिप्त यांचा संस्कृतीचा सुसज्ज विशेषांक. लिपीवरचा सर्वांगसुंदर अनेक लिपींचा अभ्यासपूर्ण अंक. किती सांगावे तेवढे कमीच.

संस्कृती विशेषांक - एक झलक 

गेल्या ४० वर्षांत साधारण ३०००-४०००च्या वर सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांनी अंकुरच्या वाचनाचा आनंद घेतला आहे. काळानुसार अंक जुने होत आहेत. पण त्यांची नीट निगा राखली जात आहे. बायका जबाबदारीने सांभाळत आहेत, तरीही ४० पैकी २ अंक गहाळ झाले. म्हणून पुढे असे काही होऊ नये म्हणून झेरॉक्स व सॉफ्ट कॉपी करायला सुरुवात झाली आहे. अंक सुरक्षित ठेवले आहेत. त्यांची जबाबदारी एका वरिष्ठ सखीवर दिली आहे व ती त्यांचा अत्यंत निगुतीने सांभाळ करत आहे. आता जुन्या सर्व अंकांची सॉफ्ट कॉपी करण्यात येईल आणि आमच्या वेबसाईटवर गेल्या काही वर्षांचे अंक वाचायला मिळू शकतील. पण तरीही अंकाचे प्रथम स्वरूप हस्तलिखित हेच असेल.

'अंकुर'चे इतक्या वर्षांचे अंक हा खजिना आहे आणि इतक्या सख्यांची बौद्धिक मालमत्ता आहे. त्यामुळे तो जपायलाच हवा. ह्या लेखासाठी अनेक स्नेहसख्यांचे मदतीचे हात पुढे आले त्या सगळ्यांचे मनापासून आभार.

स्नेहधाराचा वार्षिकोत्सव जागतिक महिला दिनाला साजरा होतो व त्याच वेळी अंकुरचे प्रकाशन होते. येत्या ८ मार्चला ४१ वा अंकुर प्रकाशित होईल तो देखील असाच विशेष व सर्वांगसुंदर असणार आहे. 
अंकुर ४१वा अंक 

अंकुरच्या प्रथम अंकात एक आशा व्यक्त केली गेली होती की "स्नेहधाराच्या एका एका धाग्याने या अंकुराची जोपासना आणि संगोपन मन लावून केले तर पाहता पाहता त्याचे कल्पवृक्षात रूपांतर केव्हा होईल समजणारही नाही" त्यांची ही आशा पूर्ण झाली आहे. त्या वृक्षाची सावली आम्हाला मिळते आहे हे आमचे खरंच भाग्य. हा फुललेला, फळांनी लगडलेला कल्पवृक्ष असाच बहरलेला राहावा, मोठा होत राहावा हीच आमच्या सगळ्यांची सदिच्छा!


विद्या पळसुले


11 comments:

  1. 'Ankur' Journey excellently replicated.
    SARVASAMAVEKSHAK !!

    ReplyDelete
  2. Wa! Lajawab narration of Ankur and Snehdhara journey! May this Snehdhara always flow and keep Ankur alive. All the best to the entire team!

    ReplyDelete
  3. May the journey of Ankur continue and blossom into a tree..

    ReplyDelete
  4. 'कथा अंकुरची'लेख वाचून धन्य वाटले.४० वर्षांचा अंकुरचा प्रवास
    विद्याने सहज शब्दात घडविला.त्यात सहभाग होता आणि आहे याचा अभिमान वाटतो.अंकुर, स्नेहधारा आणि विद्याला मनापासून शुभेच्छा !💐

    ReplyDelete
  5. सरोज घोरपडकर

    ReplyDelete
  6. Very well written i am very pleased and proud to be part of this group

    ReplyDelete
  7. Remarkable.. 41 वर्ष... .

    ReplyDelete
  8. अतिशय छान उपक्रम.'अंकुर' चा ४० वर्षांचा प्रवास विद्या पळसुलेनी फार छान मांडला आहे. स्नेहधारा आणि अंकुरच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

    ReplyDelete
  9. Ankur is a cultural heritage - and it needs to be properly preserved!!

    ReplyDelete
  10. Excellent initiative. Wish many more years of growth to Ankur.

    ReplyDelete
  11. तब्बल बेचाळीस वर्षे चाललेला अखंडित प्रकल्प! केवढे सातत्य, केवढी प्रतिभा, किती मेहनत आणि कसा ध्यास. मुळात स्नेहधारा हीच एक सांस्कृतिक आश्चर्य आहे. तिचे अपत्य अंकुरही तसेच असले तर नवल काय! पुढील चाळीस वर्षांसाठी शुभेच्छा.

    ReplyDelete