कविता - आनंद यात्री

 




जीवनाचा डोह आटला

झडली सगळी पाने

मनात माझ्या तरीही स्फुरते

श्रावणातले गाणे

 

माध्यान्हीचे चढले ऊन

क्षितिजाची रखरखती रेघ

नजरेपुढती मात्र तरीही

कृष्ण सावळा दिसतो मेघ

 

वैशाखाचा मास लागला

शुष्क कंठ पायांचे ओझे

अंतरात या तरीही माझ्या

दिडदा दिडदा सतार वाजे

 

कितीही दु:खे कितीक संकटे

पाऊल माझे मुळी न अडे

माझ्या वरती सदा बरसती

गंधफुलांचे सोनसडे

 

पोहोचायचे कुठे कशाला

सौंदर्याचे मला पिसे

निसर्ग वेडे मन हे माझे

त्याची सोबत मला असे

 

ओठावरती सदैव गाणे

गात गात मी वाट चालतो

यात्रिक मी हो आनंदाचा

वाटेवरती मधु टिपतो

 

संजय बापट




 

1 comment:

  1. वा! संजय बापट यांची सुंदर कविता बऱ्याच दिवसांनी वाचली. धन्यवाद

    ReplyDelete