कविता - भरारी

 


 

कुणी निवांत पक्षी गाणे गाऊन गेला

जाता जाता हळूच काहीसे सुचवूनी गेला

 

मातीवरती घट्ट पाय मी रोवून होतो

निळ्या नभाला पाहून थोडा उदास होतो

गात गात तो त्याच नभाला भिडून गेला

जाता जाता हळूच काहीसे सुचवूनी गेला

 

पंख मला तर कधीच नव्हते

मुक्त गळ्याने गाणे म्हटले नव्हते

गात गात तो खुशाल उडुनी गेला

जाता जाता हळूच काहीसे सुचवूनी गेला

 

तुडवत आलो एकच मळकी वाट

महाजनांची पडली जी वहिवाट

हा नभास आपली वाट दाखवीत गेला

जाता जाता हळूच काहीसे सुचवूनी गेला

 

चौफेरी या मीच बांधल्या भिंती

आकाश झाकले, बांधून छप्पर वरती

तो कटाक्ष हसरा टाकून मजवर गेला

जाता जाता हळूच काहीसे सुचवूनी गेला

 

मीच घातल्या बेड्या माझ्या हाती

स्वातंत्र्याची मला वाटली भीती

तो दि:कालाच्या बंधनातुनी सुटून गेला

जाता जाता हळूच काहीसे सुचवूनी गेला

 

संजय बापट




 

2 comments: