एका कवितेच्या जन्माची गोष्ट


एखाद्या कवितेचे किंवा कथेचे बीज एखाद्या प्रसंगातून किंवा एखाद्या विचारातून मनात रुतून बसते. कालांतराने हे रुजलेले बीजच एखाद्या कवितेचे वा कथेचे रूप घेते. अव्यक्तातून ते अमूर्त काहीतरी मूर्त रूप धारण करते, अशी माझी ही कवितागंधफुलांनो'.

मी विरार, आगाशी या भागात लहानाची मोठी झाले. हा भाग फुलांच्या वाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. सोनटक्का, सोनचाफा, केवडा, मोगरा, जाई, जुई, चमेली अशी वासाची तर कागडा, तगर, ऍस्टर, झेंडू, सूर्यफूल, तेरडा, सदाफुली, घाणेरी अशी बिन वासाची किंवा उग्र वासाची फुलेच फुले. फुलांची नुसती लयलूट!


 मी प्राथमिक शाळेत असताना गावठाणातल्या गुजराथी शाळेजवळ मला घाणेरीची झुडपे पहिल्यांदा दिसली. घाणेरीची फुले म्हणजे अनेकविध रंगांच्या अगदी चिमुकल्या फुलांचा गुलदस्ता. या फुलांनी मला प्रचंड मोहवले. यात काही पिवळे, केशरी, लाल अशा गडद रंगांच्या चिमुकल्या फुलांचे गुच्छ तर काही गुलाबी, निळे, पांढरे अशा फिकट रंगांचे चिमुकले गुच्छ. एकाच गुच्छात अनेक रंगांची फुले कशी? असा प्रश्न माझ्या बालमनाला पडायचा. मी फुले तोडून घरी न्यायला निघाले की मैत्रिणी म्हणायच्या, "अग ती घाणेरी आहे. देवाला वाहत नाहीत आणि डोक्यातसुद्धा माळत नाहीत.” मी अगदी हिरमुसून जायची. एवढी सुंदर फुले!!! सुवास नसला म्हणून काय झालं? त्यांचे कोणालाच कसे कौतुक नाही? आणि वरून घाणेरी असे वाईट नावही दिलेले. इथे या कवितेचे काव्यबीज माझ्या मनात रुजले. पण ह्यावरील कविता मात्र १०-१२ वर्षांनंतर (१९९३कॉलेजमध्ये असताना माझ्या हातून लिहिली गेली.

माझी आई मला नेहमी काव्यसंमेलनात भाग घ्यायला आणि कविता मासिकांत पाठवायला खूप प्रोत्साहन द्यायची. खरे तर मागेच लागायची. तिने वृत्तपत्रात एका काव्य स्पर्धेची जाहिरात पाहिली. मासिकाचे नाव होते "इरिंग मिरिंग". तिची कटकट नको म्हणून मी 'गंधफुलांनो...' ही कविता त्या मासिकाला पाठवली. ते कुठेतरी जालना वगैरे भागातले मासिक होते. कविता पाठवली आणि मी विसरूनही गेले. एखाद्या महिन्यानंतर घरी पत्रे यायला सुरुवात झाली. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यातून बारा-पंधरा पत्रे घरी येत होती आणि हा प्रकार दोनतीन महिने चालू होता. पोस्टकार्डांच्या काही गड्ड्या जमा झाल्या. या सर्व पत्रांत कवितेचे खूपच कौतुक केले होते. पण या कवितेला त्यांनी दलित लोकांची भावना वगैरे वगैरे अशा चष्म्यातून पाहिले होते... मला असले काहीच अभिप्रेत नव्हते... मला या सगळ्याची खूप गंमत वाटली आणि या कवितेची ही गोष्ट माझ्या मनात कायमची कोरली गेली. तीच कविता खाली देत आहे.

गंधफुलांनो...

गंधफुलांनो हसू नका रे
गंधहीन त्या रानफुलांना
नका वेदना देऊ तयांच्या
अव्याज कोवळ्या मृदू मनांना

कुणा प्राक्तनी असेल लिहिले
साज चढविणे सौंदर्यावर
कुणा हृदयीचा भाव भक्तीचा
अर्पिल कोणा प्रभुपदावर
तर कुणा हृदयीचे अंतिम वंदन
वाहील कोणी तुम्हा शवावर

गंधफुलांनो जीवन तुमचे
अखेर बांधील परइच्छांना

परिमल आशिष तुम्हास दिधला
विश्वविधात्या जगदीशाने
रंग खजिना असा उधळला
रानफुलांवर त्याच प्रभूने
कुणास रंग कुणास परिमल
कुणास काटे कुणास मृदुपण

कुणा हसावे? कशा हसावे?
फ़ुललेपण जर मिळे साऱ्यांना


अलका देशपांडे 


4 comments:

  1. "छोट्याही विषयात आशय मोठा किती आढळे" ही उक्ती सार्थ करणारी कविता!

    ReplyDelete
  2. अलका, अशी कविता तुलाच सूचू शकते

    ReplyDelete
  3. नीना वैशंपायनAugust 1, 2020 at 2:26 PM

    अलका खूप छान लिहिल आहेस आणि कविता तर सुंदरच.
    अशा दुर्लक्षित फुलांवर तू इतक सुंदर काव्य लिहिलस.

    ReplyDelete
  4. वा सुन्दर कविता. A आजकाल खूप दिसतात ही फुले.आणि खूप रंगांची.

    ReplyDelete