काव्य कसे असावे?


अलिकडे अनेक साहित्यप्रेमींच्या गटांवर खूप कविता प्रसिद्ध होत असतात, आणि सध्या या विषयावर खूप उहापोह सुरू आहे! मी ह्यामधील तज्ञ अजिबात नाही. खूप छान रचना करणारे कवी इथे आपल्या अनेक सु्ंदर रचना सादर करत असतात, वेगवेगळे काव्यप्रकार ह्या गटांवर शिकायला मिळत आहेत, एकाच शब्दावर वेगवेगळ्या भावनांचे काव्यात्मक अविष्कार वाचायला मिळत आहेत, ह्यापेक्षा जास्त एखाद्या विद्यार्थ्याला काय हवे असते?

मी शाळेत असताना शाळेच्या मासिकासाठी आम्हाला कविता पाठवायच्या होत्या, त्यासाठी शाळेने स्पर्धा ठेवली होती, त्यावेळी आमच्या मराठीच्या शिक्षिकेने (१९७५ ते ८० ह्या काळी शिक्षक हे त्या विषयाचे तज्ञच असायचे) एक कार्यशाळा घेतली होती, त्यात सांगितलेले मला आठवतील ते मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न करतेय!

१. काव्य नेहमी गेय असावे, ठेक्यात वाचतां येण्याजोगे!

२. प्रत्येक ओळ विषयाला धरून असावी, पहिल्या ओळी पासून ती खुलवत न्यावी, शेवट जमला तर त्याचा कळस असावा, किंवा आकर्षक असावा. त्या काळच्या कवींच्या कितीतरी रचना त्यांनी तेंव्हा समजाऊन सांगितल्या, पृथ्वीचे प्रेमगीत हे मला आठवत असलेले उदाहरण!

३. कविता कधीही दुर्बोध असू नये, वाचताना वाचकाला कळेल, आवडेल अशी शब्दरचना असावी, गदिमांच्या कवितांचे उदाहरण दिले होते!

४. अति मोठी रचना असू नये, विषय भरकटण्याची शक्यता असते आणि वाचताना कंटाळा येऊ शकतो!


५. कविता मराठीत लिहायची आहे तर शक्यतो मराठीच शब्द वापरावेत, संस्कृतप्रचुर लिहायचे टाळावे, नाहीतर पूर्णपणे संस्कृतमधे लिहावे. अति अलंकारिक भाषा टाळावी! बहिणाबाईंच्या रचनांचे उदाहरण दिले होते!




६. त्यावेळी कवितांचे छंद, वृत्ते ह्याला फार महत्व होते, शब्दसंख्या वगैरे! शक्यतो अशा छंदवृत्तात बसवावी, मुक्त छंद जरी वापरायचा असेल तरी फार भरकटू नये. यमकाकडे लक्ष द्यावे! उदाहरणार्थ शांता शेळके यांच्या रचना! 

७. आपण जरी आपल्या आनंदासाठी कविता लिहीत असलो तरी कुठेतरी ती वाचकांपर्यंत पोचावी असे वाटतंच असते, तेव्हा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ त्यांनाही समजेल अशी शब्दरचना असावी.

८. सर्वात महत्वाचे म्हणजे शुद्धलेखनाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, ,, अक्षरांचे वेगवेगळे होणारे उच्चार(phonetics)! ऱ्हस्व, दीर्घ इत्यादी!!

मी परत सांगतेय मी ह्यातली तज्ञ अजिबात नाहीये (माझ्याही रचना अजुन चाचपडताहेत, हे सगळं मलाही जमलेले नाही ) कुणाला हा माझा आगाऊपणा वाटला तर आधीच माफी मागते!!


रेवती कुलकर्णी




1 comment: